Tuesday, 26 February 2019

मसूद अजहर आणि इम्रान खान ह्यांचे फोनवरील संभाषण.."ह्याले काय अर्थ हाय बे इम्र्या..आमाले जबाबदारी घ्यायले सांगतली अन स्वतःची जबाबदारी इसरला लेका..
असं कुटं असते का राजा?"

"चूप ऱ्हाय बे..मले तं हे नाही समजून ऱ्हायलं अजून का ते मिराज म्हंजे विमान हाय का रनगाडे हाय? अन हे लेझर बॉम्ब कोनत्या बाजारात भेटते बे?"

"बापा..तुले तं काहीच समजत नाही राजा.."

"हाव ना.... अन ते विमानं एवढे आत घुसेपर्यंत आमचा रडारवाला काय पानाले चुना लावत बशेल होता का?"

"तरी तुले म्हटलं होतं सायच्या ते चायनीज रडार नको घेऊ..लावला चुना त्याईनं तुले.."

"जाऊदे लेका..म्हायं क्रिकेटचं बरं होतं लेका..जाऊदे ठेवतो मी फोन..पायतो आयशीशीत नोकरीगिकरी भेटते का एखांदी "

"हाव पाय..मायाकरता पन पायजो..गवतगिवत कापायले लागतंच अशीनं त्यांले एखादा."

Tuesday, 19 February 2019

षंढ

घटना "ती" ऐकताच आम्ही पेटलो..
कॅण्डल लावुनी आलो...अन मग विझलो..|
स्वप्नातही अणुबॉम्ब बघुनी "झिरपलो"
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||

घेतला ग्लासात सोडा अन म्हणालो युद्धाच्या बाता सोडा..
जास्तीत जास्त  "त्यांच्याशी" क्रिकेट खेळणं सोडा...|
बीयर चिल्ल्ड नाही म्हणून ओरडाया लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||

म्हणे राजकारण नको ह्या विषयी..
'युती'च्याच गोष्टीत घेऊ "आघाडी"...|
गळ्यात पडून सेल्फ्या लगेच घेऊ लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||

नको तिथे "तुका" आम्हाला आठवतो..
उगी राहून मग आम्ही जे होईल ते बघतो..|
नाठाळा माथी काठी, हाणणेही विसरलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||

होऊच द्या पुन्हा एकदा सव्हिस अकरा..
बिर्याणीला आहेच पुन्हा तयार बकरा...|
अवस्थेला व्यवस्थेचे कोंदण देऊ लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||

महाराज..स्वराज्य निर्मिले तरी कशास?
इथे घाबरतो आम्ही पाहुनी सश्यास..|
घायाळ हरिणी बघून पळू लागलो..
असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||

कविता पोस्टवुनी कर्तव्य केले | अन लगेच "लाईक" मोजाया  घेतले |
कमेंट अन स्मायल्या रोजच्याच आम्हा | हेच आमुचे शस्त्र अन हाच अमुचा बाणा |
नेत्यांवर चर्चा हीच आमची भाकर | त्यांनाच देतो शिव्या अन त्यांचेच आम्ही चाकर |

काय विचारता आम्हा षंढ कैसे निपजले |
जिथे पेरले वेगळे अन रोपटे भलंतेच उगवले ||


-- चिनार जोशी