Showing posts with label मराठी लेख. Show all posts
Showing posts with label मराठी लेख. Show all posts

Thursday, 1 February 2018

बजेट -- एवढं काय त्यात!!

आईची शप्पथ घेऊन सांगतो मला बजेट मधलं काहीही कळत नाही. पण आसपासचे लोकं "बजेट आहे,बजेट आहे" म्हणून अशी काही वातावरण निर्मिती करतात की मी उगाचच एक्ससाईट होऊन त्याची वाट बघायला लागतो. अर्थमंत्र्यांचं दोन- तीन तासांचं भाषण ऐकल्यावर "आपल्याला ह्यातलं काय कळलं?" असा प्रश्न एकांतात मी स्वत:ला नेहमीच विचारतो. आता हा प्रश्न क्षणिक असला तरी "आपल्याला नेमका काय फरक पडला?" हा प्रश्न तर वर्षभर सतावत असतो. बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टीत स्वस्त झाल्या असं जाहीर करतात. त्या खरंच झाल्यात का हे बघायला मी मुद्दामहून कधीही बाजारात जात नाही. आधी आईने आणि आता बायकोने दिलेली सामानाची यादी बाजारात जाऊन निमूटपणे घेऊन येणे एवढंच आम्हाला माहिती. त्यात आजकाल तर आम्ही मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये जातो. त्यामुळे सामानाचं बिल जरा जास्त वाटलं तर घेतलेल्या पन्नास टक्के तद्दन निरुपयोगी वस्तूंपैकी दोन-चार काढून ठेवायच्या. इतके सरळसाधे आमचे हिशोब असतात. तरीसुद्धा आम्ही बजेट बजेट करून का नाचत असतो हे माझं मलाच कळत नाहीये!

त्यातल्या त्यात इन्कम टॅक्सच्या मर्यादेत आल्यापासून बजेटच्या त्या भागातलं मला थोडंफार कळतं. सरकारची मेहेरबानी झाली तर वर्षाकाठी दोन-चार हजार रुपये वाचतात. वाचलेले हेच दोन-चार हजार रुपये सरकार इतर गोष्टींचे भाव वाढवून आमच्याकडून दुपटीने नकळतपणे वसूल करून घेते. मला आजवर उमगलेलं बजेट एवढंच आहे. पण मी काय म्हणतो,समजा सरकारने टॅक्स कमी केला आणि भाव वाढवले नाही.  तरी त्या दोन-चार हजारात आम्ही नेमके कोणते बंगले बांधणार आहोत?? पण इन्कम टॅक्स हा लोकांच्या इतक्या जिव्हाळ्याचा विषय आहे की, च्यायला सरकारने टॅक्स वाढवला नसता तर फेरारीचं बुक करणार होतो ह्या आवेशात लोकं बोलतात.

 बजेट म्हणजे सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक अशी सरळसाधी व्याख्या आहे. आता अंदाज म्हटलं की तो चुकणारच अशी समजूत करून लोकं गप्प का बसत नाहीत? नाहीतरी लोकसंख्येपासून ते हवामानापर्यंत कोणता सरकारी अंदाज बरोबर आलाय आजपर्यंत? बरं सरकार इतकं लाखो कोटींचं बजेट सादर करते. पुढल्या वर्षी त्यातले किती खर्च झाले हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही? (तुम्हाला सांगतो,लोकसभेच्या अध्यक्षपदी जर आमच्या गल्लीतला वाणी बसला असता तर त्याने अर्थमंत्र्यांना,"ओ आधी जुना हिशोब क्लियर करा..मग पुढचं बघू." असं ठणकावून सांगितलं असतं.) तसं पाहिलं तर हा प्रश्न आम्हाला महिन्याच्या घराच्या बजेटमध्ये सुद्धा पडत नाही. कारण मुळात तो प्रश्न पडण्याची गरजच पडत नाही. महिनाअखेर अकाउंटमधली शिल्लक रक्कम बघून आपलं बजेट पार बोंबललयं हे दिसूनच येतं. सरकारला फिस्कल डेफिसिट इकडून तिकडून कमी करण्याची सोय तरी असते. आम्हाला ती पण नाही. आमचं फिस्कटलेलं बजेट म्हणजेच आमचं फिस्कल डेफिसिट!!

काल रात्री असंच मी बजेट- बजेट म्हणून नाचत असताना बायकोने,"एवढं काय त्यात?" असं विचारून मला गप्प केलं. तिला एवढं काय हे समजावून सांगताना मला बजेटचा "ब" सुद्धा समजत नाही अशी माझी अंतरात्मा ओरडून ओरडून सांगत होती. तरीसुद्धा  मी जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ होऊ शकतो असा गैरसमज थोडावेळाकरिता निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. पण तेवढ्यात धोब्याकडून पैसे वापस घेताना  मी दहा रुपयाची फाटकी नोट घेऊन आलोय हे तिच्या लक्षात आलं. आणि माझ्यातल्या तज्ञाचा त्रिफळा उडाला.

आमचं एक जाऊद्या. (कारण आमचं नेहमीच जाऊ देण्या लायकचं असतं म्हणा!) पण मंत्रालयातले सगळे तज्ञ मिळून बजेट कसं तयार करत असतील हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे बघा, अर्थमंत्री असे राजासारखे दरबारात उच्चासनावर बसले असतील. वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी डोळ्यात अत्यंत करुण भाव आणून हात जोडून राजाकडे पैसे मागत असतील. राजा आणि प्रधान आपल्याच तोऱ्यात," का रे रेलव्या, तुला कशाला पाहिजे पाच लाख कोटी? कश्याला नवीन रेलवे लाईन टाकायच्या? आहे त्या सांभाळ आधी..चाल हे घे दोन लाख कोटी..आणि तू रे परिवहन...चारशे कोटीच्या वरती एक रुपया मिळणार नाही सांगून ठेवतो. आणि त्या समाजकल्याणला द्या शंभर कोटी. तो रस्ते विकास बघा कसा लपून बसलाय कोपऱ्यात. xxच्या मागच्या वर्षी सत्तर हजार कोटी दिले तुला ते काय जावयाच्या गावात हायवे बांधण्यासाठी होय रे?? एक रुपया देणार नाही तुला आता. तुला किती पाहिजे रे संरक्षण? तुमचं काय बा तुम्ही मोठी माणसं. तुम्हाला ब्लँक चेकचं द्यावा लागतो. प्रधानजी ह्यांना मोकळं करा लौकर. अहो कृषिताई तुम्ही कशाला रडताय? तुमची वेगळी व्यवस्था आहे. हे बघा..तीन लाख कोटी ठेवलेत दुष्काळासाठी.. ओला की कोरडा ते तुमचं तुम्ही बघा...आणि तो बालविकास राहिला की हो.अहो मुलं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य.द्या त्याला हजारेक कोटी. दोन-चार तरी बगीचे बांधा हो ह्याच्यात..आणि हो शिक्षणाचं काय तुमच्या? पाच हजार कोटी देतो अन सहा नवीन विद्यापीठं घोषित करुन टाकतो..चालेल का? ..अरेरे जलसंवर्धन करायचं राहिलं ना..आणि आदिवासी वगैरे..प्रधानजी उरलेले वाटून टाका बरं ह्यांच्यात. चला झाले का सगळे...करा हिशोब प्रधानजी अन मारा प्रिंटआउट..अन जरा दोन-चार चारोळ्या वगैरे टाका अधूनमधून ..लोकांना हसवायला बरं पडतं ते"

असो. बजेट जाहीर झालंय.आज बजेट सादर होण्यापूर्वीच हे मनोगत जगासमोर मांडावं असं वाटत होतं. पण नंतर विचार केला, आपली परिस्थिती ही बजेट सादर होण्याआधीही आणि नंतरही  तीच असणार आहे. मग नंतरच करू ना...एवढं काय त्यात!!

आज रात्रीचा विषय: सरकारने बजेटमध्ये काय काय करायला हवे होते..!  एवढं काय त्यात!!

 -- चिनार

Saturday, 17 June 2017

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!
      तसे मला बरेच प्रश्न नेहमीच पडतात. त्यातले काही विचारण्यासारखे असतात तर काही नसतात. काहींची उत्तरे असतात पण ती देण्यासारखी नसतात. आणि ज्यांची उत्तरे देण्यासारखी असतात ती मला समजण्यासारखी नसतात. म्हणूनच शेवटी मी आणि माझे प्रश्न आहेत तिथेच राहतात. मनाच्या समजुतीसाठी  मी आपला "तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे" आणि "ठेविले अनंते तैसेची राहावे" या ओव्या गुणगुणत असतो. (आता तैसेची राहावे म्हणजे कैसेची राहावे हासुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो हा भाग वेगळा!)

पण सध्या एक अजब प्रकार सुरु आहे. प्रश्नांचेसुद्धा सिक्वेल येत आहेत. त्याच प्रश्नांच्या मालिकेचा उहापोह करण्याचा हा एक प्रयत्न.

       कसंय की विजेचं भारनियमन आणि आमचा शैक्षणिक अंधार यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये हे मान्य! कारण अद्वितीय आकलनशक्तीमुळे आमच्या ज्ञानाची कवाडे सतत दिव्याखाली अंधार या परिस्थितीत असायची.त्यामुळेच भारनियमन असून नसून काही विशेष फरक पडणार नव्हता. पण प्रश्न असा आहे की, जिथे काहीही केल्या आमची मजल साठ-सत्तर मार्कांच्या पलीकडे जात नव्हती तिथे आज १४३ मुलांना १०० टक्के मार्क पडतात तरी कसे? म्हणजे अशी काय अमूलाग्र सुधारणा आपल्या शिक्षणपद्धतीत झाली आहे? थोडी चौकशी केल्यावर कळलं की,एक सुधारणा म्हणून आजकालच्या परीक्षा या जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेतल्या जातात. म्हणजे एका प्रश्नाला उत्तर म्हणून चार पर्याय, त्यातला एक बरोबर निवडायचा वगैरे वगैरे. शिक्षकांच्या शपथेवर सांगतो आम्ही या पद्धतीनेसुद्धा दिवेच लावले असते. कारण ही पद्धत म्हणजे 'चुकीला माफी नाही' या प्रकारातली आहे. आणि आम्हाला चुकण्याशिवाय पर्यायच नाही!! त्यामुळेच सर्व उपलब्ध पर्यायांची चाचपणी करता करता परीक्षेची वेळ संपली असती.

यावरून आम्ही किमान पास तरी व्हावे यासाठी आमच्या शिक्षकांनी केलेले प्रयत्न आणि सांघिक कामगिरीने आम्ही त्याचा उडवलेला फज्जा या सगळ्या गोष्टी मला आठवल्या.

     आमच्यावेळी वर्गातल्या पोरांचं लक्ष जरातरी अभ्यासाकडे वळावं म्हणून मुलींची शाळा सकाळी आणि मुलांची दुपारी असे छोटेमोठे बदल केल्या जायचे.तरीसुद्धा आमच्या वर्गातली पोरं कार्यानुभव,एनसीसी वगैरे फालतू विषयांसाठी सकाळपासून शाळेत जाऊन बसायची. एवढंच काय तर पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जातो असं सांगून, शाळेत आपापले 'पक्षी' टिपत बसायचे. त्यामुळे या छोट्यामोठ्या सुधारणा आमच्या आधीच सुधरलेल्या पोरांसाठी काहीही उपयोगात आल्या नाहीत. आणि आजकाल तर मुलं मुली एकाच बाकावर बसतात म्हणे. तरीसुद्धा शंभर टक्के?? आमच्या शिक्षकांचं नशीब थोर म्हणून ही असली थेरं आमच्यावेळी केली नाहीत. पोरांनी 'कोणत्या' विषयात शंभर टक्के 'कामगिरी' केली असती काही नेम नाही! आमच्यापेक्षा एक वर्ष सीनीअर असलेल्या पोरांसाठी  केलेली आणखी एक सुधारणा म्हणजे वर्गातल्या काही गुणवत्तावान विद्यार्थाना निवडून, शिक्षक त्यांच्यावर जास्ती मेहेनत घ्यायचे. आता एखाद दुसरा अपवाद वगळता हा खरं म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार होता. कारण आम्ही सगळी गुरंढोरं एकाच शेतात राबवायच्या लायकीचे होतो.आमच्यावेळी हा प्रकार बंद झाला कारण गुणवत्तावान विद्यार्थी शोधण्यातच शिक्षकांना जास्त मेहनत करावी लागणार होती. ट्रायल अँड एरर करता करता परीक्षा तोंडावर आली असती. शेवटी शिक्षकांनी एक अभिनव मार्ग शोधला. हुशार मुलं निवडण्यापेक्षा 'ढ' मुलं निवडली. आता या गटासाठी उमेदवारांची कमी नव्हतीच. इथे माझी इतक्या वर्षांची अविश्रांत मेहनत फळाला आली. आणि मोठ्या दिमाखात मी त्या गटात प्रवेश केला. अक्षरश: हाऊसफुल होऊन सुरु झाले हे वर्ग!  मग पालक-शिक्षक मिटींग्स वगैरे होऊ लागल्या.  प्रत्येक मीटिंगमध्ये 'हुशार खूप आहे हो तो,पण अभ्यासाचं करत नाही' ह्यावर दोन्ही पक्षांचं एकमत व्हायचं.( त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर ह्याच  वाक्याचं स्वरूप 'भारताने ठरवल्यास, २०२० मध्ये भारत ही एक महासत्ता असेल' असं असायचं!) शेवटी शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना यश आले. आणि २०२० च्या होऊ घातलेल्या भारतीय महासत्तेत आणखी एका सुशिक्षित अज्ञानवीराची भर पडली.

इथून प्रश्नाचा दुसरा भाग सुरु होतो. आमच्या अज्ञानाच्या अमर्यादित कक्षेचं अस्तित्व आम्ही मान्य केलं आहे. असं असताना,

ज्यांनी कधीकाळी आम्हाला फाटकातून आतमध्येही घेतलं नसतं त्या बिट्स पिलान्या अन  कोपऱ्याकोपऱ्यातल्या मॅनेजमेंट इंस्टीटयूटा आजकाल मेल पाठवू पाठवू ऍडमिशन घ्या म्हन्तेत बा!!

      ह्यांचं स्टॅंडर्ड घसरलं का आमचं वाढलं तेच कळत नाहीये. ती दिल्लीतली एक नॅशनल इन्स्टिट्यूट तर माझ्या हयातीत किंवा मरणोत्तर मला डॉक्टरेट दिल्याशिवाय राहणार नाही असं दिसतंय.दोन-चार वेळा फोन टाळल्यावर एकदा त्या बाईशी मी डिट्टेलमध्ये बोललो. तिच्या मते, डिग्री मिळवायला कॉलेज,लेक्चर,प्रोजेक्ट,अभ्यास यागोष्टींचे बागुलबुवे उगाचच उभे केले आहेत. आता यापैकी डिग्री मिळवायला फारसा अभ्यास करावा लागत नाही ह्या वाक्याशी मी आणि माझे कुटुंबीय बिनशर्त सहमत होतील. पण लोकलज्जेखातीर इतर अनेक गोष्टी कराव्याच लागतात हा स्वानुभव आहे. तर ती बया म्हणे, एकदा पैसे भरले की सहा-सात महिन्यात डिग्री घरी येईल. याउपरही जर मला लेक्चर वगैरे हवेच असतील तर डिस्टन्स लर्निंगची व्यवस्था आहे म्हणे. पण तिच्या मते, व्हाय टू वेस्ट टाइम? आम्ही एका डिग्रीसाठी आयुष्यातले वीस-बावीस वर्ष कशाला वाया घालवले तेच कळत नाही. कारण ज्ञानाचा अंधार तर दोन्हीकडे आहेच. कसं होतंय की, शिक्षणपद्धतीवर टीका करणे हा आमचा आवडता टाईमपास आहे. पण इथे नेमकी टीका कोणावर करावी हेच कळत नाहीये. शिक्षणाचा बाजार झालाय वगैरे गोष्टी तर लहानपणापासून ऐकत आलोय. पण हे म्हणजे पार डी-मार्ट,वॉलमार्टच्या पातळीचं होलसेल मार्केट झालं की हो! अरे एखाद्या डॉक्टरला डिस्टन्स लर्निंगने सर्जरी शिकवायलासुद्धा हे लोक मागेपुढे पाहणार नाही उद्या. एकेकाळी बिट्स पिलानी वगैरे आमच्यासाठी तीर्थक्षेत्रे होती. आता हळूहळू ते पिकनिक स्पॉट होतील का काय अशी शंका वाटते.

आता कल्पना करा,बिट्स पिलानीमध्ये त्या शंभर टक्केवाल्या मुलांच्या शेजारी जर आमच्यासारखे सेल्फ्या घेत उभे राहिले तर काय होईल?? त्या बिचाऱ्यांना 'याचसाठी केला का अट्टाहास' असा प्रश्न पडेल. खरं सांगू का, ह्या एकशे त्रेचाळीस मुलांच्या मार्कांची बेरीज केल्यास, तेव्हढ्या मार्कात आमची अख्खी पिढी पास झाली हे लक्षात येईल. आणि जर चुकून, त्यांच्या आणि आमच्या मार्कांची वजाबाकी केली तर लांबलचक जनरेशन गॅप दिसेल. म्हणून मी तर आजकाल देवाकडे एकचं गोष्ट मागतो.

"परमेश्वरा,माझ्या प्रश्नांचं तू लोड घेऊ नको. त्यांची उत्तरं नाही मिळालीत तरी चालतील.पण ही जनरेशन गॅप वाढत चाललीये. पुढेमागे आम्हाला तोंड लपवण्यापुरती तरी गॅप मिळू दे रे बाबा!!"


-- चिनार

Tuesday, 9 May 2017

राजकारण आणि We...The People!

"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!” माझा कलीग तणतणत म्हणाला.

कंपनीच्या मेलबॉक्सवर येणाऱ्या असंख्य बिनकामांच्या मेलपैकी एक मेल आमच्या मॅनेजरने त्याला पाठवला नाही ह्यावरून तो चिडला होता. खरं म्हणजे त्या ईमेलचा माझ्याशीच काय तर आमच्या अक्ख्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. मॅनेजरला FYI म्हणून आलेला ईमेल त्याने पुढे पाठवण्याची तशी काही गरज नसते. पण मेल पाठवणं हा मॅनेजरलोकांचा आवडता उद्योग असतो.तेव्हढंच रिकाम्या हाताला काम मिळतं बाकी काही नाही!! पण मेल नं पाठवण्यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण? हा प्रश्न मला पडला होता.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर ज्यांना आपल्यासोबत राजकरण खेळलं जातंय हे सुद्धा कळत नाही अश्या जनसमुदायाचा मी प्रतिनिधी आहे. पण सुदैवाने माझ्या आसपास राजकीय तज्ञांचा सतत राबता असतो. कंपनीतल्या AC चं तापमान कमीजास्त करण्यामागेही कसं राजकारण केलं जातंय इथपासून ते ट्रम्प एकाचवेळी पुतीन,थेरेसा मे आणि अँजेला मर्केल यांना कसं खेळवतोय इथपर्यंत गोष्टींचं राजकीय विश्लेषण माझ्या आसपास सतत सुरु असतं.(शिवाय या सगळ्याला शेवटी मोदीचं कसे जबाबदार आहे हे सांगायला दुसरा गटही त्याच ताकदीने प्रयत्नशील असतो!) त्यात मी राजकारणापासून अलिप्त असल्याबद्दल माझाही येताजाता उद्धार केला जातोच.आता राजकारण हा शब्दच मुळी भारदस्त! म्हणूनच लहान असल्यापासून मी त्यापासून दोन हात लांब राहणंच पसंत केलं. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, "राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली घसरते आहे."आता ही पातळी आजोबा मोजतात तरी कशी हा प्रश्न मला तेंव्हा पडायचा. पण जसं जसं वय वाढत गेलं तशी तशी ती पातळी आणखीनंच घसरली असावी. त्यामुळे ती दिसण्याचा आणि मोजण्याचा संबंध आला नाही. आणि मी त्यापासून अलिप्त होत गेलो. पण सतत कानावर पडणाऱ्या ह्या राजकीय विश्लेषणापासून मी स्वतःला वाचवू शकलो नाही. आता ही परवाचीच ईमेलची गोष्ट,

"अरे विसरला असेल तो तुला पाठवायला",मी समजवण्याच्या सुरात म्हणालो.
"विसरला वगैरे काही नाही..मोठ्या गेम असतात ह्यामागे. तुला नाही कळणार!"
तो अगदी ह्यामागे लाहोर कॉन्स्पिरसी सारखं काहीतरी आहे ह्या थाटात बोलत होता.
"कसला गेम रे?"
"अरे तो मुद्दाम मला मेल पाठवत नाही. आणि मग चारचौघात मला ह्या मेलसंदर्भात काहीतरी विचारतो. मग मला कसं काहीच माहिती नसतं असं सगळ्यांना दाखवतो."
हा मोठा गेम!!! अरे पण जेंव्हा पाठवलेल्या मेलसंदर्भातही तुला काही माहिती नसतं तेंव्हा तुझा धर्म कुठे जातो राधासुता?? हा प्रश्न मी ओठावर यायच्या आधीच गिळला. कारण राधासूत म्हणजे कोण हे त्याला कळणार नव्हतंच. उगाच आमच्या ऑफिसमधल्या राधेशी मॅनेजरचं 'सूत' जुळलंय असं त्याला वाटायचं आणि त्याने मॅनेजरचा 'गेम' करायचा.  

म्हणजे राजकारणाचा छंद जडलाय आपल्याला. कुठे खुट्ट काही वाजलं की 'ते बघ राजकारण!' असं चाललंय. त्यामानाने  हे इमेल  प्रकरण  फारच किरकोळ म्हणावं लागेल. आजकाल एखादा शब्द बोलायचीच देर की लगेच आपली वर्गवारी ठरवली जाते. सध्या भारतवर्षात उजवे,डावे आणि 'तिरपे' असे तीनच वर्ग उपलब्ध आहेत. पूर्वी उजव्या आणि डाव्यांमध्ये 'त्यातल्या त्यात सरळ' असा एक वर्ग होता. तो तिरप्यांनी नामशेष केलाय. बराच काळ  उजवे आणि डावे,"मेरे मुर्गे की एकही टांग" या हटवादाने आपापल्या कोंबड्या आणि पिलावळ सांभाळून होते. पण समजा कोंबडी एखाद्यावेळी दोन पायांवर चालली तर 'सरळ' लोकांची काही हरकत नसायची. आता तिरप्यांना हे मान्य नाही. जरा कोंबडीची बाजू घेतली की लगेच "१२७४ साली तुम्हीच कोंबड्यांना विरोध केला होता ना?? आता का त्यांचा पुळका येतोय  तुम्हाला?" असा प्रश्न येतो. (त्याचवेळी एका हातात कोंबडीची तंगडी आणि दुसऱ्या हातात "भिजवलेल्या द्राक्षांचा रस" असतो हा भाग वेगळा !) एकवेळ उजवे-डावे परवडले पण तिरपे नको अश्या मतापर्यंत मी येऊन पोहोचलोय. या तिरप्यांनी  प्रत्येक क्षेत्रात 'जे दिसेल त्याला विरोध करा रे' संघटना उभारल्या आहेत.

आता साधी गोष्ट, महेंद्रसिंग धोनीने कप्तानपद सोडल्यावर त्याच्या गौरवार्थ मी काहीतरी लिहिलं. (मी "काहीतरीच" लिहितो याबद्दल दुमत नाही!). त्यावर प्रतिक्रिया काय यावी??
"आमच्या युवराजसोबत राजकारण खेळलाय तुमचा धोनी!! त्यावेळी नाही लिहिलंत काही??"

म्हणजे एखादा धोनीचा चाहता आहे ह्याचाच अर्थ तो युवराज,गंभीर,सेहवाग इतकंच काय तर गेला बाजार गगन खोडाच्यासुद्धा जीवावर उठलाय!! एखाद्याने मोदींना मत दिलंय म्हणून त्याने पतंजलीचं तेल अंगाला चोपडून रोज शीर्षासन करतंच कंपनीत आलं पाहिजे!! एखाद्याने साहेबांना 'जीवेत शरद शतमं' म्हटलंय म्हणजेच त्याचे सात- बारे कोरे असलेच पाहिजे!! एखाद्याने अण्णांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण केले होते म्हणजे आज त्याने समस्त दिल्लीकरांची माफी मागितलीच पाहिजे!!

आता याहूनही साधं उदाहरण घेऊ...समजा आपल्या शेजारच्याने डोळ्यादेखत कचरा रस्त्यावर फेकला. आणि तुम्ही त्याविषयी त्याला काही बोलला...तर त्याच्या उजव्या-डाव्या विचारसरणीनुसार खालील प्रतिक्रिया येतील.
उजवा:-"साठ वर्ष देश कचऱ्यात गेला होता तेंव्हा काय करत होता तुम्ही? आता दोन दिवसात सगळं चकचकीत हवंय नाही का??"
डावा:- "सांगा की तुमच्या मोदीला उचलायला.स्वच्छ भारताच्या पोकळ घोषणा नुसत्या!!"
हे ऐकून तुम्ही स्वतः कचरा उचलायला गेलात की तिरप्यांची कमेंट येते.
"गुलामगिरीची सवय झालीये तुम्हाला बाकी काही नाही. आधी इंग्रजांची केली आता ह्यांची करा.हागणदारी मुक्त अभियानाला तुमच्या आजोबांनीच विरोध केला होता आठवतंय का??"

अरे जगू द्या रे आम्हाला!!

तिरप्यांच्या मते, समस्त भारतीय नागरिकांनी आपापले कामधंदे बाजूला ठेऊन रोजच्या घडामोडींवर काहीतरी भूमिका घेतलीच पाहिजे. (घडामोडी हा शब्द घडा"मोदी" असा वाचला तरी चालेल!)आणि घेतलेली भूमिका ही  पाच हजार वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांच्या भूमिकेशी सुसंगत असायलाच हवी. उदाहरणार्थ कोणीतरी कन्हैय्या नावाचं पोरगं जर 'पाकिस्तानशी युद्ध नको मैत्री हवी' असं म्हणत असेल. आणि ह्या विधानाला तुमचा मुकविरोध असेल. थोडक्यात "ते येडंय" म्हणून तुम्ही दुर्लक्ष केलं असेल. तर महाभारतात कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीयांशी युद्ध करण्यास नकार देणारा  अर्जुन तुम्हाला कसा चालतो  ह्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं. आणि त्या अर्जुनाला धर्मयुद्धासाठी तयार करणारा कन्हैय्या तुम्हाला देव म्हणून कसा चालतो ह्याचही उत्तर हवं.

अहो पाकिस्तानशी युद्धवगैरे तर फार मोठ्या गोष्टी झाल्या, पण बाहुबलीमध्ये हिंदुत्वाचं कसं उद्दात्तीकरण केलंय ह्यावरही तुमचं मत असलंच पाहिजे. आता चारशे रुपये तिकीट काढून गेलेला एखादा प्रेक्षक त्या देवसेनेला बघणार की हिंदुत्वाची भाषणं ठोकणार? त्यात जर एखाद्याला बाहुबली आवडला असेल तर तो कट्टर हिंदुत्ववादी!,आवडला नसेल तर तो देशद्रोही!! आणि एखाद्याने जर बाहुबली पाहिलाच नसेल तर तो अखिल मानवतावाद विरोधी म्हणून गणला जाईल!! ते VFX वगैरे गेलं तेल लावत! 

असो.सगळीकडे राजकारण शोधण्याच्या आणि करण्याच्या अट्टाहासाने आपल्या जगण्यातला आनंद हरवतोय का हे बघायला हवं. आपण सामान्य आहोत म्हणून 'ते' राजकारणी आहेत. आता त्यांच्यासारखंच व्हायचं असेल तर भाग वेगळा. फक्त एक गोष्ट लक्षात असावी,
त्यांनी राजकारणाची पातळी घसरवली...आपण किमान त्याची पत घसरवू नये!!

 -- चिनार

Wednesday, 25 January 2017

मी सध्या काय करतो ?

      नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या  अब्जावधी लोकांपैकी मी एक !

      एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय  अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलोच तर 'देवा,हा अजून आहेच का ?'असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण,'मी तेंव्हातरी काय करायचो?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!

      तसं आमच्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक वगैरे व्हायचा असल्यामुळे एका वर्गात 'साठ-सत्तरचं'(!) मुलं असायची. अश्यावेळी उजवीकडल्या दुसऱ्या लाईनीतील पाचव्या बाकड्यावर बसलेल्या माझ्याकडे बाईंचं लक्ष जाण्याची शक्यता कमीच होती. त्यासाठी वर्गात असलेली अप्रतिम प्रकाशयोजना आणि आमचा एकंदरीतच शैक्षणिक अंधार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. तरीसुद्धा कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर केला तरी तो त्यांना दिसत नसे. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं. त्याचा प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष फायदे असतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात नव्हते. मग आम्ही वर्गात फेमस कसे होणार? मग एखादी मुलगी आमच्याकडे कशी बघणार? आणि “मी सध्या काय करतो” हा प्रश्न तिला कसा पडणार? तसं शाळेतल्या एका पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे  बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर चाळीस-बेचाळीस आणि मार्कही साधारण तेव्हढेच !! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घेऊन येण्याची परिक्रमा मी ०.००३ सेकंदात पूर्ण करायचो. मग तीसुद्धा संधी गेली (त्या शिक्षकांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल कारण्याएवढं कायद्याचं ज्ञान त्यावेळी नव्हतं ह्याची खंत वाटते.) तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकलो नाही. आणि मी स्वतः लावलेल्या जोडीची व्हॅलिडिटी अट्ठेचाळीस तासाच्या वर टिकत नव्हती. शाळेच्या वार्षिक उत्सवात हिंदी-मराठी  गाण्यांवर मुलामुलींचे नाच बसवण्यात यायचे. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फारच फार 'शूर आम्ही सरदार' या गाण्यासाठी कोरस मध्ये मला उभं करायचे. बरं शाळेत जाऊद्या, पण रिक्षातून येताजाता एखाद्या मुलीशी ओळखबिळख व्हावी म्हणावं तर बोंबलायला आमचं घर शाळेच्या बोडख्याशी! प्रार्थनेचा 'पssssssssssहिsssssssला नमस्कार' सुरु झाल्यावर घरून निघालं तरी पाचव्या नमस्कारापर्यंत मी शाळेत पोहोचायचो. अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'ती'च्याविनाच गेलं.

       'कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतेच ना बे' या एकमेव आशेवर आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे आमच्या ध्यानातच आलं नाही. शाळेतल्या "चल हो बाजूला" म्हणणाऱ्या साळकाया- माळकाया आता "ओह एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत होत्या. अन आम्ही अजूनही "आय माय कमीन सर?" च्या पलिकड़े गेलो नव्हतो. त्यांच्या नवीन कोऱ्या स्कुटया आमच्या हर्क्युलस बाबाच्या शेजारी ऐटीत उभ्या राहायच्या. आता ब्राउनी पॉईंट्स मिळवायची पद्धतही बदलली होती. त्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून नोट्स वगैरे काढाव्या लागायच्या. चला एकवेळ ते ही केलं असतं, पण नोट्स काढायला समोरचा कुठल्या विषयावर बोलतोय हे तरी कळायला हवं ना? आमच्यातले काही उत्साही कार्यकर्ते प्रॅक्टिकलच्या वेळी मुलींना मदत करायला जायचे. जणू इंजिनाचा शोध यांच्या परसातचं लागला होता या थाटात बोलायचे. मला तर व्हर्नीयर (का कॅलिपर काय म्हणतात ते?) वापरून रीडिंगही घेता येत नव्हतं. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे माझे कॉलेजमधले  मित्र 'जोड्या लावणे' खेळत नव्हते. 'अबे कोणाशीही लाव पण लाव' अशी भूमिका असायची. कारण त्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. शेवटी काही सीनियर्सनी,'नजरेत येण्यासाठी' आम्ही गँदरिंगमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये सामील व्हावं असं सुचवलं.पण आमची 'नसलेली ख्याती आणि असलेले गुण' बघता आम्हाला दरवेळी एकच कमिटी मिळायची. डिसिप्लिन कमिटी !! केंद्रीय मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्र्याचं जे स्थान असतं तेच कॉलेज गॅदरिंगमध्ये  डिसिप्लिन कमिटीचं असतं. त्यांना कोणीही विचारत नाही! उलट नुसतेच उभे असतात म्हणून एखादयाची बॅग पकडायची जबाबदारी त्यांच्यावर येते. गॅदरिंगच्या त्या दोन दिवसात एखाद्या मुलीने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त 'ह्या नाटकाची प्रॅक्टिस कुठे सुरु आहे रे?' एवढं विचारण्यापुरती असते! शेवटी आमचं कॉलेजही तिच्याविनाच गेलं.

      अर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक वेंधळेपणा, अफाट न्यूनगंड आणि तरीसुद्धा असलेली बेफिकीर वृत्ती(किंवा निर्लज्जपणा म्हणा हवं तर) परमेश्वराने आमच्यांतच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलींनी इंप्रेस व्हावे ही मनीषा तरी बाळगू नये, पण नाही ना ! येताजाता एखाद्या मुलीने चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर स्वप्नांचे इमले डायरेक्ट वरातीपर्यंत पोहोचायचे! नंतर ह्याच मुलींच्या लग्नाच्या वराती आमच्या डोळ्यासमोरून गेल्या.

या परिस्थितीत ती सध्या काय करते हा प्रश्न मला शंभर मुलींच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करतो असं प्रश्न एक शंभरांश मुलींनाही पडणार नाही.आणि पडलाच तर त्याचे तिच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !

"तो सध्या काय करतो?....कॉलेजमधून बाहेर पडला असेल ना एव्हाना?

--चिनार

Wednesday, 11 January 2017

तो राजहंस एक !

२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच! ह्या संस्थानिकांच्या हाती एकदा जरी बॅट दिली की संस्थाने खालसा व्हायची. आता हे धोनी नामक संस्थानिक कधी खालसा होतात एवढंच बघायचं होतं! पण हळूहळू हे संस्थान भारतात नुसतं रुजलंच नाही तर पाळेमुळे घट्ट करून त्याने पूर्ण भारतावर वर्चस्व मिळवलं. मान्य करा अथवा करू नका,२००८ ते २०१५ ह्या कालखंडात महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटचा अभिषिक्त सम्राट होता !

मान्य करणाऱ्यांमध्ये काही काळ माझाही समावेश होता. कारण धोनी हे रसायन वेगळंच होतं. आदर्श खेळाडूच्या आमच्या व्याख्येत धोनी कुठेही बसत नव्हता. हा कसला कॅप्टन? कपिल देव,गावस्कर,सचिन,गांगुली,द्रविड ह्या माझी कप्तानांच्या चेहऱ्यावर खेळाप्रती,संघाप्रती जी निष्ठा दिसायची ती धोनीच्या चेहऱ्यावर कुठेही नसायची. पण निष्ठा दाखवावीच लागते हा आमचा गैरसमज धोनीने अलगद दूर केला. तो त्याच्या पद्धतीने खेळायचा. आणि  बहुतांश वेळा आपण जिंकायचो. अँड इट्स ऑल दॅट मॅटर्स!

काही लोकांचा जन्मचं जिंकण्यासाठी होतो. धोनीसुद्धा त्यातलाच एक असं मला वाटायचं. पण असं काही नसतं. धोनी किती जिंकला, किती हरला ते महत्वाचं नाही. धोनीच्या आधीचे कर्णधार हे त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावान होते हे तोसुद्धा मान्य करेल.पण ते सगळे आणि धोनी ह्यांच्यात मला जाणवलेला एक मूलभूत फरक सांगतो. ते सगळे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या भावनेने खेळायचे. धोनी, आपण जिकंलेलो  आहो,फक्त अजून जाहीर व्हायचंय ह्या विचाराने खेळायचा. धोनी विजयश्री खेचून आणत नव्हता तर ती त्याच्याच घरी राहते अश्या आविर्भावात खेळायचा. माझ्या अगाध क्रिकेटज्ञानामुळे धोनी कुठे कुठे चुकला ह्याच तांत्रिक विश्लेषण मी करू शकणार नाही. त्यामुळे  कोण बरोबर, कोण चूक हे ज्याचे त्याने ठरवावे. पण एक सामान्य क्रिकेटप्रेमी म्हणून बघताना मी असं म्हणेन की धोनी मैदानात असताना जिंकणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट वाटायची.

सचिन,लक्ष्मण,गांगुली,द्रविड आणि अश्याच कितीतरी आंतराष्ट्रीय फलंदाजांची तंत्रशुद्ध फलंदाजी बघण्याची सवय असल्यामुळे धोनी हा आमच्यासाठी एक धक्का होता. पण मुळात शुद्धता वगैरे सगळ्या कविकल्पना असतात. कुठलाही एक चेंडू  तुम्ही पायचीत होता,जायबंदी होता,जास्त श्रम घेता आणि इतर  कुठल्याही प्रकारे बाद होता,जर त्याच्या मुक्कामी पोहोचवू शकत असाल तर तुम्ही तंत्रशुद्ध फलंदाज आहात! धोनी नेमकं हेच करायचा. जगातल्या कोणत्याही गोलंदाजाने त्याला फार काळ सतावलेले  मी तरी बघितलेले नाही. उलट त्याला आऊट कसे करावे ह्यावर खलबतं व्हायची. फार कमी फलंदाजांच्या नशिबात अशी खलबतं असतात.

'गुरु' सिनेमातल्या शेवटच्या प्रसंगात गुरुभाई कोर्टाला ठणकावून सांगतात,"यहातक पोहोचने  के लिये बहोत कुछ खोया है मैने. और ये केस खतम होने तक शायद मेरी आवाज,मेरा दिमाग और मेरा सबकुछ खो दूंगा.पर एक चीज आप मुझसे नही छिन पायेंगे..और वो है मेरी हिम्मत !!"

वर्ल्डकप क्रिकेटच्या फायनलमध्ये सचिन,सेहवाग,कोहली परतल्यावर, फॉर्मात असलेल्या युवराजला थांबवून स्वतः मैदानात येण्यासाठी अपार हिम्मत असावी लागते. ही सामान्य बाब नव्हे. क्रिकेटविषयी,संघाविषयी आणि स्वतः विषयी अतुलनीय निष्ठा असणारा व्यक्तीच हे करू शकतो.ती हिम्मत दाखवून धोनीने तो सामना तिथंच जिंकला होता. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यानं जिंकला होतं ते करोडो भारतीयांचं मन !
धोनी, तुझ्या असण्याला,घडण्याला,कर्तुत्वाला आणि सयंमाला मनापासून सलाम !!

-- चिनार

Monday, 9 January 2017

व्यथा- त्यांच्या आणि आमच्या !

 साधं सरळ आयुष्य असतं आमचं. दहावी-बारावीच्या मार्कांवर आमची लायकी ठरते अन कॉलेज सुरु होतं. ते आटपून कुठेतरी नोकरीला लागायचं. मग लग्न, पोरंबाळं,संसार वगैरे वगैरे. आमच्यासारख्या शंभरातल्या ऐंशीजणांची हीच कथा. उरलेले काहीजण कॉलेजमध्ये प्रेम वगैरे करतात, परदेशात वगैरे शिकायला जातात.शेवटी  एका पातळीनंतर सगळ्यांची कथा आणि व्यथा सारखीच ! कोणी पुण्यात रडतो तर कोणी क्यालिफोर्नीयात एवढाच काय तो फरक!

           पण "त्यांचं" तसं नसतं. त्यांचं म्हंजे आमच्या हिंदी सिनेमावाल्यांचं! त्यांना दर्द दिल असतो (आम्हाला कोलेस्ट्रॉल असतो!).त्यांना दुनिया जीतने  की तमन्ना असते (आम्हाला मंथली टार्गेट असतात!). त्यांना ख्वाब असतात (आम्हाला इएमआय असतो!). त्यांना नयी राहे धुंडायची असतात (आम्हाला ट्रॅफिक जॅम असतो!).त्यांचा जालीम जमाना असतो(आम्हाला देशाचं सरकार असतं!). त्यांना बदले की आग असते (आमच्या बॉसच्या हातातच इन्क्रिमेंट असतं!).  त्यांचे शंभर-दोनशे-तीनशे कोटींचे क्लब असतात (आम्हाला आर्थीक मंदी असते किंवा नोटबंदी असते!)

        मध्यंतरी दिल धडकने दो नामक सिनेमा बघण्यात आला.श्रीमंत पण विविध व्यथा असलेले काही लोकं एका बोटीवर जमतात अशी काहीशी कथा आहे. व्यथांची पातळी काय असावी हे लक्षात यावे म्हणून त्यातील काही पुढे मांडतो. बिझिनेसमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वडील आता मुलासाठी घेतलेले विमान (खेळण्यातले नव्हे! खरेखुरे) विकणार असतात. आता आपल्याला कधी 'विमान चालवायला' मिळणार नाही ह्यामुळे मुलगा व्यथित असतो! दुसरीकडे एका गर्भश्रीमंत मुलाच्या प्रेमात पडले असताना आपले वडील दुसऱ्याच गर्भश्रीमंत मुलाशी लग्न करण्याचा आग्रह (जबरदस्ती नव्हे, हा सैराट नाही!) करतायेत म्हणून एक मुलगी व्यथित असते. आपल्या जाड दिसण्यामुळे नवरा आपल्यावर प्रेम करत नाही आहे असं वाटून एक पत्नी जास्तीत जास्त अन्नग्रहण करत असते. बरं ह्या व्यथांवर सिनेमात दाखवलेले इलाज तर अचाट होते. खरं म्हणजे सगळे बोटीवर जमलेच आहेत तर बोटीला खालून एक भगदाड पाडून कितीतरी समस्या मिटवता आल्या असत्या पण असो...! म्हणजे ह्यांच्या व्यथांची समृद्धी बघूनच आपण थक्क होतो. अश्याच कुठल्याश्या सिनेमात, आयुष्याचा  अर्थ समजावून घेण्यासाठी समुद्रात डुबकी मारणे, विमानातून खाली उडी मारणे किंवा माजलेले बैल अंगावर घेणे वगैरे इलाज सांगितले होते. खोल समुद्रात उडी मारण्यासाठी आधी समुद्राच्या मधोमध जाण्याचे सामर्थ्य अंगी बाळगावे लागते ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं होतं. किंवा बैलाच्या पुढे पळण्यापेक्षा, बैलांमागे नांगरावर उभे राहिल्यास आयुष्याचा अर्थ जास्त चांगल्या पद्धतीने कळतो हे बहुधा दिग्दर्शक विसरला असावा.   

           एवढं असूनही ह्यांच्या जिंदगीत म्हणे खूप प्रॉब्लेम असतात. दिल चाहता है नामक सिनेमात बापानं सेट केलेला धंदा सांभाळायला पोरगा ऑस्ट्रेलियात जातो. तिथं एक लग्न ठरलेली मुलगी योगायोगाने त्याला भेटते. ती ह्याच्यासोबत गावभर भटकते. मग तीच ह्याच्या प्रेमात पडते. आणि आता तिचं लग्न दुसऱ्याशी होणार हे कळल्यावर पोरगं सैरभैर होते. बाप लगेच पोराला बिझिनेस क्लासने भारतात बोलावून घेतो. साधारणपणे आपल्यापैकी कोणी जेंव्हा प्रेमात पडतं तेंव्हा गुप्तता पाळण्यात येते. ह्यांचं तसं नसतं. मुळात आपण हिच्या प्रेमात पडलोय ही गोष्ट त्यांना तिच्या लग्नाच्या दिवशीच कळते. मग तिचा होऊ घातलेला नवरा सोडून अख्खी वरात ह्या दोघांचं लग्न लावायच्या मागे लागते. शेवटी आटपाट नगरात पोरीच्या 'होऊ घातलेल्या सासऱ्याच्या' समंतीने त्या दोघांचा विवाह संपन्न होतो! बरं एवढं झाल्यावरही त्या ऑस्ट्रेलियाच्या धंद्याचं काय झालं असा प्रश्न कोणालाच पडत नाही! आणि योगायोग तरी किती घडावे ह्यांच्यासोबत ?? साध्या पीएमटी बसमध्ये बाजूला एखादी मुलगी बसावी एवढाही योगायोग कधी घडत नाही आमच्यासोबत ! ह्यांना पावसात लिफ्ट मागणारी ललना भेटते, आम्हाला पावसात गाडीचं पंक्चर दुरुस्त करायलासुद्धा कोणी सापडत नाही! अनोळखी तर सोडूनच द्या,पण ओळखीतल्या मुलीसुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत फेसबुकावर! ह्याच सिनेमात आणखी एक योगायोग आहे. सिनेमातला दुसरा एक पोरगा डझनभर प्रेमप्रकरणं केल्यावर शिस्तीत अरेंज मॅरेज करतो. त्यातही त्याला सांगून आलेली पहिलीच मुलगी आवडते. कालांतराने मुलीलाही तो आवडतो. ह्यांच्यात एकदा लग्न करायचं ठरलं ना की जुन्या सगळ्या प्रकरणातून आपसूक क्लिनचीट मिळते. इथं आमचं लग्न ठरवताना, एक-दोन मुलींना नाकारलं तर लगेच,"तुला काय ऐश्वर्या पाहिजे का रे?" असे प्रश्न चालू होतात.(नंतर किती ऐश्वर्या आम्हाला नाकारतात हा स्वतंत्र विषय आहे!). योगायोग घडण्याची परिसीमा बघायची असेल तर हम तुम सिनेमा बघावा. नायक-नायिका दर दोन-तीन वर्षांनी जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे भेटतात. तसे ते कुठेही भेटले तरी नवल वाटू नये  कारण हिंदी सिनेमात  दक्षिण आणि उत्तर ध्रुव सोडून पृथ्वीच्या प्रत्येक कोनाड्यात आता प्रेमकथा फुलवून झालेली आहे! पण प्रश्न योगायोगाचा आहे. भारतात ताटातूट झाल्यावर फ्रान्समधल्या कुठल्यातरी ट्रेनमध्ये ते भेटतात. इथं आपल्याला लोकलमध्ये चढायला मिळेल का ह्याची शाश्वती नसते. लोकल सोडा, तीन तीन महिन्याआधी रिझर्वेशन करून ते कन्फर्म होत नाही तर आपल्या बाजूच्या बर्थवर जुनी मैत्रीण भेटेल अशी अपेक्षा तरी कशी करायची?       

     रिझर्वेशन वरून आठवलं, ह्यांच्यात ते मैं दुनिया का कोना कोना देखना चाहता हू टाईप नग असतात बघा. ह्यांचे तिकीटं कोण काढत असेल हा बाळबोध वाटत असला तरी अत्यंत महत्वाचा प्रश्न मला नेहमी पडतो. ह्यांना आयआरसीटीसी, वेटींग लिस्ट, तात्काळ तिकीट,सर्व्हर डाऊन वगैरे प्रकार आड येत नाहीत का? विमानाचे दर पाहून ह्यांचे डोळे फिरत नाहीत का ? जिंदगी का मतलब शोधण्यासाठी वर्षातून दोन-तीन युरोप टूर करणं ह्या चाकरमानी हिरोंना कसं काय परवडतं? बरं जिंदगी का मतलब युरोपमध्येच का सापडतो? गेलाबाजार माथेरान नाहीतर अजिंठ्यात का सापडत नाही? बरं एकवेळ सगळ्या गोष्टी नजरेआड केल्या तरी वर्षातून दोन वेळा पंधरा दिवसांची सुट्टी मंजूर करणारे मॅनेजर ह्या सृष्टीत कोणत्या ग्रहावर आढळतात?  
  
      जाऊद्या! आमच्या आणि त्यांच्या व्यथांची तुलना होऊच शकत नाही. भाऊसाहेब पाटणकरांनी माणसाची व्याख्या, 'आपल्या व्यथांच्या सौंदर्यावर मुग्ध होतो तो माणूस!' अशी केली आहे. आम्ही मुक्त होऊ शकत नसलो तरी मुग्ध नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास आम्ही बरे अन आमच्या व्यथा बऱ्या !  

--चिनार