Wednesday, 11 March 2015

पुण्यनगरी !

 पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून  चांदणी चौकात जायचे होते.
 एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा."
समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?"
ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने"
आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ?
                काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा."
हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?"
मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?”
बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!"
मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे?
प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ  नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!"
त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही !
               ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात  "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर  आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे.
"आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं.
मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या"
यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते."
उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो,         " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !"
थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो  शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल"
      पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी  शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. स्वत: चे कौतुक करताना तर कुठला थर गाठतील सांगता येत नाही. एका मावशींच्या मते, जगातल्या सर्वात उत्तम प्रतीच्या गोष्टी त्यांच्या पुणातल्या घराजवळच मिळतात. म्हणजे त्यांच्या घरासमोरच्या स्टॉलवर  मिळणाऱ्या "सकाळ" पेपर सारखा 'सकाळ' कुठेच मिळत नाही हे त्यांच्या मुखातून मी या कानांनी ऐकलं आहे ! मराठी व्याकरणाला अतिशयोक्ती अलंकाराची गरज का पडली असेल हे त्यादिवशी कळले. दुसरी म्हणजे, स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. “आम्ही फक्त अमक्या अमक्याचीच मिसळ खातो बाकी कुठेच खात नाही. मुळात दुसरीकडच्या मिसळेला आम्ही मिसळ मानतच नाही”,असे वाक्य नेहमीच ऐकायला मिळतात . त्या "अमक्या" नी मिसळेत फरसाण ऐवजी माती टाकून दिली तरी चालते. किंवा “आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे” हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल.
       काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
-- चिनार



Tuesday, 10 March 2015

एक काहीतरी……

मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !


कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय 

आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय 

शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ? 
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !

रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?
एक काहीतरी नक्कीच संपलय !!

राधा

गोकुळ नसले तरी चालेल , 
पण आयुष्यात एक राधा असावी !

एकही गोपीका नसली तर चालेल ,
पण आयुष्यात एक राधा असावी !

देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही ,
पण आयुष्यात एक राधा असावी !

पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली ,
पण प्रेम शिकवायला एक राधा असावी !

गीता ऐकायला अर्जुन आहेच ,
पण गीता स्फुरायला एक राधा असावी !

कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!

Monday, 2 March 2015

क्लिकक्लिकाट !

      नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय.
तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू "
पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे !
       वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल. आता हेच बघा ना, लग्न लागल्यावर सगळ्यांना वधु - वरांसोबत फोटो काढायचा असतो. ग्रुप फोटोसाठी आधे इधर -आधे उधर असं करून पंधराजण फोटोसाठी वधु-वराजवळ उभे राहतात. समोर मुख्य फोटोग्राफर चा कॅमेरा, घरातला एक कॅमेरा, एका नातेवाईकाने नविनच घेतलेला अत्याधुनिक कॅमेरा, दोन -तीन मोबाईल कॅमेरे असे जवळपास - कॅमेरे असतात. फोटो निघतो. सगळ्यांना अगदी भरून पावल्यासारखं होतं. फोटोसुद्धा अगदी आरशात  बघितल्यासारखा स्वच्छ येतो. फक्त एवढंच होते की फोटोतला प्रत्येकजण वेगवेगळ्या कॅमेराकडे बघत असतो ! किंवा एखाद्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस असतो. नातेवाईक, मित्र, बालगोपाळ केक भोवती जमतात. तेवढ्यात केकचे फोटो काढण्याची सूचना येते. मोठमोठे मोबाईल खिशातून बाहेर येतात. वेगवेगळ्या कोनातून केकचे फोटो निघतात. मुलगा- आई, मुलगा-बाबा, आई-बाबा, आई-बाबा-मुलगा, मुलगा-केक, आई-बाबा-मुलगा-केक अश्या शक्य असलेल्या सगळ्या जोड्यांचे फोटो निघतात. मग केक कापल्यावर आई मुलाला केक भरवताना, बाबा मुलाला केक भरवताना, आई -बाबा एकमेकांना भरवताना असे फोटो होतात. सगळ्या पाहुण्यांना अगदी अपूर्व सोहळा पाहिल्याचा आनंद होतो. इथपर्यन्त ठीक आहे पण याच्या अगदी विरोधी फोटो सुद्धा तुम्ही सोशल मेडिया वर बघितले असतीलच. रस्त्यावर अपघात होतो. बसने मोटरसायकलला धडक दिलेली असते . मोटरसायकलस्वार जखमेने विव्हळत असतो. काही लोक त्याची गाडी उचलतात, काही त्याला धीर देतात, काही त्याच्या घरी संपर्क करतात, काही नुसतेच बघ्याच्या भूमिकेत असतात.आणि काहीजण खिशातला फोन काढून त्या दृश्याचे फोटो काढतात !
      फोटो काढण्याची आणि काढून घेण्याची चढाओढ सुरु  झाली आहे. लहानपणी बगीच्यात गेल्यावर पाळण्यावर बसण्यासाठी भलीमोठी रांग असायची. तशी रांग आतासुद्धा असते. पण ती बसून झुलण्यासाठी नाही तर बसून फोटो काढण्यासाठी! बरं, एक फोटो काढून समाधान होत नाही, १५-२०  फोटो हवे असतात. मग हाती डीजीकॅम घेतलेले उत्साही नवरे किंवा बाप वेगवेगळ्या कोनातून फोटो काढतात. प्रत्येक माणसात कुठेतरी एक कलाकार दडला असतो असं म्हणतात. डीजीकॅम हातात आल्यावर बऱ्याच लोकांमध्ये 'आपल्यातला कलाकार सापडलाय' अशी भावना बळावत असावी. खरं म्हणजे फोटोग्राफी मध्ये झालेल्या तांत्रिक क्रांतीमुळे या  नवक्रांतीकारक फोटोग्राफर्सचा जन्म झालाय. आधी ३६ फोटोंची रीळ वर्षभर पुरवावी लागायची. डिजिटल कॅमेरे आल्यापासून रीळ वैगेरे भानगड उरलीच नाही. एका तासात ३६ फोटो काढायचे. त्यातले - तरी बरे येतातच !  वाट्टेल त्या गोष्टींचे फोटो काढत सुटतात. घरातल्या गॅलरीतून बाहेर उडणाऱ्या पक्षांचे फोटो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ! घरातल्या पंख्याचा फोटो. मोशन फोटोग्राफी ! कपात स्थिर झालेल्या चहाचा फोटो. स्टिल फोटोग्राफीमस्ती करणाऱ्या स्वत:च्या मुलांचा फोटो. कॅन्डीड फोटोग्राफी ! (माझ्या तीन वर्षाच्या पुतण्याचे हजाराच्या वर फोटो असतील ! माझ्या लहानपणी फोटो काढताना आमच्यासारख्या  चिल्ल्यापिल्ल्यांना दूरच ठेवायचे. एखाद्या ग्रुप फोटो मध्ये कोणाच्यातरी कडेवर किंवा खाली जमिनीवर आम्ही बसायचो. किंवा उत्साहाच्या भरात एखाद्या फोटोत कुठूनतरी कोपरयातून डोकं बाहेर काढून आपली हौस भागवून न्यायची. पूर्ण देह दिसेल असे तर फारच कमी फोटो असतील.)
      पण या सगळ्यात त्या बिचाऱ्या फोटोग्राफरचे फोटो कोणीच काढत नाही. तो स्वत: मोठ्या ऐटीने कॅमेराची किंमत, फीचर्स सगळ्यांना सांगतो. कॅमेराचा कौतुक सोहळा पार पडतो. प्रत्येकजण आपापले फोटो काढून घेतो. त्याचे फोटो काढायला कोणीच उरत नाही. (म्हणूनच मी ठरवलंय आयुष्यात कधी कॅमेरा घ्यायचा नाही. खिशातले पैसे खर्च करून लोकांचे फोटो काढण्याचे धंदे सांगितले कोणी ?) स्वत: चे फोटो काढण्यातली गोची लक्षात आल्यावर एक नवीन प्रकार उदयास आला. सेल्फी !! स्वत: चे फोटो स्वत: काढणे. सेल्फीचं तांत्रिक नाव बहुधा 'उठसूट फोटोग्राफी' असं असावं. कारण सेल्फी काढायला कुठलही कारण किंवा प्रसंग असावा लागत नाही. मनात आलं की मोबाइल हातभर लांब धरायचा आणि क्लिक ! बसमधून फिरताना, जेवतांना,व्यायाम करतांना, पुस्तक वाचतांना  सेल्फी कधीही काढता येतो. म्हणूनच  सेल्फी काढताना माणसाने कितीही लपवलं तरी फोटोत  'आपण बावळटपणा करतोय' हे भाव दिसल्याशिवाय राहत नाही. जसं फ्लॅशमूळे काही लोकांचे डोळे मिटतात तसं सेल्फी काढताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. ती चमक म्हणजेच मेंदूने पाठवलेला 'काय बावळटपणा लावलाय' असा संदेश असतो.  फोटोग्राफी ही जर कला असेल तर सेल्फी हे त्या कलेचं विडंबनचं म्हणावं लागेल.

        खरं म्हणजे कॅमेरा हा मानवी इतिहासात लागलेला एक विलक्षण शोध आहे. घडलेला एखादा प्रसंग कैद करून ठेवता येणे म्हणजे विज्ञानाची देणगीच म्हणावी लागेल. पण इथेच थोडीशी गल्लत झालीये. विज्ञानाची देणगी ही घडणारा प्रत्येक क्षण नव्हे तर 'एखादा' प्रसंग कैद करून ठेवण्यासाठी आहे.कारण घडणारे प्रसंग हे आठवणीत ठेवण्यासाठी असतात, "गॅलरीत" ठेवण्यासाठी नाही ! त्यासाठीच ईश्वराने डोळ्यांसारखा कॅमेरा निर्माण केलाय. ज्याद्वारे असंख्य क्षण स्मृतीच्या गॅलरीत साठवले जातात. आणि स्मृतीपटलावर हवे तेंव्हा बघता येतात.