Sunday, 12 June 2016

स्वत:ला काय समजतो रे ?

     कॉलेजला असताना सतत माझे तिरपे बोलणे ऐकून आणि आत्ताचे माझे उपहासात्मक (त्याच्या भाषेत 'बकवास') लिखाण वाचून वैतागलेला एक मित्र परवा तुळशीबागेत भेटलाखूप दिवस फरार असलेला गुन्हेगार एके दिवशी अचानक नाक्यावर चहा पिताना दिसल्यावर एखाद्या पोलिसाला जसा आनंद होईल  तसाच काहीसा आनंद मला त्याच्या चेहऱ्यावर दिसलाविचार करारविवारी दुपारीतुळशीबागेत बायकोची  टिकल्या अन हेयरक्लिपांची  दोन तासांची खरेदी चळवळ मुलीला कडेवर घेऊन भोगलेली असूनही त्याच्यात मला दिसताक्षणी चोपायचा   पेशन्स शिल्लक होता ! म्हणजे आमचे संबंध किती मधुर असावेत ह्याची कल्पना येईल.  किंवा बायकोमुळे   भोगलेल्या त्या दोन तासांचे फ़स्ट्रेशन काढण्यासाठी कोणीतरी बकरा सापडला ह्याचाही तो आनंद असू शकेल  (कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या गाण्याचा अर्थ अश्यावेळी अलगद उलगडतो.) आता तुळशीबागेतल्या   सिक्स लेन एक्स्प्रेस हायवेला लाजवेल इतक्या मोठ्या गल्लीत तो अचानक समोर आल्यामुळे त्याला टाळतासुद्धा येईनाशेवटी हसून ओळख दाखवावीच लागलीकायकसं काय विचारून झाल्यावर त्याने डायरेक्ट मुद्द्याला  हात घातला.


"स्वत:ला काय समजतोस रे तू ?"


मी दचकून आजूबाजूला पाहिलं तर त्या प्रश्नामुळे तिथल्या अफ़ाट जनसमुदायाला काहीही फरक पडला नव्हता.

"काकाय झालं?” ,मी उलट प्रश्न केला.


"खूप लिहीतोयेस आजकालजो दिसेल त्याची मजा उडवतोयेसतसा चांगला लिहितोस तू पण अती झालं आणि हसू आलं असं नको व्हायला...नाही का?"


मला सगळ्यात पहिले जाणवली ती त्याची बदललेली भाषाअस्सल विदर्भी भाषेचे सदाशिव पेठेत स्थलांतरण   झाल्यासारखे वाटत होतेआणि नुसतेच स्थलांतरण नाही तर लवकरच परमनंट रेसीडंसशिप मिळणार अशी   परिस्थिती होतीआता खरच त्याची भाषा बदलली होती की कडेवरच्या चीमुरड्यासमोर तो असं बोलत होता देव जाणे.

"अरे झालं काय पणकाय लिहिलेलं आवडलं नाही तुला?", मी त्याला विचारलं.


"सगळंच रेजगाचा फार अनुभव असल्याच्या आविर्भाव आणून लिहितोस तूआता हेच बघचारपाच वर्ष नोकरी काय केली तर संपूर्ण कार्पोरेट विश्वावर लिहीशील का तू ? आम्हीपण करतो ना नोकरी इथे."


(त्याच्या मुखातून 'संपूर्णहा शब्द संपूर्णपणे संपूर्ण आयुष्यात कधी ऐकायला मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं   नव्हतंमुळात तो चुकुनही कधी माझ्या स्वप्नात आलाच तर त्याक्षणी एखाद्याने बादलीभर पाणी ओतून मला उठवावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!).


असो.आता माझ्या माहितीप्रमाणे हा मित्र आयटीमध्ये कुठल्याश्या कंपनीत आहेसॉरी सॉरी...परत हे लिखाण त्याने वाचलं तर वांदे होतीलकोणतीही आयटी कंपनी ही "कुठल्याश्यासदरात येत नाहीती एकतर  फॉर्च्यून ५०० किंवा सी एम एम लेव्हल xxx  तरी असतेचयापैकी काही नसलं,तरी ती एक आयटी कंपनी असल्यामुळे तिची कुचेष्टा करणं हा दखलपात्र गुन्हा आहेअसोतर मला कळेना की ह्याचा नक्की राग माझ्या लिखाणावर  आहे की मी आयटीवर लिहित नाही यावर आहेकारण आयटी 'दखलपात्रसुद्धा नसणं हा तर अजामीनपात्र   गुन्हा आहे.

"अरे पण तुझ्या आयटी इंडस्ट्रीवर कुठे लिहिलंय मी अजून?", मी म्हणालो.


"प्रयत्न सुद्धा करू नकोस !!! आधीच अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालायेसआयटीचा गंधही नाहीये तुला.  तुझ्यासाठी ते हिंदी सिनेमे वगैरे विषय ठीक आहेहॉलीवूडवर लिहून आधीच तुझी पातळी कळलीये आम्हालाआयटीवर लिहून तोंडावर आपटशील."


आता याचं नक्की कुठे जळतंय ह्याचा हळुहळु अंदाज यायला लागलाआयटी आणि हॉलीवूड ह्याचं काय नातं आहे माहिती नाही पण बहुतांश आयटीवाले पूर्वजन्मीचं देणं असल्यासारखं हॉलीवूडवर प्रेम करतातमग मी   जरा त्याची थट्टा करायची ठरवलं.

"माझं जाऊदे रेतू लिही ना तुझे अनुभव आयटीमधले.", मी म्हणालो.


"कामं असतात आम्हालावेळ नसतो अजिबाततुझ्यासारखं कंपनीत पाट्या टाकायला जात नाही आम्ही."


"कामं असतात म्हणजे ते कॉपी पेस्ट वालेच नाआणि मी कुठे म्हणतोय कंपनीत बसून लिही म्हणूनपण हे असं तुळशीबागेत फिरण्यापेक्षा घरी बसून वेळ सत्कारणी लाव."


झालं !! आता वर्मी घाव बसला होताकॉपीपेस्ट हा शब्द ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव शिफ़्ट डीलीट   करताना असतात तसे निर्दयी झाले होतेकॉपीपेस्ट हे जगभरातल्या चाकरमान्यांचे आवडते तंत्रज्ञान (!) आहे,  तिथं आयटीबिगर आयटी असा भेदभाव नाहीपण कॉपीपेस्ट केलंय हे जाणवून देणे अपमानास्पद समजले  जातेशिवाय या तंत्रज्ञानाचा उगम आयटी क्षेत्रात झालेला असल्यामुळे प्रत्येक आयटीवाल्याचे ते एक अदृश्य  शस्त्र आहेइथे मी डायरेक्ट त्या अदृश्य धनुष्याला प्रत्यंचा बांधायचा पराक्रम केल्यामुळे सुटणारा बाण आता   मलाचं  झेलावा लागणार होतामलातर त्याच्या नजरेतूनच अग्नीबाण सुटताना दिसत होते.

"काय समजतो रे स्वत:ला तू ? नुसतं कॉपीपेस्ट करतो होय रे आम्हीआयटीचा लॉँगफॉर्म तरी माहितीये का   तुलाकधी कुठल्या आयटी कंपनीत गेला आहेस का ? तुला कोण आतमध्ये घेणार म्हणा ? एक आयटी कंपनी किती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करते माहितीये का तुलाते सोड रे...प्लॅटफॉर्म म्हणजे काय हे तरी माहितीये काकिती टेक्नोलॉजीजचे नाव ऐकली आहेत रे तू ? कॉपीपेस्ट करण्यामागे कोणती टेक्नोलॉजी आहे माहितीये कातू लिहितोस त्यातलं तरी किती ओरिजिनल असतं ? कुठून तरी कॉपी-पेस्ट करत असशील?"


माझं सोडा...त्याच्या कडेवरच्या चिमुरड्याचे तोंड पाहण्यासारखे झाले होते. (कदाचित घरी त्या चिमुरड्याच्या  वडिलांना इतकं बोलायची संधी मिळत नसेल !) आणि इकडे ह्याची बडबड  सुरूच होतीपण अजून माझं काम फत्ते व्हायचं होतंशेवटी आगीत आणखी तेल ओतण्यासाठी मी त्याला मधेच थांबवलं.

"जायला कशाला हवं त्यासाठी आयटी कंपनीमध्येउघड सत्य आहे हेकॉपीपेस्ट !! तेव्हढंच करता तुम्हीआणि तसं नसेल तर एक दिवस गुगल  वापरता काम करून दाखव बरं."  


परत वर्मी घाव बसला !
त्याचे अग्निबाण परत सुरु झाले.

"बस्स....गुगल !!!! तेव्हढीच तुम्हा लोकांची अक्कल !! तुम्हाला वाटते गुगलवर सगळं मिळतं एका सेकंदात...हो नामी सांगतो ते कोड्स गुगलवर शोधून दाखव मग कळेल तुला किती कठीण असते ते."


"म्हणजे तुम्ही गुगलवरूनच शोधता एवढं तर खरं आहे ना!! ते शोधायला जे काही लागतं तेव्हढंच तुमचं स्किल!!"


"तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये रेतुला वाटतं तेच खरं असं काही नाहीयेम्हणूनच तुझं लिखाण आवडत नाही मला.एकदा त्या ह्युमन रिसोर्सवाल्यांवर पण असंच लिहिलं होतंस तू."


"त्याचं काय आताएचआरविषयी सगळ्यांचे हेच मत असतेमी फक्त लिहून दाखवलं एवढंच."


"असं काहीही नाहीयेचांगले एचआरसुद्धा असतात."


मी उत्तर देणार तेव्हढ्यात मला एक गोष्ट आठवली आणि मी तिथल्या तिथे शब्द गिळलेह्याच्या विरोधाचं कारण बरचसं कौटुंबिक होतंकारण माझ्या आठवणीप्रमाणे ह्या साहेबांची पत्नी एचआर होतीआणि तेंव्हा ती   आसपासच कुठेतरी असल्यामुळे साहेब सतर्क होतेआता मलाही शांत बसणे भाग होते अन्यथा  भर   तुळशीबागेत हिंसाचार झाला असता.

"जाऊदे रे..एखाद्या वेळेस लिहिल्या जातं असं काहीतरीतू दुर्लक्ष करमी तर म्हणतो तू वाचू नकोच मी   लिहिलेलं.", मी म्हणालो.


"वाचतचं नाही मीआणि खरच किती लोकं वाचतात ही सुद्धा शंका आहे मला."


आता निर्णायक दणका देणे आवश्यक होतेमाझ्या सगळ्या वाचकांची मनोमन माफी मागून मी म्हणालो,

"वाचतात रेरिकामटेकडे लोकं भरपूर आहेतकारण आयटीमध्ये बरेच मित्र आहेत माझे!!!!!"


-- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in