शाळेत वर्गातल्या मुलींनी मुलांना राखी बांधण्याचा एक भिषण प्रकार होता. कोणत्यातरी शिक्षिकेच्या डोक्यात राखीनंतरच्या काही दिवसात हा उपक्रम यायचाच. त्यामुळे ऋषीपंचमीची फार आतुरतेने वाट पाहिली जायची.आता त्याचं कसं असतंय, क्रश वगैरे शब्द तेंव्हा माहिती नव्हते, पण असायचा एखादा गोजिरवाणा चेहरा वर्गात! जिच्याबद्दल भविष्य माहिती नसलं तरी वर्तमानातच राखी बांधून घेण्याचा अजिबात विचार नसायचा.
मग एके दिवशी वर्गात "ती" घोषणा व्हायची. काही पोरं गोंधळाचा फायदा घेऊन वर्गातून निसटायचा प्रयत्न करायची. आम्हाला ते पण जमत नव्हतं. कारण कोणीतरी फितुरी केली तर उद्या वर्गात सगळ्यांसमोर (आणि तिच्यासमोरसुद्धा) आपला उद्धार होण्याची शक्यता जास्त!! आणि का कोण जाणे माझ्या पत्रिकेत असे उद्धाराचे प्रसंग फार ठासून भरले आहेत! (पता नही ऐसी सिच्युएशनमे मैं आटोमॅटिक आगे कैसे आ जाता हू टाईप!)
मग सगळे बकरे कुर्बानी द्यायला लायनीत उभे राहायचे.आणि समोर बकऱ्या!
पहिली मुलगी पहिल्या मुलाच्या हाताला राखी बांधेल, दुसरी मुलगी दुसऱ्या मुलाच्या हाताला असा क्रम असायचा. मला ह्याच्यात मेजर ऑब्जेक्शन होतं. अरे कमीत कमी ह्याच्यात तरी चॉईस द्या ना! ही काय जबरदस्ती? लोकशाही आहे ना देशात? ती काय फक्त नागरिकशास्त्रात शिकवण्यासाठीच का? आपापसात ठरवून घ्या बा बांधून तुम्ही असं म्हणायला काय जातं?
पण नाही.. तिथपण शिस्त त्येजायला..
मग ती कोणत्या नंबरवर उभी आहे त्यावरून आपला नंबर ठरवायची एक कसरत सुरू व्हायची. पण तिचे दिवाने दोन-चार तरी असायचेच ना. सगळ्यांच आपापले नंबर बदलले की परत गोंधळ. आणि वर सांगितल्याप्रमाणे, "पता नही ऐसी सिच्युएशनमें मैं आटोमॅटिक आगे कैसें आ जाता हू!"
शेवटी जे घडू नये तेच घडायचं!
हिंदू संस्कृती,सणवार,रितीरिवाज ह्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे.
पण जर हिंदूंची संख्या वाढवायची असेल तर शाळेत ह्या असल्या धंद्यांना चालना देऊन ती कशी वाढेल??
--एक संतप्त सवाल
--चिनार
No comments:
Post a Comment