Wednesday, 5 November 2014

झालीया निवडणूक असावे निश्चिंत !!

झालीया निवडणूक असावे निश्चिंत !!
गेल्या दोन - तीन महिन्यांपासून देशात गाजत असलेली निवडणूक अखेर संपली. ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो निकाल सुद्धा लागला. याआधी कितीतरी निवडणुका अनुभवल्या असल्या तरी यावेळचा अनुभव जरा वेगळाच होता. सज्ञान होऊन आठ - दहा वर्षे झाली ,दोन - तीन वेळा मतदान सुद्धा करून झालं पण यावेळचा मतदानाचा उत्साह जबरदस्त होता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. तसा निवडणुकीशी आमचा संबंध फार जुना आहे. म्हणजे अगदी  मतदानाचा हक्क मिळायचा होता तेंव्हापासून !! मग ती निवडणूक नगरपालिकेची असो कि लोकसभेची. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो. अर्थात त्यावेळी पक्ष कोणता , उमेदवार कोणता ह्याचा विचार आम्ही करत नव्हतो. पंजा, कमळ, धनुष्यबाण, नांगर, शिलाई मशीन , टीव्ही ,दगड ,माती-धोंडे .... . सगळ्या निवडणूक चिन्हांची पत्रकं आम्ही जमवली होती. (" साहेब, त्यावेळी घड्याळ अस्तित्वात यायचं होतं म्हणून ते आणू शकलो नाही. कृपया आमच्या गावातील धरणांवर याचा राग काढू नका !! ". आणि हो ! त्यावेळी "झाडू" चा जन्म देखील व्हायचा होता हे देखील सांगायला हवं नाहीतर आम्ही सगळे अंबानीचे एजंट आहोत असे आरोप "सामान्य माणूस" करेल. त्याकाळात रेल्वे इंजिन सुद्धा रस्त्यावरील टोलनाक्यावरून धावता रुळावरूनचं धावायचं म्हणून ते सुद्धा घरी आणू शकलो नाही !! )
त्यावेळी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान केलं जायचं. मतमोजणीला - दिवस लागायचे. मतपत्रिका वापरून मतदान करण्याची माझी फार इच्छा होती. पण आम्ही एकविसाव्या शतकातले मतदार असल्यामुळे हे शक्य झालं नाही. आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला तेंव्हाइलेक्ट्रॉनिक” मतदानाच युग सुरु झालं होतं. तसा आधुनिकीकरणाला किंवा संगणक युगाला माझा विरोध नाहीये. पण तरी कोणतीही  गोष्ट इलेक्ट्रॉनिक झाली ना की मला जरा भीतीचं वाटते. यावेळी मतदानाच्या दिवशी तर मला फार टेन्शन आलं होतं. .नेमकी आपल्याच वेळी ती व्होटिंग मशीन बंद पडली किंवा खराब झाली तर काय ? असा प्रश्न हजार वेळा माझ्या मनात येउन गेला . पण माझी ही शंका लगेच दूर झाली. आजकाल व्होटिंग मशीन व्यवस्थित काम करते आहे कि नाही हे बघायला उमेदवार  स्वत: मतदान कक्षात येउन जातात म्हणेइतकचं काय तर आपल्या पक्षाचं चिन्ह पाचपन्नास वेळा दाबून ते खात्री सुद्धा करून घेतात. मग माझी काळजी दूर झाली !!!
गेल्या महिन्याभरात देशभरात प्रचाराचा नुसता धुरळा उडत होता. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या नेत्यांची भाषणं ऐकून दमायला झालं होतं पण यातला नेमका कोण खरा हे कळत नव्हतं. एका नेत्याला तर देशातील महिलांची इतकी काळजी वाटत होती कि त्याच्या प्रत्येक  भाषणात , " महिला सक्षम झाल्याच पाहिजे" हाच मुद्दा वारंवार येत होता. म्हणजे त्याला देशातील वीजप्रश्न , पाणीप्रश्न, अर्थव्यवस्था, जातीयवाद वगैरे काहीही प्रश्न विचारले तरी , "महिला सक्षम झाल्याशिवाय हा देश सुधारणार नाही " असंच उत्तर यायचं. आता महिला सक्षम करणार म्हणजे काय प्रत्येकीच्या हातात बंदूक देणार का ? असा प्रश्न मला पडला. (खरंच असं झालं तर घरातल्या मोलकरणीला सुद्धा ," मावशी ,उद्या जरा लवकर याल का ? असं विचारताना आधी चिलखत घालावं लागेल ). कदाचित त्या नेत्याने लहानपणापासूनच त्याच्या घरी आजी,आई, बहिण यांचाच हुकुम चालतो असं बघितलं असेल. त्यामुळे देशातील सगळ्या पुरुषांचा रोल फक्त स्वत: च्या कुटुंबांना "आडनाव" देण्यापुरताच मर्यादित असावा असं त्याला वाटत होतं. पण एका गोष्टीत मात्र या नेत्याच खूप आश्चर्य वाटायचं. स्वत: अज्ञान निरागसतेच्या नावाखाली लपवायचा प्रयत्न करताना बाकी सगळ्या जगात सुद्धा अज्ञान पसरलं आहे अशी त्याची ठाम समजूत होती. त्याला बघितलं कि ' दिवार ' सिनेमातला एक प्रसंग आठवतो. नोकरीच्या शोधात असलेला रवि (शशी कपूर) आपल्या मैत्रिणीच्या पोलिस  कमिशनर असलेल्या वडिलांना भेटायला जातो.
ते विचारतात ," रवि बेटा, आजकल क्या करते हो ?".
स्वत:च्या बेरोजगारीची लाज वाटून रवि म्हणतो ," जी क्या बताऊ , मैं आजकल कुछ नही करता ".
यावर पोलिस  कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!"
तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "
दुसरीकडे एका नेत्यांनी देशभर सभा घेण्याचा सपाटा लावला होता. ते सतत काहीतरी " मॉडेल" दाखवायचे. त्यांनी स्वत: च्या निवडणूक चिन्ह बरोबरचं चहाचा इतका प्रचार केला की ते निवडून आल्यावर बहुतेक चहाला "राष्ट्रीय पेय" म्हणून  जाहीर करतील. ते बघून करन जोहर सुद्धा आपल्या "कॉफी विथ करन" कार्यक्रमांच नाव बदलून "चहा विथ करन" करणार असल्याच ऐकलं होतं. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचा प्रचार करण्यासाठी या नेत्याला पक्षातील इतर कोणताही नेत्याची गरज नाही असं जाणवत होतं. या नेत्याला बघून 'दिवार' मधला दुसरा प्रसंग आठवतो.
एका अशक्यप्राय कामाची रणनीती आखताना विजयचा (अमिताभ बच्चन) बॉस त्याला म्हणतो , " विजय, तुम्हारा वहा अकेले जाना  ठीक नही. क्या तुम्हे लगता हैं के ये काम तुम अकेले कर सकते हो ?".
त्यावर विजय म्हणतो ," नही.....मैं जानता हू के ये काम मैं अकेले कर सकता हू !!! ".
या पक्षाची प्रचार नीती ठरवताना असंच काहीसं संभाषण झालं असावं !!
हे सगळं सुरु असताना एक सामान्य माणूस सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचा तर हा नेता जर खेळायला आला तर पुढीलप्रमाणे नियम असतील .
. मी सामान्य माणूस असल्याने मलाच पहिली ब्याटींग मिळाली पाहिजे
. माझ्या बॅटनी चेंडूला नुसता स्पर्श जरी केला तरी सहा रन देण्यात यावे आणि स्पर्श झाल्यास गोलंदाजावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात यावा
. मी सामान्य माणूस असल्याने प्रायोजकांनी माझ्यावर कोणताही दबाव टाकू नये आणि याआधी च्या सामन्यात कमावलेल्या पैशांचा हिशोब द्यावा
. अम्पायरने सगळे निर्णय मला विचारून घ्यावेत अन्यथा तो प्रायोजकांचा एजंट असल्याचे मी जाहीर करेल
. मी सुद्धा प्रेक्षकांसाराखाच सामान्य माणूस असल्याने माझा संघ हरल्यास प्रेक्षकांनी माझ्यासोबत पीचवरचं "धरणे " द्यायला बसावे.
काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा जोरात प्रचार  सुरु होता . निवडणुकीच्या घौडदौडीत एक महिला नेता आपला हत्ती पुढे  दामटवत होती . आता फक्त हत्तीवरून साखर वाटायचीच बाकी राहिली होती. मला तर स्वप्नात तिरंग्यात अशोकचक्र ऐवजी हत्ती दिसायला लागला होता. एका राज्यातल्या राजकारणात "चिकन सूप आणि वडा" असा नवीन पदार्थ तयार झालं होता. प्रादेशिक पक्षांची एक गोष्ट अनाकलनीय असते. दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये जरा काही झालं कि यांना डायरेक्ट पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागतात. आणि अशी मोठी स्वप्न बघितली कि रेल्वे  किंवा कृषी मंत्रिपद तरी मिळूनच जाते !!
असो. तर निवडणुकीची आणि प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. पुढच्या दोन - तीन दिवसात नवीन सरकार स्थापन होईल.नवीन सरकार आमच्या मनासारखं आहे कि नाही हा मुद्दा आता गौण आहे. एकशे वीस कोटी सामान्य जनता सरकारकडे आशेने बघते आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे एक आव्हानच आहे. मुळात सामान्य माणसाच्या अपेक्षा फार कमी असतात . पण वर्षानुवर्षे त्या कोणीच पूर्ण केल्याने आता त्या डोंगर एवढ्या वाटतायेत. थोडा विचार केला तर सामान्य माणसाच्या अपेक्षा पुढील दोन ओळीत सांगता येतील  आणि थोडा प्रयत्न केला तर त्या पूर्ण देखील करता येतील !!
                            थोडा हैं थोडे की जरुरत हैं
                          जिंदगी फिर भी यहा खुबसुरत हैं !!
                                                                                                                                                                                                                                                                           

                                                                                                                                                                  ---- चिनार

कार्पोरेट

कार्पोरेट
कॉलेज चे सोनेरी दिवस सरत असतानाच आम्हाला भविष्याचे वेध लागले होते. आता आपण कार्पोरेट विश्वात पदार्पण करणार ही जाणीव आम्हाला सुखावून जायची . बघता बघता कॉलेज संपल .पण कॉलेज मधून बाहेर पडताच मनात आलेला पहिला विचार म्हणजे , " आता डोक्यावर कॉलेजच छप्पर नाही " असा होता .त्या छपराखाली आम्ही किती सुरक्षित होतो हे कार्पोरेट विश्वाचे चटके बसल्यावर कळलं .
मग तो सोनियाचा दिन आला आणि आम्ही कंपनीत रुजू झालो . ‘Induction programme, Training session’ असे करत करत भरभर दिवस पुढे जात होते . त्याकाळात कंपनीच्या भव्य इमारतीपासून ते मशीनमधल्या बेचव कॉफी पर्यन्त सगळ्या गोष्टींच कौतुक वाटत. पण नवलाईचे नउ दिवस संपले कि त्याच गोष्टींचा कंटाळा यायला लागतो . कारण त्या भव्य इमारती च्या आतमध्ये सगळं यंत्रवत सुरु असतं. आणि तिथे कॉफी मशिनलाच काय तर खुद्द माणसाला सुद्धा "Resourse" म्हणून संबोधण्यात येते.
हळूहळू कामाला सुरुवात होते. " बॉस " नावाच्या एका व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून देण्यात येते . मग हळुहळू ते व्यक्तिमत्व उलगडायला लागतं. किंबहुना हे व्यक्तिमत्व आपल्याला कधीच उलगडणार नाही हे आधी कळतं . कारण बॉस हे एक नसून अनेक व्यक्तिमत्व असतात. पुढे आपल्या करियर मध्ये कितीतरी बॉस भेटतात. कोणी मित्रासारखं वागवतं, कोणी अक्षरश : मुलासारखं वागवतं, कोणी फक्त कामाशी काम ठेऊन म्हणजे ज्याला कार्पोरेट भाषेत " प्रोफ़ेशनल " असा म्हणतात तसं वागवतं , तर कोणी अगदी जन्मोजन्मीचा शत्रू असल्यासारखं वागवतं. कधी कधी तर असा प्रश्न पडतो कि जेंव्हा  आपल्यावर बॉस होण्याची वेळ येईल तेंव्हा  आपण कसे असू ? त्यात आपला स्वभाव जर सगळ्यांशी मिळुन मिसळून राहण्याचा असेल तर हे उसंन प्रोफेशनलीझम आणायचं तरी कूठुन ? त्यात प्रोफेशनलीझमचा खरा अर्थ आणि कार्पोरेट विश्वातला अर्थ ह्यात खूप फरक आहे.
आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असणं आणि त्यासाठी झोकून काम करणं म्हणजे प्रोफेशनलीझम !! पण कार्पोरेट विश्वात माझ्या व्यवसायाशी फक्त मीच प्रामाणिक आहे असं  दाखवण्यासाठी झोकून काम करणं म्हणजे प्रोफेशनलीझम !!
कार्पोरेट विश्वात काही परवलीचे शब्द असतात .
Performance ---- जो नाही दाखवला तेंव्हाच आपण सगळ्यांच्या नजरेत येतो
Productivity ----  जी नेमकी किती आहे हे कोणीच सांगु शकत नाही
Project ---- " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी " अश्या प्रकारामुळे जो नेहमीच पेटलेला असतो.
Process ---- जी ठरवे पर्यन्त प्रोजेक्ट ची वेळ संपते
Increment ---- मालकाने अगदी ५१% शेयर्स जरी आपल्या नावे केले तरी जी आपल्याला कमीचं वाटते .
Team ----- ज्यांत सगळेच कप्तान असतात.
तश्या कार्पोरेट विश्वात गमतीजमती भरपूर असतात . व्यक्ती निरीक्षणाचा छंद असणारयासाठी तर ते "विरंगुळा केंद्र " ठरू शकतं. उदाहरणार्थ , समोरची व्यक्ती कोणत्या विभागातली आहे हे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर " दुपारी चारनंतर या " असं मिळालं तर आपण  ‘Account Department’  ला आहोत हे ओळखावं . आणि त्यानंतरही तुम्ही प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा केलाच तर, "तुम्हाला कळत नाहीये का मी काय बोलतोय ?" असं उत्तर मिळेल . आपण समजदार असलो तर दुपारी चारनंतर सुद्धा तिथे जाणार नाही
किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर,  ‘as per company policy’ असं मिळालं तर समोरची व्यक्ती ही  HR चं असु शकते . HR लोकांसाठी कंपनी पॉलिसी  हे पुस्तकं बायबल पेक्षा महत्वाचं असतंगंमत म्हणजे त्यांनी कधी बायबलही वाचलेलं नसतं आणि कंपनी पॉलिसी  पण वाचलेली नसते . पण कोणत्याही गोष्टीला अडवणं हीच आपल्या कंपनीची पॉलीसी आहे अशी त्यांची ठाम समजूत असते .
आपलं एखादं महत्वाचं काम घेऊन आपण कोणाकडे गेलो आणि ते काम झालं असं तर कधीचं होत नाही . अशावेळी , " मी आत्ता खूप बिझी आहे. मी आत्ता काहीच करू शकत नाही " असं उत्तर मिळाल्यास आपण         ‘ Design Department (Technical cell)’  ला आहोत हे ओळखावं . पण थोडं लक्ष देऊन तो बिझी असणारा माणूस नेमकं काय करतोय हे बघितल्यास कळेल की काल केलेलं चुकीचं काम तो  आत्ता परत करतोय . कारण त्यासाठी आत्ताच त्याच्या बॉसनी त्याला झापं झाप झापलाय !!
मग आपलं अपूर्ण राहिलेलं काम घेऊन आपण दुसऱ्या  कोणाजवळ गेलो की , "तू मला काय विचारतोय ? माझा काय संबंध ?" असं उत्तरं मिळेल . हे उत्तर देणारा  माणूस हा कंपनीतला सगळ्यात दु:खी माणूस असतो . कारण त्याचा नेमक्या कोणत्या कामाशी संबंध आहे हे त्यालाही माहिती नसते.
आपल्या एखाद्या समस्येचं उत्तर जर , "मी हे आधीच सांगितलं होतं . त्यावेळी माझं कोणी ऐकलं नाही " असं मिळालं तर आपणQuality Control’  मध्ये आहोत . या लोकांना सगळ्या गोष्टींची पुर्वकल्पना असते. पण यांची भुमिका ही नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणा सारखी तटस्थ असते .
मग हळुहळू सगळे विभाग फिरून आपण Project Manager  कडे येतो. आपली समस्या ऐकून तो कुत्सित पणे हसतो . आणि , "अरे १८५७ च्या उठावात  आम्ही….." अश्या सूरात सुरवात करून सगळा इतिहास - भूगोल आपल्यासमोर मांडतो . पण नेमका आपला प्रश्न अन्नुतरितच राहतो . या व्यक्तीला भूतकाळ आणि भविष्य काळातच राहायला आवडतं. वर्तमानकाळ त्याच्या गावीच नसतो .
बिचारे आपण !! समस्या अजूनही सुटलेली नसल्यामुळे शेवटी आपल्या बॉस समोर सगळी कैफियत मांडतो . मग बॉस आपण काय करायला हवं होतं हे सांगतो . अचानक आपल्याला  श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन घडतंय असं  जाणवायला लागतं. आणि त्या विश्वरूपापुढे आपलं अस्तित्व,आपलं ज्ञान किती नगण्य आहे ह्याची जाणीव होऊन निराश मनस्थितीत आपण घरी जातो .
अश्या कितीतरी वल्ली इथे रोज भेटतात . स्वत : विषयी कितीतरी गैरसमज घेऊन लोकं इथे वावरतात . काही लोकांना कंपनीची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे असं  वाटतं . जणूकाही यांनी काम करणं बंद केल्यावर दुसऱ्याच दिवशी कंपनीला टाळं लागणार आहे . काही लोक तर सतत ," सध्या मार्केट मध्ये मंदी आहे म्हणून नाहीतर केंव्हाच लाथ मारली असती या कंपनीला !!" अश्या अविर्भावात  असतात .जणूकाही मार्केट तेजीत आल्यावर मुकेश अंबानी स्वत : यांच्यासाठी पायघड्या घालणार आहे . आणि अझीम प्रेमजी ह्यांचासाठी देवाला साकडं घालणार आहे !!! काही लोकं सतत आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची कैफियत मांडत असतात . कंपनीची प्रत्येक  गोष्ट ही आपल्याला त्रास देण्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत असते . म्हणजे अगदी ह्यांच्या डोक्यावरचे पंखे  जरी बंद झाले तरी आपल्याला गरमी व्हावी म्हणून मुद्दाम असं केलंय असं त्यांना वाटतं . तर काही लोकांना कंपनीतल्या आतल्या बातम्या आपल्यालाच कश्या माहिती असतात हे सांगण्यात अभिमान वाटतो . जणूकाही कंपनीचा मालक आणि हे रोज एकाच कपातून चहा पितात !!
या सगळ्यात आणखी एक जमात  असते . ती म्हणजे प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्यांची . पण ह्या बिचाऱ्यांची परिस्थिती नेहमीच इकडे आड अन तिकडे विहीर अशी असते . कारण कधीतरी पाणी लागेल या आशेने ते विहीर खोदत राहतात . आणि पाणी लागल्यावर इतर लोकं त्यात हात धुवून घेतात . पण या बिचारयांच्या हाताला कोणी पाणीही लागू देत नाही आणि त्या खोल विहिरीतून बाहेर पडायला त्यांना कोणी हातसुद्धा देत नाही . शिवाय विहिरीतून बाहेर पडलेच तर पुढे काय हा प्रश्न तर कायम असतोच !!
तसं पाहता खरं विश्व आणि कॉर्पोरेट विश्व सारखंच असतं . फरक असला तर तो एव्हढाच की खऱ्या विश्वातली Entry आणि Exit आपल्या हातात नसते . आणि  कॉर्पोरेट विश्वातली Entry आणि Exit  बऱ्याच  अंशी आपल्या  हातात असली तरी त्याचा काही उपयोग नसतो . हे वाक्य लिहिताना कुठेतरी वाचलेल्या ओळी मला आठवतायेत .
                                         जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा,
                   जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा  !!! “
                                                                                                                                                   ----चिनार