Tuesday, 26 May 2020

तिचा काहीच दोष नसतो..

शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच  म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता.

आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो!

तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता. आता मधात माझं घर होतं त्याला ती करणार? पण "ती मुद्दाम तुया घरासमोरून जाते ना बे" हे मित्रांच मत. मग तिच्या येण्याजण्याच्या वेळी आमचं अंगणात चकरा मारणं ठरलेलं. मग एक दिवस घोळ होतो. तिच्या येण्याची अन मी समोरच्या गटारातून बॉल काढून, आंगभर शिंतोडे घेऊन, जग जिंकल्याच्या आविर्भावात फाटकाकडे येण्याची एकचं वेळ होते. आमचा अवतार बघून तिच्या मैत्रिणी हसतात. ह्यात तिचा काय दोष!

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो...

आता ताप काय कोणाला येत नाही का? तिलाही आला.डॉक्टरकडे गेली बिचारी. बरीच गर्दी होती. आतमध्ये कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला. दोनच मिनिटांनी कमरेवर हात ठेवून केबिनमधून मी बाहेर पडलो. ती तरी काय करणार?

तिचा काही म्हणजे काहीच दोष नसतो...

आता मी काही एवढा ढ वगैरे नव्हतो. पण एकदा गणिताच्या मॅडम चाचणी परीक्षेचे मार्क वर्गात सांगत होत्या. आमच्यातल्याच एका भैताडाने त्याच्या पेपरवर माझा रोलनंबर लिहिला होता. त्याला विसपैकी तीन मार्क मिळाले. मॅडमनी वर्गासमोर अन तिच्यासमोर माझा जाहीर सत्कार केला. दुसऱ्यादिवशी मॅडमला चूक लक्षात आली. त्यांनी वर्गासमोर ती मान्य केली. पण त्यादिवशी नेमकी ती आली नव्हती! आता घरी पाहुणे आले त्याला ती काय करणार...?

तिचा कधीच दोष नसतो..

तिचा भाऊ आमचा शाळेत नव्हता. पण भावाची "ती" आमच्या शाळेत होती. तो वरचेवर चक्कर टाकायचा. एकदा सायकल पार्किंग वरून झाले आमच्यात भांडणं. शाळा आमची होती त्यामुळे आम्ही शेर. धुतला त्याला सगळ्यांनी उभाआडवा. मी त्याची कॉलर पकडलेली. तेवढयात ती समोर आली. तिची बिचारीची काय चूक?

तिची कधीच चूक नसते...

ती वर्गाची कॅप्टन बनते. वर्गात दंगा होऊ नये ही तिची जबाबदारी असते. केवळ तिच्यासाठी मी शस्त्र खाली ठेवलेले असतात. पण एक दिवस...!

एक दिवस मागच्या बेंचवरच्या मुलाला शांत बसवण्यासाठी मी ओरडलेलो असतो. माझी काहीच चूक नाही हे तिलाही माहिती असते. पण राजधर्म!!! केवळ राजधर्म म्हणून माझे नाव ती फळ्यावर लिहिते.

तिचा काहीच दोष नसतो...

परत मित्र म्हणतात,

"अबे तिला तुझं नाव तिच्या हाताने लिहायचं होतं म्हणुन लिहीलंय. बघ किती सुंदर लिहीलंय"

आम्हाला लय गोड वाटतं

आता तिचं अक्षर मुळातच सुंदर असतं..त्यात तिची काय चूक..

तिचा काहीच दोष नसतो...

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो..

समाप्त