Sunday 13 September 2020

पाती..

 पाती...

आज घरी नारायण दशमी आहे. विदर्भातल्या एक-दोन जिल्ह्यात फारच कमी कुटुंबांमध्ये हा सण असतो. 90 टक्के विदर्भात हा प्रकार माहितीसुद्धा नसेल. आमच्या मूळ गावातल्या घरी आज सूर्यनारायणाची पूजा असते.कित्येक पिढयांपासून हे अखंड सुरू आहे. हळूहळू कुटुंब रुंदावलं, लेकरं गावाबाहेर पडलीत, संबंध कमी झालेत, तरी बहुतांश कुटुंबीय आपापल्या घरी नारायण दशमी करतात. हे व्रत तसं कडक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला कूळ बदललं तरी हे व्रत करावं लागतं.वडिलांच्या आत्याबाईंना वयाच्या पंच्यात्त्तरीपर्यंत नारायण दशमी करताना मी बघितलेलं आहे. घरातले अतिवृद्ध, गर्भवती स्त्रिया,पेशन्ट्स आणि लहान मुलं ह्यांना नैसर्गिक सूट मिळते.

देवावर श्रद्धा असली तरी देवाधर्माचं मी फार काही करत नाही. पण पिढ्यांपिढ्या सुरू असलेली नारायण दशमी कळत्या वयापासून मी आणि इतर भावंडं इमानेइतबारे करतो.

आता ह्यात काय विशेष असा प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर पुढं दिलंय..

जोपर्यंत पोटोबा व्यवस्थित सुरू आहे तोपर्यंत आपल्याला कशावरही आक्षेप नसतो. 

भरल्यापोटी मी प्रतिगामी,पुरोगामी,संघी,सनातनी,धर्मनिरपेक्ष,अंनिस समर्थक असा सर्वकाही आहे. पोटातल्या भुकेवर काही आलं की भूमिका बदलते.

आणि नारायण दशमी करताना नेमकं तेच होतं.


आज घरी नॉर्मल भाजी पोळीचा स्वयंपाक नसतो. तवा,कढई वापरता येत नाही. तेल,तिखट,मसाला इतकंच काय तर मिठसुद्धा चालत नाही.


मग खायचं काय?? 

"पाती"

पाती कशी करतात? 

कणकेत फक्त पाणी टाकून गोळा भिजवायचा. त्याला पोळीसारखं लाटून पाण्याच्या वाफेवर उकडायचं. ह्यातून जे काय तयार होईल त्याला पाती ऐसें नाव!

ही पाती मग सकाळ-संध्याकाळ दूध,दही,तूप आणि साखर ह्यासोबत खायची. सोबत फळं खाता येतात. पात्या किती खायच्या ह्यावर बंधन नाही. पण मुळात तीनपेक्षा जास्त पात्या आत ढकलणे शक्य नाही.आणि कितीही ढकलल्या तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही!

नारायण दशमी आहे!

वर्षातून एकदाच तर येते!

परंपरा! प्रतिष्ठा! 

वगैरे बोलून दिवस ढकलल्या जातो. 

पण संध्याकाळ? 

दिन ढल जाये हाय संध्याकाळ ना जाये..

रोटी ना आये, उसकी याद सताये...

अशी अवस्था होते.

रात्री नऊ वाजेपर्यंत मी नास्तिकतेकडे झुकलेला असतो.पण पूर्ण नास्तिकात रूपांतर होण्याआधी निग्रहाने चार पात्या खाऊन मी अंधारगुडुप होऊन जातो..!

झोपेत दचकून उठतो. घरात एखादी पाती शिल्लक तर नाहीये ना अशी शंका येते. कारण नियमाप्रमाणे पाती संपल्याशिवाय दुसरा स्वयंपाक करता येत नाही. मग पाती गाईला चारावी लागते. त्यासाठी सकाळी उठून शहरात गाय शोधा! अश्यावेळी गायी पण लपून बसतात.चुकून सापडल्याच तर पाती बघून तोंड फिरवतात. शेवटी त्यांनाही चॉईस आहेच ना!

मला दरदरून घाम फुटतो. मग आठवतं. शेवटची पाती आपणच कोंबलीये. 

परत अंधारगुडूप होतो.

आणि स्वप्नात गुणगुणतो,

तू किसी दशमी सी गुजरती हैं..

मैं किसी पाती सा..उकडा जाता हू !!

समाप्त


 --चिनार

Monday 24 August 2020

पाचूंडी!!


पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट..

एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला.
इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली. अन तिकडं कुतुबशाहाला कुणकुण लागली. त्याने लगोलग, मंत्र्यांना महाराजांची भेट घ्यायला पाठवलं. मंत्र्यांनी कुतुबशाहा तर्फे महाराजांना आमंत्रण दिले. महाराज थोडे नाराज होतेच. पण महाराजांच्या पूर्ण सेनेचे आदरातिथ्य व्हावे ह्यासाठी तयारी पूर्ण करण्यात वेळ लागला, आणि म्हणूनच आमंत्रण द्यायला उशीर झाला असा युक्तिवाद मंत्र्यांनी केला. महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी महाराज--कुतुबशाहा भेट आणि मावळ्यांना मेजवानी असा बेत ठरला.

ऐंशी हजार अन ते पण मावळे बरं का !! तुमच्या-माझ्यासारखे अर्ध्या भाकरीत आडवे होणारे कचकडे नव्हते ते. त्यात कुतुबशाहाने त्यांच्यासाठी पुरणपोळीचा बेत ठेवलेला..

अन पुरणपोळी म्हणजे, तुमच्या घरी बनते तशी तळहाताएवढी नव्हे..( कीर्तनकाराच्या अश्या प्रत्येक वाक्यावर आम्ही खळखळून हसत होतो!)

ऐका आता पुरणपोळी कशी होती ते..

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

आणि ही तयार झाली....पाच पोळ्यांची पाचूंडी !!!

मोठ्ठा शामियाना उभारला होता.. सगळे मावळे एकाच वेळी बसू शकतील असा..वाढायला हजार-पंधराशे लोकं होते..

मग काय विचारता? मावळे बसले जेवायला..मोठमोठाल्या ताटात पाचूंडी, सोबतीला साध्या पोळ्या, दोन भाज्या, कोशिंबीर, चटण्या अन ताटाबाहेर ताकाचा तांब्या..कुतुबशाहाचे आदेश होते..मावळे जेवत असे पर्यंत ताट रिकामं दिसायलाच नको..लक्षात ठेवा !!

मावळे भिडलेत...एक पाचूंडी, दुसरी पाचूंडी....तिसरी, चौथी, पाचवी....(इथपर्यंत ऐकून आम्ही गपगार झालो होतो). 

सांगा बरं एकेका मावळ्याने किती पाचुंड्या खाल्ल्या असतील ?? (आम्हाला विचारलं)

"सहा...."

"आठ"

"अकरा", (काही बोलतं का बे वगैरे उद्गार ऐकू येत होते..)

कोणत्याच पोराची कल्पनाशक्ती ह्या पलीकडे जात नव्हती...

"अबे पोट्टेहो...काय कामाचे तुम्ही? आकडा पण बरोबर सांगू शकत नाही ! खाणार काय तुम्ही?"

"ऐका...एकेका मावळ्याने वीस वीस पाचुंड्या खाल्ल्या लेकं हो !"

काय ??? 

वीस पाचुंड्या? सगळ्यांनी आश्चर्याने आ वासला होता...

वीस गुणिले पाच म्हणजे शंभर...गुणिले ऐंशी हजार ... म्हणजे आठ लाख...नाही नाही सोळा लाख...नाही ऐंशी लाख बहुतेक...मी तिथल्या तिथे तीन वेळा हिशोब चुकवला..

कीर्तन संपलं..तरी हिशोब जुळत नव्हता...

आणि येणार प्रत्येक आकडा हा नवे नवे उच्चांक गाठत होता..

दोन-तीन दिवसांनी ऐंशी लाख हा आकडा फायनल झाला..

पण ऐंशी लाख पुराणपोळ्यांना लागणारं पुरण (ते सुद्धा आठवतंय ना, परातीएवढी एक पोळी, त्यावर अर्धा किलो गावरान तूप वगैरे वगैरे !) करायला किती हरभऱ्याची डाळ भिजवली असेल? कधी भिजवली असेल? साखर किती वापरली असेल? एका पाचूंडीला अडीच किलो ह्या हिशोबाने चाळीस लाख किलो गावरान तूप कढवायला किती गावरान गाई म्हशी कुतुबशाहाकडे असतील? एका मावळ्याने पाच तांबे ताक जरी प्यायलं असेल तरी चार लाख तांबे ताक बनवायला किती मोठं भांड वापरलं असेल? 
ह्याचा मी अजूनही हिशोब करतोय..

ह्यात कीर्तनकाराने त्याच्या पदरचा मसाला, तुपाची धार वगैरे सोडली असेलच ह्यात शंका नाही. पण एका मावळ्याने तीन-चार पाचुंड्या जरी खाल्ल्या असतील तरी पंधरा-वीस पुरणपोळ्या होतात हो !

दरवेळी पुरणपोळी खाताना ही पाचूंडीची गोष्ट मला आठवते. आणि निग्रहाने खाऊन सुद्धा तीन पुरणाच्या पोळी पलीकडे मजल जात नाही.

आयुष्यात एकदा तरी, दोन दिवस पुरवून पुरवून का होईना पण एक तरी पाचूंडी खायची इच्छा आहे !

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

पाच पुरणपोळ्यांची एक पाचूंडी !

समाप्त 

चिनार 

(तळटीप: ही कथा कीर्तनकाराने सांगितलेली आहे. ह्या मागील ऐतिहासिक सत्य मी तपासलेलं नाही. कथेला कथा म्हणूनच घ्यावे ही विनंती!)

Thursday 13 August 2020

नारायण...लॉकडाऊन इफेक्ट्

 दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली.

त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन,


"काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली!  सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला.


"बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?"    


"नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले 


आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही. त्याने सॅनिटायझरची बाटली दिली गण्याच्या हातात अन गण्याला बजावून सांगितलं


"हे बघ गण्या, दोन थेंबाच्यावर कोणाच्याच हातावर टाकू नको सांगून ठेवतो! संध्याकाळपर्यंत हीच बाटली पुरवायची आहे लक्षात ठेव"


"अहो पण चार बाटल्या आणल्यात ना नारायणभाऊ?


"म्हणून काय लगेच संपवायच्या का? किती महाग झालंय सॅनिटायझर माहितीये का? जेवढं उरेल तेवढं संध्याकाळी वापस करायला येईल असं बजावून आलोय त्या मेडिकलवाल्याला मी! तो मला सांगत होता वापस नाही घेता येत म्हणून. मी म्हटलं, त्याला काय एक्स्पायरी असते होय रे? की सोडा असतो त्याच्यात झाकण उघडलं की उडून जायला. मला सांगतोय! तू जपून वापर"


"बरं"


"आणि हे बघ, शिंच्या अत्तर समजून लोकांच्या अंगावर सॅनिटायझर शिंपडू नको लक्षात ठेव."


गण्याला उगाचच दम देऊन नारायण पुढे निघाला. 


पुढे दोन बायका एकमेकांना चिपकून सेल्फी घेत होत्या. दोघीही 'अफाट' असल्याकारणाने एका फ्रेममध्ये बसणं शक्य नव्हतं. 


नारायण लगेच खेकसला,

"ए ए शकुताई! काय चाललंय? काय सोशल डिस्टंसिंग वगैरे काही आहे की नाही? जवळ उभं राहून काय सेल्फी काढताय. तू या कोपऱ्यात जा अन तू त्या कोपऱ्यात जा! अन लागेल तेवढे फोटो काढा जा"


"ए असं काय रे नारायण? दूर उभा राहून कसं काय सेल्फी काढणार रे?"


"हे बघ..लग्नात सोशल डिस्टंसिंग पाळणार अशी हमी तुझ्याच नवऱ्यानं दिलीये पोलीस स्टेशनमध्ये. त्याचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावायचा नसेल तर सांगतो ते ऐक. नाहीतर तुझं तू बघ"


नारायण पुढे निघाला,

"नारबा, चहा-नाश्ता नाही आला अजून? व्याही पेटलाय तिकडं!"


"सकाळपासून तीन वेळा मी चहा पाजलाय त्यांना! कप सॅनिटाइझ्ड आहेत का असं विचारात होते मला.  मी म्हटलं कप,बशी, साखर,चहा पावडर इतकंच काय तर गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. आता बोला !!


तेव्हढ्यात नारायणाला मुलीच्या आईने आवाज दिला..तिच्यासोबत सात-आठ बायका होत्या.

"नारायणा, अरे मुलाकडल्या बायकांना हळदी-कुंकू द्यायचंय. वाण म्हणून प्रत्येकीला एकेक मास्क देऊ म्हटलं. तर हे कसले सुती कापडाचे मास्क आणलेस रे. मुलाच्या आईला तरी किमान गर्भरेशमी मास्क आणायचास ना!"


"काय करायचंय थेरडीला गर्भरेशमी? सुती कापड बरं पडतं त्यापेक्षा"


सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर मनसोक्त हसल्या.


"नारबा...मुलाचे मित्र परगावावरून आलेत. आता क्वारंटाईन केल्याशिवाय कसं काय सामील करून घेणार त्यांना?"


"काका, काही काळजी करू नका. त्यांची 'सोय' मी वरच्या खोलीत केली आहे. संध्याकाळपर्यंत उठणार नाहीत"


"अरे म्हणजे, दारू बिरू आणलीस की काय?"


"कसली दारू? सॅनिटायझरमध्ये ८२ टक्के अल्कोहोल असते म्हणतात. तेच ठेवलंय ग्लासात भरून!!"


असे एकानंतर एक हल्ले परतवत नारायण आपला डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा कार्यालयात थैमान घालत असतो.


नवरा-नवरी बोहोल्यावर उभे राहतात. मंगलाष्टक म्हणण्याची वेळ येते. आणि नेमका आंतरपाट सापडत नाही. 


"हे काय, साध्या आंतरपाटाची व्यवस्था करता येत नाही ह्यांना?", कोणतरी कुजबुजतं..


तेवढ्यात नारायण उत्तरतो,

"कश्याला पाहिजे आंतरपाट गुरुजी? लग्न लागण्याआधी एकमेकांचे चेहरे पाहायचे नाही हाच उद्देश असतो ना आंतरपाटाचा? हो ना!! मग हे काय मास्क लावलेत त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? चला सुरु करा मंगलाष्टक...म्हणा रे सगळ्यांनी..तदैव लग्न सुदिनं...."


आणि एकदाच लग्न लागतं..


नारायण डोक्यावर कफन बांधल्यासारखं चेहऱ्यावर मास्क बांधून पुढचा हल्ला परतवायला निघतो...


समाप्त...


चिनार

Monday 10 August 2020

अंबापेठेतले सिनेमे...

 आज सकाळी अक्षय अन सैफचं मैं खिलाडी तू अनारी गाणं सुरु होतं. काही आवाज, काही ओळखीचे वास डायरेक्ट भूतकाळात घेऊन जातात. तसं हे गाणं मला अंबापेठेत घेऊन गेलं.

अंबापेठ ! म्हणजे माझं आजोळ. अमरावतीच्या मध्यवर्ती भागात असलेली सगळ्यात जुनी वस्ती ! अंबापेठेचं आयुष्यातलं स्थान लिहिण्याजोगती प्रतिभा माझ्यात कधी येईल का ते माहिती नाही, पण आज त्यातल्या एका भागावर लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

अंबापेठेत पाहिलेल्या किंबहुना पाहायला मिळालेल्या सिनेमांची मोठी यादी तयार करता येईल. त्याकाळात आमिर, सलमान, शाहरुख ह्यांची चलती होती. तिघांचीही सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरु होती. अनिल कपूर, ऋषी कपूर ह्यांचा थोडाबहुत पडता काळ सुरु झाला होता तरीपण १९४२ ए लव्ह स्टोरी, बोल राधा बोल वगैरे सिनेमातून त्यांचं नाणं खणखणीत वाजत होतंच. आणि हे पाच-सहा लोकं सोडले तर इंडस्ट्रीत आदित्य पांचोली, राहुल रॉयपासून ते अक्षय कुमार, अजय देवगणपर्यंत असे बरेच लोकं होते ज्यांचे सिनेमे चालायचे किंवा पडायचे. पण ह्यांचा अमुक एक सिनेमा बघितला आणि आवडला असं चार चौघात सांगता येत नसे. ह्यांचे सिनेमे थेयटरमध्ये जाऊन बघण्याची आमच्यात पद्धतच नव्हती. थिएटरमध्ये हम है राही प्यार के, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे वगैरे बघायचे असतात. मोहरा, खिलाडी, दिलवाले कभी ना हारे हे सिनेमे बघायचेच नसतात अशी माझी एक समजूत होती. आता ह्याच्यामागे एक अर्थकारण सुद्धा होतं. आलेला प्रत्येक सिनेमा पोरांना दाखवणं हे कोणत्याच मध्यमवर्गीय पालकांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे सिनेमे दाखवायचे ते एकदम सो कॉल्ड प्रीमियम कॅटेगिरीतलेच असा विचार असायचा. मग बलवान, वक्त हमारा है, मैं खिलाडी तू अनाडी हे सिनेमे थोडे कनिष्ठ मध्यमवर्गीय प्रीमियम कॅटेगिरीत यायचे.

मग हे सिनेमे बघायला मिळाले कुठे? तर अंबापेठेत !!

आजोबांचा दिवस सकाळी रेडियोवर भीमण्णांच्या भूपाळीपासून सुरु व्हायचा. अन आम्ही चिल्लेपिल्ले त्यांचं पाणी वगैरे भरून झालं की उठायचो. मग नुसता गोंगाट ! दुपारी शांत झोपणं वगैरे प्रकार माहितीच नव्हते. मग आजोबा केबल टीव्हीवर आम्हाला एखादा सिनेमा लावून देऊन स्वतः वामकुक्षी करायचे.

तिथं बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे राहुल रॉयचा जुनून ! (कदाचित दुसरा असू शकेल पण आत्ता हाच आठवतोय)
तो राहुल रॉय पौर्णिमेच्या रात्री वाघ वगैरे बनतो अशी काहीतरी स्टोरी होती. आता एखाद्याला वाघ बनवायचं आहे तर राहुल रॉय ही काय चॉईस म्हणायची का? राष्ट्रीय प्राण्याला ट्रीट करण्याची ही काय पद्धत झाली ! पण ते वाघ वगैरे होण्याचं चित्रण जबरदस्त होतं बरं का. भीती वाटायची त्यावेळेला. पण मी एकटाच का घाबरू? म्हणून गणिताचा मास्तर पौर्णिमेला कोल्हा बनतो अशी एक अफवा मी शाळेत उठवली होती. (अफवांच्या विश्वात ही आजही अनबिटेबल आहे !)

मग सैफचा पहिला सिनेमा 'आशिक आवारा' बघितल्याचं आठवतंय. शर्मिला टागोर अन नवाब पतौडींचा हा मुलगा. रूप तेरा मस्ताना-प्यार मेरा दिवाना हे शर्मिलाजींचं गाजलेलं गाणं ! आणि नवाब पतौडींचा एक डोळा कृत्रिम होता असं म्हणतात. त्यावरून सैफचा एक डोळा बकरीचा आहे अशी एक अफवा उठली होती.(आईशप्पथ ! ही अफवा माझी नाही.) आणि यावरूनच सैफला हिणवायला, रूप तुला नसताना-बकरीचा डोळा असताना-शान कशाला मारतो रे गाढवा! असं एक गाणं म्हटल्या जायचं. (ही रचनासुद्धा माझी नाही). पण काही असो, सैफ मला तेंव्हापासूनच आवडायचा. आशिक आवरा, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, तू चोर मैं सिपाही असे त्याचे बरेच सिनेमे मी अंबापेठेत बघितले.

अक्षयने अंडरटेकरला उचललेलं याची देही याची डोळा त्या छोट्या पडद्यावरच बघितलं. जादूगर, इन्सानियत हे शूटिंग झाल्यावर परत अमिताभनेही कधी बघितले नसतील असे सिनेमे अंबापेठेत बघताना खूप मजा यायची.

गोविंदाचा आँखे सुद्धा तिथंच बघितलाय. संजय दत्तचे इनाम दस हजार, सडक, गुमराह,साजन, सुनील शेट्टीचे बलवान, गोपी किशन, टक्कर, अक्षयचे सपूत, खिलाडी सिरीजचे जवळपास सगळेच सिनेमे जर अंबापेठ नसतं तर कदाचित कधीच बघितले नसते. तिथं सिनेमे बघण्याचा एक तोटासुद्धा होता. आजोबांना मारधाड फारशी आवडत नव्हती. त्यामुळे आजोबा जागे व्हायच्या आधी सिनेमा संपलेला बरा असायचा. नाहीतर शेवटची फायटिंग सुरु झाली की आजोबा टीव्ही बंद करायचे. बऱ्याच सिनेमांचा शेवट बघायचा राहिला तो राहिलाच. सिनेमात थोडे इंटेन्स प्रसंग सुरु झाले की बरोब्बर तेंव्हाच आजोबांना कशीकाय जाग यायची हे एक कोडंच आहे. उठल्या उठल्या पहिले टीव्ही बंद !

अंबापेठेचा फायदा आमच्या आई बाबांनाही भरपूर झालाय.अंबापेठेच्या घराजवळच एक थिएटर होतं. त्यामुळे हक्काची पार्किंगची जागा उपलब्ध होती. पण आई बाबा तिथं स्कुटरसोबतच लेकरांनाही पार्क करून जायचे. माझ्यासाठी सिनेमा की आज्जी ह्यातली नैसर्गिक चॉईस आज्जीच असायची. आणि 'एका तिकिटाचे पैसे' हे अर्थकारणसुद्धा होतंच. आणि त्याहीपेक्षा सिनेमा बघताना एका लेकराची कटकट नसणं हे जास्त सुखावह होतं.

अंबापेठेत एका खोलीत लहान मामा राहायचा.तिथल्या लाकडी खिडकीत काचेच्या फ्रेम बसवल्या होत्या. त्यातील एका खिडकीमध्ये शशी कपूरच्या "सवाल" सिनेमाचं पोस्टर चिपकवलं होतं. तासोनतास आम्ही त्या पोस्टरकडे बघत राहायचो. उगाचच! तिथं त्या पोस्टरचं काय प्रयोजन होतं हा एक सवालच आहे.

असो.
अंबापेठ अजूनही आहे. पण ते घर पाडून आता नवीन घर उभारलंय. मोठा टीव्हीसुद्धा आहे.

आता आजोबा नाहीत...आजी खूप थकलीये..

पूर्वीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा मोठे होऊन उगाचच फार शहाणे झाल्यागत वागतोय..

चालायचंच... सिनेमातरी कुठं पहिलेसारखा राहिलाय !!

-- समाप्त

-चिनार

Tuesday 4 August 2020

राखी स्पेशल

शाळेत वर्गातल्या मुलींनी मुलांना राखी बांधण्याचा एक भिषण प्रकार होता. कोणत्यातरी शिक्षिकेच्या डोक्यात राखीनंतरच्या काही दिवसात हा उपक्रम यायचाच. त्यामुळे ऋषीपंचमीची फार आतुरतेने वाट पाहिली जायची.आता त्याचं कसं असतंय, क्रश वगैरे शब्द तेंव्हा माहिती नव्हते, पण असायचा एखादा गोजिरवाणा चेहरा वर्गात! जिच्याबद्दल भविष्य माहिती नसलं तरी वर्तमानातच राखी बांधून घेण्याचा अजिबात विचार नसायचा.

मग एके दिवशी वर्गात "ती" घोषणा व्हायची. काही पोरं गोंधळाचा फायदा घेऊन वर्गातून निसटायचा प्रयत्न करायची. आम्हाला ते पण जमत नव्हतं. कारण कोणीतरी फितुरी केली तर उद्या वर्गात सगळ्यांसमोर (आणि तिच्यासमोरसुद्धा) आपला उद्धार होण्याची शक्यता जास्त!! आणि का कोण जाणे माझ्या पत्रिकेत असे उद्धाराचे प्रसंग फार ठासून भरले आहेत! (पता नही ऐसी सिच्युएशनमे मैं आटोमॅटिक आगे कैसे आ जाता हू टाईप!) 

मग सगळे बकरे कुर्बानी द्यायला लायनीत उभे राहायचे.आणि समोर बकऱ्या! 

पहिली  मुलगी पहिल्या मुलाच्या हाताला राखी बांधेल, दुसरी मुलगी दुसऱ्या मुलाच्या हाताला असा क्रम असायचा. मला ह्याच्यात मेजर ऑब्जेक्शन होतं. अरे कमीत कमी ह्याच्यात तरी चॉईस द्या ना! ही काय जबरदस्ती? लोकशाही आहे ना देशात? ती काय फक्त नागरिकशास्त्रात शिकवण्यासाठीच का? आपापसात ठरवून घ्या बा बांधून तुम्ही असं म्हणायला काय जातं?

पण नाही.. तिथपण शिस्त त्येजायला..

मग ती कोणत्या नंबरवर उभी आहे त्यावरून आपला नंबर ठरवायची एक कसरत सुरू व्हायची. पण तिचे दिवाने दोन-चार तरी असायचेच ना. सगळ्यांच आपापले नंबर बदलले की परत गोंधळ. आणि वर सांगितल्याप्रमाणे, "पता नही ऐसी सिच्युएशनमें मैं आटोमॅटिक आगे कैसें आ जाता हू!"

शेवटी जे घडू नये तेच घडायचं!

हिंदू संस्कृती,सणवार,रितीरिवाज ह्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे.

पण जर हिंदूंची संख्या वाढवायची असेल तर शाळेत ह्या असल्या धंद्यांना चालना देऊन ती कशी वाढेल??

--एक संतप्त सवाल

--चिनार

Friday 26 June 2020

प्रिंटर आणि मी!


माझं आणि प्रिंटरचं काय वैर आहे माहिती नाही.पण मी प्रिंट दिली अन प्रिंटरजवळ गेल्यावर ती आलेली दिसली असं कधीच होत नाही. त्या लॅनचा तरी प्रॉब्लेम असेल किंवा आतमध्ये आधीपासूनच कागदं तरी अडकलेले असतील किंवा प्रिंटर हँग तरी झालेलं असेल! एकतर मी बसतो तिथून प्रिंटभर कोसभर लांब आहे. अश्यावेळी आपण दहा-बारा प्रिंट्स देऊन प्रिंटरजवळ  गेल्यावर तो मक्ख चेहऱ्याने आपल्याकडे बघताना दिसला की माझा तिळपापड होतो.

"अरे बाबारे, कंपनीत आम्ही आहोत ना मक्ख, आम्ही आहोत ना मठ्ठ !! तुला काय गरज आहे माणसात यायची !"

आता हे रोजचंच असल्यामुळे सवय झालीये. पण कधी कधी आपल्याला जेन्युईन अर्जन्सी असते. म्हणजे  मीटिंग मधून आपल्याला रिपोर्ट घेऊन येण्याचा निरोप आलाय,आपण घाईघाईत प्रिंट देतोय, धावतपळत प्रिंटरजवळ जातोय .आणि  हे भाऊसाहेब इकडे असहकार आंदोलन पुकारून बसतात ! मग त्यांच्या मिन्नतवाऱ्या करून रिपोर्ट घेऊन मीटिंगमध्ये पोहोचेपर्यंत तिकडे तो विषय संपलेला असतो.चिमणीच्या पिल्लाच्या बारश्याला निघालेली गोगलगाय त्याच्या लग्नापर्यंत तिथे जाऊन पोहोचते तशी आपली गत होते.

आता "त्यात काय एवढं!" असं वाटू शकतं. पण कॉर्पोरेट जगात त्या क्षणाला खूप महत्त्व असतं. Sometimes you are asked to prove your point on a piece of paper! आणि त्यावेळी फक्त प्रिंट वेळेवर येऊ न शकल्यामुळे  आपला पराभव होतो. बरं गोगलगाय असण्याचं किंवा पराभवाचं दु:ख बाजूला ठेवलं तरी तो माकडतोंड्या प्रिंटर अजूनही आपल्याला वाकुल्या दाखवत असतो त्याचा जास्त राग येतो.

आणि आजकाल कंपन्यांमध्ये ते सेव्ह पेपर इनिशिएटिव्ह सुरु झालंय.मी प्रिंटरच्या कारट्रिजची शप्पथ घेऊन सांगतो, हा इनिशिएटिव्ह मी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून राबवण्याचा प्रयत्न करतोय.  पण ज्या ज्या वेळी मी कागदं वाचवायचा प्रयत्न करतो त्या त्या वेळी ह्या प्रिंटरच्या आडमुठेपणामुळे मी तिप्पट-चौपट कागदं खर्च करून ते कारट्रिज संपवलंय !  सरळसाधी गोष्ट आहे, पाणी वाचवणं जरी आपल्या हातात असलं तरी ते वाचू देणं हे नळाच्याच हातात असतं. तसंच प्रिंटरचं आहे. पण सेव्ह पेपर हा इनिशिएटिव्ह प्रिंटरला मान्यच नाहीये. कारण त्याच्या बापाचं काहीच जात नाही ना !

लक्षात घ्या, हा माझ्या भावनांचा उद्रेक नसून मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकेल असा दावा आहे.     

जाता जाता एक सांगतो, तुम्ही कितीही कॉर्पोरेट तीसमारखां असाल

पण प्रिंटरमध्ये अडकलेला कागद फाटू न देता जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुमचं कॉर्पोरेट जीवन व्यर्थ आहे

आणि

प्रिंटरमध्ये शेवटचा कागद उरला असताना शंभर लोकांमधून जर तुमचीच प्रिंट आली असेल तर समजून घ्या,

You are the chosen one!!

 
समाप्त

Sunday 7 June 2020

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

#CinemaGully

#दिलवाले_दुल्हनिया_ले_जाएंगे

   टीव्हीवर डीडीएलजे सुरु आहे. राज (शारक्या) नुकताच युरोप टूर वरून परतला आहे. आपण सिमरनच्या प्रेमात आहोत हे त्याला आता कन्फर्म झालंय. तो स्विमिंग पूलजवळ बसलाय. तेवढ्यात त्याचे वडील अनुपम खेर तिथे येतात. शारक्याच्या हातात 'बीयर'चा टिन देतात. आणि मी शेगावचं दर्शन घेऊन आल्यावर वडील ज्या कॅज्युअलतेने मला, "किती वेळ लागला बे दर्शनाले?" असं विचारायचे त्याच कॅज्युअलतेने ते शारक्याला विचारतात, "लडकी का नाम क्या है?"

हातात बीयरचा टिन आणून देणं वगैरे तर कहर आहे. आम्ही शेगावचा प्रसाद वडिलांच्या हातात देताना डाव्या हाताने दिला म्हणूनसुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत. मुळात दर्शनाला लागलेला वेळ विचारायचं कारण, चिरंजीव इतक्या वेळ कुठं शेण खात बसले होते हे जाणून घेणे हेच असायचं. इकडे पोरगा एक महिना युरोपात काय दिवे लावून आला वगैरे प्रश्न अनुपम खेरला अजिबात पडत नाही. पुढे मग अनुपमजी शारक्याला कुठल्याही परिस्थितीत सिमरनशी लग्न करायचं असं बजावून भारतात पाठवतात. 'मैने तुम्हे जिंदगीभर ये तुनतुना बजाने के लिये पैदा नही किया था' असंही सांगतात. तसा प्रेमविवाहाला वगैरे आमच्या घरात विरोध नव्हता. आता वडिलांच्या पोटी शारक्या जन्माला आला नाही ह्यात त्यांची काय चूक ! त्यामुळे  कुठल्याच सिमरनने आम्हाला भाव दिला नाही हा भाग वेगळा. पण इथं सिच्युएशन वेगळी आहे हे लक्षात घ्या. सिमरनचं आपल्यावर प्रेम आहे ह्यावर शारक्या अजूनतरी कॉन्फिडन्ट नाहीये. अश्या परिस्थितीत,लंडन ते भटिंडा प्रवासखर्च लक्षात घेता, जिथं पोरीच्या मनात काय आहे हे माहिती नाहीये, तिथं आमच्या वडिलांनी काही आम्हाला "जाओ ,लेकर आओ मेरी बहू को" वगैरे म्हटलं नसतं भाऊ !!  आणि 'आपल्या देशात काय कमी आहे का पोरींची! त्यातली कर एखादी पसंत' असा अत्यंत प्रॅक्टिकल सल्ला दिला असता.

पुढं अनुपम खेरसुद्धा शारक्याला मदत करायला भारतात येतात. आणि सूनमुख पाहिल्यावर अभिप्राय देताना ते, "Excellent,Fantastic,Done!!" असं उदगारतात. माझ्या मते, ह्या प्रसंगातला बाप हा आदर्श बापाच्या व्याख्येतली जी प्रीमियम कॅटेगिरी असेल त्यात येतो. आपल्या इथले वडिल किमान मुलासमोर तरी मुलीविषयी मत देत नाही. बाकी मुलीचे वडिल,काका,मामा,भाऊ ह्यांच्याविषयी भलेही यथेच्छ चर्चा करतील. कारण लहानपणापासून ज्या मुलाला,"थोबाड बघितलं का आरश्यात?" हेच सुनावलं आहे त्याला लग्नासाठी मुलगी मिळते आहे हेच त्यांच्यासाठी मोठं यश असते. वडिलांनी मत दिलंच तर ते "जोडा शोभून दिसेल" ह्यापेक्षा वेगळं नसते. ह्यातला छुपा अर्थ, नगाला नग मिळाला ना...बस्स! असा असतो.

पुढे अनुपम खेर सिमरनला पळवून नेण्याचा सल्ला शारक्याला देतात. नव्हे, त्याच्यासाठी तिकीट वगैरे काढून स्वतः स्टेशनवर बॅग घेऊन उभे राहतात. एवढा मिलेनियर बाप अश्या प्रसंगी स्पेशल गाडी न करता भारतीय रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेनवर कसा काय अवलंबून राहतो हा एक प्रश्नच आहे म्हणा! पण असो! आता आमच्यासोबत घडलं जरी असतं तरी इथे आम्ही स्वकर्तृत्वाने माती खाल्ली असती. आमच्याकडे बघून अमरीश पुरीने,"जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी" तर नक्कीच म्हटले नसते.याउलट त्याने स्पेशल गाडी बोलावून आमची पाठवणी केली असती. 

तसंही एका मुलीचा बाप झाल्यापासून, शारक्याकडे धावत जाणाऱ्या सिमरनचा हात पकडणाऱ्या बापाच्या भावना काय असतात ह्याचा थोडाबहुत अंदाज आला आहे. आजकाल हा प्रसंग पाहताना क्षणभर का होईना पण  मी अमरीश पुरीच्याच बाजूने असतो. कारण,

बाप आखिर बाप होता है !

समाप्त

Tuesday 26 May 2020

तिचा काहीच दोष नसतो..

शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच  म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता.

आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो!

तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता. आता मधात माझं घर होतं त्याला ती करणार? पण "ती मुद्दाम तुया घरासमोरून जाते ना बे" हे मित्रांच मत. मग तिच्या येण्याजण्याच्या वेळी आमचं अंगणात चकरा मारणं ठरलेलं. मग एक दिवस घोळ होतो. तिच्या येण्याची अन मी समोरच्या गटारातून बॉल काढून, आंगभर शिंतोडे घेऊन, जग जिंकल्याच्या आविर्भावात फाटकाकडे येण्याची एकचं वेळ होते. आमचा अवतार बघून तिच्या मैत्रिणी हसतात. ह्यात तिचा काय दोष!

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो...

आता ताप काय कोणाला येत नाही का? तिलाही आला.डॉक्टरकडे गेली बिचारी. बरीच गर्दी होती. आतमध्ये कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला. दोनच मिनिटांनी कमरेवर हात ठेवून केबिनमधून मी बाहेर पडलो. ती तरी काय करणार?

तिचा काही म्हणजे काहीच दोष नसतो...

आता मी काही एवढा ढ वगैरे नव्हतो. पण एकदा गणिताच्या मॅडम चाचणी परीक्षेचे मार्क वर्गात सांगत होत्या. आमच्यातल्याच एका भैताडाने त्याच्या पेपरवर माझा रोलनंबर लिहिला होता. त्याला विसपैकी तीन मार्क मिळाले. मॅडमनी वर्गासमोर अन तिच्यासमोर माझा जाहीर सत्कार केला. दुसऱ्यादिवशी मॅडमला चूक लक्षात आली. त्यांनी वर्गासमोर ती मान्य केली. पण त्यादिवशी नेमकी ती आली नव्हती! आता घरी पाहुणे आले त्याला ती काय करणार...?

तिचा कधीच दोष नसतो..

तिचा भाऊ आमचा शाळेत नव्हता. पण भावाची "ती" आमच्या शाळेत होती. तो वरचेवर चक्कर टाकायचा. एकदा सायकल पार्किंग वरून झाले आमच्यात भांडणं. शाळा आमची होती त्यामुळे आम्ही शेर. धुतला त्याला सगळ्यांनी उभाआडवा. मी त्याची कॉलर पकडलेली. तेवढयात ती समोर आली. तिची बिचारीची काय चूक?

तिची कधीच चूक नसते...

ती वर्गाची कॅप्टन बनते. वर्गात दंगा होऊ नये ही तिची जबाबदारी असते. केवळ तिच्यासाठी मी शस्त्र खाली ठेवलेले असतात. पण एक दिवस...!

एक दिवस मागच्या बेंचवरच्या मुलाला शांत बसवण्यासाठी मी ओरडलेलो असतो. माझी काहीच चूक नाही हे तिलाही माहिती असते. पण राजधर्म!!! केवळ राजधर्म म्हणून माझे नाव ती फळ्यावर लिहिते.

तिचा काहीच दोष नसतो...

परत मित्र म्हणतात,

"अबे तिला तुझं नाव तिच्या हाताने लिहायचं होतं म्हणुन लिहीलंय. बघ किती सुंदर लिहीलंय"

आम्हाला लय गोड वाटतं

आता तिचं अक्षर मुळातच सुंदर असतं..त्यात तिची काय चूक..

तिचा काहीच दोष नसतो...

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो..

समाप्त





Tuesday 28 April 2020

सिनेमातले विनोदी प्रसंग..

परवा प्रियदर्शनचा खट्टामीठा सुरु होता. नेमका तो रोड रोलर नेण्याचा प्रसंग बघण्यात आला. हा एक अफाट  विनोदी सीन आहे.

प्रचंड नुकसानीत असलेला कंगाल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले (अक्षय कुमार) नगरपालिकेविरोधात एक कोर्टकेस जिंकतो. आणि नुकसानभरपाई म्हणून त्याला पालिकेच्या मालकीचा रोड रोलर मिळतो. पण तो रोड रोलर नादुरुस्त आहे हे टिचकुलेला माहिती नसतं. रोलर चालवण्यासाठी स्पेशालिस्ट ड्रायव्हर जॉनी लिव्हरला बोलावण्यात येते. आणि रोडरोलर पुराण सुरु होते. जॉनी लिव्हरने टिपिकल ड्रायव्हरच्या भूमिकेचं बेयरिंग अचूक पकडलं आहे. रोलर सुरु होत नाही हे पाहून,"अभी मेरेको समझ में आया इसका प्रॉब्लेम क्या है" असं दर दोन मिनिटांनी जॉनी म्हणत असतो. शेवटी पूर्ण इंजिन,गियरबॉक्स उघडूनही रोलर चालू होत नाही हे पाहून तो हत्तीच्या साहाय्याने ओढण्यात येतो. मग एका चढाईच्या रस्त्यावर दोर तुटून रोलर खाली घसरायला लागतो. कोपऱ्यावर असलेल्या नीरज व्होराच्या घराची भिंत तोडून रोलर पार लिविंग रूमपर्यंत पोहोचतो. काहींच्या काही आहे हा सीन पण दरवेळी बघताना मी पोट धरून हसतो.

विनोदी पंच नसलेले असे सिचुएशनल कॉमेडी सिन लिहिणं आणि पडद्यावर साकारणं अवघडच असतं. इथं स्क्रीनप्ले, कॅमेरा अँगल आणि कलाकारांचे एक्प्रेशन्स फार महत्त्वाचे असतात. ह्या प्रसंगात फुकाचा ऍटिट्यूड असेलला ड्रायव्हर,सतत पैसे खर्च करून काहीच हाती न लागल्याने फस्ट्रेट झालेला कॉन्ट्रॅक्टर , कॉट्रॅक्टरला शांत करून काही ना काही उरफाट्या आयडीया देणारा नोकर आणि ह्या सगळ्याशी काहीच संबंध नसताना उगाचच ह्यात गुरफटला गेलेला कोपऱ्यावरचा घरमालक ह्या चारही भूमिका अनुक्रमे जॉनी लिव्हर, अक्षय कुमार,राजपाल यादव अन नीरज व्होरा ह्यांनी फारच अफलातून केल्या आहेत.

या सगळ्यावर कडी म्हणजे प्रसंगातली शेवटची फ्रेम,

रोलरवर बसून घराची भिंत तोडून लिविंग रूममध्ये टीव्हीजवळ पोहोचल्यावर जॉनी म्हणतो,

"जरा स्पीड से अगर और आते ना, हमलोग वो रोड पे पहुचते थे...आई शप्पथ !"

प्रियदर्शनच्या सिनेमात असे प्रसंग बरेचदा पाहायला मिळतात. ह्याच सिनेमात पुढे सचिन टिचकुले बहिणीच्या लग्नासाठी म्हणून उधार मागायला एका हार्डवेयर शॉपच्या मालकाकडे (असरानी) जातो. तिथं दुकानातलाच एक कर्मचारी अतुल परचुरेसुद्धा आईच्या इलाजासाठी  मालकाकडे पैसे मागायला आला असतो. त्याचवेळी असरानीला  बायकोचा आणि ग्राहकाचा फोन एकाच वेळी आला असतो. चौघांशी बोलताना त्याला कन्फ्युजन होते. हा थोडासा ब्लॅक कॉमेडी प्रकारात येणार प्रसंगही मस्त जमला आहे.

 प्रियदर्शनच्याच 'हंगामा' सिनेमात आणखी एक अफलातून प्रसंग आहे. वेडा समजून राजपाल यादवला पकडायला पोलीस इन्स्पेकटर (मनोज जोशी) एका लॉजमध्ये येतात आणि आरडाओरडा चालू करतात. आणि ह्या सगळ्या प्रकारावर चिडलेला राजपाल पोलीस, लॉजचा नोकर, लॉजचा मालक अश्या सगळयांना धोपटून काढतो.

दुल्हेराजा सिनेमाचा शेवटचा प्लॉट, हा शाब्दिक आणि सिच्युएशनल अश्या दोन्ही विनोदी प्रकारात मोडणारा एक आयकॉनिक सीन आहे. गोविंदा काय प्रतीचा कलाकार आहे ते ह्या प्रसंगात दिसते.

संजीव कुमारजी आणि देवेन वर्मा सर ह्यांचा अंगुर सिनेमा म्हणजे तर विनोदी लेखनाची कार्यशाळा आहे. खूप वैतागलेला संजीव कुमार पोलीस स्टेशनला जाण्यासाठी एका ऑटोवाल्याला पत्ता विचारतो,
"अरे ये पुलीस स्टेशन कहा है?"

"साहब, पुलीस स्टेशन...छोटा या बडा?"

ह्यावर आणखी वैतागून संजीव कुमार म्हणतो,

"मुझे खरीदना नही है! कंपलेंट लिखानी है भाई!"

ही विनोदाची सर्वोच्च पातळी आहे! इथला रस्ता सापडला पाहिजे!

विनोदात लेयर्ड विनोद नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे वेगवेगळे थर (लेयर) असलेला विनोद. तो ह्या प्रसंगात आहे. म्हणजे बघा, कोणीतरी पत्ता विचारल्यावर सरळ न सांगता आगाऊपणे प्रतिप्रश्न करणं (छोटा या बडा?) हा पहिला थर. नंतर संजीव कुमारच हे पात्र आधीच्या घटनांमुळे खूप वैतागलेलं असतं. त्यात हा प्रतिप्रश्न ऐकून तो आणखी चिडतो. संजीवजी ज्या पद्धतीने,"मुझे खरीदना नही है" हे वाक्य डिलिव्हर करतात त्यात त्या पात्राचं अक्ख्या कथेतलं फस्ट्रेशन विनोदी पद्धतीनं बाहेर येते. हा विनोदाचा दुसरा थर. अर्थात हे करायला त्या तोडीचा अभिनेता असावा लागतो. आणि शेवटचा थर म्हणजे, नेमकं पोलिसांच्याच संदर्भात वापरलेलं,"मुझे खरीदना नही है" हे रूपक !!

विनोदी प्रसंग हा माझा आवडीचा विषय आहे. रडवण्यापेक्षा हसवणं हे फार कठीण असतं.

तुम्हाला आवडणारे विनोदी प्रसंग जरूर लिहा.

मुंग्या..


आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं. मग घरातल्या पोरांना शेजारच्या घरी पाठवून तिकडेही मुंग्या पोहोचल्यात का हे बघितल्या जायचं. त्यावरून प्रॉब्लेम वैश्विक आहे की घरगुती आहे हे निश्चित व्हायचं. वैश्विक असल्यास तो पाच-दहा मिनिटात आपोआप सुटायचा अन मुंग्या आपापल्या घरी जायच्या.

पण घरगुती असल्यास युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु व्हायचे. घरातले तज्ञ म्हणजे बाबा किंवा दादा, टीव्हीच्या मागची दूरदर्शनची केबल उगाचच काढून आणि सॉकेटमध्ये फुंकर घालून परत खोचून बघायचे. ही फुंकर टेक्नॉलॉजी कधीच कामात येत नव्हती. मग तांत्रिक प्रयत्नांचा कळस म्हणजे टीव्ही बंद करून एकदा परत सुरु करणे. त्यानंतर छतावरच्या अँटेनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं निदान व्हायचं. अनुभवी बायका अश्यावेळी "आता ह्यांच्या बापाकडून काही टीव्ही चालू होत नाही. संपला मेला पिच्चर" असं मनातल्या मनात बडबडत स्वयंपाकाला लागायच्या.

मग शेजारच्या दादाला जो आयटीआय शिकतोय छतावर चढून अँटेना हलवण्यासाठी पाचारण केल्या जायचं. आमच्या घराला जिना नव्हता अन शिडी लहान होती. त्यामुळे शिडीने मोरीच्या छतावर चढायचं अन शिडी वर ओढून घराच्या छतावर चढायचं इतका द्राविडी प्राणायाम होता. नंतर बराच वेळ तो दादा अँटेनासोबत झटापट करायचा. म्हणजे अँटेना पूर्ण ३६० अंशात वळवून देखील फरक पडत नव्हता. एव्हाना त्या दादाचे वडील सुद्धा आमच्या अंगणात आलेले असायचे. त्यांनी स्वतः मुंबईला जाऊन दूरदर्शन केंद्र एकदा लांबून बघितले असल्याने त्यांना तगडा अनुभव होता.

शेवटी वरतून दादा ओरडायचा,
"नाही होत आहे हे इथून?"

ह्यावर काका त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा एक सुस्कारा टाकून म्हणायचे,
"मी म्हनलं ना जोशीसाहेब तुमाले.... तिकडूनचं प्रॉब्लेम हाये काहीतरी !"

तिकडून म्हणजे कुकडून ? हे विचारण्याची आम्हाला परवानगी नव्हती.

इंजिनियरिंग करूनही घरातल्या टीव्हीवरच्या मुंग्या कुकडून यायच्या आणि कुकडे जायच्या हे आजवर मला उलगडलेलं नाही.  


Thursday 9 January 2020

मन्या व्हर्सेस अंबानी..


आमच्या मन्यानी नवीन वर्षाचा संकल्प वगैरे करणं कधीच सोडलं आहे. वारंवार संकल्प करून तो पूर्ण करणं, मग त्याची लाज वाटणं,मग स्वतःला दोष देणं आणि ह्यातून हळूहळू निगरगट्ट होण्याकडे झुकणं अन फायनली निगरगट्ट होणं ह्या सगळ्या स्टेजेस मन्याने पार केल्या आहेत. आता त्याच्यासमोर कोणी न्यू इयर रिझोल्युशन वगैरे गोष्टी सुरु केल्या की मन्या मनातल्या मनात हसतो. तरीसुद्धा खूप वर्षांपासून मनात असलेला पण कधीही पूर्णत्वास गेलेला, सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय यंदा मन्याने घेतला होता. फक्त ह्यावेळी त्याने त्याला  संकल्प वगैरे नाव देऊन जाहिरात करणं कटाक्षाने टाळलं.आता जानेवारीचा पहिला आठवडा संपत आला तरी मन्या रोजच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशीराच उठतोय. कारण थंडीचं तशी पडलीये ना !  पण काल शनिवारी रात्री मन्याने ठरवलं की काहीही झालं तरी उद्या सकाळी लवकर उठायचंच..

आणि सकाळी सव्वा आठ वाजता मन्याचा डोळा उघडला..!

स्वयंपाकघरात गेल्यावर मिश्किल हास्याने बायकोने त्याचे स्वागत केले. नऊ वाजता मन्या चहा पिता पिता पेपर वाचत होता. तिकडून बायकोने घरात काहीही भाजी नसल्याचे जाहीर केले.आणि मन्याला संभाव्य संकटाची चाहूल लागली. त्याने लगेच "मी आणतोय" अशी घोषणा केली. आणि लेकीला सोबत घेऊन तो निघाला सुद्धा. तसं भाजी आणणं हे मन्याचं आवडतं काम. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून त्याच्या घराजवळची मंडई बंद पडली होती. त्यामुळे मन्याला जवळच्या रिलायन्स फ्रेश मधून भाजी आणावी लागायची. तिथं जाणं मन्याला अजिबात आवडत नाही. सुपरमार्केट,शॉपिंग मॉल इथे मन्या गुदमरतो. इथला प्रत्येक माणूस आपल्याला लुटायलाच बसलाय ही त्याची धारणा आहे. नेहमीचा भाजीवाला एक किलो मटार मोजल्यावर दोन शेंगा अजून टाकतो ही गोष्ट मन्याला सुखावते. पण रिलायन्समध्ये ह्याचसाठी एक हजार नऊ ग्रामचे पैशे मोजावे लागतात. तिथं कुठंतरी मन्याचं मध्यमवर्गीय मन दुखावतं. आणि कोथिंबीरच्या जुडीला उगाचच कोरिएण्डर लीव्ज म्हणून विकत घ्यायला त्याचं मराठी मनही धजावत नाही.

असो. तर रिलायंस फ्रेशमध्ये मन्या फार वेळ घालवत नाही. चार-पाच भाज्या भराभरा निवडून बाहेर पडायचं हे त्याचं ठरलेलं आहे. आठवड्याच्या भाजीच्या नावाखाली चार-पाच दिवस पुरेल एवढीच भाजी आणायची अन उरलेले दोन दिवस बायकोला पिठलं किंवा खिचडी करायला लावायची ह्यामागेही मन्याचं एक छुपं आर्थिक नियोजन आहे. त्यासाठी बायकोला "तुझ्या हातच्या पिठल्याची चवचं खास" असंही तो अधूनमधून म्हणत असतो.

आजही मन्या भाज्या अन एक दह्याचं पाकीट घेऊन बिलिंग काउंटरवर आला.लेकीसाठी भेंडीसुद्धा घेतली होती. (सुपर मिलेनियल जनरेशनची आपली मुलगी भेंडीची भाजी आवडीने खाते अन डेरीमिल्क कॅडबरीला नाक मुरडते ह्यामागचं कोड मन्याला कधीच सुटत नव्हतं.) बिलिंग सुरु असताना काउंटरवरचा मुलगा मन्याला म्हणाला,
"सर सिस्टम में कुछ प्रॉब्लेम है. दही का प्राईस एमआरपीसे तीन रुपया ज्यादा दिखा राहा है."
"ऐसा कैसे?", मन्याने विचारलं.
"कुछ एरर है सर. कर दु बिलिंग?"
"नही रुको. तुम्हारा एरर है तुम ठीक करो. हंम क्यो भुगते?," मन्याने आवाज वाढवला.      
"नही हो सकता सर. आप दही मत लिजिए फिर."

ह्या एका गोष्टीची मन्याला नेहमीच चीड यायची. मागेही एकदा मॉल मध्ये असंच घडलं होतं. फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट लिहिलेल्या एका ड्रेसवर काहीच डिस्काउंट नाहीये असं पाऊण तास लायनीत उभं राहिल्यावर  काउंटरवरच्या फटाकड्या पोरीने सांगितलं होतं. शेवटी बायको आणि त्याहीपेक्षा त्या फटाकड्या पोरीसमोर इज्जत जाऊ नये म्हणून मन्याने तो ड्रेस खरेदी केला होता. पण आता इथे तीन रुपयासाठी मन्या असून बसला. शेवटी दही घेण्यासाठी परत एखाद्या दुकानात जावं लागेल असं विचार करून मन्याने तीन रुपये जास्त मोजून दही घेतलं. आणि "कोई सिस्टम नही है यहापे" अश्या तीव्र शब्दात निषेध नोंदवून मन्या बाहेर आला.

गाडीजवळ येताच, एकंदरीत आपलं बिल एवढं कमी कसं झालं हा प्रश्न मन्याला पडला. त्याने बिल चेक केलं. दह्याचे पकडून एकशे सदोतीस रुपये झाले होते. एखादा आयटम बिलात घ्यायचा राहिलाय का असा विचार करताना त्याला बिलात भेंडी लावलेली कुठेच दिसली नाही. पण भेंडी पिशवीत तर होतीचं. त्याने मुलीकडे बघितल्यावर त्याला आठवलं की, भेंडी घेतल्यापासून त्याचं पुडकं मुलीने छातीशी कवटाळून धरलं होतं. आणि मन्या काउंटरवर वाद घालत असताना मुलीने कदाचित ते पुडकं पिशवीत टाकलं असावं. त्यामुळे भेंडी बिलात आलीच नाही. साधारण बावीस रुपयाची भेंडी मन्याला फुकट मिळाली होती. पण मन्याला ते काही पटेना. पैसे देण्यासाठी तो परत आतमध्ये गेला.

काउंटरसमोर मारुतीच्या शेपटीएवढी रांग लागली होती. मन्याने लायनीत उभं राहायचं ठरवलं. पण पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात त्याला दह्यासाठी मोजलेल्या जास्तीच्या तीन रुपयांची आठवण झाली. तो जागच्या जागी थबकला. आणि अचानकच रिलायन्स जियोचे वाढलेले दर, अंबानीचा प्रशस्त बंगला, आयपीएल,नोटबंदी,जीएसटी वगैरे सगळ्याविषयीच असलेला त्याचा सात्विक राग उफाळून आला.

"लावतोच चुना आता ह्या अंबान्याला" असं म्हणून मन्या बाहेर आला.  

मन्या खुशीतच घरी आला. नकळतपणे का होईना अन बावीस रुपयाचंचं का होईना पण आपण अंबान्याचं नुकसान केलं ह्याचा त्याला आनंद झाला होतं. त्याने बायकोलासुद्धा सांगितलं. तिचे वेगळेच प्रश्न सुरु झाले.
"अहो ते ठीक आहे पण त्यांच्या कॅमेरात दिसलं तर?"
"काही दिसत नाही. दही आणलं आहे, तू कढी कर छान."

मस्त जेवण करून मन्या झोपायला गेला. त्याला झोप लागत नव्हती.अंबान्याचं नुकसान करण्याच्या नादात आपण चोरी केली आहे हे त्याच्या पांढरपेश्या मनातून जात नव्हतं. त्याने उठून परत बिल चेक केलं. बिलात शेवटल्या लायनीत Okra असं लिहून त्यासमोर बावीस रुपये लिहीलेले होते. मन्याने गूगलवर Okra शब्दाचा अर्थ चेक केला. आता भेंडीला इंग्रजीत Okra  म्हणतात हे मन्याच्या बापालाही माहिती असण्याची शक्यता नाहीये. तर मन्याची काय कथा!

शेवटी आपण चोरी केलेली नाहीये हे मन्याच्या लक्षात आलं.

"बघ साल्या अंबान्या तुझ्यासारखा नाहीये मी", असं म्हणून मन्या परत झोपायला गेला.

पण आता दह्यासाठी जास्तीचे मोजलेले तीन रुपये त्याचा डोळा लागू देत नव्हते !

समाप्त..

#Ambani #reliancejio #reliancefresh