Wednesday 13 January 2021

AI आणि मी

फेसबुक आपल्यावर लक्ष ठेवतंय, व्हॉट्स ऍप आता आपला डेटा स्टोअर करणार, मग आपल्या इंटरेस्टनुसार आपल्यावर जाहिरातींचा भडिमार होणार... हे सगळं ठीक आहे.

पण,

एखाद्या वेबसाईटवरून एखादा शर्ट घेतल्यावर परत परत तोच शर्ट समोर दिसावा ही आर्टीफिशियल इंटिलीजन्सची कोणती पातळी म्हणावी? कोण बसलंय तिथं प्रोजेक्टरच्या मागे? अरे वांग्या, बायकोसाठी एखादी साडी किंवा कुर्ता घेतल्यावर महिन्याभराने परत तीच साडी किंवा कुर्ता घेतला तर त्याचे परिणाम कळतात का तूला? त्या झुक्याला म्हणा, स्वतः च्या बायकोसोबत असं करून दाखव एकदा! मला सांगतोय..!

पुरुष मूर्ख असतात पण इतके नाहीत रे. काहीतरी व्हेरायटी दाखव लेका! निदान त्या फोटोतली बाई तरी बदल. एखाद्यावेळी त्याला भुलून परत तीच साडी घेऊ आम्ही. नाहीतर निदान नेत्रसुख तरी मिळेल. 

बरं ते 'स्टॉप सीईंग धिस ऍड' केलं तर गूगल आपल्यालाच विचारतंय ऑलरेडी पर्चेस्ड का म्हणून!! रताळ्या, तूच बिल पाठवलंस ना मेलवर? गूगल पे वापरलं तर वीस रुपये कॅशबॅक हे गाजर पण तूच दाखवलं ना? 

आणि हे म्हणे इंटेलिजंट!!

क्या इंटेलिजंट बनेगा रे तू ?

मला तर त्या ओला,उबेर अन झोमॅटोच्या जाहिराती सुद्धा कळत नाहीत. महिन्यातून जास्तीत जास्त एकदा मी ओलाकॅब वापरतो ही माहिती तर ओलाच्या त्या डेटाबेस का काय म्हणतात त्यात असेल ना! मग ट्वेन्टी परसेन्ट डिस्काउंटवाले मॅसेज दिवसातून चारवेळा मला पाठवण्यात काय हशील? ओला डिस्काउंट देतंय म्हणून कोणी गावभर भटकतं का? म्हणजे असे पण लोकं आहेत का जगात? असतील तर, कौन हैं ये लोग? कहा से आते है ये लोग? 

एकदा पनीर टिक्का खाल्ल्यावर दुसऱ्यादिवशी परत पनीर कोण खातं? मग बेस्ट पनीर इन दी टाऊन वालं नोटिफिकेशन आज कश्यासाठी? आणि हे जर बेष्ट होतं तर काल का नाही खाऊ घातलंस रे झोमाट्या? की एकदा ह्या जोश्याच्या नरड्यात रबरासारखं पनीर कोंबल्याशिवाय हा काही सुधारणार नाही अशी काही सुपारी घेतलीये ह्यांनी?

रेड बस ह्या ऍपवरून समजा उद्याचं तिकीट बुक केलं तर बसमध्ये बसेपर्यंत दर एक तासाने रिमायन्डर येते. 'हॅव यु पॅक्ड युअर बॅग्स. डोन्ट फरगेट टू टेक वॉटर' असे मॅसेजेस येतात. अरे तुला काय करायचंय सोन्या? नसत्या चौकश्या! बरं समजा 'नो' असा रिप्लाय केला तर तू काय घरी येणार आहेस का कपड्यांच्या घड्या घालून द्यायला?

ही अजिबात अतिशयोक्ती नाहीये. याहून कहर म्हणजे 'चॅट विथ युअर को-पॅसेंजर' असे मॅसेजसुद्धा येतात. त्यात एक लिंक दिलेली असते. आयुष्यात कधीच न भेटलेल्या आणि परत कधीच भेटण्याची शक्यता नसलेल्या माणसाशी नेमक्या कोणत्या विषयावर बोलणं अपेक्षित आहे? "बाबा रे मी डब्ब्यात थालीपीठ घेतलंय. तू मेतकूट- भात घेऊन ये बरं का", हे बोलायचं का? मला एवढंच सुचू शकतं.बरं एखादी 'सुबक ठेंगणी' असती तर बोललोही असतो पण ती जमात आजकाल नामशेष झालीये. 

असो. तर हे सगळं कस्टमरबेस मजबूत करण्यासाठी असतं असं कळलंय. 

आता एखाद्या कस्टमरने ऑनलाइन मजबूत बत्ता मागवून स्वतः चा मोबाईल भुगा होईपर्यंत कुटला नाही म्हणजे मिळवलं!


समाप्त


©चिनार शशिकांत जोशी

No comments:

Post a Comment