Monday, 9 January 2017

व्यथा- त्यांच्या आणि आमच्या !

 साधं सरळ आयुष्य असतं आमचं. दहावी-बारावीच्या मार्कांवर आमची लायकी ठरते अन कॉलेज सुरु होतं. ते आटपून कुठेतरी नोकरीला लागायचं. मग लग्न, पोरंबाळं,संसार वगैरे वगैरे. आमच्यासारख्या शंभरातल्या ऐंशीजणांची हीच कथा. उरलेले काहीजण कॉलेजमध्ये प्रेम वगैरे करतात, परदेशात वगैरे शिकायला जातात.शेवटी  एका पातळीनंतर सगळ्यांची कथा आणि व्यथा सारखीच ! कोणी पुण्यात रडतो तर कोणी क्यालिफोर्नीयात एवढाच काय तो फरक!

           पण "त्यांचं" तसं नसतं. त्यांचं म्हंजे आमच्या हिंदी सिनेमावाल्यांचं! त्यांना दर्द दिल असतो (आम्हाला कोलेस्ट्रॉल असतो!).त्यांना दुनिया जीतने  की तमन्ना असते (आम्हाला मंथली टार्गेट असतात!). त्यांना ख्वाब असतात (आम्हाला इएमआय असतो!). त्यांना नयी राहे धुंडायची असतात (आम्हाला ट्रॅफिक जॅम असतो!).त्यांचा जालीम जमाना असतो(आम्हाला देशाचं सरकार असतं!). त्यांना बदले की आग असते (आमच्या बॉसच्या हातातच इन्क्रिमेंट असतं!).  त्यांचे शंभर-दोनशे-तीनशे कोटींचे क्लब असतात (आम्हाला आर्थीक मंदी असते किंवा नोटबंदी असते!)

        मध्यंतरी दिल धडकने दो नामक सिनेमा बघण्यात आला.श्रीमंत पण विविध व्यथा असलेले काही लोकं एका बोटीवर जमतात अशी काहीशी कथा आहे. व्यथांची पातळी काय असावी हे लक्षात यावे म्हणून त्यातील काही पुढे मांडतो. बिझिनेसमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वडील आता मुलासाठी घेतलेले विमान (खेळण्यातले नव्हे! खरेखुरे) विकणार असतात. आता आपल्याला कधी 'विमान चालवायला' मिळणार नाही ह्यामुळे मुलगा व्यथित असतो! दुसरीकडे एका गर्भश्रीमंत मुलाच्या प्रेमात पडले असताना आपले वडील दुसऱ्याच गर्भश्रीमंत मुलाशी लग्न करण्याचा आग्रह (जबरदस्ती नव्हे, हा सैराट नाही!) करतायेत म्हणून एक मुलगी व्यथित असते. आपल्या जाड दिसण्यामुळे नवरा आपल्यावर प्रेम करत नाही आहे असं वाटून एक पत्नी जास्तीत जास्त अन्नग्रहण करत असते. बरं ह्या व्यथांवर सिनेमात दाखवलेले इलाज तर अचाट होते. खरं म्हणजे सगळे बोटीवर जमलेच आहेत तर बोटीला खालून एक भगदाड पाडून कितीतरी समस्या मिटवता आल्या असत्या पण असो...! म्हणजे ह्यांच्या व्यथांची समृद्धी बघूनच आपण थक्क होतो. अश्याच कुठल्याश्या सिनेमात, आयुष्याचा  अर्थ समजावून घेण्यासाठी समुद्रात डुबकी मारणे, विमानातून खाली उडी मारणे किंवा माजलेले बैल अंगावर घेणे वगैरे इलाज सांगितले होते. खोल समुद्रात उडी मारण्यासाठी आधी समुद्राच्या मधोमध जाण्याचे सामर्थ्य अंगी बाळगावे लागते ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं होतं. किंवा बैलाच्या पुढे पळण्यापेक्षा, बैलांमागे नांगरावर उभे राहिल्यास आयुष्याचा अर्थ जास्त चांगल्या पद्धतीने कळतो हे बहुधा दिग्दर्शक विसरला असावा.   

           एवढं असूनही ह्यांच्या जिंदगीत म्हणे खूप प्रॉब्लेम असतात. दिल चाहता है नामक सिनेमात बापानं सेट केलेला धंदा सांभाळायला पोरगा ऑस्ट्रेलियात जातो. तिथं एक लग्न ठरलेली मुलगी योगायोगाने त्याला भेटते. ती ह्याच्यासोबत गावभर भटकते. मग तीच ह्याच्या प्रेमात पडते. आणि आता तिचं लग्न दुसऱ्याशी होणार हे कळल्यावर पोरगं सैरभैर होते. बाप लगेच पोराला बिझिनेस क्लासने भारतात बोलावून घेतो. साधारणपणे आपल्यापैकी कोणी जेंव्हा प्रेमात पडतं तेंव्हा गुप्तता पाळण्यात येते. ह्यांचं तसं नसतं. मुळात आपण हिच्या प्रेमात पडलोय ही गोष्ट त्यांना तिच्या लग्नाच्या दिवशीच कळते. मग तिचा होऊ घातलेला नवरा सोडून अख्खी वरात ह्या दोघांचं लग्न लावायच्या मागे लागते. शेवटी आटपाट नगरात पोरीच्या 'होऊ घातलेल्या सासऱ्याच्या' समंतीने त्या दोघांचा विवाह संपन्न होतो! बरं एवढं झाल्यावरही त्या ऑस्ट्रेलियाच्या धंद्याचं काय झालं असा प्रश्न कोणालाच पडत नाही! आणि योगायोग तरी किती घडावे ह्यांच्यासोबत ?? साध्या पीएमटी बसमध्ये बाजूला एखादी मुलगी बसावी एवढाही योगायोग कधी घडत नाही आमच्यासोबत ! ह्यांना पावसात लिफ्ट मागणारी ललना भेटते, आम्हाला पावसात गाडीचं पंक्चर दुरुस्त करायलासुद्धा कोणी सापडत नाही! अनोळखी तर सोडूनच द्या,पण ओळखीतल्या मुलीसुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत फेसबुकावर! ह्याच सिनेमात आणखी एक योगायोग आहे. सिनेमातला दुसरा एक पोरगा डझनभर प्रेमप्रकरणं केल्यावर शिस्तीत अरेंज मॅरेज करतो. त्यातही त्याला सांगून आलेली पहिलीच मुलगी आवडते. कालांतराने मुलीलाही तो आवडतो. ह्यांच्यात एकदा लग्न करायचं ठरलं ना की जुन्या सगळ्या प्रकरणातून आपसूक क्लिनचीट मिळते. इथं आमचं लग्न ठरवताना, एक-दोन मुलींना नाकारलं तर लगेच,"तुला काय ऐश्वर्या पाहिजे का रे?" असे प्रश्न चालू होतात.(नंतर किती ऐश्वर्या आम्हाला नाकारतात हा स्वतंत्र विषय आहे!). योगायोग घडण्याची परिसीमा बघायची असेल तर हम तुम सिनेमा बघावा. नायक-नायिका दर दोन-तीन वर्षांनी जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे भेटतात. तसे ते कुठेही भेटले तरी नवल वाटू नये  कारण हिंदी सिनेमात  दक्षिण आणि उत्तर ध्रुव सोडून पृथ्वीच्या प्रत्येक कोनाड्यात आता प्रेमकथा फुलवून झालेली आहे! पण प्रश्न योगायोगाचा आहे. भारतात ताटातूट झाल्यावर फ्रान्समधल्या कुठल्यातरी ट्रेनमध्ये ते भेटतात. इथं आपल्याला लोकलमध्ये चढायला मिळेल का ह्याची शाश्वती नसते. लोकल सोडा, तीन तीन महिन्याआधी रिझर्वेशन करून ते कन्फर्म होत नाही तर आपल्या बाजूच्या बर्थवर जुनी मैत्रीण भेटेल अशी अपेक्षा तरी कशी करायची?       

     रिझर्वेशन वरून आठवलं, ह्यांच्यात ते मैं दुनिया का कोना कोना देखना चाहता हू टाईप नग असतात बघा. ह्यांचे तिकीटं कोण काढत असेल हा बाळबोध वाटत असला तरी अत्यंत महत्वाचा प्रश्न मला नेहमी पडतो. ह्यांना आयआरसीटीसी, वेटींग लिस्ट, तात्काळ तिकीट,सर्व्हर डाऊन वगैरे प्रकार आड येत नाहीत का? विमानाचे दर पाहून ह्यांचे डोळे फिरत नाहीत का ? जिंदगी का मतलब शोधण्यासाठी वर्षातून दोन-तीन युरोप टूर करणं ह्या चाकरमानी हिरोंना कसं काय परवडतं? बरं जिंदगी का मतलब युरोपमध्येच का सापडतो? गेलाबाजार माथेरान नाहीतर अजिंठ्यात का सापडत नाही? बरं एकवेळ सगळ्या गोष्टी नजरेआड केल्या तरी वर्षातून दोन वेळा पंधरा दिवसांची सुट्टी मंजूर करणारे मॅनेजर ह्या सृष्टीत कोणत्या ग्रहावर आढळतात?  
  
      जाऊद्या! आमच्या आणि त्यांच्या व्यथांची तुलना होऊच शकत नाही. भाऊसाहेब पाटणकरांनी माणसाची व्याख्या, 'आपल्या व्यथांच्या सौंदर्यावर मुग्ध होतो तो माणूस!' अशी केली आहे. आम्ही मुक्त होऊ शकत नसलो तरी मुग्ध नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास आम्ही बरे अन आमच्या व्यथा बऱ्या !  

--चिनार

3 comments:

  1. पण "त्यांचं" तसं नसतं. त्यांचं म्हंजे आमच्या हिंदी सिनेमावाल्यांचं! त्यांना दर्द ऐ दिल असतो (आम्हाला कोलेस्ट्रॉल असतो!).त्यांना दुनिया जीतने की तमन्ना असते (आम्हाला मंथली टार्गेट असतात!). त्यांना ख्वाब असतात (आम्हाला इएमआय असतो!). त्यांना नयी राहे धुंडायची असतात (आम्हाला ट्रॅफिक जॅम असतो!).त्यांचा जालीम जमाना असतो(आम्हाला देशाचं सरकार असतं!). त्यांना बदले की आग असते (आमच्या बॉसच्या हातातच इन्क्रिमेंट असतं!). त्यांचे शंभर-दोनशे-तीनशे कोटींचे क्लब असतात (आम्हाला आर्थीक मंदी असते किंवा नोटबंदी असते!)- खूप सुंदर चिनारजी.

    ReplyDelete