Monday, 24 August 2020

पाचूंडी!!


पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट..

एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला.
इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली. अन तिकडं कुतुबशाहाला कुणकुण लागली. त्याने लगोलग, मंत्र्यांना महाराजांची भेट घ्यायला पाठवलं. मंत्र्यांनी कुतुबशाहा तर्फे महाराजांना आमंत्रण दिले. महाराज थोडे नाराज होतेच. पण महाराजांच्या पूर्ण सेनेचे आदरातिथ्य व्हावे ह्यासाठी तयारी पूर्ण करण्यात वेळ लागला, आणि म्हणूनच आमंत्रण द्यायला उशीर झाला असा युक्तिवाद मंत्र्यांनी केला. महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी महाराज--कुतुबशाहा भेट आणि मावळ्यांना मेजवानी असा बेत ठरला.

ऐंशी हजार अन ते पण मावळे बरं का !! तुमच्या-माझ्यासारखे अर्ध्या भाकरीत आडवे होणारे कचकडे नव्हते ते. त्यात कुतुबशाहाने त्यांच्यासाठी पुरणपोळीचा बेत ठेवलेला..

अन पुरणपोळी म्हणजे, तुमच्या घरी बनते तशी तळहाताएवढी नव्हे..( कीर्तनकाराच्या अश्या प्रत्येक वाक्यावर आम्ही खळखळून हसत होतो!)

ऐका आता पुरणपोळी कशी होती ते..

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

आणि ही तयार झाली....पाच पोळ्यांची पाचूंडी !!!

मोठ्ठा शामियाना उभारला होता.. सगळे मावळे एकाच वेळी बसू शकतील असा..वाढायला हजार-पंधराशे लोकं होते..

मग काय विचारता? मावळे बसले जेवायला..मोठमोठाल्या ताटात पाचूंडी, सोबतीला साध्या पोळ्या, दोन भाज्या, कोशिंबीर, चटण्या अन ताटाबाहेर ताकाचा तांब्या..कुतुबशाहाचे आदेश होते..मावळे जेवत असे पर्यंत ताट रिकामं दिसायलाच नको..लक्षात ठेवा !!

मावळे भिडलेत...एक पाचूंडी, दुसरी पाचूंडी....तिसरी, चौथी, पाचवी....(इथपर्यंत ऐकून आम्ही गपगार झालो होतो). 

सांगा बरं एकेका मावळ्याने किती पाचुंड्या खाल्ल्या असतील ?? (आम्हाला विचारलं)

"सहा...."

"आठ"

"अकरा", (काही बोलतं का बे वगैरे उद्गार ऐकू येत होते..)

कोणत्याच पोराची कल्पनाशक्ती ह्या पलीकडे जात नव्हती...

"अबे पोट्टेहो...काय कामाचे तुम्ही? आकडा पण बरोबर सांगू शकत नाही ! खाणार काय तुम्ही?"

"ऐका...एकेका मावळ्याने वीस वीस पाचुंड्या खाल्ल्या लेकं हो !"

काय ??? 

वीस पाचुंड्या? सगळ्यांनी आश्चर्याने आ वासला होता...

वीस गुणिले पाच म्हणजे शंभर...गुणिले ऐंशी हजार ... म्हणजे आठ लाख...नाही नाही सोळा लाख...नाही ऐंशी लाख बहुतेक...मी तिथल्या तिथे तीन वेळा हिशोब चुकवला..

कीर्तन संपलं..तरी हिशोब जुळत नव्हता...

आणि येणार प्रत्येक आकडा हा नवे नवे उच्चांक गाठत होता..

दोन-तीन दिवसांनी ऐंशी लाख हा आकडा फायनल झाला..

पण ऐंशी लाख पुराणपोळ्यांना लागणारं पुरण (ते सुद्धा आठवतंय ना, परातीएवढी एक पोळी, त्यावर अर्धा किलो गावरान तूप वगैरे वगैरे !) करायला किती हरभऱ्याची डाळ भिजवली असेल? कधी भिजवली असेल? साखर किती वापरली असेल? एका पाचूंडीला अडीच किलो ह्या हिशोबाने चाळीस लाख किलो गावरान तूप कढवायला किती गावरान गाई म्हशी कुतुबशाहाकडे असतील? एका मावळ्याने पाच तांबे ताक जरी प्यायलं असेल तरी चार लाख तांबे ताक बनवायला किती मोठं भांड वापरलं असेल? 
ह्याचा मी अजूनही हिशोब करतोय..

ह्यात कीर्तनकाराने त्याच्या पदरचा मसाला, तुपाची धार वगैरे सोडली असेलच ह्यात शंका नाही. पण एका मावळ्याने तीन-चार पाचुंड्या जरी खाल्ल्या असतील तरी पंधरा-वीस पुरणपोळ्या होतात हो !

दरवेळी पुरणपोळी खाताना ही पाचूंडीची गोष्ट मला आठवते. आणि निग्रहाने खाऊन सुद्धा तीन पुरणाच्या पोळी पलीकडे मजल जात नाही.

आयुष्यात एकदा तरी, दोन दिवस पुरवून पुरवून का होईना पण एक तरी पाचूंडी खायची इच्छा आहे !

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

पाच पुरणपोळ्यांची एक पाचूंडी !

समाप्त 

चिनार 

(तळटीप: ही कथा कीर्तनकाराने सांगितलेली आहे. ह्या मागील ऐतिहासिक सत्य मी तपासलेलं नाही. कथेला कथा म्हणूनच घ्यावे ही विनंती!)

No comments:

Post a Comment