Friday, 23 August 2019

लक्षात राहिलेले प्रसंग...


आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत  अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे????
गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे. ह्याच सिनेमात पुढे काही असे प्रसंग आहेत जे गब्बर ह्या व्यक्तिरेखेची व्यापकता जास्त परिणामकारकरीत्या दाखवतात.किंबहुना गब्बरच नव्हे तर संपूर्ण शोले सिनेमाचा इम्पॅक्ट त्या प्रसंगांमुळे जास्त वाढलेला आहे. पण असे प्रसंग लक्षात राहत नाहीत आणि त्यांची चर्चा होत नाही. अश्याच दुर्लक्षित पण जबरदस्त प्रसंगांची, संवादांची आणि अभिनयाची दखल घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
सुरवात शोलेपासूनच...सिनेमाच्या उत्तरार्धात अहमदला (सचिन पिळगावकर) गब्बरची माणसं पकडून नेतात.
"सरदार ये रामगढ का लौंढा है.स्टेशन जा राहा था.हमने उठा लिया"
हे ऐकताच खाटेवर झोपलेला गब्बर अहमदकडे न बघता स्वत:च्या हातावर फिरणाऱ्या किड्याला निर्दयीपणे चिरडून टाकतो. कट टू..अहमदचं प्रेत घेऊन घोडा हळूहळू गावात शिरतो.
निर्दयी गब्बरसिंगमधला कोल्ड ब्लडेड मर्डरर इथे दिसून येतो. गब्बरच्या लेखी रामगढ, तिथले रहिवासी ह्यांची काय किंमत आहे हे तो मुंगीला चापट मारून दाखवतो. 
दुसरा सिनेमा : दिवार  (दिग्दर्शक: यश चोप्रा)
गाजलेला प्रसंग आणि डायलॉग : मेरे पास माँ है.. / मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता
ह्या सिनेमात विजय (अमिताभ बच्चन) श्रीमंत झाल्यावर एक इमारत विकत घेतो असा प्रसंग आहे. त्यात इमारतीचा सौदा पूर्ण झाल्यावर मूळ मालक विजयला म्हणतो,
"अब सौदा पुरा हो गया. पर एक बात कहू. आपने घाटे का सौदा किया. अगर आप केहते तो इस पुरानी इमारत के मैं पाच-दस लाख रुपये कम भी कर देता. माफ किजीये, पर आपको धंदा करना नही आता."

यावर विजय उत्तरतो," धंदा करना तो आपको नही आता सेठ. ये इमारत जब बन रही थी, तो मेरी माँ ने यहाँ इटे उठाई थी. और आज ये ईमारत मैं उसे तोहफे में देने जा रहा हु. अगर आप तो इस ईमारत के मैं पांच-दस लाख रुपये और दे देता. धंदा करना तो आपको नही आता."

आईवर झालेला अन्याय, तिने घेतलेले कष्ट ह्याचा विजयवर किती परिणाम झालेला असतो हे ह्या प्रसंगात अधोरेखित होते. विजयने स्वीकारलेल्या चुकीच्या मार्गाची पाळेमुळे त्याच्या आईच्या अश्रूमध्ये असतात. बांधकामावर असलेला मुकादम जेंव्हा विजयाच्या आईचा अपमान करतो तेंव्हा विजय त्याला दगड फेकून मारतो. हा दगड विजयने त्या संपूर्ण समाजवरंच फेकलेला असतो. इथूनच नैतिक-अनैतिकतेचे सगळे बंधनं झिडकारून तो आईचे अश्रू पुसायचे ठरवतो. मुळात समाजाची सिलेक्टिव्ह नैतिकता त्याने जवळून अनुभवली असते. आणि वरील प्रसंग हे विजयने समाजाला दिलेले उत्तर आहे. ह्या सिनेमात शेवटी नैतिकता जिंकताना दाखवली असली तरी का कोण जाणे अनैतिक विजय जास्त जवळचा वाटतो.
ह्या सिनेमात एका प्रसंगात, विजय आणि त्याचे सहकारी चर्चा करत असतात.
"विजय, इतने खतरे में तुम्हारा अकेले जाना ठीक नहीं. क्या तुम्हे लगता है के ये काम तुम अकेले कर सकते हो?"
"नहीं ! मैं जानता हु के ये काम मैं अकेले कर सकता हु"
अफाट प्रसंग आहे हा. धंद्यात नवीन असल्याने विजयवर काही लोकांचा फारसा विश्वास नसतो. पण विजयाचा स्वत:वर जबरदस्त विश्वास असतो. ह्यात अमिताभचे डोळे आणि संवादफेक पाहावी.
ह्या सिनेमात आधी एक विनोदी म्हणावा असा प्रसंग आहे. विजयाचा धाकटा भाऊ रवी (शशी कपूर) नोकरीसाठी वणवण फिरत असतो. एकदा तो मैत्रिणीच्या वडिलांना भेटतो. ते पोलीस कमिशनर असतात.
ते विचारतात," तो रवी बेटा आजकल क्या कर रहे हो?"
स्वतःच्या बेरोजगारीची लाज वाटून रवी म्हणतो," अब आपसे क्या छुपाना सर. मैं आजकल कुछ नही कर रहा हू."
कमिशनर सहजतेने म्हणतात," कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ."
मुंबई पोलीस कमिशनरच्या तोंडी काही करत नसशील तर पोलिसात ये हे वाक्य देऊन लेखकाला काय दाखवायचे होते देवाला माहिती !

सिनेमा: त्रिशूल
गाजलेला प्रसंग/संवाद : मैं यहा आपसे पाच लाख का सौदा करने आया हू और मेरी जेब मी पाच फुटी कवडीया भी नही है !
त्रिशूल सिनेमातला प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यात भरून घ्यावा असाच आहे. कथा वेगळी असली तरी मूळ आशय अन्याय आणि त्याविरुद्ध घेतलेला प्रतिशोध असाच आहे. दिवार आणि त्रिशूलमधली अमिताभची व्यक्तिरेखा बरीचशी सारखी आहे. पण दिवारमधला विजय एका संधीच्या प्रतीक्षेत असतो. ती मिळताच तो स्वतःवरचा अन्याय झुगारून देतो. तर त्रिशूलमधला विजय अन्यायाला झुगारून देण्यासाठी स्वतः संधी निर्माण करतो. दोघांचाही आत्मविश्वास अमिताभने नजरेतूनच दाखवला आहे. त्रिशूलमध्ये विजय हा बिल्डर आर के गुप्ता ह्यांचा अनौरस पुत्र असतो. वडिलांनी आईवर आणि पर्यायाने स्वतः वर केलेला अन्याय त्याला सहन होत नाही. बिल्डर आर के गुप्ता ह्यांना त्यांच्याच बिझीनेसमध्ये पराभूत करून बरबाद करण्यासाठी विजय शहरात येतो. आणि हळूहळू तो यशस्वी होतो.

ह्यात काही फार सुंदर प्रसंग आहेत,
बिझनेसमध्ये शिरल्यावर कुठल्याश्या एका टेंडरमध्ये आर के गुप्तांच्या कंपनीला विजय मात देतो आणि तो प्रकल्प मिळवतो. ह्या यशासाठी तो शहरातल्या इतर उद्योजकांना एक जंगी पार्टी देतो. ह्या पार्टीविषयी बोलताना विजय गीताला (राखी गुलजार) म्हणतो, 
"गीता इस पार्टी के लिये शहर के तमाम बडे लोगोको न्योता भेजो. और हा.. आर के गुप्ता और फॅमिली को बुलाना मत भुलना. वो अबतक इस शहर के बडे आदमी है !"

आपण आर के गुप्ताला हारवणारच ह्याविषयी विजयला कमालीचा आत्मविश्वास असतो. तोच त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. विजय प्रत्येक टेंडर केवळ एका रुपयाच्या फरकाने जिंकतो. ही थोडीशी अतिशयोक्ती असली तरी आर के गुप्ताला त्याची लायकी दाखवण्यासाठी वापरेललं हे एक रुपयाचं रूपक खूप समर्पक आहे. आर के गुप्ता हुशार असतात. मेहनती असतात. आणि धंद्यात प्रामाणिकसुद्धा असतात.पण हा सिनेमा विजयाच्या दृष्टीकोनातून बघायचा आहे. त्याची माणसं ओळखण्याची आणि हाताळण्याची पद्धत वेगळी असते.

ह्याच सिनेमात आधी एक प्रसंग आहे. गीता (राखी गुलजार) ही आधी आर के गुप्तांच्या कंपनीत कामाला असते. आर के गुप्तांच्या टेंडरची किंमत जाणून घ्यायला विजय त्यांच्याचं एका कारकुनाला (भंडारी) पैसे देतो. पण पैसे घेतल्याचा आळ गीतावर येतो. आर के गुप्ता तिला नोकरीवरून काढून टाकतात. हे विजयला कळताच तो तडक आर के गुप्तांना भेटतो आणि सत्य परिस्थिती सांगतो. गीतासारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही अन्याय केला हे ही सांगतो. आर के गुप्ता ओशाळतात.
ते म्हणतात," मिस्टर विजय, माना की मैने गलती की है. पर भंडारी तुम्हारी मदत कर रहा था. गीताको बचाने  के लिये तुमने खुद का नुकसान क्यो करवाया?"
ह्यावर विजय सडेतोड उत्तर देतो,
"जिंदगी में कुछ बातें फायदे और नुकसान से ऊपर होती है मिस्टर आर के गुप्ता.... मगर अफ़सोस के कुछ लोग इसे समझ नहीं पाते."
माझ्या मते, हिंदी सिनेमातल्या काही सर्वोत्कृष्ट संवादांमध्ये हा संवाद येतो. ह्यात विजयच्या डोळ्यातले बदलणारे भाव बघावेत. आर के गुप्तांच्या आचारविचारांविषयी असलेला राग, त्याविषयी वाटणारी घृणा अन त्याचवेळी वाटणारी कीव हे तीनही भाव अमिताभने दाखवले आहेत. विजयचं ध्येय खूप स्पष्ट असते. त्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा आर के गुप्तांचे नुकसान करण्यात जास्त रस असतो. पण हे करताना कोणाही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊन त्याला दुसरा आर के गुप्ता बनायचं नसतं.

सिनेमात शेवटी आणखी एक जबरदस्त प्रसंग आहे. ज्यात सिनेमाचे त्रिशूल हे नाव सार्थ होते. विजयमुळे आर के गुप्ता धंद्यात पूर्णतः बरबाद होतात. हा विजयाचा पहिला वार! विजय आणि आर के गुप्तांचं खरं नातं कळल्यानंतर त्यांची मुलेसुद्धा दुरावतात. हा विजयचा दुसरा वार!

घरात हताश अवस्थेत बसलेल्या आर के गुप्तांना भेटायला विजय येतो. विजय स्वतः ची ओळख सांगून त्यांची पूर्ण मालमत्ता त्यांना वापस करतो. त्यावेळचा संवाद,
" जिस दौलत के लिए आपने ने मेरी माँ को दुनिया की ठोकरे खाने के लिए अकेला छोड़ दिया था. आज वही दौलत मैं मेरी माँ के तरफ आपको देने आया हु. आज आपके पास आपकी सारी दौलत है, लेकिन आपसे बड़ा गरीब मैंने नहीं देखा !!"

हा विजयचा तीसरा वार !!

त्रिशूल !!

समाप्त

Saturday, 17 August 2019

लोकमान्य - एक युगपुरुष !


लोकमान्य टिळक  हे एक हिमालयाएवढं विशाल व्यक्तीमत्व होतं याविषयी दुमत  नाही. त्यामुळे या महापुरुषाचे चरित्र कुठल्याही स्वरूपात रसिकांसमोर आणणे हे तेवढंच विशाल आव्हान आहे. दिग्दर्शक ओम राऊत, सहलेखक कौस्तुभ सावरकर आणि साक्षात टिळकांची भूमिका साकारणारा सुबोध भावे या सगळ्यांनी हे आव्हान पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अर्थात कुठलीही कलाकृती सर्वसमावेशक असू शकत नाही. कारण रसिकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. पण कलाकृती साकारणाऱ्या सर्व कलाकारांचा दृष्टीकोन आणि ध्येय एकच असेल तर ती कलाकृती बहुतांश रसिकांना भावतेच ! यासाठी 'लोकमान्य' च्या टीमचे अभिनंदन करायलाच हवे.

चित्रपटाची सुरवात होते ती नाना पाटेकर यांच्या टिपीकल शैलीतल्या निवेदनाने. हे निवेदन पडद्यावर कलाकारांची नाव दाखवत असताना प्लेबॅक पद्धतीने आपल्याला ऐकू येतं. यासाठी पडद्यावर वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेतलेला आहे. ते संपूर्ण निवेदन केवळ लाजवाब आहे. सद्य परिस्थितीवर केलेले मार्मिक भाष्य आणि योग्य ठिकाणी काढलेले चिमटे अंतर्मुख करणारे आहेत. विशेषत: निवेदनातले अखेरचे  वाक्य  काळजाचा ठाव घेते --- " टिळक , तुमचं पुण्यस्मरण करणारी आमची ही  शेवटचीच पिढी असेल... असेल नाही, आहेच !!"

टिळकांवर झालेल्या न्यायलयीन खटल्याच्या प्रसंगापासून चित्रपटाची खरी सुरवात होते. सुबोध भावेनी साकारलेले टिळक या क्षणापासून आपल्या मनावर  आरूढ होतात ते अखेरपर्यन्त ! हळूहळू टिळकांचा जीवनपट उलगडत जातो. टिळक- आगरकरांची मैत्री, त्यांच्यातले वैचारिक मतभेद, त्यातूनच उफाळून आलेले जहाल आणि मवाळ असे दोन गट हे सगळे प्रसंग प्रभावी आहेत. महापुरुषांचे विचार कोणाला पटो अथवा ना पटो, त्यातली स्पष्टता ही नेहमीच वाखाणण्याजोगी असते. चरित्रपट साकारताना तीन तासात चरित्राची उकल करणं जमलं नाही तरी व्यक्तिमत्व आणि विचारांची स्पष्टता व्यवस्थित मांडली गेलीच पाहिजे. त्याबाबतीत लोकमान्य हा सिनेमा यशस्वी होतो. तत्कालीन समाज व्यवस्थेत असलेले दोष टिळकांना मान्य होते. पण त्यात इंग्रजांची मध्यस्थी त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच तत्कालीन काही सुधारणवाद्यांच्या इंग्रजधार्जिण्या भूमिकेला त्यांचा विरोध होता. ही बाब सिनेमात ठळकपणे समोर येते. 
    
टिळकांचा इंग्रज सत्ताधाऱ्यांविषयी असलेला आत्यंतिक राग संपूर्ण सिनेमातून अधोरेखित झालेला आहे. टिळकांनी गणेशोत्सव आणि इतर सामाजिक उपक्रमातून केलेली जनजागृती दाखवण्यात सुद्धा चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी होतो. चाफेकर बंधूंनी केलेला रँड या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या वधाचा प्रसंग उत्तम जमलेला आहे. सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. सुबोध भावेने टिळकांचे करारी व्यक्तीमत्व अगदी जसेच्या तसे सादर केले आहे. आगरकरांच्या भूमिकेत समीर विद्वांस सुद्धा शोभून दिसतो. टिळकांचे कथानक सांगताना एका उपकथानकाचा आधार घेतला आहे. आजच्या काळातला मकरंद (चिन्मय मांडलेकर) नावाचा एक युवा पत्रकार सद्य सामाजिक आणि राजकीय परिस्थिमुळे निराश झालेला आहे. अशातच तो टिळकांच्या विचारांकडे खेचला जातो. त्यातून त्याच्या मनातले द्वन्द्व आणखीनच वाढत जाते. चिन्मय मांडलेकरनी ही भूमिका उत्तम वठवली असली तरी हे उपकथानक नंतर नंतर कंटाळवाणे वाटत जाते. कारण यामुळे मुख्य कथानकाची लिंक तुटते.

 चरित्रपट साकारताना इतिहासाची योग्य प्रकारे उकल करणे आवश्यक असते. तिथे हा चित्रपट थोडा कमी पडतो. टिळक हे राष्ट्रीय नेते होते. ब्रिटीश त्यांना घाबरत होते. पण या चित्रपटात त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे कार्य दिसून येत नाही. इतर समकालीन नेत्यांशी त्यांचे असलेले राजकीय संबंध सुद्धा पूर्णत: उलगडून येत नाहीत. यासंदर्भातले काही प्रसंग घाईघाईत गुंडाळल्यासारखे वाटतात. उदा. टिळक आणि स्वामी विवेकानंदाची भेट किंवा वंगभंग आंदोलनाआधी बिपीन पाल यांच्याशी झालेली महत्वपूर्ण भेट. उपकथानकातल्या काही प्रसंगाची लांबी कमी करून इतर महत्वाचे प्रसंग तपशीलवार दाखवता आले असते. अर्थात ज्यांना टिळकांविषयी काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणीच म्हणवी लागेल. थोडक्यात सांगायचे तर दिग्दर्शक ओम राऊत आणि टीमने हिमालयावरील चढाई यशस्वी केली असली तरी एव्हरेस्ट गाठण्यात ते कमी पडले असं म्हणावं लागेल.

समाप्त

(तळटीप: शेंगा आणि टरफलं हा प्रसंग दाखवण्याचा मोह आवरल्यावाबद्दल ओम राऊत आणि टीमचे वैयक्तिक  पातळीवर अभिनंदन!)


Thursday, 1 August 2019

आमच्या सीसीडीय आठवणी..


सध्या सीसीडीचं (कॅफे कॉफी डे) प्रकरण जोरात आहे म्हणून नाहीतर हे लिखाण तसं  सीसीडी, बरिस्ता आणि तत्सम सगळ्या प्रकारांना उद्देशून आहे. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शहरात सीसीडीचं पहिलं आउटलेट सुरु झालं. तेंव्हापासून ते नंतर कितीतरी वर्ष "हे आपल्यासाठी नाही" हे डोक्यात पक्कं बसलं होतं. कॉलेजसमोरच्या मामाच्या टपरीवर दोन रुपयात कटिंग चहा अन छोटा पारले जीचा पुडा घेणाऱ्या आमच्यासारख्यांना सीसीडीत जाऊन दीडशे रुपयाची कॉफी पिणे कधीच झेपणारे नव्हते. अगदी कमवायला लागल्यावरसुद्धा सीसीडीत जाऊन उधळावं असं कधीही वाटलं नाही. चहा किंवा कॉफी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण चांगल्या हॉटेलात आजही तीस रुपयात कॉफी अन दीडशे रुपयात भरपेट थाळी मिळत असताना फक्त कॉफीसाठी दोनशे-अडीचशे रुपये  लोकं कसे काय देऊ शकतात हे मला उलगडलेलं कोडं आहे.

पुण्यात नवीन असताना नोकरी लागायच्या आधी एकदा एका मित्राला भेटायला गेलो होतो. त्याच्या कंपनीसमोर बरिस्ता कॉफी शॉप होतं. तो ही तिथे कधीच गेला नव्हता. पण त्यादिवशी त्याला काय वाटले माहिती नाही. फोनवर तो मला बरिस्तात भेटू असं म्हणाला. त्याने बरिस्ताचं नाव काढल्याबरोबर ,"तुया बाप गेला होता का रे बरिस्तात कधी?"  ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.
त्यावर तो म्हणाला,
"अबे माझी पण हिंमत नाही झाली अजून. पण आता तू सोबत आहे तर गेलो असतो"
"हे पाय पैशे तुलेच द्यायचे आहे. पण आतमध्ये जाऊन मी इंग्रजी बोलणार नाही भाऊ"
इंग्रजी बोलावे लागेल हे कळल्यावर त्याने लगेच नाद सोडला. 

बरं फक्त इंग्रजी बोलून भागणार नव्हते. तिथले वेटर व्हायवा घेतल्यासारखे प्रश्न विचारतात. म्हणजे पंधरा हत्तींची हिंमत एकटवुन दोन कॉफ्यांसाठी पाचशेची नोट खिशातून काढायची. त्यानंतर वन हॉट अँड वन कोल्ड कॉफी प्लीज असं घोकत घोकत काउंटरवरच्या  तरुणीजवळ जायचं. अन मी तुझ्यावर लाईन मारतोय असं तिला जाणवू देता अन एकदाही अडखळता आपली ऑर्डर द्यायची.मग तिच्या कॅपेचिनो ऑर एस्प्रेसो ह्या प्रश्नावर मुरलीधरनसमोरच्या हेमांग बदानीसारखा केविलवाणा चेहरा करायचा. नंतर कसंबसं स्वत:ला सावरत "नाही नाही..गरम कॉफी आपली साधी" असं बावळटासारखं उत्तर द्यायचं. 

एकतर अगदी पहिल्यापासूनच इतक्या चकचकीत वातावरणात मला गुदमरल्यासारखं होते. त्यात ह्यांचे प्रश्न अन शिष्टाचाराचे फवारे उडायला लागले की असह्य होते. कसंय की, नेहमीच्या हॉटेलात, वाजवी दर  असल्याने अन्न आणि अपमान दोन्ही मुकाट गिळले जातात. पण इकडं, अवाजवी दरात अत्यंत बेचव कॉफी अन आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन परवडत नाही. म्हणून कित्येक वर्ष ह्या प्रकारापासून मी लांबच होतो. पण नंतर काही अपरिहार्य कारणांमुळे सीसीडीची ब्याद अंगावर घ्यावीच लागली.

ते कारण म्हणजे... लग्नासाठी वधूसंशोधन..

झालं काय की, आमचे पालक गावाकडे अन आम्ही नोकरीसाठी पुण्यात. आणि 'साहेबांच्या शैक्षणिक धोरणामुळे' अनेक समवयस्क सावित्रीच्या लेकीसुद्धा पुण्या-मुंबईतच नोकरीला असायच्या. मग आमचे पालक आपापसात बोलून राजीखुशीने आम्हाला पुण्यातल्या सीसीडीत भेटायला सांगायचे. आता आपला मुलगा  कपातून बशीत ओततानासुद्धा चहा सांडवतो हे त्यांना माहिती असूनही मला ह्या अग्निदिव्यात का ढकलायचे ते माहिती नाही. तर एके दिवशी अचानक सीसीडीत भेटायचं फर्मान आलं. ध्यानीमनी नसताना डायरेक्ट वर्ल्डकप खेळायला जायचे फर्मान आल्यावर मयांक अग्रवालला काय वाटले असेल हे मी एगझॅक्ट सांगू शकतो.पण मयांकच्या गाठीशी क्रिकेट खेळण्याचा अनुभव तरी होता. इथं आमच्यासमोर मेनूकार्ड कसं मागायचं इथपासून ते मेनूकार्डातलं काय मागवायचं इथपर्यंत प्रश्न होते. मग लगोलग आम्ही गुगलवरून सीसीडीचं मेनूकार्ड डाऊनलोड केलं. आणि बराच खल केल्यावर स्वतःसाठी कोल्डकॉफी आणि तिच्यासाठी तिला जे हवं ते मागवायचं अशी स्ट्रॅटेजी ठरवली. तिला इंप्रेस करण्यासाठी दोन-तीन कॉफ्यांचे नावसुद्धा पाठ करून ठेवले.

पण.... नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते..

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आम्ही सीसीडीत भेटलो. तोपर्यंत आमची खूप प्रॅक्टिस झाली होती. त्यामुळे मी आपल्या बापाचे कॉफीचे मळे असल्यागत सराईतपणे वागत होतो. मी माझ्यासाठी कोल्डकॉफी मागितली.
अन तिला विचारले..,
"तू काय घेणार? एक्स्प्रेसो ट्राय करून बघ हवं तर.."

आणि तिने बॉम्ब टाकला..

"ऍक्चुअली..माझी ना आज चतुर्थी आहे. इथं उपासाचं काही मिळते का?"

अगं रताळे आपण काय करमरकर नाश्ता सेंटरमध्ये आलोय का ... ! ही माझी मनातल्या मनात पहिली रिएक्शन होती.

आता हिच्यासाठी सीसीडीत उपासाचे पदार्थ शोधणं हा आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न होता. मी काउंटरवर जाऊन काहीतरी विचारल्यासारखं केलं आणि वापस आलो. आणि तिला घेऊन शेजारच्या गंधर्व हॉटेलात गेलो.
मला दुःख तिच्या चतुर्थीचं किंवा गंधर्वात जाण्याचं नव्हतं. तर दुःख हिच्यासाठी केला का अट्टाहास ह्याचं होतं. बरं एवढं करूनही तिने आधी नकार कळवला राव...!!

त्यानंतर सीसीडीत बऱ्याच वेळा जाणं झालं. (ह्याचं कारण सूज्ञांच्या लक्षात येईलच!) हळूहळू मी उत्तम सीसीडीपटू झालो. "सीसीडीचं स्टॅंडर्ड घसरलंय" किंवा "छया..पूर्वीचं सीसीडी राहिलं नाही" हे बोलण्याइतपत अनुभव आता गाठीशी आहे. पण गंमत म्हणजे जिच्याशी लग्न ठरलं तिच्याशी पहिली भेट सीसीडीत झाली नाही.

बहुतेक माझ्या पत्रिकेत 'सीसीडी लाभी नाही' असं कुठेतरी कोपऱ्यात लिहिलं असावं.

समाप्त