Tuesday, 28 April 2020

मुंग्या..


आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं. मग घरातल्या पोरांना शेजारच्या घरी पाठवून तिकडेही मुंग्या पोहोचल्यात का हे बघितल्या जायचं. त्यावरून प्रॉब्लेम वैश्विक आहे की घरगुती आहे हे निश्चित व्हायचं. वैश्विक असल्यास तो पाच-दहा मिनिटात आपोआप सुटायचा अन मुंग्या आपापल्या घरी जायच्या.

पण घरगुती असल्यास युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु व्हायचे. घरातले तज्ञ म्हणजे बाबा किंवा दादा, टीव्हीच्या मागची दूरदर्शनची केबल उगाचच काढून आणि सॉकेटमध्ये फुंकर घालून परत खोचून बघायचे. ही फुंकर टेक्नॉलॉजी कधीच कामात येत नव्हती. मग तांत्रिक प्रयत्नांचा कळस म्हणजे टीव्ही बंद करून एकदा परत सुरु करणे. त्यानंतर छतावरच्या अँटेनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं निदान व्हायचं. अनुभवी बायका अश्यावेळी "आता ह्यांच्या बापाकडून काही टीव्ही चालू होत नाही. संपला मेला पिच्चर" असं मनातल्या मनात बडबडत स्वयंपाकाला लागायच्या.

मग शेजारच्या दादाला जो आयटीआय शिकतोय छतावर चढून अँटेना हलवण्यासाठी पाचारण केल्या जायचं. आमच्या घराला जिना नव्हता अन शिडी लहान होती. त्यामुळे शिडीने मोरीच्या छतावर चढायचं अन शिडी वर ओढून घराच्या छतावर चढायचं इतका द्राविडी प्राणायाम होता. नंतर बराच वेळ तो दादा अँटेनासोबत झटापट करायचा. म्हणजे अँटेना पूर्ण ३६० अंशात वळवून देखील फरक पडत नव्हता. एव्हाना त्या दादाचे वडील सुद्धा आमच्या अंगणात आलेले असायचे. त्यांनी स्वतः मुंबईला जाऊन दूरदर्शन केंद्र एकदा लांबून बघितले असल्याने त्यांना तगडा अनुभव होता.

शेवटी वरतून दादा ओरडायचा,
"नाही होत आहे हे इथून?"

ह्यावर काका त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा एक सुस्कारा टाकून म्हणायचे,
"मी म्हनलं ना जोशीसाहेब तुमाले.... तिकडूनचं प्रॉब्लेम हाये काहीतरी !"

तिकडून म्हणजे कुकडून ? हे विचारण्याची आम्हाला परवानगी नव्हती.

इंजिनियरिंग करूनही घरातल्या टीव्हीवरच्या मुंग्या कुकडून यायच्या आणि कुकडे जायच्या हे आजवर मला उलगडलेलं नाही.  


No comments:

Post a Comment