Thursday, 13 August 2020

नारायण...लॉकडाऊन इफेक्ट्

 दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली.

त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन,


"काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली!  सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला.


"बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?"    


"नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले 


आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही. त्याने सॅनिटायझरची बाटली दिली गण्याच्या हातात अन गण्याला बजावून सांगितलं


"हे बघ गण्या, दोन थेंबाच्यावर कोणाच्याच हातावर टाकू नको सांगून ठेवतो! संध्याकाळपर्यंत हीच बाटली पुरवायची आहे लक्षात ठेव"


"अहो पण चार बाटल्या आणल्यात ना नारायणभाऊ?


"म्हणून काय लगेच संपवायच्या का? किती महाग झालंय सॅनिटायझर माहितीये का? जेवढं उरेल तेवढं संध्याकाळी वापस करायला येईल असं बजावून आलोय त्या मेडिकलवाल्याला मी! तो मला सांगत होता वापस नाही घेता येत म्हणून. मी म्हटलं, त्याला काय एक्स्पायरी असते होय रे? की सोडा असतो त्याच्यात झाकण उघडलं की उडून जायला. मला सांगतोय! तू जपून वापर"


"बरं"


"आणि हे बघ, शिंच्या अत्तर समजून लोकांच्या अंगावर सॅनिटायझर शिंपडू नको लक्षात ठेव."


गण्याला उगाचच दम देऊन नारायण पुढे निघाला. 


पुढे दोन बायका एकमेकांना चिपकून सेल्फी घेत होत्या. दोघीही 'अफाट' असल्याकारणाने एका फ्रेममध्ये बसणं शक्य नव्हतं. 


नारायण लगेच खेकसला,

"ए ए शकुताई! काय चाललंय? काय सोशल डिस्टंसिंग वगैरे काही आहे की नाही? जवळ उभं राहून काय सेल्फी काढताय. तू या कोपऱ्यात जा अन तू त्या कोपऱ्यात जा! अन लागेल तेवढे फोटो काढा जा"


"ए असं काय रे नारायण? दूर उभा राहून कसं काय सेल्फी काढणार रे?"


"हे बघ..लग्नात सोशल डिस्टंसिंग पाळणार अशी हमी तुझ्याच नवऱ्यानं दिलीये पोलीस स्टेशनमध्ये. त्याचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावायचा नसेल तर सांगतो ते ऐक. नाहीतर तुझं तू बघ"


नारायण पुढे निघाला,

"नारबा, चहा-नाश्ता नाही आला अजून? व्याही पेटलाय तिकडं!"


"सकाळपासून तीन वेळा मी चहा पाजलाय त्यांना! कप सॅनिटाइझ्ड आहेत का असं विचारात होते मला.  मी म्हटलं कप,बशी, साखर,चहा पावडर इतकंच काय तर गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. आता बोला !!


तेव्हढ्यात नारायणाला मुलीच्या आईने आवाज दिला..तिच्यासोबत सात-आठ बायका होत्या.

"नारायणा, अरे मुलाकडल्या बायकांना हळदी-कुंकू द्यायचंय. वाण म्हणून प्रत्येकीला एकेक मास्क देऊ म्हटलं. तर हे कसले सुती कापडाचे मास्क आणलेस रे. मुलाच्या आईला तरी किमान गर्भरेशमी मास्क आणायचास ना!"


"काय करायचंय थेरडीला गर्भरेशमी? सुती कापड बरं पडतं त्यापेक्षा"


सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर मनसोक्त हसल्या.


"नारबा...मुलाचे मित्र परगावावरून आलेत. आता क्वारंटाईन केल्याशिवाय कसं काय सामील करून घेणार त्यांना?"


"काका, काही काळजी करू नका. त्यांची 'सोय' मी वरच्या खोलीत केली आहे. संध्याकाळपर्यंत उठणार नाहीत"


"अरे म्हणजे, दारू बिरू आणलीस की काय?"


"कसली दारू? सॅनिटायझरमध्ये ८२ टक्के अल्कोहोल असते म्हणतात. तेच ठेवलंय ग्लासात भरून!!"


असे एकानंतर एक हल्ले परतवत नारायण आपला डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा कार्यालयात थैमान घालत असतो.


नवरा-नवरी बोहोल्यावर उभे राहतात. मंगलाष्टक म्हणण्याची वेळ येते. आणि नेमका आंतरपाट सापडत नाही. 


"हे काय, साध्या आंतरपाटाची व्यवस्था करता येत नाही ह्यांना?", कोणतरी कुजबुजतं..


तेवढ्यात नारायण उत्तरतो,

"कश्याला पाहिजे आंतरपाट गुरुजी? लग्न लागण्याआधी एकमेकांचे चेहरे पाहायचे नाही हाच उद्देश असतो ना आंतरपाटाचा? हो ना!! मग हे काय मास्क लावलेत त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? चला सुरु करा मंगलाष्टक...म्हणा रे सगळ्यांनी..तदैव लग्न सुदिनं...."


आणि एकदाच लग्न लागतं..


नारायण डोक्यावर कफन बांधल्यासारखं चेहऱ्यावर मास्क बांधून पुढचा हल्ला परतवायला निघतो...


समाप्त...


चिनार

No comments:

Post a Comment