Saturday, 9 January 2021

पेन..

 कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी आयुष्यात एका गोष्टीची चोरी आपण सगळ्यांनीच केलीये/अजूनही करतो...

पेन !!!

ह्यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात,

चोरी केलेला पेन आणि जवळ राहून गेलेला पेन...

आठवणीने वापस केलेला पेन ही कॅटेगरी आता नामशेष झालीये..एवढासा पेन, त्यात काय वापस करायचं?

'चोरी गेलेले पेन' ही एक पॅरालल इकॉनॉमी आहे. ह्यांच व्हॅल्यूएशन रिलायन्सच्या मार्केट कॅपिटल एवढं नक्कीच असेल.हर्षद मेहता सिरीजमध्ये शेयर मार्केट आणि मनी मार्केट ह्यांचा उल्लेख आहे. ह्यांच्याच आसपास, पण न दिसणारं एक पेन मार्केटसुद्धा आहे. प्लॅटफॉर्म नंबर पौने दस सारखं! 

ह्या मार्केटची मोडस ऑपरेंडी साधारण खालीलप्रमाणे,

पहिल्याने पेन विकत घ्यायचा, दुसऱ्याने तो चोरायचा, काही दिवस वापरून हरवायचा. मग पहिल्याने परत पेन विकत घ्यायचा. इथं पहिला आणि दुसरा कधीही इंटरचेंज होऊ शकतात. त्यात तिसरा,चौथा अप टू इंफिनिटी कितीही लोकं येऊ शकतात. मुळात इथं काही नियम नाहीयेत.

"अ पेन, वन्स ईट इंटर्स इन दी मार्केट, कॅन नायदर बी सोल्ड नॉर कॅन बी बॉट. ओन्ली दी ओनरशिप कॅन बी चेंज्ड विदआऊट इंटिमेशन टू दी प्रायमरी ओनर. धिस सायकल कॅन बी रिपीटेड फॉर 'एन' नंबर ऑफ टाईम्स अनटिल द पेन इटसेल्फ डिसॅपियर्स फ्रॉम दी मार्केट"

काही लोकांनी पेनला बांधून वगैरे ह्या मार्केटला आळा घालायचा प्रयत्न केला पण दोरीसकट पेन गायब व्हायला लागल्यावर त्यांनी प्रयत्न थांबवले. त्यातल्या त्यात आपलं होणार नुकसान जर कमी करायचं असेल तर पेन विकत घेताना त्याच्यासोबत रिफिल्स कधीच घेऊ नयेत. कारण रिफिल संपेपर्यंत पेन आपल्याजवळ राहील हा दुर्दम्य आशावाद काहीच कामाचा नाहीये. 

मला गिफ्ट मिळालेला अन थोडासा महागडा पेन काही दिवसांनी हरवला. त्यात मला काही विशेष वाटलं नाही. पण जवळजवळ सहा महिन्यांनी तो पेन माझ्याजवळ परत आल्यावर मी अवाक झालो.शेवटी 'आपलं काही जमणार नाही भौ!' असं म्हणून स्वतः त्या पेनचा त्याग केला.

मानवजात नष्ट झाल्यावर करोडो वर्षांनी उत्खननात जेंव्हा अब्जावधी पेन सापडतील तेंव्हा सगळ्या आकाशगंगेतले लोकं पृथ्वीवरच राहत होते का असा प्रश्न त्या शास्त्रज्ञांना पडल्याशिवाय राहणार नाही.

समाप्त

(देव न करो, पण उत्खननात जर त्याच पेनांनी लिहीलेलं माझं लिखाण सापडलं तर पृथ्वीवरील मानवजात अचानक नष्ट का झाली ह्याचही उत्तर मिळून जाईल!!)

-- चिनार

Thursday, 7 January 2021

 

एक परिंदा..

(प्रेरणा: "उडतं पाखरू" by Tejal Krishnakumar Raut )

(ही कथा वाचण्याआधी तेजलची कथा वाचावी म्हणजे व्यवस्थित संदर्भ मिळेल. लिंक खाली दिली आहे.)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157613613946232&id=688691231


कॉम्प्युटरच्या नादात आपल्याला कॉलेजला उशीर होतोय हे राहुलच्या लक्षात येईपर्यंत घड्याळात पावणेदहा वाजले होते. साडेदहाचं पहिलं लेक्चर असतं. त्याच्याआधी तिला गाठायचं म्हणजे सव्वादहापर्यंत कॉलेजमध्ये पोहोचायला हवं. राहुल धावतच रूमच्या बाहेर येऊन बाथरुमकडे पळाला. बेसिनजवळ आईशी धडक होता होता वाचली. तेच आईची बडबड सुरु झाली,

"हं ..आता उशीर झाला असेल. दिवसरात्र कॉम्प्युटरमध्ये डोकं घातल्यावर काय होणार दुसरं?"

कशीबशी अंघोळ आटोपून राहुल खोलीत आला. कपाट उघडल्यावर आपण काल कपडे इस्त्रीला दिलेच नाही हे त्याच्या लक्षात आले. खुंटीवरची राखाडी रंगाची जीन्स त्याने अंगात चढवली. आणि पूर्ण कपाट खंगाळून राखाडी रंगावर अजिबात न शोभणारा अन मुळात स्वतःचा असा काही रंगच नसणारा एक शर्ट त्याने घातला. आरश्यात बघून भांग पाडताना त्याने विचार केला,

"असं काहीही घालून फिरतो आपण. मग कोण बघणार आपल्याकडे?"

"तसं ही कोण बघतं आपल्याकडे?", त्याच्या मनातून लगोलग उत्तर आलं.

"तू चूप बे" त्याने मनाला दटावलं

मनाचं काही फार चुकलं नव्हतं. कारण राहुल हा कॉलेजमधला एक 'नो-बडी' होता. हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची संख्या पूर्ण भरावी म्हणून वर्गात जे मुलं असतात त्यापैकी राहुल एक! या नो-बडी च्या असण्यानसण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही. पण नो-बडी आवश्यक असतात. कारण त्यांच्याशिवाय 'सम-बडी' लोकांचं वेगळेपण अधोरेखित होत नाही. 

खांद्यावर सॅक लटकावून राहुल खोलीबाहेर आला. पायात बूट चढवत असताना आईने आवाज दिला.

"अरे राहुल, नाश्ता तरी करून जा"

"नको आई उशीर होतोय"

"अरे आज बाबांचा वाढदिवस आहे. शिरा केलाय छान. दोन घास तरी खाऊन जा", आईने समोर प्लेट ठेवली. 

राहुलने उभ्याउभ्याच खायला सुरवात केली. शिरा त्याला आवडायचाच. खाता-खाता त्याच्या मनात विचार आला. 

'थोडा शिरा डब्यात घेऊन जाऊ का? तिलाही आवडत असेल. अन त्यानिमित्ताने तिच्याशी बोलता तरी येईल.'

"आई शिरा छान झालाय. थोडा डब्यात देते का? आज शेखरचा पण वाढदिवस आहे. त्याच्यासाठी घेऊन जातो."

"हो देते", आई म्हणाली.

घराबाहेर पडताना राहुलला कधीतरी कँटीनमध्ये झालेली एक चर्चा आठवली. त्यावेळी तीसुद्धा तिथेच होती.

"माझा वाढदिवस ना? चोवीस डिसेंबरला असतो," शेखर म्हणाला.

"अरे वा !", ती उत्साहाने म्हणाली.

"माझ्या बाबांचा पण त्याच दिवशी असतो वाढदिवस," राहुलने चर्चेत एक अनावश्यक माहिती पुरवली.

"अच्छा", असं म्हणून ती हसली. 

शेखरचा वाढदिवस तर ती विसरणं शक्यच नाही. पण आज माझ्या बाबांचाही वाढदिवस असतो हे तिच्या लक्षात असेल का? ह्या विचारात राहुल कॉलेजमध्ये पोहोचला. 

पार्किगमध्ये गाडी लावताना त्याला ती ऑटोमधून उतरताना दिसली. 

ती....पल्लवी !!

"अरे वा! आज दोघेही एकाच वेळी आलोय. आजचा दिवस लकी आहे", राहुलच्या मनातले विचार.

असल्या फालतू योगायोगांना काही अर्थ नसतो हे माहिती असूनही त्यावर विचार त्याचे अर्थ लावत बसणं राहुलला फार आवडायचं. ह्या योगायोगांना जर खरंच काही अर्थ असता तर आजपर्यंत किमान बहात्तरवेळा पल्लवीने स्वतःच राहुलला प्रपोझ केलं असतं.

आज पल्लवीने निळी जीन्स अन पांढरा कुर्ता घातला होता. "काय गोड दिसते आहे यार", असं म्हणून राहुलने मनातल्या मनात 'ना कजरे की धार, ना मोतीयो का हार, ना कोई किया सिंगार, फिरभी कितनी सुंदर हो' हे गाणं म्हणून घेतलं. तिच्या कपाळावरची चमकणारी अर्धचंद्र आकाराची टिकली लक्ष वेधून घेत होती. नॉर्मली मुली जीन्सवर टिकली लावत नाहीत. पण पल्लवी तशी नव्हती. 'छ्या, जीन्सवर कोणी टिकली लावतं का पल्लवी?' असं कधीतरी स्नेहाने पल्लवीला टोकलं होतं.त्यावर पल्लवीने नुसतं हसून दिलेलं 'मला आवडते' हे उत्तर राहुलला आठवलं. त्यावेळी 'मलाही आवडते' हे राहुलचं वाक्य कोणालाच ऐकू गेलं नव्हतं. कारण 'नो-बडी' हे एखाद्या मोठ्या शब्दातल्या सायलेंट 'p' किंवा 'n' सारखे असतात !

पल्लवी गेटच्या आतमध्ये आली. ती कोणाला तरी शोधत होती. आणि आपसूक तिची पावलं शेखर आणि मित्रमंडळी बसलेल्या कट्ट्याकडे वळली. राहुल थोडं अंतर ठेऊन तिच्या मागेमागे चालू लागला. सगळ्यांनी शेखरला विश केलं. आत्ताच शिऱ्याचा डब्बा काढून तिला द्यावा असं राहुलला वाटत होतं. पण मित्रमंडळी तिच्यासाठी एक घासही शिल्लक ठेवणार नाही ह्याची कल्पना त्याला आल्यामुळे तो शांत बसला. 

पल्लवीला शेखर आवडतो हे राहुलच्या फार पूर्वीच लक्षात आलं होतं. शेखर होताच तसा! लेडीकिलर ! मस्त गिटार वाजवायचा, गाणं म्हणायचा. गिटार वाजवता आली की मुली पटतात अशी समज झाल्याने राहुलनेही हट्टाने एक गिटार विकत आणली होती. पण आपल्यासारख्या डावखुऱ्या लोकांची गिटार वेगळी असते हे माहितीच नसल्याने राहुल एक नॉर्मल गिटार घेऊन आला होता. दुकानदाराने वापस घ्यायला नकार दिल्याने ती घरात तशीच धूळ खात पडली होती. नंतर आपला हा मूर्खपणा कॉलेजमध्ये कोणालाच कळू नये ह्यासाठी त्याने बरेच कष्ट घेतले. 

पल्लवीला शेखर आवडत असताना आपण तिच्यासाठी झुरणं ह्याचं कुठेतरी एक गिल्टही राहुलला होतं. कारण शेखर राहुलचा मित्र होता. मनातून पल्लवीचा विचार काढून टाकण्याचा प्रयत्नही राहुलने बऱ्याचदा केला.

पण, 

मन का परिंदा उड उड जाये...

कौन है जो उसको समझाये...!!

हळूहळू वर्गात सगळे जमले. चान्स मिळेल तसा, 'शेखरकडे बघणाऱ्या पल्लवीकडे' बघण्यात राहुलचा अर्धा दिवस गेला. तिला शिरा कसा द्यायचा हा प्रश्न कायम होता. दुपारी कॅंटीनमध्ये तशी संधी आलीसुद्धा. पण नेमके शेखर आणि स्नेहा तिथे आले. पल्लवीने शेखरच्या हातात काहीतरी दिल्याचं राहुलने बघितलं. राहुल आता पुढच्या संधीची वाट बघू लागला. 

कॉलेज गॅदरिंग दहा दिवसांवर आलं होतं, त्यामुळे लेक्चर्स संपल्यावर मुलंमुली ऑडिटोरियममध्ये, ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला थांबायचे. नेहमीप्रमाणे शेखर गिटार वाजवून गाणं म्हणणार होता. आणि प्रॅक्टिससाठी तोही ऑडिटोरियममध्ये होता. राहुलचा गॅदरिंगशी काही संबंध नव्हता. पण शेखरच्या ओळखीने त्याला एका कमिटीत स्थान मिळालं होतं. तीच आपली नेहमीची कमिटी... डिसिप्लिन कमिटी! कॉलेजमधले सगळे 'नो-बडी' गोळा करून ही कमिटी बनवल्या जाते. केंद्रीय मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्र्यांचं जे स्थान असतं तेच गॅदरिंगमध्ये डिसीप्लिन कमिटीचं असतं. त्यांना कोणी विचारत नसतं !

राहुल तिथं पल्लवी अन स्नेहाच्या आसपास घुटमळत होता. नशिबाने जर आज पल्लवी एकटीच तिथून निघाली तर रस्त्यात तिला गाठून शिऱ्याचा डब्बा तिला द्यायचाच असं राहुलने ठरवलं. 'हाय पल्लवी, आज बाबांचा वाढदिवस आहे ना तर आईने शिरा पाठवला होता सगळ्यांसाठी. सकाळी द्यायलाच विसरलो.' ह्या वाक्याची त्याने दहावेळा उजळणी केली. पण पल्लवी लवकर उठत नव्हती. शेखरची प्रॅक्टिस झाल्याशिवाय ही काय उठणार नाही हे राहुलच्या लक्षात आलं. ही संधीपण गेली बहुतेक असं वाटत असतानाच पल्लवी उठली. आणि ऑडिटोरियमच्या मधल्या एका रांगेतून ती बाहेर जाऊ लागली. तीन-चार रांगा सोडून राहुलसुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागला. पल्लवी जरा जास्तच वेगात चाललीये असं त्याला वाटलं. तिला घाई असावी का? आपल्यामुळे तिला उशीर तर नाही ना होणार असाही विचार त्याच्या मनात आला. 

आणि तो तिला आवाज देणार तेवढयात शेखरचा आवाज आला,

“आज गॅदरिंगच्या गाण्याच्या आधी मी एक दुसरं गाणं म्हणणार आहे. कोणीतरी फर्माईश केलीये ह्या गाण्याची आणि निदान आज तरी मला तिचं मन मोडायचं नाहीये.”

पल्लवी थांबली अन तिने वळून शेखरकडे बघितलं. शेखरने गायला सुरवात केली,

"इक बात कहो गर मानो तुम, सपनो में न आना जानो तुम. मैं नींद में उठकर चलता हूं, जब देखता हूं सच मानो तुम"

पल्लवी जागच्या जागी थिजली होती. तिचे भरलेले डोळे अन ओठावरचं हसू बरंच काही सांगत होतं. पल्लवी अन शेखर ह्या सरळ रेषेचा आपण उगाचच त्रिकोण करतोय हे राहुलच्या लक्षात आलं. आणि तो तिथून बाहेर जाऊ लागला. तोवर शेखरचं गाणंही संपलं होतं. 

निराश मनाने राहुल दाराजवळ पोहोचला. आणि तिकडे शेखरने गॅदरिंगमध्ये म्हणायच्या गाण्याची प्रॅक्टिस सुरु केली.

"तूटा तूटा एक परिंदा ऐसे तूटा, के फिर जुड ना पाया..

लुटा लुटा किसने उसको ऐसे लुटा, के फिर उड ना पाया.."

समाप्त..


Sunday, 13 September 2020

पाती..

 पाती...

आज घरी नारायण दशमी आहे. विदर्भातल्या एक-दोन जिल्ह्यात फारच कमी कुटुंबांमध्ये हा सण असतो. 90 टक्के विदर्भात हा प्रकार माहितीसुद्धा नसेल. आमच्या मूळ गावातल्या घरी आज सूर्यनारायणाची पूजा असते.कित्येक पिढयांपासून हे अखंड सुरू आहे. हळूहळू कुटुंब रुंदावलं, लेकरं गावाबाहेर पडलीत, संबंध कमी झालेत, तरी बहुतांश कुटुंबीय आपापल्या घरी नारायण दशमी करतात. हे व्रत तसं कडक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला कूळ बदललं तरी हे व्रत करावं लागतं.वडिलांच्या आत्याबाईंना वयाच्या पंच्यात्त्तरीपर्यंत नारायण दशमी करताना मी बघितलेलं आहे. घरातले अतिवृद्ध, गर्भवती स्त्रिया,पेशन्ट्स आणि लहान मुलं ह्यांना नैसर्गिक सूट मिळते.

देवावर श्रद्धा असली तरी देवाधर्माचं मी फार काही करत नाही. पण पिढ्यांपिढ्या सुरू असलेली नारायण दशमी कळत्या वयापासून मी आणि इतर भावंडं इमानेइतबारे करतो.

आता ह्यात काय विशेष असा प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर पुढं दिलंय..

जोपर्यंत पोटोबा व्यवस्थित सुरू आहे तोपर्यंत आपल्याला कशावरही आक्षेप नसतो. 

भरल्यापोटी मी प्रतिगामी,पुरोगामी,संघी,सनातनी,धर्मनिरपेक्ष,अंनिस समर्थक असा सर्वकाही आहे. पोटातल्या भुकेवर काही आलं की भूमिका बदलते.

आणि नारायण दशमी करताना नेमकं तेच होतं.


आज घरी नॉर्मल भाजी पोळीचा स्वयंपाक नसतो. तवा,कढई वापरता येत नाही. तेल,तिखट,मसाला इतकंच काय तर मिठसुद्धा चालत नाही.


मग खायचं काय?? 

"पाती"

पाती कशी करतात? 

कणकेत फक्त पाणी टाकून गोळा भिजवायचा. त्याला पोळीसारखं लाटून पाण्याच्या वाफेवर उकडायचं. ह्यातून जे काय तयार होईल त्याला पाती ऐसें नाव!

ही पाती मग सकाळ-संध्याकाळ दूध,दही,तूप आणि साखर ह्यासोबत खायची. सोबत फळं खाता येतात. पात्या किती खायच्या ह्यावर बंधन नाही. पण मुळात तीनपेक्षा जास्त पात्या आत ढकलणे शक्य नाही.आणि कितीही ढकलल्या तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही!

नारायण दशमी आहे!

वर्षातून एकदाच तर येते!

परंपरा! प्रतिष्ठा! 

वगैरे बोलून दिवस ढकलल्या जातो. 

पण संध्याकाळ? 

दिन ढल जाये हाय संध्याकाळ ना जाये..

रोटी ना आये, उसकी याद सताये...

अशी अवस्था होते.

रात्री नऊ वाजेपर्यंत मी नास्तिकतेकडे झुकलेला असतो.पण पूर्ण नास्तिकात रूपांतर होण्याआधी निग्रहाने चार पात्या खाऊन मी अंधारगुडुप होऊन जातो..!

झोपेत दचकून उठतो. घरात एखादी पाती शिल्लक तर नाहीये ना अशी शंका येते. कारण नियमाप्रमाणे पाती संपल्याशिवाय दुसरा स्वयंपाक करता येत नाही. मग पाती गाईला चारावी लागते. त्यासाठी सकाळी उठून शहरात गाय शोधा! अश्यावेळी गायी पण लपून बसतात.चुकून सापडल्याच तर पाती बघून तोंड फिरवतात. शेवटी त्यांनाही चॉईस आहेच ना!

मला दरदरून घाम फुटतो. मग आठवतं. शेवटची पाती आपणच कोंबलीये. 

परत अंधारगुडूप होतो.

आणि स्वप्नात गुणगुणतो,

तू किसी दशमी सी गुजरती हैं..

मैं किसी पाती सा..उकडा जाता हू !!

समाप्त


 --चिनार

Monday, 24 August 2020

पाचूंडी!!


पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट..

एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला.
इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली. अन तिकडं कुतुबशाहाला कुणकुण लागली. त्याने लगोलग, मंत्र्यांना महाराजांची भेट घ्यायला पाठवलं. मंत्र्यांनी कुतुबशाहा तर्फे महाराजांना आमंत्रण दिले. महाराज थोडे नाराज होतेच. पण महाराजांच्या पूर्ण सेनेचे आदरातिथ्य व्हावे ह्यासाठी तयारी पूर्ण करण्यात वेळ लागला, आणि म्हणूनच आमंत्रण द्यायला उशीर झाला असा युक्तिवाद मंत्र्यांनी केला. महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी महाराज--कुतुबशाहा भेट आणि मावळ्यांना मेजवानी असा बेत ठरला.

ऐंशी हजार अन ते पण मावळे बरं का !! तुमच्या-माझ्यासारखे अर्ध्या भाकरीत आडवे होणारे कचकडे नव्हते ते. त्यात कुतुबशाहाने त्यांच्यासाठी पुरणपोळीचा बेत ठेवलेला..

अन पुरणपोळी म्हणजे, तुमच्या घरी बनते तशी तळहाताएवढी नव्हे..( कीर्तनकाराच्या अश्या प्रत्येक वाक्यावर आम्ही खळखळून हसत होतो!)

ऐका आता पुरणपोळी कशी होती ते..

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

आणि ही तयार झाली....पाच पोळ्यांची पाचूंडी !!!

मोठ्ठा शामियाना उभारला होता.. सगळे मावळे एकाच वेळी बसू शकतील असा..वाढायला हजार-पंधराशे लोकं होते..

मग काय विचारता? मावळे बसले जेवायला..मोठमोठाल्या ताटात पाचूंडी, सोबतीला साध्या पोळ्या, दोन भाज्या, कोशिंबीर, चटण्या अन ताटाबाहेर ताकाचा तांब्या..कुतुबशाहाचे आदेश होते..मावळे जेवत असे पर्यंत ताट रिकामं दिसायलाच नको..लक्षात ठेवा !!

मावळे भिडलेत...एक पाचूंडी, दुसरी पाचूंडी....तिसरी, चौथी, पाचवी....(इथपर्यंत ऐकून आम्ही गपगार झालो होतो). 

सांगा बरं एकेका मावळ्याने किती पाचुंड्या खाल्ल्या असतील ?? (आम्हाला विचारलं)

"सहा...."

"आठ"

"अकरा", (काही बोलतं का बे वगैरे उद्गार ऐकू येत होते..)

कोणत्याच पोराची कल्पनाशक्ती ह्या पलीकडे जात नव्हती...

"अबे पोट्टेहो...काय कामाचे तुम्ही? आकडा पण बरोबर सांगू शकत नाही ! खाणार काय तुम्ही?"

"ऐका...एकेका मावळ्याने वीस वीस पाचुंड्या खाल्ल्या लेकं हो !"

काय ??? 

वीस पाचुंड्या? सगळ्यांनी आश्चर्याने आ वासला होता...

वीस गुणिले पाच म्हणजे शंभर...गुणिले ऐंशी हजार ... म्हणजे आठ लाख...नाही नाही सोळा लाख...नाही ऐंशी लाख बहुतेक...मी तिथल्या तिथे तीन वेळा हिशोब चुकवला..

कीर्तन संपलं..तरी हिशोब जुळत नव्हता...

आणि येणार प्रत्येक आकडा हा नवे नवे उच्चांक गाठत होता..

दोन-तीन दिवसांनी ऐंशी लाख हा आकडा फायनल झाला..

पण ऐंशी लाख पुराणपोळ्यांना लागणारं पुरण (ते सुद्धा आठवतंय ना, परातीएवढी एक पोळी, त्यावर अर्धा किलो गावरान तूप वगैरे वगैरे !) करायला किती हरभऱ्याची डाळ भिजवली असेल? कधी भिजवली असेल? साखर किती वापरली असेल? एका पाचूंडीला अडीच किलो ह्या हिशोबाने चाळीस लाख किलो गावरान तूप कढवायला किती गावरान गाई म्हशी कुतुबशाहाकडे असतील? एका मावळ्याने पाच तांबे ताक जरी प्यायलं असेल तरी चार लाख तांबे ताक बनवायला किती मोठं भांड वापरलं असेल? 
ह्याचा मी अजूनही हिशोब करतोय..

ह्यात कीर्तनकाराने त्याच्या पदरचा मसाला, तुपाची धार वगैरे सोडली असेलच ह्यात शंका नाही. पण एका मावळ्याने तीन-चार पाचुंड्या जरी खाल्ल्या असतील तरी पंधरा-वीस पुरणपोळ्या होतात हो !

दरवेळी पुरणपोळी खाताना ही पाचूंडीची गोष्ट मला आठवते. आणि निग्रहाने खाऊन सुद्धा तीन पुरणाच्या पोळी पलीकडे मजल जात नाही.

आयुष्यात एकदा तरी, दोन दिवस पुरवून पुरवून का होईना पण एक तरी पाचूंडी खायची इच्छा आहे !

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

पाच पुरणपोळ्यांची एक पाचूंडी !

समाप्त 

चिनार 

(तळटीप: ही कथा कीर्तनकाराने सांगितलेली आहे. ह्या मागील ऐतिहासिक सत्य मी तपासलेलं नाही. कथेला कथा म्हणूनच घ्यावे ही विनंती!)

Thursday, 13 August 2020

नारायण...लॉकडाऊन इफेक्ट्

 दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली.

त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन,


"काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली!  सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला.


"बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?"    


"नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले 


आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही. त्याने सॅनिटायझरची बाटली दिली गण्याच्या हातात अन गण्याला बजावून सांगितलं


"हे बघ गण्या, दोन थेंबाच्यावर कोणाच्याच हातावर टाकू नको सांगून ठेवतो! संध्याकाळपर्यंत हीच बाटली पुरवायची आहे लक्षात ठेव"


"अहो पण चार बाटल्या आणल्यात ना नारायणभाऊ?


"म्हणून काय लगेच संपवायच्या का? किती महाग झालंय सॅनिटायझर माहितीये का? जेवढं उरेल तेवढं संध्याकाळी वापस करायला येईल असं बजावून आलोय त्या मेडिकलवाल्याला मी! तो मला सांगत होता वापस नाही घेता येत म्हणून. मी म्हटलं, त्याला काय एक्स्पायरी असते होय रे? की सोडा असतो त्याच्यात झाकण उघडलं की उडून जायला. मला सांगतोय! तू जपून वापर"


"बरं"


"आणि हे बघ, शिंच्या अत्तर समजून लोकांच्या अंगावर सॅनिटायझर शिंपडू नको लक्षात ठेव."


गण्याला उगाचच दम देऊन नारायण पुढे निघाला. 


पुढे दोन बायका एकमेकांना चिपकून सेल्फी घेत होत्या. दोघीही 'अफाट' असल्याकारणाने एका फ्रेममध्ये बसणं शक्य नव्हतं. 


नारायण लगेच खेकसला,

"ए ए शकुताई! काय चाललंय? काय सोशल डिस्टंसिंग वगैरे काही आहे की नाही? जवळ उभं राहून काय सेल्फी काढताय. तू या कोपऱ्यात जा अन तू त्या कोपऱ्यात जा! अन लागेल तेवढे फोटो काढा जा"


"ए असं काय रे नारायण? दूर उभा राहून कसं काय सेल्फी काढणार रे?"


"हे बघ..लग्नात सोशल डिस्टंसिंग पाळणार अशी हमी तुझ्याच नवऱ्यानं दिलीये पोलीस स्टेशनमध्ये. त्याचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावायचा नसेल तर सांगतो ते ऐक. नाहीतर तुझं तू बघ"


नारायण पुढे निघाला,

"नारबा, चहा-नाश्ता नाही आला अजून? व्याही पेटलाय तिकडं!"


"सकाळपासून तीन वेळा मी चहा पाजलाय त्यांना! कप सॅनिटाइझ्ड आहेत का असं विचारात होते मला.  मी म्हटलं कप,बशी, साखर,चहा पावडर इतकंच काय तर गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. आता बोला !!


तेव्हढ्यात नारायणाला मुलीच्या आईने आवाज दिला..तिच्यासोबत सात-आठ बायका होत्या.

"नारायणा, अरे मुलाकडल्या बायकांना हळदी-कुंकू द्यायचंय. वाण म्हणून प्रत्येकीला एकेक मास्क देऊ म्हटलं. तर हे कसले सुती कापडाचे मास्क आणलेस रे. मुलाच्या आईला तरी किमान गर्भरेशमी मास्क आणायचास ना!"


"काय करायचंय थेरडीला गर्भरेशमी? सुती कापड बरं पडतं त्यापेक्षा"


सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर मनसोक्त हसल्या.


"नारबा...मुलाचे मित्र परगावावरून आलेत. आता क्वारंटाईन केल्याशिवाय कसं काय सामील करून घेणार त्यांना?"


"काका, काही काळजी करू नका. त्यांची 'सोय' मी वरच्या खोलीत केली आहे. संध्याकाळपर्यंत उठणार नाहीत"


"अरे म्हणजे, दारू बिरू आणलीस की काय?"


"कसली दारू? सॅनिटायझरमध्ये ८२ टक्के अल्कोहोल असते म्हणतात. तेच ठेवलंय ग्लासात भरून!!"


असे एकानंतर एक हल्ले परतवत नारायण आपला डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा कार्यालयात थैमान घालत असतो.


नवरा-नवरी बोहोल्यावर उभे राहतात. मंगलाष्टक म्हणण्याची वेळ येते. आणि नेमका आंतरपाट सापडत नाही. 


"हे काय, साध्या आंतरपाटाची व्यवस्था करता येत नाही ह्यांना?", कोणतरी कुजबुजतं..


तेवढ्यात नारायण उत्तरतो,

"कश्याला पाहिजे आंतरपाट गुरुजी? लग्न लागण्याआधी एकमेकांचे चेहरे पाहायचे नाही हाच उद्देश असतो ना आंतरपाटाचा? हो ना!! मग हे काय मास्क लावलेत त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? चला सुरु करा मंगलाष्टक...म्हणा रे सगळ्यांनी..तदैव लग्न सुदिनं...."


आणि एकदाच लग्न लागतं..


नारायण डोक्यावर कफन बांधल्यासारखं चेहऱ्यावर मास्क बांधून पुढचा हल्ला परतवायला निघतो...


समाप्त...


चिनार

Monday, 10 August 2020

अंबापेठेतले सिनेमे...

 आज सकाळी अक्षय अन सैफचं मैं खिलाडी तू अनारी गाणं सुरु होतं. काही आवाज, काही ओळखीचे वास डायरेक्ट भूतकाळात घेऊन जातात. तसं हे गाणं मला अंबापेठेत घेऊन गेलं.

अंबापेठ ! म्हणजे माझं आजोळ. अमरावतीच्या मध्यवर्ती भागात असलेली सगळ्यात जुनी वस्ती ! अंबापेठेचं आयुष्यातलं स्थान लिहिण्याजोगती प्रतिभा माझ्यात कधी येईल का ते माहिती नाही, पण आज त्यातल्या एका भागावर लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

अंबापेठेत पाहिलेल्या किंबहुना पाहायला मिळालेल्या सिनेमांची मोठी यादी तयार करता येईल. त्याकाळात आमिर, सलमान, शाहरुख ह्यांची चलती होती. तिघांचीही सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरु होती. अनिल कपूर, ऋषी कपूर ह्यांचा थोडाबहुत पडता काळ सुरु झाला होता तरीपण १९४२ ए लव्ह स्टोरी, बोल राधा बोल वगैरे सिनेमातून त्यांचं नाणं खणखणीत वाजत होतंच. आणि हे पाच-सहा लोकं सोडले तर इंडस्ट्रीत आदित्य पांचोली, राहुल रॉयपासून ते अक्षय कुमार, अजय देवगणपर्यंत असे बरेच लोकं होते ज्यांचे सिनेमे चालायचे किंवा पडायचे. पण ह्यांचा अमुक एक सिनेमा बघितला आणि आवडला असं चार चौघात सांगता येत नसे. ह्यांचे सिनेमे थेयटरमध्ये जाऊन बघण्याची आमच्यात पद्धतच नव्हती. थिएटरमध्ये हम है राही प्यार के, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे वगैरे बघायचे असतात. मोहरा, खिलाडी, दिलवाले कभी ना हारे हे सिनेमे बघायचेच नसतात अशी माझी एक समजूत होती. आता ह्याच्यामागे एक अर्थकारण सुद्धा होतं. आलेला प्रत्येक सिनेमा पोरांना दाखवणं हे कोणत्याच मध्यमवर्गीय पालकांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे सिनेमे दाखवायचे ते एकदम सो कॉल्ड प्रीमियम कॅटेगिरीतलेच असा विचार असायचा. मग बलवान, वक्त हमारा है, मैं खिलाडी तू अनाडी हे सिनेमे थोडे कनिष्ठ मध्यमवर्गीय प्रीमियम कॅटेगिरीत यायचे.

मग हे सिनेमे बघायला मिळाले कुठे? तर अंबापेठेत !!

आजोबांचा दिवस सकाळी रेडियोवर भीमण्णांच्या भूपाळीपासून सुरु व्हायचा. अन आम्ही चिल्लेपिल्ले त्यांचं पाणी वगैरे भरून झालं की उठायचो. मग नुसता गोंगाट ! दुपारी शांत झोपणं वगैरे प्रकार माहितीच नव्हते. मग आजोबा केबल टीव्हीवर आम्हाला एखादा सिनेमा लावून देऊन स्वतः वामकुक्षी करायचे.

तिथं बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे राहुल रॉयचा जुनून ! (कदाचित दुसरा असू शकेल पण आत्ता हाच आठवतोय)
तो राहुल रॉय पौर्णिमेच्या रात्री वाघ वगैरे बनतो अशी काहीतरी स्टोरी होती. आता एखाद्याला वाघ बनवायचं आहे तर राहुल रॉय ही काय चॉईस म्हणायची का? राष्ट्रीय प्राण्याला ट्रीट करण्याची ही काय पद्धत झाली ! पण ते वाघ वगैरे होण्याचं चित्रण जबरदस्त होतं बरं का. भीती वाटायची त्यावेळेला. पण मी एकटाच का घाबरू? म्हणून गणिताचा मास्तर पौर्णिमेला कोल्हा बनतो अशी एक अफवा मी शाळेत उठवली होती. (अफवांच्या विश्वात ही आजही अनबिटेबल आहे !)

मग सैफचा पहिला सिनेमा 'आशिक आवारा' बघितल्याचं आठवतंय. शर्मिला टागोर अन नवाब पतौडींचा हा मुलगा. रूप तेरा मस्ताना-प्यार मेरा दिवाना हे शर्मिलाजींचं गाजलेलं गाणं ! आणि नवाब पतौडींचा एक डोळा कृत्रिम होता असं म्हणतात. त्यावरून सैफचा एक डोळा बकरीचा आहे अशी एक अफवा उठली होती.(आईशप्पथ ! ही अफवा माझी नाही.) आणि यावरूनच सैफला हिणवायला, रूप तुला नसताना-बकरीचा डोळा असताना-शान कशाला मारतो रे गाढवा! असं एक गाणं म्हटल्या जायचं. (ही रचनासुद्धा माझी नाही). पण काही असो, सैफ मला तेंव्हापासूनच आवडायचा. आशिक आवरा, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, तू चोर मैं सिपाही असे त्याचे बरेच सिनेमे मी अंबापेठेत बघितले.

अक्षयने अंडरटेकरला उचललेलं याची देही याची डोळा त्या छोट्या पडद्यावरच बघितलं. जादूगर, इन्सानियत हे शूटिंग झाल्यावर परत अमिताभनेही कधी बघितले नसतील असे सिनेमे अंबापेठेत बघताना खूप मजा यायची.

गोविंदाचा आँखे सुद्धा तिथंच बघितलाय. संजय दत्तचे इनाम दस हजार, सडक, गुमराह,साजन, सुनील शेट्टीचे बलवान, गोपी किशन, टक्कर, अक्षयचे सपूत, खिलाडी सिरीजचे जवळपास सगळेच सिनेमे जर अंबापेठ नसतं तर कदाचित कधीच बघितले नसते. तिथं सिनेमे बघण्याचा एक तोटासुद्धा होता. आजोबांना मारधाड फारशी आवडत नव्हती. त्यामुळे आजोबा जागे व्हायच्या आधी सिनेमा संपलेला बरा असायचा. नाहीतर शेवटची फायटिंग सुरु झाली की आजोबा टीव्ही बंद करायचे. बऱ्याच सिनेमांचा शेवट बघायचा राहिला तो राहिलाच. सिनेमात थोडे इंटेन्स प्रसंग सुरु झाले की बरोब्बर तेंव्हाच आजोबांना कशीकाय जाग यायची हे एक कोडंच आहे. उठल्या उठल्या पहिले टीव्ही बंद !

अंबापेठेचा फायदा आमच्या आई बाबांनाही भरपूर झालाय.अंबापेठेच्या घराजवळच एक थिएटर होतं. त्यामुळे हक्काची पार्किंगची जागा उपलब्ध होती. पण आई बाबा तिथं स्कुटरसोबतच लेकरांनाही पार्क करून जायचे. माझ्यासाठी सिनेमा की आज्जी ह्यातली नैसर्गिक चॉईस आज्जीच असायची. आणि 'एका तिकिटाचे पैसे' हे अर्थकारणसुद्धा होतंच. आणि त्याहीपेक्षा सिनेमा बघताना एका लेकराची कटकट नसणं हे जास्त सुखावह होतं.

अंबापेठेत एका खोलीत लहान मामा राहायचा.तिथल्या लाकडी खिडकीत काचेच्या फ्रेम बसवल्या होत्या. त्यातील एका खिडकीमध्ये शशी कपूरच्या "सवाल" सिनेमाचं पोस्टर चिपकवलं होतं. तासोनतास आम्ही त्या पोस्टरकडे बघत राहायचो. उगाचच! तिथं त्या पोस्टरचं काय प्रयोजन होतं हा एक सवालच आहे.

असो.
अंबापेठ अजूनही आहे. पण ते घर पाडून आता नवीन घर उभारलंय. मोठा टीव्हीसुद्धा आहे.

आता आजोबा नाहीत...आजी खूप थकलीये..

पूर्वीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा मोठे होऊन उगाचच फार शहाणे झाल्यागत वागतोय..

चालायचंच... सिनेमातरी कुठं पहिलेसारखा राहिलाय !!

-- समाप्त

-चिनार

Tuesday, 4 August 2020

राखी स्पेशल

शाळेत वर्गातल्या मुलींनी मुलांना राखी बांधण्याचा एक भिषण प्रकार होता. कोणत्यातरी शिक्षिकेच्या डोक्यात राखीनंतरच्या काही दिवसात हा उपक्रम यायचाच. त्यामुळे ऋषीपंचमीची फार आतुरतेने वाट पाहिली जायची.आता त्याचं कसं असतंय, क्रश वगैरे शब्द तेंव्हा माहिती नव्हते, पण असायचा एखादा गोजिरवाणा चेहरा वर्गात! जिच्याबद्दल भविष्य माहिती नसलं तरी वर्तमानातच राखी बांधून घेण्याचा अजिबात विचार नसायचा.

मग एके दिवशी वर्गात "ती" घोषणा व्हायची. काही पोरं गोंधळाचा फायदा घेऊन वर्गातून निसटायचा प्रयत्न करायची. आम्हाला ते पण जमत नव्हतं. कारण कोणीतरी फितुरी केली तर उद्या वर्गात सगळ्यांसमोर (आणि तिच्यासमोरसुद्धा) आपला उद्धार होण्याची शक्यता जास्त!! आणि का कोण जाणे माझ्या पत्रिकेत असे उद्धाराचे प्रसंग फार ठासून भरले आहेत! (पता नही ऐसी सिच्युएशनमे मैं आटोमॅटिक आगे कैसे आ जाता हू टाईप!) 

मग सगळे बकरे कुर्बानी द्यायला लायनीत उभे राहायचे.आणि समोर बकऱ्या! 

पहिली  मुलगी पहिल्या मुलाच्या हाताला राखी बांधेल, दुसरी मुलगी दुसऱ्या मुलाच्या हाताला असा क्रम असायचा. मला ह्याच्यात मेजर ऑब्जेक्शन होतं. अरे कमीत कमी ह्याच्यात तरी चॉईस द्या ना! ही काय जबरदस्ती? लोकशाही आहे ना देशात? ती काय फक्त नागरिकशास्त्रात शिकवण्यासाठीच का? आपापसात ठरवून घ्या बा बांधून तुम्ही असं म्हणायला काय जातं?

पण नाही.. तिथपण शिस्त त्येजायला..

मग ती कोणत्या नंबरवर उभी आहे त्यावरून आपला नंबर ठरवायची एक कसरत सुरू व्हायची. पण तिचे दिवाने दोन-चार तरी असायचेच ना. सगळ्यांच आपापले नंबर बदलले की परत गोंधळ. आणि वर सांगितल्याप्रमाणे, "पता नही ऐसी सिच्युएशनमें मैं आटोमॅटिक आगे कैसें आ जाता हू!"

शेवटी जे घडू नये तेच घडायचं!

हिंदू संस्कृती,सणवार,रितीरिवाज ह्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे.

पण जर हिंदूंची संख्या वाढवायची असेल तर शाळेत ह्या असल्या धंद्यांना चालना देऊन ती कशी वाढेल??

--एक संतप्त सवाल

--चिनार