Wednesday, 11 March 2015

पुण्यनगरी !

 पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून  चांदणी चौकात जायचे होते.
 एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा."
समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?"
ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने"
आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ?
                काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा."
हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?"
मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?”
बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!"
मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे?
प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ  नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!"
त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही !
               ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात  "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर  आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे.
"आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं.
मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या"
यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते."
उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो,         " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !"
थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो  शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल"
      पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी  शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. स्वत: चे कौतुक करताना तर कुठला थर गाठतील सांगता येत नाही. एका मावशींच्या मते, जगातल्या सर्वात उत्तम प्रतीच्या गोष्टी त्यांच्या पुणातल्या घराजवळच मिळतात. म्हणजे त्यांच्या घरासमोरच्या स्टॉलवर  मिळणाऱ्या "सकाळ" पेपर सारखा 'सकाळ' कुठेच मिळत नाही हे त्यांच्या मुखातून मी या कानांनी ऐकलं आहे ! मराठी व्याकरणाला अतिशयोक्ती अलंकाराची गरज का पडली असेल हे त्यादिवशी कळले. दुसरी म्हणजे, स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. “आम्ही फक्त अमक्या अमक्याचीच मिसळ खातो बाकी कुठेच खात नाही. मुळात दुसरीकडच्या मिसळेला आम्ही मिसळ मानतच नाही”,असे वाक्य नेहमीच ऐकायला मिळतात . त्या "अमक्या" नी मिसळेत फरसाण ऐवजी माती टाकून दिली तरी चालते. किंवा “आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे” हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल.
       काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
-- चिनार13 comments:

 1. Chhan...
  Pune Maaz Aawdich thikaan ..
  Itlyaa Puneri Paatya tar Majeshirach...!

  ReplyDelete
 2. मस्त जमलाय लेख. पुणे तिथे काय उणे?
  पुण्यातील लोकांच्या मानसशास्त्रावर शंभर PhDs होऊ शकतात.

  ReplyDelete
 3. उत्तम जमलाय लेख. पण पुणेरी मामा-मावशांपासून धोका संभवतो. सांभाळून राहणे !

  ReplyDelete
 4. :)

  शेतकरी आत्महत्या वरून आठवलं … मागे कोल्हापूर च्या टोल प्रश्ना संदर्भात पण कुणीतरी पुणेरी काकांनी "योजना मंजूर करून घेताना झोपला होतात काय. आता कशाला आंदोलने वगैरे करताय" असा काहीतरी शेरा मारला होता.
  मी वाचूनच सर्द झालो होतो

  ReplyDelete
  Replies
  1. :-)पुणेकरांचा काही नेम नाही हेच खरे !
   बाकी लेख वाचून अभिप्राय द्यावा

   Delete
 5. पुणे शहर आता 'कात' टाकतय, सबंध भारतातून इथे लोक येताहेत इथं एक नवीन मिक्स संस्कृती निर्माण होत आहे. पुणेरी स्वभावाची लोक शोधण्यासाठी थोडा त्रास घ्यावा लागेल.

  ReplyDelete
 6. लेख आवडला. काही दिवसात पुण्याचीही मुंबई आणि दिल्ली होणार. सर्व हिंदी (मोडकी तोडकी का होईना) बोलताना आढळतील.

  ReplyDelete
 7. लेख नक्कीच आवडला... बाकी (आमच्यासारख्या) पुणेकरांनाही अधुन-मधुन टोमणे आवडतातच...

  ReplyDelete
 8. This comment has been removed by the author.

  ReplyDelete