Friday, 28 June 2019

कार्पोरेटायनम:

त्याचं कसं असतंय..
कंपनीत कोणाच्यातरी एका छोट्या चुकीने एखादा छोटामोठा प्रॉब्लेम उद्भवतो. आणि हल्ली फारच अनकॉमन झालेला कॉमन सेन्स वापरला तर तो प्रॉब्लेम लगेच सोडवला जाऊ शकतो.
पण पण पण.... जो हायलाईटच झाला नाही तो प्रॉब्लेम कसला ! या कार्पोरेट नियमाप्रमाणे तो प्रॉब्लेम चुगलकी पद्धतीने तुघलकी मॅनेजमेंटसमोर मांडल्या जातो. मग गुन्हेगारांची रीतसर पेशी होते. आणि समस्येचे मूळ शोधण्यासाठी 'जाऊ तिथे माती खाऊ' अश्या हायली एक्सपीरिअन्सड लोकांची समिती नेमण्यात येते.
पुढचे काही दिवस समिती गुन्हेगारांची उलट तपासणी घेते. ही उलटतपासणी होत असताना बाकीचे कलीग,"घेन्न बाबू आता" ह्या नजरेने बघत असतात. गुन्हेगार चौकशीत सहकार्य करत नाही अशीही आवई उठवण्यात येते. आणि एके दिवशी, मीटिंग बोलावून समितीचा अहवाल सादर होतो. अहवालाच्या प्रत्येक वाक्यात वूड हॅव बिन, कूड हॅव बिन छाप शब्दांची भरमार असते. समस्येचा विचार केल्यास अहवालाचा प्रमुख भाग हा अश्मयुगीन मानवाचे राहणीमान, चाकाचा शोध, डायनासॉरचा विनाश, पहिले हिमयुग, डार्विन थियरी, इ इज इक्वल टू एमसी स्क्वेयर, मुघलांचे आक्रमण, छत्रपतींचा उदय, पेशव्यांचे पानिपत, इंग्रजांची जुलमी राजवट, दांडीयात्रा, चले जाव आंदोलन, नेहरू, आणीबाणी, आरक्षण, किल्लारीचा भूकंप, एन्रॉन प्रकल्प, आर्थिक मंदी, गॅट करार, पोखरणची अणुचाचणी, गोध्रा, गुजरात मॉडेल, बिग बँग थियरी, नोकीयाचे दिवाळे, नोटबंदी आणि जीएसटी इतका रिलेव्हंट असतो.
टाळ्यांच्या गडगडाटात अहवालाचे कौतुक केल्या जाते. अगदी कुडोस गिडोसचा हैदोस होतो. मग प्रत्येकच डिपार्टमेंटला "आस्क दी स्टेटस को " टाईप सल्ले मिळतात. एखादा उत्साही HR लगेच,"सर व्हाय डोन्ट वी कन्डक्ट सच एन्क्वायरीज इन ऑल डिपार्टमेंट? असा प्रश्न विचारतो. बस्स हाच तो क्षण असतो जिथं समोर बसलेल्या सगळ्या लोकांच्या घशात नुकताच खाल्लेला समोसा अडकतो. सगळे जीव मुठीत धरून एमडीच्या रिप्लायकडे लक्ष देतात. नेमका त्याचं वेळी एमडीच्या तोंडात समोसा असल्यामुळे तो लगेच काही बोलू शकत नाही. तेवढ्या वेळात कितीतरी लोकं नवस बोलून मोकळे होतात. काहीतर आत्ताच एमडीला हार्ट अटॅक यावा इथपर्यंत प्रार्थना करतात. एमडी सावकाश पाणी वगैरे पिऊन स्क्रीनकडे बघतो. आणि खाल्ल्या समोस्याला जागून, "येस.. शुअर..वी मस्ट डू इट " असे सांगतो. सगळयांना अचानकच ऍसिडिटी सुरु होते. इतक्या वेळ लहान तोंड करून बसलेले गुन्हेगार एकदम खुशीत येतात. "आता घ्या ना सायचेहो", अश्या मुद्रेने ते सगळ्यांकडे बघतात. एखादा डिपार्टमेंट हेड एमडीला ,"सर ऍक्चुअली धिस मे नॉट बी रिलेव्हंट इन ऑल दी डिपार्टमेंट्स. इस्पेशियली इन माय डिपार्टमेंट यु सी.." असे समजावण्याचा प्रयत्न करतो. पण एमडी बधत नाही. "आय डोन्ट वॉन्ट टू लिसन ऑल धिस बुलशीट", असे एमडी ठणकावून सांगतो. इथं इन डायरेक्टली एमडीने सगळ्या एचओडीना ,"तुम्ही बैलं आहात" हे सुनावलं असतं. सगळी बैलं माना डोलावतात. एमडी परत फर्मान सोडतो "धिस हॅज टू बी इम्प्लिमेंटेड इन ऑल दि डिपार्टमेंट्स इंक्लूडिंग HR !" आता HR हेडच्या कपाळ्यावर आठ्या येतात. ज्या उत्साही HR ने हे सुचवलं असतं तो "आता वं माय" करून डोक्यला हात मारतो. मीटिंग संपते.
गुन्हेगारांसहित सगळे आपापल्या जागेवर येतात. ज्या समस्येमुळे हे महाभारत घडलं असतं ती अजूनही वाकुल्या दाखवत उभी असते.
समाप्त

Wednesday, 19 June 2019

ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा'

ट्वेन्टी इयर्स ऑफ सरफरोश....फिफ्टीन इयर्स ऑफ लक्ष्य वगैरे ट्रेंड सुरु आहेत.
पण ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा' विषयी कोणी काहीच कसं बोलत नाहीये !
९९ साली आलेल्या ह्या सिनेमाची जाहिरात 'टायटॅनिकला मराठी उत्तर' अशी करण्यात आली होती.
टायटॅनिकमध्ये शेवटी लाकडी फलटीवर पुरेशी जागा असतानाही जॅकने मरण का स्वीकारले ह्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळते.
धांगडधिंगा सिनेमाची कथा कोर्टाच्या पार्श्वभूमीवर घडते. टायटॅनिक जहाजातून वाचलेल्या सातशे प्रवाश्यांनी धांगडधिंगा बघितल्यावर, आम्हाला का वाचवले म्हणून जहाजाच्या कॅप्टनवर त्याच कोर्टात केस केली होती म्हणे. एवढंच नाही, टायटॅनिक सिनेमात ती म्हातारी शेवटी गळ्यातला हिऱ्याचा हार समुद्रात फेकते ते आठवतंय का? तर धांगडधिंगा या 'सिनेमॅटिक जेम' समोर गळ्यातल्या हिऱ्याचे काहीच मोल नाही ह्याची पुरती जाणीव तिला झाली होती. म्हणूनच तिने हे पाऊल उचलले.
केट विन्स्लेटने तर किशोरीताई आंबीयेंचा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरवात केली होती. जेम्स कॅमेरूनच्या केबिनमध्ये 'आमचे श्रद्धास्थान' म्हणून आजही महेश कोठारेंचा फोटो आहे. धांगडधिंगाची पटकथा जेम्सने देवघरात ठेवलीये. अवतार सिनेमा करण्याआधी धांगडधिंगाचाच हॉलीवूडी रिमेक करण्याचा प्रस्ताव घेऊन एक निर्माता जेम्सकडे गेला होता. पण 'क्लासिकस् अँड कल्ट्स कॅन नॉट बी रीमेड. अँड धांगडधिंगा इज अ जेम विच शुड ओन्ली बी व्ह्यूड अँड शुड नॉट बी इव्हन टच्ड' असे म्हणून जेम्सने तो प्रस्ताव धुडकावून लावला.धांगडधिंगा हा माझ्या लायर लायर ह्या सिनेमावरून प्रेरित आहे असा आरोप खुद्द जिम कॅरीने केला होता. जेम्सने त्याचा विरोध करत "जिम कॅरीचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला. अवतारच्या पटकथेत जेम्सने महेश कोठारेंची मदत मागितली होती. पण कोठारे त्यावेळी 'जबरदस्त' या सायन्स फिक्शनच्या कामात बिझी असल्याने ते होऊ शकले नाही.
तरी नशीब धांगडधिंगा सिनेमात महागुरू नव्हते. नाहीतर लियोनार्डो डिकार्पियोने त्यांची दीक्षा घेण्यासाठी भारतात स्थलांतर केले असते. धांगडधिंगात महागुरुंचे नसणे आणि म्हणूनच लियोनार्डोने त्यांना फॉलो न करणे हेच त्याला ऑस्कर मिळण्यासाठी इतकी वर्ष थांबावे लागण्याचे कारण आहे.
इतके अनन्यसाधारण महत्त्व असलेला धांगडधिंगा !
ह्या सिनेमाला अनुल्लेखाने मारल्याबद्दल तमाम सिनेरसिक,विश्लेषक, समीक्षक आणि लेखक ह्यांचा जाहीर निषेध !
चिनार