Wednesday, 24 May 2017

इमान...भाग ५

गब्ब्यानं पाच-दहा मिनिट टाईमपास केला. आतमध्ये जाची त्याची काही हिम्मत होयेना. त्याची बायको म्हनली,
"आव चाला की आतमंदी"

"हाव..जाऊ ना"

गब्ब्यानं तिकीट अन आधार कार्ड शोधाले बॅग उघडली. पाच मिनिट झामल झूमल केल्यावर त्याले पाकीट सापडलं. गब्ब्या गेटपाशी गेला अन त्या पोलिसाच्या थोबाडाकडे पायत उभा राह्यला.
"काय पाहिजे?"

"ते....इमान...तिकीट...."

"आतमधे जाच हाय का?"

"हाव"

"काढ मंग तिकीट."

गब्ब्यानं तिकीट दाखवलं. आधार कार्डावरचा फोटो काही नीट दिसेना.
"तूच हाय का या फोटोमध्ये?"

"हाव..मीच आहो ना तो."

"अन सात वाजताच्या फ्लाईटले आत्तापासून कायले आला? तीन वाजले आत्ता कुठं. जाय सहा वाजता ये."

"साहेब आता कुठं जाऊ उन्हाचं. जाऊ द्या ना आतमध्ये. म्या बसतो तिकडं कोपऱ्यात जाऊन. कोणाला त्रास न्हाय देत."

"बरं... काय हाय त्या बॅगेत? ठेव त्या पट्ट्यावर सारं सामान."

"कपडे हाय साहेब."

सामान चेक झाल्यावर पोलिसानं त्याईले आतमध्ये सोडलं.  आतला झगमगाट पाहून गब्ब्या लयच इम्प्रेश झाला.

अगागागा...काय ते लायटिंग..अन काय त्या चोपड्या फरश्या...अन सगळं चकाचक...अन थंडी पाय ना कशी वाजू लागली..फुल्ल येशी लावेल हाय वाट्टे. याले म्हन्ते लेका एरपोर्ट...नाहीतं आपल्या गावचा स्टॅन्ड बघा च्यामायबीन. नुसता कल्ला असते तिथं..इथं पाय काही आवाज नाही बिलकुल...

थोडावेळ तं गब्ब्या तसाच बसून राह्यला. त्येच्या बायकोला पन काही सुचेना. तिले वेगळेच प्रश्न पडले व्हते,

"एवढं चकाचक ठेवाले कोन्या गाईच्या शेनानं सारावते काय माहित बाप्पा?"

"अन एवढ्या लायटीचं बिल किती येत आसन?"

"अन त्या पोट्ट्या पाय कश्या झपझप चालू राहिल्या..याच हाय का ऐरहोष्टेश?"

"अन येवढी थंडी हाय इथं. गोधडी आनाले पाहिजे व्हती.इमानात देतीन का गोधडी?"

बराच वेळ बसल्यावर गब्ब्याले बबन्याचं बोलनं आठवलं
"हे पाय गब्ब्या..तिथं जाऊन बसून नको राहू झामल्यासारखा..काउंटरवर जाशीनं. तिथं फायनल तिकीट मिळते. अन शीट नंबर लिहेल असते त्येच्यावर.."

गब्ब्या उठला अन काउंटर शोधाले जाऊ लागला. पन वीसेक तरी काउंटर होते समोर. कुठं जायचं त्याले कळेना. त्यातल्या त्यात जिथं एक बरी पोट्टी बसेल होती तिथं गेला गब्ब्या. अन भैताडासारखा त्या पोरीच्या तोंडाकडे पायत उभा राह्यला.

"येस सर..डू यू वॉन्ट बोर्डिंग पासेस?"

"तिकीट...शीट नंबर...."

"ओह..प्लिज गिव्ह इट टू मी."

गब्ब्यानं तिकीट दिलं. तिनं तिकीट पाहून तोंड वाकडं केलं.
"सर धिस इज फॉर इंडिगो...अँड धिस इज गो-एयर काउंटर."

"यस यस..एयर तिकीट."

"नो सर..गो टू दॅट काउंटर प्लीज.", तिनं तिकीट वापस केलं.

गब्ब्याले काही कळेना. तो एअर इंडिया,किंगफिशर,जेट एअरवेज या सगळ्या काउंटरवर फिरून इंडिगोच्या काउंटरवर पोहोचला. त्याले बोर्डिंग पासेस मिळाले एकदाचे.

"सर डू  यू वॉन्ट टू गिव्ह एनी बॅगेज?"

"काय म्हणलं?"

"बॅगेज सर?"

"हाव हायेत ना बॅगा..थामा आनतो.", गब्ब्यानं गपागप बॅगा आणून पटकल्या त्या पट्ट्यावर.

"थँक यू सर."

"मॅडम, रिशीट भेटते का सामानाची? तसा भरोसा हाय म्हना तुमच्यावर."

"व्हॉट?"

"रिशीट म्हणलं रिशीट!! नसनं तं राहू द्या."

गब्ब्या जागेवर आला. बायकोनं विचारलं,
"येवढा वेळ कायले लागला तुमाले?"

"तिकीट आणायला गेल्तो ना."

"येवढा वेळ?"

"शिष्टीम नाही यायची बराबर..हा म्हन्ते तिकडं जाय..थो म्हन्ते तिकडं जाय. त्याईलेचं माहिती न्हाय कुठं जायचं ते....शिष्टीम नाही बराबर."

गब्ब्या थोडावेळ शांत बसला. अन कसलीतरी अनाउन्समेंट झाली. गब्ब्याले एकदम आठवलं.
"अर्रर्र...ते बाई म्हनाली होती अनाउन्समेंट झाली का तिकडं जासानं म्हनून. भुललो म्या."

गब्ब्या धावतच तिकडं गेला. ती अनाउन्समेंट दुसऱ्याच फ्लाईटची व्हती. तो सिक्योरिटीवाला गब्ब्याले सांगू सांगू थकला. पन जेंव्हा जेंव्हा अनाउन्समेंट व्हायची तेंव्हा गब्ब्या तिकडं पळायचा.

शेवटी एकदाची गब्ब्याच्या इमानाची अनाउन्समेंट झाली. गब्ब्या सगळं लचांड घेऊन सिक्योरिटी चेक इन साठी गेला. बायकांची लाईन वेगळी होती म्हनून बायकोला तिकडं पाठवलं.

तो सिक्योरिटीवाला गब्ब्याले मशीन लाऊन चेक करत होता. आता गब्ब्यांनं चूप बसावं की नाही, पन नाही ना..गब्ब्या त्याले म्हन्ते,
"लय बोअर काम हाय राजेहो तुमचं नाही?"

"क्या हुआ?"

"बोअर होत असानं म्हटलं.निस्ती मशीन फिरवाची दिवसभर. अन मशीन हाय म्हटल्यावर कोनाची हिम्मत हाय बंदूक आनाची?? बाकी एखांद्याकडे बंदूक-गिन्दूक सापडल्यावर मजा असंनं तुमची?"

त्या सिक्योरिटीवाल्याले काही समजलं नाही हे गब्ब्याचं नशीब.

गब्ब्याले आता इमानात बसाची घाई झाली होती. हॉलच्या दरोज्यातून इमानं दिसत होते. गब्ब्याच्या इमानाची वेळ झाली. गब्ब्या फ्यामिलीले घेऊन लायनीत उभा ऱ्हायला. इमानाजवळ जायले बसची व्यवस्था होती. पन गब्ब्याले 'कायले येवढा खर्च करते?' हे कळत नव्हतं. बसमधून उतरून गब्ब्यानं इमानाकडे बघितलं.

"बाब्बो...येवढं मोठं इमान च्यामायले!! पाय ना...मायला माया हाईट एवढे तं चाकं हायेत त्याचे..पंखा पाय ना तो. आपले दहा-बारा टेबल फॅन मावतीन त्याच्यात."

एवढं मोठं इमान अन तो आवाज ऐकून राम्या रडायला लागला. गब्ब्याची बायको म्हनाली,
"आवं मी काय म्हन्ते..पोरगं घाबरीन अजून..जायचं का इथून वापस? कायले बसा लागते इमानात?"

"म्याट झाली काय तू? चाल गुपचाप."

"आवं कायले जायचं आतमध्ये? आतून तं फुल्ल येष्टी सारखंच दिसून रायलं हे."

"म्याट आहे तू. तुया बापानं पाह्यलं होतं का इमान कधी?"

झालं!! आता गब्ब्याच्या बायकोचा पारा चढला.
"हाव..अन तुमी तं जसे इमानातचं पैदा झालते. अन चार-पाच इमानं बांधून ठेवेल हाय आपल्या गोठ्यात मामंजींनं. माया आप्पांले कायले नाव ठेवता?? मगापासून पाहून ऱ्हायली मी..त्या ऐरहोष्टेशकडे डोळे फाडू फाडू पाहू ऱ्हायले. म्या येवढी तयार झाली तुमच्यासाठी..मले एका शब्दानं बोलले नाही. जास्त बोलानं आत्ता वापस जाईन मी इथून."

सगळे लोक गब्ब्याकडे पाहू लागले.
"आवं तू चूप बस ना माय..चुकलं मायं."

गब्ब्यांन राम्याला उचललं अन तो इमानाची शिडी चढू लागला. वरती पोहोचल्यावर ऐरहोष्टेश गब्ब्याकडे पाहून हासली. तिनं गब्ब्याचे बोर्डिंग पासेस चेक केले अन गब्ब्याले आत जायला सांगितलं. आपल्याले  इमानात घेतलं ह्याच्यावर गब्ब्याचा विश्वासच बसेना. गब्ब्या तिले म्हनला,

"एक मिनिट थांबसान का मॅडम?"

"व्हॉट?"

गब्ब्या दरोज्याच्या बाहेर आला अन मोठ्यांन बोंबलला,

"बबन्या...सायच्या इमानात घेतलं बे मले !!"

समाप्त 

5 comments:

 1. Mast..गब्ब्याची बोंब बबन्या पर्यंत पोहोचली की नाही माहिती नाही....पण आमच्या पर्यंत नक्की पोहोचली. G8 job....

  ReplyDelete
 2. घेतलं रे बावा गब्याले इमानात

  ReplyDelete
 3. मले आता इमानापक्षी गब्ब्याच जास्त आवडाले लागला लेका. लयी छान लिवलस त्वा. एकदम झकास!!!
  Keep it up.

  ReplyDelete
 4. ekdam mastch....5 bhag ekapathopath ek n thambata vachale gele...

  ReplyDelete
 5. Very nice and interesting be...

  ReplyDelete