Sunday, 21 May 2017

इमान...भाग ३

झालं ना !! गब्ब्या फ्यामिलीले घेऊन इमानात जाणार हे गोष्ट साऱ्या गावात पसरली. गब्ब्याले येताजाता लोकं प्रश्न इचारू लागले, सल्ले देऊ लागले.

ज्याइची आजलोकची जिंदगी फाट्यावर येष्टीची वाट पायन्यात गेली ते लोकं गब्ब्याले शानपनाच्या गोष्टी सांगू लागले.

"तुले सांगतो गब्ब्या..म्या वाचलं हायं पेपरात...इमानाची इस्पीड बघायची असंन तं त्याले जास्त उंच नेऊन उपेग न्हाय..त्वां पायलेटले सांगून इमान खालीच ठेवजो जरा...अन मंग पाय कसं पयते इमान बुंगाट!!!"

"काही सांगतं का बे..थो पायलेट का आपल्या गावचा हायं का गब्ब्या सांगन ते ऐकायले?? तू गप्प रायजो गब्ब्या."

"गब्ब्या लेका..त्या ऐरहोष्टेश लय कंचा रायते म्हन्तेत. अन आपुन जे सांगू ते त्याईले कराचं लागते म्हन्ते. मजा हायं लेका तुयी."

"अबे सायच्या तमाशा हायं का तो आपुन सांगू ते ऐकायला?? कोन सांगते बे तुमाले हे? आनसान का गब्ब्याच्या घरावर गोटे?"

"गब्ब्या त्वां खिडकीजवळची शिट आदीच शितून घेजो गपकन. तिथूनच लय मजा दिसते."

"अबे येष्टी व्हय का बे ते मजा दिसाले. तुमाले अक्कलच नाही लेका थोडीबी. गब्ब्या तू साईडलेच बसजो. म्हंजे ते ऐरहोष्टेश तुले खेटून जाइन एखांद्यावेळी. तेव्हढीच मजा तुले."

"गब्ब्या त्वां काहीपन कर लेका, पन आपल्याला थोडी दारू घेऊन ये  एरपोर्टवरून. तिथं येक नंबर माल असते म्हने."

"अबे पैसे लागते ना बे दारूले." 

"अबे माया मामा गेलंता इमानात. तो सांगे,एकदा का इमानात चढलं की सारं फुकट रायते म्हने. जवळ येऊ येऊ  चॉकलेटं वाटते म्हने. आपन मांगतली तं दारू बी भेटते उलशीक."

 "अबे दारूगिरु भेटनं ते बराबर हायं, पन हा गब्ब्या चाल्ला त्येच्या बायकोले घेऊन! त्याले दारूच्या गुत्त्यावर तं येऊ देत नाही गावात. इमानात कायची दारू पिते गब्ब्या??"

 "हा लेका गब्ब्या..हे बराबर हायं..तुयी बायको करनं रंगाचा बेरंग!!"

"अबे काही होत नाही बेरंग..गब्ब्या त्वां शिटा घेताना बायकोले अन राम्याला पुढची शिट घेजो अन तू घेजो मागची. मंग मजा हायं तुयी. पन थोडं सेटिंग करा लागन तुले."

येक म्हातारा तिथं बसून या फकाल्या ऐकत व्हता. म्हाताऱ्यांनं दुसरं महायुद्ध अन पंच्यात्तरची आनिबानी सारं पाहयेल होतं. त्याचे फंडे अजून वेगळेच होते.
"पोट्टेहो..आता तुमाले सारी मजाक वाटू लागली. पन आम्ही भोगेल हायं या इमानाचे पर्रताप. हे अशे इमानं जायचे डोस्क्यावरून बॉम्ब फेकत वावरात. किती लोकं मेले असतीन त्याची गंती नाही लेकहो. आमी दिवेगीवे बंद करून राहायचो रात्रीचे. दिवा पाहून बॉम्ब फेकला तं कोनाले सांगतां?? अन आता तुमी मजा मारा सायचेहो इमानात बसून."

"आम्ही न्हाय ना बावाजी! हा गब्ब्या चालला इमानात. तुमीच समजवा बा त्याले आता."

गब्ब्या तीतून कवाचाच सटकला व्हता.   गब्ब्या तीतून कवाचाच सटकला व्हता. गब्ब्या वान्याच्या दुकानावर किराना घ्यायले थांबला.
"या गब्ब्यासेठ. हे तुमची लिष्ट रेडीचं करून ठेवली. हे घ्या बा."

गब्ब्यानं सामान चेक केलं. सामानाच्या पिशवीत बिल पाहून तो सटकला.
"हे बिल कायले दिलं राजेहो. वहीत लिहून घ्या ना आपल्या नावानं."

"काय बोलता गब्ब्यासेठ!! मी मनलं बा आता तुमी इमानात फिरनारे मांनसं!! तुमी काय आता उधारीत सामान घ्यान का? मांगची उधारी बी लिहून देली हायं त्येच्यात."

"काही बोलता का राजेहो. इथं इमानाचं तिकिट काढून आधीच फाटेल हायं मायी. अन आता हे कुटून देऊ?"

"याले काय अर्थ हायं बे गब्ब्या. मले वाटलं येकतरी गिर्हाईक भेटलं बिनाउधारीचं. इमानात बसूनही सुधारणार नाही सायचेहो तुमी."
 
हे इमान प्रकरण लयच अंगाशी आलं व्हतं त्येच्या. गब्ब्या घरी पोहोचला तं चार-पाच बायका त्येच्या बायकोले घेरून बसल्या व्हत्या.

"हे पाय सरे..ते इमान सुरु होताना लय भेव लागते म्हने. तू उलसाक अंगारा लावून घेजो तुया अन राम्याच्या डोक्याले. अन येक माळ ठेवजो हातात गजाननबाबाचा जप कराले."

"आव माय..ते तिथं साऱ्यासमोर जप करत बशींन तं लोकं म्याट समजतीन तिले. कायबी सांगते का?"

"समजू दे ना म्याट. ते पोरगं घाबरलं म्हंजे?"

"मी म्हन्ते कायले इशाची परीक्षा पाह्यची? आधीच देवीचा गोंधळ घाल ना घरात!!"

"काय तुमी म्हाताऱ्या अंगारे गोंधळाच्या गोष्टी करता निस्त्या. ते पाय ना आपली माय पहिल्यांडाव इमानात बसणार हायं ना. तुमच्या खानदानात बसलं होत काय कोनी? तिले मस्त नटून पाठवू आपण इथून. त्या ऐरहोष्टेश झ्यक मारतींन साऱ्या."

"आता हे काय काढलं त्वां नवीन?"

"मंग काय..सरे त्वां कोणती साडी नसणार हायं ते ठरवलं काय?"

"न्हाय ना अजून."

"म्या सान्गते तुले. तुया साऱ्या जुन्या साड्याईले दे टाकून. नवीन नव्वार घेऊन माग गब्ब्याभाऊले."

"म्याट झाली काय तू?"

"तू ऐक माय..तुले मस्त तयार करून पाठवते का नाही बघ नव्या नवरीसारखं!!"

गब्ब्या वसरीवर बसून सारं ऐकून रायला व्हता. त्यानं डोस्क्यावर हात मारला. आता त्यालेही डाउट आला व्हता.

"हे नव्या नवरीचं लचांड पाहून घेतीन का आपल्याले इमानात?"   


क्रमश:

Saturday, 20 May 2017

इमान....भाग २

इकडं गब्ब्यांन पैश्याची जुळवाजुळव सुरु केलती. इमानात बसाची त्याची लय इच्छा व्हती. त्यानं बायकोला न सांगता गावच्या बँकेत एक खातं ओपन केलंत. जमनं तसे पैसे टाकत जाय तो त्याच्यात. गब्ब्यांन गपचिप जाऊन पैसे काढून आनले. अन तिकडं बबन्यानं तिकीटाची जुगाडबाजी चालू केली. बबन्या एक नंबरचा फकाल्या मानुस. त्येच्या पोटात काही रायते का? अन तसपनं खेड्यात कोनती गोष्ट लपून रायते ? येक दिवस बबन्यानं गब्ब्याच्या हातात तिकीट टिकवलं...
"घे बे सायच्या.जमवला तुया जुगाड"
"काय सांगतं? येक नंबर काम झालं ना हे. कसं जमवलं बे?"
हे बोलता बोलता गब्ब्यांन तिकीटाची रक्कम पाह्यली. चार हजार तीनशे बावन्न !!
"का बे सायच्या येवढी महाग तिकीट? त्वां तं तीन हजार सांगतले होते."
"अबे तं पेट्रोलचे पैसे तुया बाप भरनं का? फ्युएलचे वेगळे पैसे लागतेत."
"याले काय अर्थ आहे बे? तेराशेचं पेट्रोल लेका!! अन सारे पैसे मायाकडूनच घेतीन का? बाकीचेबी असतीन ना इमानात?"
"साऱ्याकडनं घेते पैसे. लय पेट्रोल लागते इमानात."
"सबसिडी-गिबसिडी देत न्हाय का सरकार त्याईले."
"अबे तुले इमानात जायचं हाय तं सरकार कायले सबसिडी देईन बे? कमाल हाये लेका तुयी..तुमचा बस चालला तं मयताच्या लाकडावरबी सबसिडी मागानं तुम्ही."
"बरं जौदे.बाकीचे पैसे तं दे वापस."
"हे घे. तालुक्याला जाऊन काडली तिकीट. माया जान्यायेन्याचे अन नास्त्याचे पैसे कापले हाय त्यातून."
"बरं..कोणाला काय बोलला न्हाय ना तू."
"न्हाय बा..बसच्या कंडक्टरले दाखवली फक्त तिकिट. त्याईले म्हणलं अशी छापाले पाह्यजे तिकीट नायतर तुमी देता चिटोरे आमच्या हातात. बम्म चिडला तो."
"त्याले कायले सांगतलं बे? आता साऱ्यायले माह्यती पडनं "
"न्हाय सांगत थो. आमचं भांडणं सोडवायले दोन-चार लोकं आलते बसमधले. मंग चूप बसला तो."
"म्हणजे त्याईले बी कळलं!!"
"अबे न्हाय ना मालूम पडत कोनाले. ते काह्यले सांगतीनं? बरं मी जातो आता."
गब्ब्यांन तिकीट गुपचूप आपल्या खिशात ठेवलं. आता त्याले बायकोले माहेरी पाठवायचं होतं. पन त्याला येक गोष्ट माहिती नव्हती. त्येच्या हातात तिकीट पडायच्या आधी त्येच्या बायकोले सगळं कळलं होतं. गब्ब्या तिला म्हनंला,
"राम्याले सुट्टी लागली हाय तर आठ दिवस जाऊन ये तू माहेरी."
"अन तुमी काय करानं इथं एकटे."
"म्या करनं काहीतरी. तू नको लोड घेऊ. तुले बसवून देतो परवा येष्टीतं."
"पन अप्पा म्हणत होते."
"काय?"
"ते म्हने बाळापूरले इमान उतरायची यवस्था न्हाय अजून. पूडल्या वर्षी या म्हने. म्हणजे जावईबापू मुमैले जाताजाता सोडतीनं तुले इथं."
गब्ब्या हादरला.
"काय..कायचं इमान? भंजाळला का तुया बुडा?"
"अप्पांना काय म्हनाचं न्हाय सांगून ठेवते!! मले बाळापूरले पाठवून सौत्ता इमानात बसता काय? पायतेच मी आता कसे बसता ते."
"म्या नाही चाल्लो इमानात. तुले कोनी सांगतलं"?
"मले सारं मालूम हाय."
"हे पाय..तू..."
"काय बोलू नका आता?"
"बरं नाही जात बा मी इमानात. चुकलं ना मायं?"
"ते मले नाही मालूम."
"आता नाय जात म्हन्लो ना?"
"असे कसे जात न्हाय..आता मले बी याच हाय इमानात. मायं अन राम्याचं बी तिकिट काढा."
"पागल झाली काय तू,येष्टीचं तिकिट हाय का ते? लय महाग असते ते."
"ते मले नका सांगू? मायाशिवाय जाऊन त्या येरहोष्टेश संग जांगडबुत्ता जमवायचा होता ना तुमाले!! पाह्यतेचं मी आता."
"अव नाही वं माय. आत्ता मी येकला जाणार होतो. मंग पुढच्या वर्षी तुमाले नेणार होतो. सारं काही यवस्थित असते का नाही पहा लागन का न्हाय आधी जाऊन?"
"बाप्पा बाप्पा...तुमी सांगितल्यावर जशे शिटागिटा नवीनच लावणार हायेत ते इमानात!! अन आपल्याकड पैश्याच झाडं लावेल हाय पर्त्येकवर्षी इमानात बसाले!"
"तू ऐक ना माय येकडावं."
"मले नका सांगू. आता मले इमानात बसाच हाय म्हंजे हाय!"
"बरं..करतो कायतरी जुगाड."
गब्ब्यानं बबन्याला आनखी २ तिकिटं काढाले सांगीतले. बबन्या दोन-तीन दिवसांनी येऊन गब्ब्याले म्हनला,
"गब्ब्या लेका, तिकीट तर मिळून जाइन पन आता भाव वाढला म्हन्ते तो."
"भाव वाढला?"
"हाव लेका."
"असं कसं बे?"
"ते इमानाचं तसंच असते म्हन्ते."
"अबे ते काय तुरीची डाळ व्हय का भाव कमीजास्त व्हायले? काही सांगतं का लेका?"
"मले काय मालूम बे..आता एका तिकिटाचे सहा हजार पडतीन."
"सहा हजार?? काही का बे? तो तुया एजेंट मले झोलर वाटू लागला."
"नाही ना बे..म्या अजून एकाले विचारलं ना..तो पन तेच म्हने."
"आता तिकीट तं काढाच लागीन. बायको काही ऐकेना."
"मंग आता बे?"
"देतो तुले पैसे थोड्या वेळात."
"बरं"
"पन हे काय पटलं न्हाय भाऊ. आपन त्या इमानवाल्याले एवढा धंदा देऊ राहिलो तं थो असा करते लेका."
"कायचा धंदा बे?..तुया भरोश्यावर बसला हाय का तो? तू न्हाय काढलं तं दुसरं कोनी काढनं तिकीट."
"आपली येष्टी बरी लेका ह्यापेक्षा.तिकीट कधीबी काढा. तेव्हढंच ऱ्हायते."
"मंग जातं का येष्टीनं?"
"मायी बायको येष्टीच्या खिडकीतून खाली फेकंन मले आता. तू जाय तिकीट काढ."
"काढतो. पन मले येक डाउट हाय लेका."
"काय?"
"तू एकटा व्हता तवा ठीक व्हतं. हे तुय लचांड पाहून घेतीन का तुले इमानात?"
"तू जाय ना बे. तिकीट काढ. मी पायतो."

क्रमश:

Thursday, 18 May 2017

इमान... भाग १


"आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या."
डोस्क्यावरून उडणाऱ्या इमानाकडं पाहत गब्ब्या म्हनाला.

"येडा झाला का बे तू..तुले कोन घीन का इमानात?"

"काऊन? तिकीट काडल्यावर तं घ्याच लागीन नं त्याईले."

"असं नाय घेत बे कोनाले. इंग्लिश लोकं असतेत तिथं."

"म्हंजे?? अन तुले काय म्हायती बे?? तिकिट काडून यष्टयीत बसतो तसं इमानात बसाचं."

"यष्टयीसारखं नसते बे..यष्टयीत नीरा कोंबतेत लोकाईले..हा त्याच्या उरावर..थो दुसऱ्याच्या मांडीत..तीन शिटावर सहा-सहा लोकं बसतेत. इमानात जेवढ्या शिटा तेव्हढेच माणसं असते. म्हणून तर आपल्यासारख्याले घेत नाही आतमध्ये. तुम्ही सायचेहो ड्रायव्हरच्या शीटवर बी रुमाल टाकानं."

 "ते मले माहिती आहे ना बे. मी काय म्हंतो, बा तिकीट काडून जर शिस्तीत मी माया जागेवर बसाले तयार असंनं तं काऊन घेनार नाय मले आतमदे."

"आबे नुसतं तिकीटाची गोष्ट नसते ना. त्याईले स्टॅंडर्ड लोकं पाह्यजे. तू जाशींनं भयाडसारखा पैजाम्यात."

" अन का बे ते सिनेमात चड्डी घालून सारे इमानात बसताना दाखवते. ते कसं चालते?"

"चड्डी नाय बे. बर्मुडा म्हन्ते त्याले. बर्मुड्यात ष्टाईलीश वाटते म्हनून चालते."

"पँट-शर्ट घालून जातो नं बा! मंग तं झालं?"

"अन सामान कायच्यात नेशींनं? तुया फाटक्या गोधडीत?"

"बॅग हाय ना मायाकडे. बटन तुटलं हाय त्याचं. घेतो दुरुस्त करून. न्हायतर गुंडाळतो त्याले सुतळी."

"हे पाय आता कसं बोल्ला. हे अशे सुतळी गुंडाळायचे गावरान धंदे करता तुमी. चांगली महागाची बॅग घ्या लागते. त्याले चाकं असते खालून. अन वरतून ओढायले खटका देल्ला असते. तू नेशींनं बॅग डोक्यावर ठेऊन तिथं साऱ्यासमोर."

"अबे पन मायी बॅग,माये कपडे,मायं सामान मी नेतो नं माया हिशोबानं!! मी डोक्यावर नेईन न्ह्यतर बैलगाडीत टाकून नेईन. प्रत्येक गोष्टीत कायचं स्टॅंडर्ड आलं बे??"

"तुया हिशोबानं म्हंजे?? हे पाय प्रत्येक ठिकाणचा हिशोब वेगळा असते. तसंच करा लागते राजा.आता तुले माहिती हाय का? सामानाचं वजन बी ठरवलं असते इमानात. त्येच्यापेक्षा जास्त नेऊ देत नाही."

"असं बी असते का?"

"मंग! तू जाशींनं साऱ्या गावाचे बोचके-बाचके घेऊन. अन ते सामान तुले काउंटरवर जमा करा लागते. मंग मुक्कामावर पोचलं की भेटते तुले वापस."

"अन नाही भेटलं म्हंजे?"

"अबे चिट्ठीवर लिहिलं असते ना किती सामान हाय ते. सगळं येते बरोबर. अन ते एका पट्ट्यावर सोडते सारं सामान. आपल्याले उचला लागते त्याच्यावरून."

"अन माय सामान कोनी मायाआधीच उचलून नेलं म्हंजे?"

"असा कोनता खजिना घेऊन चाल्ला बावा तू? अन तुये पैजामे चोरन्यातं कोनाले इंट्रेष्ट असंनं?? अन समज चोरले तं पोलीस असते तिथं. त्याईले सांगजो."

"ते पन बराबर हाय म्हना. पन भुरटे सगळीकडेच असते ना बे! बरं पैशेगिशे कुठे ठेव्हाचें? ते पन जमा करा लागते काय?"

"हाव..तिथं दानपेटी ठेवली असते त्याईनी! मंग ते येरहोष्टेश म्हन्ते द्या बा तुमच्या हिशोबानं! येडा झाला का बे तू? पैशे सोबतच ठेव्हाचें."

"अन पुडी? चालते का आतमध्ये?"

"कायची?"

"गायछापची पुडी बे."

"पुडी चालन पन खाऊ नको बावा आतमध्ये."

"काऊन?"

"काऊन म्हंजे? नाही चालत आतमध्ये. आदी गायछाप खाशीनं मंग बिडी बी लागनं तुले."

"बरं नाही खात बा. म्या सगळं व्यवस्थित शिकून घेतो ना आधी. पन आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या."

"अन खर्च कुटून करशीन बे? तुय सामान-सुमान,नवीन बॅग,तिकीट, अन नागपूरले जा लागन इथून तो खर्च वेगळा,बरं वापस या लागनं मुमैवरून. सगळं मिळून धा हजार तं कुठंच नाय गेले गड्या. "

"ते जमवतो मी कुटून बी. तू फक्त तिकिटाचा जुगाड दे जमवून."

"बायकोला बी घेऊन जातं काय सोबत?"

"पागल झाला काय? तिले कायले सोबत नेऊ?"

"मले वाटलं जोडीबिडीनं जाचं असंनं तुले."
"नाय बे? तिले सोबत घेतलं तं पोट्ट्यालें पन न्या लागन. एवढा लचांड घेऊन कुठं जातं?"

"पन सांगशीन काय तिले?"

"तिले का सांगाच. तिले देतो बापाकडं पाठवून चार-आठ दिवस. अन मंग जातो मी इमानात. तू काय सांगू नको फक्त हे कोनाले."

"म्या कायले सांगतो बावा.पन मले येक डाउट हाय राजा."

"काय बे?"

"तुले घेतीन का इमानात?"

"आता काऊन बे? सोयरा बनून जाईन ना मी."

"अबे पन थोबाडावरूनच भैताड दिसतं ना तू? त्याचं काय करशीन?"

"तू जाय बे तिकिटाचा जमवं सायच्या. मी पायतो काय कराच ते."

क्रमश:



Tuesday, 9 May 2017

राजकारण आणि We...The People!

"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!” माझा कलीग तणतणत म्हणाला.

कंपनीच्या मेलबॉक्सवर येणाऱ्या असंख्य बिनकामांच्या मेलपैकी एक मेल आमच्या मॅनेजरने त्याला पाठवला नाही ह्यावरून तो चिडला होता. खरं म्हणजे त्या ईमेलचा माझ्याशीच काय तर आमच्या अक्ख्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. मॅनेजरला FYI म्हणून आलेला ईमेल त्याने पुढे पाठवण्याची तशी काही गरज नसते. पण मेल पाठवणं हा मॅनेजरलोकांचा आवडता उद्योग असतो.तेव्हढंच रिकाम्या हाताला काम मिळतं बाकी काही नाही!! पण मेल नं पाठवण्यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण? हा प्रश्न मला पडला होता.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर ज्यांना आपल्यासोबत राजकरण खेळलं जातंय हे सुद्धा कळत नाही अश्या जनसमुदायाचा मी प्रतिनिधी आहे. पण सुदैवाने माझ्या आसपास राजकीय तज्ञांचा सतत राबता असतो. कंपनीतल्या AC चं तापमान कमीजास्त करण्यामागेही कसं राजकारण केलं जातंय इथपासून ते ट्रम्प एकाचवेळी पुतीन,थेरेसा मे आणि अँजेला मर्केल यांना कसं खेळवतोय इथपर्यंत गोष्टींचं राजकीय विश्लेषण माझ्या आसपास सतत सुरु असतं.(शिवाय या सगळ्याला शेवटी मोदीचं कसे जबाबदार आहे हे सांगायला दुसरा गटही त्याच ताकदीने प्रयत्नशील असतो!) त्यात मी राजकारणापासून अलिप्त असल्याबद्दल माझाही येताजाता उद्धार केला जातोच.आता राजकारण हा शब्दच मुळी भारदस्त! म्हणूनच लहान असल्यापासून मी त्यापासून दोन हात लांब राहणंच पसंत केलं. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, "राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली घसरते आहे."आता ही पातळी आजोबा मोजतात तरी कशी हा प्रश्न मला तेंव्हा पडायचा. पण जसं जसं वय वाढत गेलं तशी तशी ती पातळी आणखीनंच घसरली असावी. त्यामुळे ती दिसण्याचा आणि मोजण्याचा संबंध आला नाही. आणि मी त्यापासून अलिप्त होत गेलो. पण सतत कानावर पडणाऱ्या ह्या राजकीय विश्लेषणापासून मी स्वतःला वाचवू शकलो नाही. आता ही परवाचीच ईमेलची गोष्ट,

"अरे विसरला असेल तो तुला पाठवायला",मी समजवण्याच्या सुरात म्हणालो.
"विसरला वगैरे काही नाही..मोठ्या गेम असतात ह्यामागे. तुला नाही कळणार!"
तो अगदी ह्यामागे लाहोर कॉन्स्पिरसी सारखं काहीतरी आहे ह्या थाटात बोलत होता.
"कसला गेम रे?"
"अरे तो मुद्दाम मला मेल पाठवत नाही. आणि मग चारचौघात मला ह्या मेलसंदर्भात काहीतरी विचारतो. मग मला कसं काहीच माहिती नसतं असं सगळ्यांना दाखवतो."
हा मोठा गेम!!! अरे पण जेंव्हा पाठवलेल्या मेलसंदर्भातही तुला काही माहिती नसतं तेंव्हा तुझा धर्म कुठे जातो राधासुता?? हा प्रश्न मी ओठावर यायच्या आधीच गिळला. कारण राधासूत म्हणजे कोण हे त्याला कळणार नव्हतंच. उगाच आमच्या ऑफिसमधल्या राधेशी मॅनेजरचं 'सूत' जुळलंय असं त्याला वाटायचं आणि त्याने मॅनेजरचा 'गेम' करायचा.  

म्हणजे राजकारणाचा छंद जडलाय आपल्याला. कुठे खुट्ट काही वाजलं की 'ते बघ राजकारण!' असं चाललंय. त्यामानाने  हे इमेल  प्रकरण  फारच किरकोळ म्हणावं लागेल. आजकाल एखादा शब्द बोलायचीच देर की लगेच आपली वर्गवारी ठरवली जाते. सध्या भारतवर्षात उजवे,डावे आणि 'तिरपे' असे तीनच वर्ग उपलब्ध आहेत. पूर्वी उजव्या आणि डाव्यांमध्ये 'त्यातल्या त्यात सरळ' असा एक वर्ग होता. तो तिरप्यांनी नामशेष केलाय. बराच काळ  उजवे आणि डावे,"मेरे मुर्गे की एकही टांग" या हटवादाने आपापल्या कोंबड्या आणि पिलावळ सांभाळून होते. पण समजा कोंबडी एखाद्यावेळी दोन पायांवर चालली तर 'सरळ' लोकांची काही हरकत नसायची. आता तिरप्यांना हे मान्य नाही. जरा कोंबडीची बाजू घेतली की लगेच "१२७४ साली तुम्हीच कोंबड्यांना विरोध केला होता ना?? आता का त्यांचा पुळका येतोय  तुम्हाला?" असा प्रश्न येतो. (त्याचवेळी एका हातात कोंबडीची तंगडी आणि दुसऱ्या हातात "भिजवलेल्या द्राक्षांचा रस" असतो हा भाग वेगळा !) एकवेळ उजवे-डावे परवडले पण तिरपे नको अश्या मतापर्यंत मी येऊन पोहोचलोय. या तिरप्यांनी  प्रत्येक क्षेत्रात 'जे दिसेल त्याला विरोध करा रे' संघटना उभारल्या आहेत.

आता साधी गोष्ट, महेंद्रसिंग धोनीने कप्तानपद सोडल्यावर त्याच्या गौरवार्थ मी काहीतरी लिहिलं. (मी "काहीतरीच" लिहितो याबद्दल दुमत नाही!). त्यावर प्रतिक्रिया काय यावी??
"आमच्या युवराजसोबत राजकारण खेळलाय तुमचा धोनी!! त्यावेळी नाही लिहिलंत काही??"

म्हणजे एखादा धोनीचा चाहता आहे ह्याचाच अर्थ तो युवराज,गंभीर,सेहवाग इतकंच काय तर गेला बाजार गगन खोडाच्यासुद्धा जीवावर उठलाय!! एखाद्याने मोदींना मत दिलंय म्हणून त्याने पतंजलीचं तेल अंगाला चोपडून रोज शीर्षासन करतंच कंपनीत आलं पाहिजे!! एखाद्याने साहेबांना 'जीवेत शरद शतमं' म्हटलंय म्हणजेच त्याचे सात- बारे कोरे असलेच पाहिजे!! एखाद्याने अण्णांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण केले होते म्हणजे आज त्याने समस्त दिल्लीकरांची माफी मागितलीच पाहिजे!!

आता याहूनही साधं उदाहरण घेऊ...समजा आपल्या शेजारच्याने डोळ्यादेखत कचरा रस्त्यावर फेकला. आणि तुम्ही त्याविषयी त्याला काही बोलला...तर त्याच्या उजव्या-डाव्या विचारसरणीनुसार खालील प्रतिक्रिया येतील.
उजवा:-"साठ वर्ष देश कचऱ्यात गेला होता तेंव्हा काय करत होता तुम्ही? आता दोन दिवसात सगळं चकचकीत हवंय नाही का??"
डावा:- "सांगा की तुमच्या मोदीला उचलायला.स्वच्छ भारताच्या पोकळ घोषणा नुसत्या!!"
हे ऐकून तुम्ही स्वतः कचरा उचलायला गेलात की तिरप्यांची कमेंट येते.
"गुलामगिरीची सवय झालीये तुम्हाला बाकी काही नाही. आधी इंग्रजांची केली आता ह्यांची करा.हागणदारी मुक्त अभियानाला तुमच्या आजोबांनीच विरोध केला होता आठवतंय का??"

अरे जगू द्या रे आम्हाला!!

तिरप्यांच्या मते, समस्त भारतीय नागरिकांनी आपापले कामधंदे बाजूला ठेऊन रोजच्या घडामोडींवर काहीतरी भूमिका घेतलीच पाहिजे. (घडामोडी हा शब्द घडा"मोदी" असा वाचला तरी चालेल!)आणि घेतलेली भूमिका ही  पाच हजार वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांच्या भूमिकेशी सुसंगत असायलाच हवी. उदाहरणार्थ कोणीतरी कन्हैय्या नावाचं पोरगं जर 'पाकिस्तानशी युद्ध नको मैत्री हवी' असं म्हणत असेल. आणि ह्या विधानाला तुमचा मुकविरोध असेल. थोडक्यात "ते येडंय" म्हणून तुम्ही दुर्लक्ष केलं असेल. तर महाभारतात कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीयांशी युद्ध करण्यास नकार देणारा  अर्जुन तुम्हाला कसा चालतो  ह्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं. आणि त्या अर्जुनाला धर्मयुद्धासाठी तयार करणारा कन्हैय्या तुम्हाला देव म्हणून कसा चालतो ह्याचही उत्तर हवं.

अहो पाकिस्तानशी युद्धवगैरे तर फार मोठ्या गोष्टी झाल्या, पण बाहुबलीमध्ये हिंदुत्वाचं कसं उद्दात्तीकरण केलंय ह्यावरही तुमचं मत असलंच पाहिजे. आता चारशे रुपये तिकीट काढून गेलेला एखादा प्रेक्षक त्या देवसेनेला बघणार की हिंदुत्वाची भाषणं ठोकणार? त्यात जर एखाद्याला बाहुबली आवडला असेल तर तो कट्टर हिंदुत्ववादी!,आवडला नसेल तर तो देशद्रोही!! आणि एखाद्याने जर बाहुबली पाहिलाच नसेल तर तो अखिल मानवतावाद विरोधी म्हणून गणला जाईल!! ते VFX वगैरे गेलं तेल लावत! 

असो.सगळीकडे राजकारण शोधण्याच्या आणि करण्याच्या अट्टाहासाने आपल्या जगण्यातला आनंद हरवतोय का हे बघायला हवं. आपण सामान्य आहोत म्हणून 'ते' राजकारणी आहेत. आता त्यांच्यासारखंच व्हायचं असेल तर भाग वेगळा. फक्त एक गोष्ट लक्षात असावी,
त्यांनी राजकारणाची पातळी घसरवली...आपण किमान त्याची पत घसरवू नये!!

 -- चिनार