Monday, 13 May 2019

टीम इंडिया मिशन २०१९

कोहलीचा सकाळी सकाळी "टीम इंडिया मिशन २०१९" या व्हाट्स ऍप ग्रुपवर मॅसेज,
"पोट्टेहो, आयपीएल संपली. आता नाचगाने बंद करा सायचेहो. उद्या सकाळी पाच वाजता मले सारे मैदानात पाहिजे..."
तिकडून विजय शंकरने लगोलग अंगठ्याची स्मायली 👍🏻पाठवून दिली.
केदार जाधवचा पण लगेच रिप्लाय..."हाव भाऊ..येतो"
बाकी कोनीच अजून मॅसेज वाचला नाही हे पाहून कोहली चिडला.
"मॅसेजही वाचून नाही राहिले ना पोट्टे.... माया दिमाग खराब करू नका"
"भाऊ चिडू नका भाऊ...मी उठवतो साऱ्यायले..", केदार जाधव
स्क्रीनवर रोहित इज टायपिंग असा मॅसेज दिसतो.
"भाऊ..ते बघा..रोहित उठला वाट्टे.."
"अन बाकीचे?...झोपूनच राहा लेकहो.. नेतच नाही कोनाले"
तेवढ्यात रोहितचा रिप्लाय आला..
"काय लावलं बे विराट? 😤😤 कालच तं संपली आयपीएल. थांब ना दोन-चार दिवस..मंग करू सुरु प्रॅक्टिस.."
"दोन--चार दिवस ???😡😡😡 अबे पंधरा दिवसावर आलं ना वर्ल्डकप.."
"मंग काय होते? अन तुले काय बे..तू पहिल्याच राउंडले बाहेर पडला आयपीएलमधून. तुया बम्म आराम झाला अशीन 😂😂😂"
"होबासक्या करू नको रोहित..🤬🤬😡😡व्हाईस कॅप्टन केलं तुले यावेळेस लेका..पोट्ट्यांसमोर सांभाळून बोलत जाय.."
"हाव भाऊ..."
"गपचूप ये उद्या पाच वाजता.."
"परवापासून येतो ना बे विराट? एक दिवस तं झोपू दे लेका.."
"युच नको मंग तू 😡😡"
तेवढयातं स्क्रीनवर xxxxxxxxxxx इज टायपिंग असं दिसतंय..
"भाऊ..रोहित येत नशीन तं मी यु का?😍😍"
"हा कोन व्हय बे?🤔🤔", रोहित
"भाऊ..हा ऋषभ पंत हाय", केदार जाधव
"याले कोनी घेतलं गृपमदे?", रोहित
"मी तं नाही घेतलं बा..", विराट
"😳😳याडमीन तं तूच हायेस बे विराट?"
"ते मालूम हाय मले..पण मी नाही याड केलं ह्याले. फोन हॅक झाला वाट्टे माया.."
"फोन कसा हॅक होईन बे?", रोहित
" इथं इव्हीएम पन तं हॅक होते म्हनतेंत", विराट..
"भाऊ तसं नाही ते..त्याले मी याड केलंत खूप आधी. आधी या ग्रुपचं नाव "मैं भी वर्ल्डकप खेळुंगा" असं होतं तेंव्हा मी याडमीन होतो. मंग तुमी टीम निवडली अन ग्रुपचं नाव बदललं. ह्याले काढायचं राहिलं बहुतेक..", दिनेश कार्तिक.
"च्या मायबीन !!😱😱" विराट
"अबे पन त्यानं स्वतःहून तं बाहेर पडायचं ना मंग.. का गणपतीचा भंडारा व्हय हा ग्रुप म्हन्जे??😠😠"
"भाऊ..चुकलं भाऊ," ऋषभ पंत
"चूप राय तू"
"भाऊ...मी काय म्हंतो... आता गृपमदे आहो तं जमवा ना माया वर्ल्डकपचा जुगाड!!", ऋषभ पंत.
"अबे कोन हाय बे हा? मायला मी काय आधार कार्ड वाटून राहिलो का हिथं ? जुगाड जमवा म्हंते..😠😠😡"
"भाऊ..काढा त्याले बाहेर.."
विराट त्याला बाहेर काढतो.
"अन काबे विराट..साल्या आम्हाले उठवलं.. त्या धोनीले काऊन नाही उठवत?"🤨, रोहित
"तो कधीच उठला हाये..", विराट.
" तुले कस माहिती?", रोहित
"मंग तुले का वाट्टे मले कोनी उठवलं?? सकाळी त्याचाच फोन आलंता..", विराट
"हे घ्या च्या मायबीन..हा आमचा कॅप्टन!!🤣🤣"
"परत होबासक्या...उद्या भेट सायच्या मैदानात.."
"अबे पन कोंच्या मैदानात या लागते ते तं सांग.."
"शास्त्रीमामाले इचारून मॅसेज टाकतो मी", विराट..
"हे पहा रे पोट्टेहो..हा आपला कॅप्टन..ह्याले उठवते धोनी..सांभाळते शास्त्री...ह्यापेक्षा मले कॅप्टन करा तुमी..😍😍😂😂"
"हाव भाऊ...माया सपोर्ट आहे तुमाले😄😄", दिनेश कार्तिक
"मायापन...😂😂", केदार जाधव..
"शानपणा करू नका सायचेहो... ऋषभ पंत अन रायडूले घेऊन जाईन तुमच्या जागी..", विराट
"नाही भाऊ...तुमीच भाऊ..तुमीच..मजाक केली भाऊ..", दिनेश कार्तिक..
"एकच वादा...कोहली दादा..🕺🏻🕺🏻", केदार जाधव
"उद्या या मंग सकाळी.."
"हाव भाऊ..", रोहित, दिनेश, केदार..
समाप्त..
चिनार

Thursday, 9 May 2019

व्हिडीयो कोच..

९३-९४ साली प्रायव्हेट बस ही संस्था अगदी नवीन होती. शिवा ट्रॅव्हल्स, सदानी ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्या नुकत्याच उदयाला आल्या होत्या. अमरावती-अकोला, अमरावती-यवतमाळ वगैरे गाड्या राजापेठ चौकातून निघायच्या. नोकरीसाठी अप-डाऊन करण्याऱ्या लोकांसाठी ह्या गाड्या सोयीच्या होत्या. दिवसभर ऑफिसमधून थकूनभागून घराकडे निघाल्यावर एसटीतुन उभं राहून प्रवास करण्यापेक्षा हे बरं होतं. किंवा दिवसभर खरेदीसाठी वगैरे अमरावतीत आलेल्या कुटुंबांना रात्री गावाकडे परतण्यासाठी सुध्दा ह्या बसेसचा पर्याय उपलब्ध झाला. पण खाजगी क्षेत्र म्हटलं की स्पर्धा आली. स्पर्धा म्हटलं की नवनवीन डावपेच आले. आलेला प्रवासी जागा नसल्याकारणाने निसटून जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या सीट्सच्या मध्ये जी जागा असते त्यात स्टूल ठेवण्यात यायचे. त्या स्टूलवर लहान मुलांना बसवले की आईबाप मांडीवर घेण्याच्या त्रासातून मोकळे. पण ब्रेक लागला की सगळे स्टूल लायनीत एकमेकांवर आदळायचे. त्यामुळे काही दिवसांनी स्टूलवर बसायला कोणी तयार होईना. आणि दुसरीकडे स्पर्धा वाढतच होती.

मग प्रवासांना आकर्षित करण्यासाठी एक शक्कल लढवण्यात आलीव्हिडीयो कोच !!

x आरामदायी बस (व्हिडीयो कोच उपलब्ध) अश्या जाहिराती बसवर लिहिल्या जाऊ लागल्या. बसच्या समोरच्या भागात आणि ड्रायवर केबिनच्या मागे टीव्ही लावलेला असे. आणि व्हीसीआरवर कॅसेट लावून सिनेमे दाखवायचे. तेवढाच तास-दोन तास प्रवाश्यांचा वेळ चांगला जायचा. मलाही सुरवातीला ह्या व्हिडीयो कोचवाल्या बसेस फार आवडायच्या. इतरवेळी बघायला मिळणारे बरेच सिनेमे तिथे बघायला मिळायचे. मिथुन, अजय देवगण, सुनील शेट्टी, अक्षय कुमारच्या  त्याकाळातील सिनेमांचे थेयटरपेक्षाही जास्त शोज ह्या व्हिडीयो कोच बसमध्ये जास्त झाले असतील. त्यावेळी खान त्रिकुट आणि गोविंदा हे चलनी नाणे होते. त्यामुळे त्यांचे सिनेमे बसमध्ये लावणे म्हणजे प्रीमियम कॅटेगरी होती. अगदीच एखाद्यावेळेला त्यांचे सिनेमे लावायचे. पुढे जाऊन गोविंदाचे चलनीमूल्य कमी झाले. आणि त्याच्या सिनेमाची रवानगी जनरल कॅटेगिरीत झाली. आणि गोविंदाचे चाललेले जुने सिनेमे ही व्हिडीयो कोचची ओळख बनली. इंगजी सिनेमेवगैरे बसमध्ये कधीच लावत नव्हते. कारण समोर फॅमिली ऑडियन्स असायचा. आणि भारतीय फॅमेल्या हिंदी सिनेमातले बलात्काराचे प्रसंग आणि सीरियलमधले कौटुंबिक कटकारस्थानं चालतील पण इंग्रजी सिनेमे नको ह्यावर अजूनही ठाम आहेत.

असो. पण कुठलाही सिनेमा लावला तरी एक समस्या कायमच असायची. अमरावती -अकोला किंवा यवतमाळ हे अंतर दोन तासांचं. आणि त्याकाळात कोणताच हिंदी सिनेमा दोन तासात संपत नसे. त्यामुळे शेवटी  हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या दुष्ट आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात 'चलो अकोला बसस्ट्यांड' अशी आरोळी ऐकू यायची. की उतरा बसमधून. माझ्या व्हिडीयोकोच बस प्रवासाच्या कारकिर्दीत टायटल्सपासून क्रेडिट्सपर्यंत पाहिलेला एकही सिनेमा मला आठवत नाही. तश्या आणखीही बऱ्याच समस्या होत्या. बसमधल्या मागच्या सीटवर टीव्हीचा आवाज पोहोचत नसे. मग काही दिवसांनी तिथे स्पीकर लावण्यात आले. आधीच लाऊड सिनेमे आणि त्यात फाटलेल्या आवाजाचे स्पीकर्स म्हणजे कानावर अत्याचार व्हायचा. आणि एखाद्यावेळी चांगला सिनेमा, चांगली जागा आणि व्यवस्थित आवाज हे सगळं जुळून आलं की टीव्हीवरचं चित्र खराब असायचं. ह्या असल्या कारणांनी व्हिडीयो कोचचं आकर्षण कमी झालं.

पुढे अमरावती-पुणे, सुरत वगैरे लांब पल्ल्याच्या x सीटर बसेस सुरु झाल्या. ह्यात व्हिडीयो कोच ही सुविधा नसून गरज होती. कारण एवढे मोठाले कंटाळवाणे प्रवास  मनोरंजनाशिवाय करणं अशक्य होतं.ह्यात साधारण दोन सिनेमे तरी बघून व्हायचे. नंतर व्हीसीआर जाऊन सीडी प्लेयर आले. सीटर बसेसला स्लीपर कोचचा पर्याय आला. मग एसी स्लीपर कोच आलेत. पण स्लीपर कोचमध्ये एकाबाजूला झोपून समोरच्या टीव्हीकडे बघणं त्रासदायक होतं. ह्यावर उपाय म्हणून स्लीपर कोचच्या प्रत्येक कम्पार्टमेन्टला स्वतंत्र स्क्रीन देण्यात आली. मग शेजारी बसलेल्या अनोळखी सहप्रवाश्याला सिनेमा बघायचा नसेल तर काय हा प्रश्न उपस्थित झाला. त्यासाठी एकाच कंपार्टमेंटमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या. आणि आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक प्रवाश्याला एकेक हेडफोन! आताशा उपलब्ध असलेल्या सिनेमातून आपल्या आवडीचा सिनेमा निवडण्याचीही सुविधा आहे. एवढं असताना आजकाल आलिशान एसी बसमधून प्रवास करताना इयर फोन लावून स्वत:च्याच लॅपटॉपवर वेब सिरीज बघण्याची पद्धत आहे.

डिजिटल क्रांती का काय म्हणतात ते हेच असावं...

असो. आणि आम्ही काय करतो? तर त्या लॅपटॉपवल्याच्या आजूबाजूच्या कंपार्टमेंटमध्ये आमच्या लेकीला झोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
"अगं तो टीव्ही खराब झालाय. तो नाही लागणार. झोप तू."

आणि ह्यावर सुपर मिलेनियल जनरेशनची आमची लेक आम्हाला ऐकवते,

"मग मला यु त्यूबवल व्हीदियो लाऊन द्या..आनि तुमी झोपा"


समाप्त

Thursday, 2 May 2019

सरफरोश...
सरफरोश सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाल्याचे वाचनात आले. साहजिकच वीस वर्षांपूर्वी आपण काय करत होतो हा विचार डोक्यात आला. पण त्यात काही विशेष सांगण्यासारखं नाही. आणि आणखी वीस वर्षांनी हा प्रश्न पडल्यावरही उत्तर हेच असणार ह्यात शंका नाही. असो.

तर ९९ साली सरफरोश रिलीज झाला त्यावेळी मी आठव्या वर्गाची वार्षिक परीक्षा दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या.टीव्हीवर सरफरोशचं ट्रेलर बघितल्याचं मला पक्कं आठवतं. ट्रेलरमध्ये आमिरचे वडील त्याच्या  कपाळावर  टिळा लावतात तो प्रसंग आवर्जून दाखवयाचे. आता त्यादरम्यान  (आणि त्यानंतरही!) देशभक्तीपर सिनेमाचं बॅटन सनी देओलच्या हातात होतं. आणि सनीच्या सिनेमात ह्या असल्या प्रसंगांची काही कमी नव्हती. त्यामुळे सरफरोशच्या ट्रेलरमध्ये विशेष असं काही वाटलं नाही.शिवाय त्यावेळी सिनेमाचं फारसं आकर्षण नव्हतं. आणि आलेला प्रत्येक सिनेमा पाहण्याची मुभासुद्धा नव्हती. ह्या आणि इतर असल्याचं कारणांमुळे मी त्यावेळी सरफरोश थियेटरमध्ये जाऊन पाहिला नाही.सरफरोशसारखे बरेच सिनेमे या ना त्या कारणाने थिएटरमध्ये बघायचे राहून गेलेत. त्यात प्रामुख्याने बॉर्डर, सत्या, दिल सें, मिशन काश्मीर आणि रेहना है तेरे दिल में चा मी आवर्जून उल्लेख करेल.  आता हे सोडून काही सिनेमे मी थिएटरमध्ये का पाहिलेत ह्याचीही लांबलचक यादी आहे.

नंतर काही महिन्यांनी सरफरोश व्हिडीयो सिडी भाड्याने आणून पाहिला. आणि खरं सांगतो समजलाच नाही. कोण बाला ठाकूर, कोण वीरन, कोण सुलतान..आणि त्याचा नसिरुद्दीन शहाच्या गुलफाम हसनशी काय संबंध?
अरे किती किचकट आहे हे सगळं. तेंव्हापर्यंत आम्ही पाहिलेल्या सिनेमात काय असायचं.तर एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर, त्याची हिरोईन आणि खलनायक म्हणून  गावातला एक गुंडा किंवा भ्रष्ट राजकारणी. मग तो खलनायक सिनेमाभर हिरोवर अत्याचार करणार. आणि शेवटी हिरो त्याला धोपटणार. इतकी साधी सरळ मांडणी. अगदी आदल्या वर्षी आलेल्या आमीरच्याच गुलामची कथासुद्धा अशीच होती. (गुलामचं वेगेळेपण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे). पण सरफरोश वेगळाच होता. आणि तो समजून घेण्याची उमज तेंव्हा नव्हती.
यथावकाश सरफरोश वारंवार बघण्यात आला. हळूहळू समजला आणि नंतर अंगात भिनला. गेल्या वीस वर्षात सरफरोश किती वेळा बघितलाय ह्याची गणतीच नाही. आजही तो टीव्हीवर दिसला की चॅनेल बदलल्या जात नाही. पण आजकाल ते यू टीव्हीवाले सरफरोश असा हायलाईट्स दाखवल्यासारखा का दाखवतात कळत नाही.
असो.

सिनेनिर्मितीच्या वेगवेगळ्या पातळींवर सरफरोश हा एक उत्कृष्ट सिनेमा होता. सगळ्यात आधी येते ती सरफरोशची कथा आणि पटकथा. सरफरोशची कथा वरकरणी एका पोलीस तपासाची कर्मकहाणी इतकी साधी वाटत असली तरी प्रचंड गुंतागुंतीची आहे. इतक्या घटना आणि व्यक्तिरेखा पटकथेत बांधणं म्हणजे खायचं काम नव्हे. माझ्यासारख्या नवख्या लेखकासाठी सरफरोशची पटकथा म्हणजे एक कार्यशाळा आहे. कुठल्याही व्यक्तिरेखेवर अन्याय न होऊ देता आणि त्याच वेळी ती व्यक्तिरेखा डोईजड होणार नाही ह्याची पुरेपूर खात्री ह्या पटकथेत घेतली आहे. उदाहरणादाखल आमिरची एसीपी राठोड म्हणून एन्ट्री होते तो प्रसंग बघा..इथे एक रिमांडमध्ये घेतलेला नगरसेवक आमिरची वाट बघत बसला असतो. तो हवालदारावर ओरडून म्हणतो,
"अबे बूला तेरे एसीपी राठोड को . मैं यहा पुरे दिन बैठने नही आया हू"
ह्या माणसाचं कथेत पुढे काहीच काम नाही. पण या छोट्या प्रसंगातून  एकदंरीत सगळ्याच छोट्यामोठ्या नेत्यांची गुर्मी आणि आमीर त्याला ज्या सहजतेने धडा शिकवतो त्यावरून एसीपी राठोड काय चीज आहे ही बाब उत्तम पद्धतीने समोर येते. दुसरं उदाहरण मकरंद देशपांडेच्या शिवा ह्या व्यक्तिरेखेचं. हा शिवा पोलिसांच्या तपासात सतत व्यत्यय आणत असतो. त्यात कस्टडीत घेतलेल्या एखाद्या गुन्हेगाराला मारणं, एखाद्याला गायब करणं वगैरे गोष्टी येतात. शिवा ऐनवेळी कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणालाच कळत नाही. शिवाला फारसे संवादही नाही. पण एका प्रसंगात तो सुलतानला म्हणतो, "अपन को भाई जितना अक्कल नही है. पर कभी कभी लगता है अपना पेहलेवाला धंदा ही अच्छा था. ड्रग्स का.."  गुन्हेगारीच्या अथांग समुद्रात  शिवा ही एक छोटीशी मासोळी असते. आणि वाटत नसलं, तरी ह्याची त्यालाही पूर्ण कल्पना असते. सरफरोशच्या पटकथेत अश्या कितीतरी गोष्टी सहज मांडल्या आहेत. मतलबी मिरची सेठ, सगळ्या प्रकारात बळीचा बकरा बनलेला सुलतान ह्या सगळयांना पटकथेत स्वतंत्र अस्तित्व आहे.

इन्स्पेक्टर सलीम ही सरफरोश मधली सगळ्यात लक्षवेधी भूमिका आहे. आणि त्यासाठी मुकेश ऋषीहुन योग्य अभिनेता मिळालाच नसता. नोकरीच्या ठिकाणी धर्मामुळे सतत डावलल्या गेलेला आणि सगळ्यांच्या डोळ्यातला तिरस्कार पचवून इमानेइतबारे नोकरी करणारा इन्स्पेक्टर सलीम मुकेश ऋषींनी मनापासून साकारला आहे. एखाद्या सामान्य पटकथेत, एसीपी राठोडचा असिस्टंट म्हणून कोणीतरी हवा म्हणून एखादी दुय्यम दर्जाची भूमिका सहज लिहिता आली असती. आणि सरफरोशच्या मुख्य कथेत त्याने काही फ़ारसा फरक पडला नसता. पण सलीमची भूमिका विचारपूर्वक लिहिण्यात आली आहे. आणि त्यानेच ही पटकथा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. एका विशिष्ट धर्मातील लोकांकडे सतत त्या विशिष्ट नजरेनेच बघण्याच्या प्रवुत्तीला सलीम छेद देतो. एका प्रसंगात एसीपी राठोडने सलीमला चिडून म्हणतो,
"सलीम ये मेरे मुल्क का मामला है."
"तो क्या मेरे मुल्क का नही है?"
"शायद नही है", एसीपी राठोड उत्तरतो.
या वाक्यानंतर सलीमच्या डोळ्यातले भाव पाहावे. जबरदस्त ! अपमानाचे दु:ख आणि चीड ह्याचं सुरेख मिश्रण. नंतरच्या एका प्रसंगात सलीम एका कट्टरतावाद्याला मुसलमान शब्दाचा अर्थ सांगतो. हा प्रसंग म्हणजे "दोन्हीकडच्या" कट्टरतावाद्यांना सणसणीत चपराक आहे. 

आता वळूया सरफरोशच्या प्रमुख खलनायकाकडे. वरकरणी सरफरोशचा प्रमुख खलनायक म्हणजे पाकिस्तान सरकार आणि त्यांचा मुख्य मोहरा गझल गायक गुलफाम हसन आहे. पण दोघांच्याही खलनायकीचे मूळ वेगवेगळे आहे. पाकिस्तान सरकार भारतात दहशतवाद पसरवण्याच्या बेतात आहे. पण गुलफाम हसन त्याचा वैयक्तिक बदला घेतोय.  पाकिस्तान सरकारच्या मदतीने त्याला  भारतीयांचा बदला घ्यायचाय. पण त्याच वेळी एक कलाकार म्हणून स्वतःची गरिमा, मानसन्मान त्याला तितकाच प्रिय आहे. जगासमोर मनस्वी  कलाकार म्हणून वावरणारा गुलफाम हसनचा दुसरा चेहरा अत्यंत क्रूर आहे. आणि त्याच्या क्रूरपणाची ओळख पडद्यवर तेवढ्याच परिणामकारकतेने दाखवली आहे.  त्याच्या रियाजात व्यत्यय आणणाऱ्या बकरीच्या पिल्लाचा कान तो ज्या निर्दयतेने उपटतो ते एखाद्या मानवी हत्याकांडाच्या प्रसंगापेक्षाही भयंकर आहे. फाळणीच्या वेळी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराला त्याने समस्त भारतीयांना परस्पर गुन्हेगार ठरवले आहे. शेवटी जेंव्हा गुलफाम त्याच्या दहशतवादी भूमिकेचं समर्थन देताना फाळणीचा संदर्भ देतो त्या प्रसंगाचं टेकिंग अफलातून आहे. त्याच्या लंगड्या समर्थनाला एसीपी राठोड तडक उत्तर देतो.
"गुलफाम हसन.. बटवारा हमारे लिये भी कोई खुशी का दिन नही था."
गुलफाम निरुत्तर होतो पण तरीही स्वतः ची भूमिका सोडत नाही.
तो म्हणतो," हमारे घाव बहोत गेहरे है..वो इतनी आसानी सें नही भरेंगे."
हा प्रसंग अखेरचा असला तरी कितीतरी प्रश्नांची मालिका सुरु करून जातो. ही अशी मानसिकता असल्यास दहशतवाद कधीतरी थांबेल का? दहशतवादाचं मूळ परिस्थितीत आहे की मानसिकतेत? परिस्थितीत असेल तर गुलफामवर जे अत्याचार लहानपणी झालेत त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आणि मानसन्मान त्याला परतफेडीच्या स्वरूपात मिळालंय. तर या परिस्थितीत गुलफाम हसन दहशतवादाकडे का झुकावा? बरं ज्या पाकिस्तानी सरकारसाठी गुलफाम काम करतोय त्यांच्या दृष्टीने तो केवळ एक मुहाजिर म्हणजे बाहेरचा व्यक्ती आहे. आणि ह्याचीही गुलफामला पूर्ण कल्पना आहे. तरीही तो त्यांच्याशी प्रामाणिक का आहे?

 सरफरोश वेगळा आहे तो ह्यासाठीच. कारण केवळ एक पोलीस केस न राहता सरफरोश समाजातल्या कितीतरी गोष्टींवर भाष्य करतो. अभिनयाच्या बाबतीतीही सरफरोश समकालीन चित्रपटांपेक्षा सरस आहे हे वेगळे सांगायला नकोच. मध्यंतरी सरफरोशचा सिक्वेल येणार असं वाचण्यात आलं. असं काहीही घडू नये अशी मनोमन इच्छा आहे. काही कलाकृतींना परत छेडू नये. कारण त्यांचे धागे प्रेक्षकांच्या मनाशी जुळलेले असतात.

सरफरोशचा सिक्वेल बनवण्यापेक्षा सरफरोश परत थेटरात लावा रे. एसीपी राठोडचा तो डायलॉग थेटरमध्ये ऐकायची फार इच्छा आहे.

"क्या ठाकूर..तेरेको कितनी बार बुलाया तू आता नही है!!!"

समाप्त