Tuesday, 9 May 2017

राजकारण आणि We...The People!

"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!” माझा कलीग तणतणत म्हणाला.

कंपनीच्या मेलबॉक्सवर येणाऱ्या असंख्य बिनकामांच्या मेलपैकी एक मेल आमच्या मॅनेजरने त्याला पाठवला नाही ह्यावरून तो चिडला होता. खरं म्हणजे त्या ईमेलचा माझ्याशीच काय तर आमच्या अक्ख्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. मॅनेजरला FYI म्हणून आलेला ईमेल त्याने पुढे पाठवण्याची तशी काही गरज नसते. पण मेल पाठवणं हा मॅनेजरलोकांचा आवडता उद्योग असतो.तेव्हढंच रिकाम्या हाताला काम मिळतं बाकी काही नाही!! पण मेल नं पाठवण्यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण? हा प्रश्न मला पडला होता.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर ज्यांना आपल्यासोबत राजकरण खेळलं जातंय हे सुद्धा कळत नाही अश्या जनसमुदायाचा मी प्रतिनिधी आहे. पण सुदैवाने माझ्या आसपास राजकीय तज्ञांचा सतत राबता असतो. कंपनीतल्या AC चं तापमान कमीजास्त करण्यामागेही कसं राजकारण केलं जातंय इथपासून ते ट्रम्प एकाचवेळी पुतीन,थेरेसा मे आणि अँजेला मर्केल यांना कसं खेळवतोय इथपर्यंत गोष्टींचं राजकीय विश्लेषण माझ्या आसपास सतत सुरु असतं.(शिवाय या सगळ्याला शेवटी मोदीचं कसे जबाबदार आहे हे सांगायला दुसरा गटही त्याच ताकदीने प्रयत्नशील असतो!) त्यात मी राजकारणापासून अलिप्त असल्याबद्दल माझाही येताजाता उद्धार केला जातोच.आता राजकारण हा शब्दच मुळी भारदस्त! म्हणूनच लहान असल्यापासून मी त्यापासून दोन हात लांब राहणंच पसंत केलं. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, "राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली घसरते आहे."आता ही पातळी आजोबा मोजतात तरी कशी हा प्रश्न मला तेंव्हा पडायचा. पण जसं जसं वय वाढत गेलं तशी तशी ती पातळी आणखीनंच घसरली असावी. त्यामुळे ती दिसण्याचा आणि मोजण्याचा संबंध आला नाही. आणि मी त्यापासून अलिप्त होत गेलो. पण सतत कानावर पडणाऱ्या ह्या राजकीय विश्लेषणापासून मी स्वतःला वाचवू शकलो नाही. आता ही परवाचीच ईमेलची गोष्ट,

"अरे विसरला असेल तो तुला पाठवायला",मी समजवण्याच्या सुरात म्हणालो.
"विसरला वगैरे काही नाही..मोठ्या गेम असतात ह्यामागे. तुला नाही कळणार!"
तो अगदी ह्यामागे लाहोर कॉन्स्पिरसी सारखं काहीतरी आहे ह्या थाटात बोलत होता.
"कसला गेम रे?"
"अरे तो मुद्दाम मला मेल पाठवत नाही. आणि मग चारचौघात मला ह्या मेलसंदर्भात काहीतरी विचारतो. मग मला कसं काहीच माहिती नसतं असं सगळ्यांना दाखवतो."
हा मोठा गेम!!! अरे पण जेंव्हा पाठवलेल्या मेलसंदर्भातही तुला काही माहिती नसतं तेंव्हा तुझा धर्म कुठे जातो राधासुता?? हा प्रश्न मी ओठावर यायच्या आधीच गिळला. कारण राधासूत म्हणजे कोण हे त्याला कळणार नव्हतंच. उगाच आमच्या ऑफिसमधल्या राधेशी मॅनेजरचं 'सूत' जुळलंय असं त्याला वाटायचं आणि त्याने मॅनेजरचा 'गेम' करायचा.  

म्हणजे राजकारणाचा छंद जडलाय आपल्याला. कुठे खुट्ट काही वाजलं की 'ते बघ राजकारण!' असं चाललंय. त्यामानाने  हे इमेल  प्रकरण  फारच किरकोळ म्हणावं लागेल. आजकाल एखादा शब्द बोलायचीच देर की लगेच आपली वर्गवारी ठरवली जाते. सध्या भारतवर्षात उजवे,डावे आणि 'तिरपे' असे तीनच वर्ग उपलब्ध आहेत. पूर्वी उजव्या आणि डाव्यांमध्ये 'त्यातल्या त्यात सरळ' असा एक वर्ग होता. तो तिरप्यांनी नामशेष केलाय. बराच काळ  उजवे आणि डावे,"मेरे मुर्गे की एकही टांग" या हटवादाने आपापल्या कोंबड्या आणि पिलावळ सांभाळून होते. पण समजा कोंबडी एखाद्यावेळी दोन पायांवर चालली तर 'सरळ' लोकांची काही हरकत नसायची. आता तिरप्यांना हे मान्य नाही. जरा कोंबडीची बाजू घेतली की लगेच "१२७४ साली तुम्हीच कोंबड्यांना विरोध केला होता ना?? आता का त्यांचा पुळका येतोय  तुम्हाला?" असा प्रश्न येतो. (त्याचवेळी एका हातात कोंबडीची तंगडी आणि दुसऱ्या हातात "भिजवलेल्या द्राक्षांचा रस" असतो हा भाग वेगळा !) एकवेळ उजवे-डावे परवडले पण तिरपे नको अश्या मतापर्यंत मी येऊन पोहोचलोय. या तिरप्यांनी  प्रत्येक क्षेत्रात 'जे दिसेल त्याला विरोध करा रे' संघटना उभारल्या आहेत.

आता साधी गोष्ट, महेंद्रसिंग धोनीने कप्तानपद सोडल्यावर त्याच्या गौरवार्थ मी काहीतरी लिहिलं. (मी "काहीतरीच" लिहितो याबद्दल दुमत नाही!). त्यावर प्रतिक्रिया काय यावी??
"आमच्या युवराजसोबत राजकारण खेळलाय तुमचा धोनी!! त्यावेळी नाही लिहिलंत काही??"

म्हणजे एखादा धोनीचा चाहता आहे ह्याचाच अर्थ तो युवराज,गंभीर,सेहवाग इतकंच काय तर गेला बाजार गगन खोडाच्यासुद्धा जीवावर उठलाय!! एखाद्याने मोदींना मत दिलंय म्हणून त्याने पतंजलीचं तेल अंगाला चोपडून रोज शीर्षासन करतंच कंपनीत आलं पाहिजे!! एखाद्याने साहेबांना 'जीवेत शरद शतमं' म्हटलंय म्हणजेच त्याचे सात- बारे कोरे असलेच पाहिजे!! एखाद्याने अण्णांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण केले होते म्हणजे आज त्याने समस्त दिल्लीकरांची माफी मागितलीच पाहिजे!!

आता याहूनही साधं उदाहरण घेऊ...समजा आपल्या शेजारच्याने डोळ्यादेखत कचरा रस्त्यावर फेकला. आणि तुम्ही त्याविषयी त्याला काही बोलला...तर त्याच्या उजव्या-डाव्या विचारसरणीनुसार खालील प्रतिक्रिया येतील.
उजवा:-"साठ वर्ष देश कचऱ्यात गेला होता तेंव्हा काय करत होता तुम्ही? आता दोन दिवसात सगळं चकचकीत हवंय नाही का??"
डावा:- "सांगा की तुमच्या मोदीला उचलायला.स्वच्छ भारताच्या पोकळ घोषणा नुसत्या!!"
हे ऐकून तुम्ही स्वतः कचरा उचलायला गेलात की तिरप्यांची कमेंट येते.
"गुलामगिरीची सवय झालीये तुम्हाला बाकी काही नाही. आधी इंग्रजांची केली आता ह्यांची करा.हागणदारी मुक्त अभियानाला तुमच्या आजोबांनीच विरोध केला होता आठवतंय का??"

अरे जगू द्या रे आम्हाला!!

तिरप्यांच्या मते, समस्त भारतीय नागरिकांनी आपापले कामधंदे बाजूला ठेऊन रोजच्या घडामोडींवर काहीतरी भूमिका घेतलीच पाहिजे. (घडामोडी हा शब्द घडा"मोदी" असा वाचला तरी चालेल!)आणि घेतलेली भूमिका ही  पाच हजार वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांच्या भूमिकेशी सुसंगत असायलाच हवी. उदाहरणार्थ कोणीतरी कन्हैय्या नावाचं पोरगं जर 'पाकिस्तानशी युद्ध नको मैत्री हवी' असं म्हणत असेल. आणि ह्या विधानाला तुमचा मुकविरोध असेल. थोडक्यात "ते येडंय" म्हणून तुम्ही दुर्लक्ष केलं असेल. तर महाभारतात कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीयांशी युद्ध करण्यास नकार देणारा  अर्जुन तुम्हाला कसा चालतो  ह्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं. आणि त्या अर्जुनाला धर्मयुद्धासाठी तयार करणारा कन्हैय्या तुम्हाला देव म्हणून कसा चालतो ह्याचही उत्तर हवं.

अहो पाकिस्तानशी युद्धवगैरे तर फार मोठ्या गोष्टी झाल्या, पण बाहुबलीमध्ये हिंदुत्वाचं कसं उद्दात्तीकरण केलंय ह्यावरही तुमचं मत असलंच पाहिजे. आता चारशे रुपये तिकीट काढून गेलेला एखादा प्रेक्षक त्या देवसेनेला बघणार की हिंदुत्वाची भाषणं ठोकणार? त्यात जर एखाद्याला बाहुबली आवडला असेल तर तो कट्टर हिंदुत्ववादी!,आवडला नसेल तर तो देशद्रोही!! आणि एखाद्याने जर बाहुबली पाहिलाच नसेल तर तो अखिल मानवतावाद विरोधी म्हणून गणला जाईल!! ते VFX वगैरे गेलं तेल लावत! 

असो.सगळीकडे राजकारण शोधण्याच्या आणि करण्याच्या अट्टाहासाने आपल्या जगण्यातला आनंद हरवतोय का हे बघायला हवं. आपण सामान्य आहोत म्हणून 'ते' राजकारणी आहेत. आता त्यांच्यासारखंच व्हायचं असेल तर भाग वेगळा. फक्त एक गोष्ट लक्षात असावी,
त्यांनी राजकारणाची पातळी घसरवली...आपण किमान त्याची पत घसरवू नये!!

 -- चिनार

2 comments: