Wednesday, 27 May 2015

शेतातला एक दिवस...

'संसदेतला एक दिवस ' ह्या माझ्या आधीच्या लिखाणाचा दुसरा भाग म्हणून हा कल्पनाविस्तार प्रकाशित करत आहे.

युवराजांनी आता मनाशी पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी जनतेतली आपली प्रतिमा सुधारायची. जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा.ते प्रश्न सोडवून जनतेचा हिरो बनायचं. पण त्यांना नक्की सुरवात कोठून करावी हे कळत नव्हतं. या विचारात असतानाच कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं की , भारत हा कृषीप्रधान देश आहे. पंतप्रधान आणि कृषीप्रधान ह्या दोन शब्दात त्यांना काहीतरी साम्य जाणवल्यामुळे त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. ते शेवटी मातोश्रींकडे गेले.
युवराज : आई आपला देश कृषीप्रधान आहे ना?
मातोश्री : हो रे बाळा..काय झालं?
युवराज : कृषीप्रधान म्हणजे काय ?
मातोश्री : अरे देशातली जनता प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हणजेच कृषी. आपल्याही परिवारात जुन्या काळी कोणी ना कोणी शेती केली असेलच.
युवराज: हो हो...आत्ता आठवलं..आजोबा-पणजोबा नेहमी म्हणायचे..भारत देश म्हणजे आपल्यासाठी शेतजमीनच आहे..जनतेने पेरायचं अन आपण खायचं..
मातोश्री : अरे परमेश्वरा..!!

शेवटी युवराजांनी कृषी म्हणजेच शेती या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं. लगेच त्यांनी जवळपासच्या एक दोन गावात कृषी दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले. ठरल्याप्रमाणे युवराज एका  गावात पोहोचले. तिथे दोन -चार शेतकरी त्यांना दिसले.
युवराज : आपला देश हा कृषीप्रधान देश आहे ! जय जवान जय किसान !
शेतकरी : काय झालं मालक ?
युवराज : आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अवकाळी पावसाने झालेले नुकसान सरकारला भरून द्यावेच लागेल. आम्ही त्यासाठी आंदोलन करू.
शेतकरी : मालक..गेल्या २ वर्षापासून इथे पाऊसच पडला नाही.
युवराज : तरीपण दुबार पेरणीचे पैसे सरकारला द्यावेच लागतील.
शेतकरी : मालक..यावर्षी अजून एकदाही पेरणी झालेली नाही.
युवराज : काय म्हणता ?...काळजी करू नका ,आम्ही शेतमालाला योग्य भाव मिळवून देऊ ?
शेतकरी : मालक अजून गेल्या २ वर्षांचे पैसे मिळाले नाही.
युवराज: तुमच्या अजून काही समस्या असतील तर मला सांगा. मी त्या सोडवेन. गेल्या ६० वर्षांपासून शेतकऱ्यांचा मित्र अशीच ओळख आहे आमची. ह्या नवीन सरकारने वाटोळे केले आहे तुमचे. भारत हा कृषीप्रधान देश आहे...
शेतकरी : बरं बरं मालक...कळलं आम्हाला..तेवढं पेमेण्टचं बघा..
युवराज: हो..मी लगेच कृषीमंत्र्यांना सांगतो. बाय द वे..कश्याची शेती करता तुम्ही ?
शेतकरी : सोयाबीन लावतो मालक..आणि कपास पन..
युवराज:  अरे वा..म्हणजे बागायती शेती..चांगलंय..
शेतकरी : नाही हो मालक..कोरडवाहू..ऊस ,गहू  म्हणजे बागायती..
युवराज:  गहू का नाही लावत तुम्ही?
शेतकरी: दुष्काळी भागात गहू कसा लावणार मालक..पाणी लागते भरपूर
युवराज:  अहो..दुष्काळ दरवर्षी एकदाच पडतो ना..दुष्काळ पडायच्या आधीच लावायचा ना !!!
शेतकरी : धन्य आहात मालक तुम्ही !
युवराज:  आणि तुम्ही धनधान्य आहात ..कारण भारत हा कृषी......!
शेतकरी : अरे कोणी आवरा रे ह्याला...

नंतर युवराजांनी शेतीची पाहणी करायचे ठरवले. जवळच्याच एका शेतजमिनीवर ते गेले. चपलेतून सुद्धा त्यांना काटे - खडे टोचत होते. तरीपण युवराज चालत राहिले. त्यांच्या सोबत पाच-पन्नास कार्यकर्ते, शेतकरी वैगेरे होतेच. एका ठिकाणी थांबून त्यांनी थोडी माती उचलली.
शेतकरी: काय झालं मालक ?
युवराज: हा पहा सविनय कायदेभंग!
शेतकरी: म्हणजे काय ?
युवराज:भूसंपादन कायदा आम्ही होऊ देणार नाही.
शेतकरी: ठीक आहे..नका होऊ देऊ..पण माती का उचललीत मालक?
युवराज: हीच माती नेउन मी सत्ताधाऱ्यांना दाखवणार..त्यांना विरोध करणार..
शेतकरी (मनात) : आणि माती खाणार...!
शेतकरी: मालक काही वर्षांपूर्वी तुमच्या सरकारने हाच कायदा आणायची तयारी केली होती. तुमचं सरकार गेलं आता ह्याचं आलं..आम्हाला काय फरक पडला..शेतकऱ्याला काय फरक पडतो शेवटी ?
युवराज: काय सांगता ?...मी कुठे होतो त्यावेळी ?
शेतकरी (चिडून) : मालक..तुम्ही तेंव्हाही माती खात होतात..आताही माती खात आहात!

हे ऐकून युवराज स्तब्ध झाले. वापस आल्यावर ते तडक पंतप्रधानांना भेटायला गेले.
युवराज: परत एकदा..परत एकदा सूडाच राजकारण खेळताय तुम्ही.
पंतप्रधान: काय झालं युवराज ?
युवराज:आमचाच कायदा परत आणताय..शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव  आहे तुमचा !
पंतप्रधान: त्यावेळी तुमचा काय डाव होता युवराज ?
युवराज: जमिनी हडपण्यासाठी आम्हाला कायद्याची गरज कधीच नव्हती..प्रत्येक कार्यकर्त्याला एकरानी जमिनी वाटल्यात आम्ही..
पंतप्रधान: त्याच जमिनी परत मिळवण्यासाठी हा कायदा आहे युवराज..
युवराज: पण मोबदल्याच काय ?..भारत हा कृषीप्रधान ......
पंतप्रधान: अरे कोणी आवरा रे ह्याला...!!

-- चिनार 

Tuesday, 26 May 2015

संसदेतला एक दिवस !

सदर लिखाण काल्पनिक नसून त्याचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्ती किंवा घटनेशीसंबंध आढळल्यास तो अजिबात योगायोग समजू नये !
स्थळ : संसद भवन
युवराजांची आलिशान गाडी संसद भवनाच्या मुख्य दरवाजातून आत आली. आज युवराज ड्रायव्हरला बाजूला बसवून स्वत: गाडी चालवत होते. सवयीप्रमाणे त्यांनी गाडी त्यांच्या नेहेमीच्या जागी पार्क करायला नेली. पण काय आश्चर्य ! त्या जागी दुसऱ्याच कोणीतरी गाडी पार्क केली होती.
युवराज : माझ्या जागेवर गाडी कोणी लावली आहे ?
ड्रायव्हर : साहेब..ती पंतप्रधानांची गाडी आहे. ही जागा पंतप्रधानांच्या गाडीसाठीच आरक्षित आहे.
युवराज : असेल..त्याने काय फरक पडतो. वर्षानुवर्षे आमची गाडी याच जागेवर पार्क केली जाते. आजही मी इथेच  पार्क करणार.
ड्रायव्हर: हो साहेब, कारण वर्षानुवर्षे आपल्या घराण्यातले लोकच पंतप्रधान होत होते. आता  पंतप्रधान बदलले आहेत. आता ही जागा त्यांची आहे.
युवराज: मुर्खासारखं बोलू नको..मागील दहा वर्ष आमच्या घरातला माणूस पंतप्रधान नव्हता. तरीसुद्धा आमची गाडी इथेच लागायची.
ड्रायव्हर: हो साहेब..कारण या आधीचे पंतप्रधान , आपण पंतप्रधान आहोत हेच विसरले होते...तुमच्या गाडीच्या मागे मागे त्यांची गाडी यायची. जागा मिळेल तिथे लावायचे ते !
युवराज: फार बोलतोयेस तू ....आता जे कोणी पंतप्रधान असतील त्यांना जाऊन सांग ही गाडी हटवायला.
ड्रायव्हर: साहेब ..श्री XXX सध्या पंतप्रधान आहेत. मी गरीब माणूस त्यांच्यासमोर काय बोलणार ?
युवराज : तो मौत का सौदागर !!
ड्रायव्हर: साहेब हळू बोला. निवडणुका संपल्या आहेत. आणि आपण संसदभवनात आहोत.
युवराज: अरे कोणाला सांगतोयेस तू हे..संसद भवन म्हणजे आमच्या घरातलं आंगण आहे. लहानपणी इथल्या गवतावर खेळायला यायचो मी.
ड्रायव्हर: साहेब तुम्ही आजही इथे खेळायलाचं येता हो !
युवराज: चूप बस!!! जा ..जाऊन सांग त्या पंतप्रधानाला ..म्हणावं..संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याने संसद तुमच्या मालकीची होत नाही.
ड्रायव्हर: साहेब तुमच्या पाया पडतो. तुम्ही आत चला. मी बघतो गाडी कुठे पार्क करायची ते.
युवराज: बर बर ...माझा मोबाईल दे गाडीतला. कॅंडी क्रशची सातशेवी लेव्हल पार करायचीये आज आत बसून.

युवराज आत गेलेत. लोकसभेच्या सभागृहात प्रवेश करताच त्यांची पावले सवयीप्रमाणे सत्ताधारी बाकांकडे चालू लागली. त्यांनी आपली नेहमीची जागा पकडली. एका खासदाराच्या ते लक्षात येताच तो लगबगीने त्यांच्याकडे गेला.
खासदार : साहेब..आपली जागा तिकडे आहे. इकडे सत्ताधारी खासदार बसतात.
युवराज: अरे काय चाललंय हे..बाहेर आमच्या जागेवर पार्किंग करू देत नाही. इथे नेहमीच्या ठिकाणी बसू देत नाही. ही लोकशाही आहे की हुकुमशाही ?
खासदार : साहेब..हवं तर माझ्या जागेवर बसा पण इथे बसू नका..अध्यक्ष यायची वेळ झाली.
युवराज: येऊ दे अध्यक्षांना..मला बोलायचं आहे त्यांच्याशी. पिढ्यानीपिढ्या आमची असलेली खुर्ची आम्ही सोडली..आता काय बाक पण सोडायचा का ? अन्याय आहे हा !
खासदार: साहेब तुम्ही खूप दिवसांनी इथे आला आहात. आजकाल आपण इथे बसत नाही. तुम्ही माझ्या जागेवर चला.
युवराज : ठीके येतो मी..पण तुमच्या जागेवर नेट ची रेंज येते का ? मला थायलंडच्या ट्रिपचे फोटो फेसबुकवर टाकायचे आहेत.
खासदार (हादरून): रेंज येते साहेब..पण कृपा करून तिथले फोटो शेयर करू नका हो !!
युवराज : का ? तुमचे ते पंतप्रधान सेल्फी शेयर करतात तेंव्हा ? मी पण काढले आहेत सेल्फी विपश्यना करताना ?
खासदार: साहेब तुम्ही विपश्यनेला गेले होते यावर कोणाचा विश्वासचं नाहीये हो ? थायलंडला जाऊन विपश्यना करणं म्हणजे सनी लियोनच्या घरी जाऊन तिची फक्त ओटी भरल्यासारखं होतं हो. कोण विश्वास ठेवेल ?
युवराज : मी केली ती विपश्यनाच होती !!
खासदार : साहेब तुम्हाला काय करायचं ते करा ..कृपा करून आम्हाला त्या फोटोंमध्ये टॅग करू नका.

शेवटी युवराज त्या खासदाराच्या जागेवर जाऊन बसले. इकडे अर्थमंत्र्यांनी काळ्या पैशावरचे विधेयक सादर केले. त्यांचे भाषण झाल्यावर युवराज तावातावाने उठले.
युवराज: हे विधेयक अत्यंत फालतू आहे.
अर्थमंत्री: काय झालं?
अध्यक्ष : कृपया असंसदीय भाषा वापरू नका !
युवराज: वा !! आता आमच्या भाषेवर पण आक्षेप. इतके वर्ष आमचीच भाषा चालायची इथे.
अध्यक्ष : तुम्हाला जे बोलायचं आहे ते संसदीय भाषेत बोला.
युवराज: बर बर..हे विधेयक सदोष आहे. काळा पैसा कमावणाऱ्या नवीन लोकांच ठीक आहे पण वर्षानुवर्षे ज्यांनी काळा पैसा कमावलाय त्यांचं काय ? त्यांचं विचारच केला नाहीये या विधेयकात.
अर्थमंत्री:नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला ? काळा पैसा वापस आणण्यासाठी विधेयक आहे हे.
युवराज: असेल ना..पण ज्यांना आपला काळा पैसा पांढरा करून घ्यायचा असेल त्यांना एक संधी द्यायला हवी ना. त्या काळ्या पैशावर जेवढा प्राप्तीकर भरावा लागत असेल तेवढा भरायला जर कोणी तयार असेल तर !
अर्थमंत्री: कोणाला करायचं आहे असं?
युवराज: कोणाला म्हणजे...माझ्या आईला करायचा आहे !
युवराजांची आई जागेवरून कोसळण्याच्या बेतात होती. काही खासदार तिकडे धावले. काही खासदार युवराजांकडे धावले.
खासदार: साहेब..काय बोलताय तुम्ही ?
युवराज:काय चुकीचं बोललो मी ?
खासदार: अहो तुमच्या मातोश्रीने काळ्या पैशावर प्राप्तीकर द्यायचा ठरवला तर पुढचे किमान पाच वर्ष देशात कोणालाही प्राप्तीकर भरावा लागणार नाही.
युवराज: मग काय झालं? आमचे पैशे तर पांढरे होतील ना !
खासदाराचे डोळे पांढरे झाले.
खासदार :अरे याला कोणीतरी आवरा रे !

नंतर युवराजांना कोणीतरी संसदेच्या कॅण्टीन मध्ये घेऊन गेले. पोटात थोडं अन्न गेल्यावर युवराज शांत झाले.थोड्यावेळाने पंतप्रधान स्वत: तिथे आले. त्यांना बघून युवराज पुन्हा चवताळले.
युवराज: आले ..आले आमचं रक्त प्यायला. मौत के सौदागर. कशाला आलात इथे ? त्या परदेशात कोणी जेवू  नाही घातलं वाटते.
पंतप्रधान: युवराज..तुमचा नक्की प्रोब्लेम काय आहे ?
युवराज: तुम्ही..तुम्हीच माझा प्रोब्लेम आहात.
पंतप्रधान:काय केलंय मी ? तुमच्यावर तर आजकाल टीका पण करावी वाटत नाही मला.
युवराज: तुम्ही आल्यापासून वाट लागलीये देशाची..देशात भूकंप होतायेत..शेतकरी आत्महत्या करतायेत..स्त्रिया सुरक्षित नाहीयेत..सीमेवर हल्ले होतायेत..पार्किंगला जागा नाहीये..मोबाईलला रेंज नाहीये ..फ़ोटो शेयर करता येत नाही..अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीये..
पंतप्रधान: अहो युवराज थांबा थांबा..तुमचा प्रोब्लेम कळलाय मला.
युवराज: नुसतं कळून काय उपयोग? काय केलं गेल्या वर्षभरात तुम्ही?
पंतप्रधान: तुमचं खरय युवराज ! पण तुमच्या पार्किंगचा आणि रेंजचा प्रोब्लेम मी आजच्या आज सोडवतो बघा. बाकी गेल्या वर्षभरात आम्ही काय काय केलंय ते तुमच्या मातोश्रींना मी समजावून सांगतो. तुम्ही त्यात पडू नका.
युवराज: मातोश्रींवरून आठवलं..ते काळ्या पैशाच विधेयक ! सूडाच राजकारण खेळता आहात तुम्ही. पंधरा लाख रुपये देणार होतात तुम्ही. माझे आणि आईचे पैसे कुठे आहेत ?
पंतप्रधान: आधार कार्ड नाहीये तुमचं युवराज. नाहीतर लगेच पैसे मिळाले असते तुम्हाला तुमच्या बँक खात्यात.
युवराज: मूर्ख समजलात होय मला...स्विस बँकेतून स्विस बँकेच्याच खात्यात पैसे टाकायला आधार कार्ड कशाला लागतंय तुम्हाला ?
पंतप्रधान: अरे ..ह्याला कोणीतरी आवरा रे !!

-- चिनार 

Thursday, 7 May 2015

सलमानचा जामिन !

उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर  द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी 
१. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
   कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो.
२. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
   कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे. 
३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे.
    कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते. 
४. फूटपाथवर झोपणाऱ्या सगळ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा सरंक्षण देण्यात यावे.        आणि विम्याचा हप्ता सबसिडीमार्फत देण्यात यावा. 
   कारण -- कुत्रे असलेत तरी ते माणसचं आहेत. 
५. एखाद्याचा प्रेमभंग झाला असल्यास त्याचे भविष्यातले सगळेच गुन्हे माफ करावे. प्रेमभंग किती वेळा   व्हावा याबद्दल बंधन असू नये. आणि अश्या प्रेमवीरांची मद्य पिण्याची व्यवस्था सरकारने त्यांच्या घरीच करावी (अर्थात सबसीडीमार्फतच!) 
    कारण -- प्रेमभंग ही एक नियतीने दिलेली एक शिक्षाच असते. 
६. सेलेब्रिटीला जेल मध्ये पाठवयाचे असल्यास त्यांच्या ऐवजी त्यांच्या घरगड्यांना पाठवण्याची मुभा असावी. 
    कारण -- बाहेर राहून २०० कोटींचा व्यवसाय करणारे सेलेब्रिटी अर्थव्यवस्थेला हातभारच लावत असतात. 
७. अपघात, शिकार, बलात्कार, देशद्रोह असल्या फालतू कारणांसाठी सेलेब्रिटीवर खटला भरून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये. न्यायालयाबाहेरच असे खटले मार्गी लावावे. 
    कारण--  बडे बडे देशो मी ऐसी छोटी छोटी बाते होती ही रेहती है !
                                                                                                                      -- चिनार