Monday, 24 August 2020

पाचूंडी!!


पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट..

एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला.
इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली. अन तिकडं कुतुबशाहाला कुणकुण लागली. त्याने लगोलग, मंत्र्यांना महाराजांची भेट घ्यायला पाठवलं. मंत्र्यांनी कुतुबशाहा तर्फे महाराजांना आमंत्रण दिले. महाराज थोडे नाराज होतेच. पण महाराजांच्या पूर्ण सेनेचे आदरातिथ्य व्हावे ह्यासाठी तयारी पूर्ण करण्यात वेळ लागला, आणि म्हणूनच आमंत्रण द्यायला उशीर झाला असा युक्तिवाद मंत्र्यांनी केला. महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी महाराज--कुतुबशाहा भेट आणि मावळ्यांना मेजवानी असा बेत ठरला.

ऐंशी हजार अन ते पण मावळे बरं का !! तुमच्या-माझ्यासारखे अर्ध्या भाकरीत आडवे होणारे कचकडे नव्हते ते. त्यात कुतुबशाहाने त्यांच्यासाठी पुरणपोळीचा बेत ठेवलेला..

अन पुरणपोळी म्हणजे, तुमच्या घरी बनते तशी तळहाताएवढी नव्हे..( कीर्तनकाराच्या अश्या प्रत्येक वाक्यावर आम्ही खळखळून हसत होतो!)

ऐका आता पुरणपोळी कशी होती ते..

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

आणि ही तयार झाली....पाच पोळ्यांची पाचूंडी !!!

मोठ्ठा शामियाना उभारला होता.. सगळे मावळे एकाच वेळी बसू शकतील असा..वाढायला हजार-पंधराशे लोकं होते..

मग काय विचारता? मावळे बसले जेवायला..मोठमोठाल्या ताटात पाचूंडी, सोबतीला साध्या पोळ्या, दोन भाज्या, कोशिंबीर, चटण्या अन ताटाबाहेर ताकाचा तांब्या..कुतुबशाहाचे आदेश होते..मावळे जेवत असे पर्यंत ताट रिकामं दिसायलाच नको..लक्षात ठेवा !!

मावळे भिडलेत...एक पाचूंडी, दुसरी पाचूंडी....तिसरी, चौथी, पाचवी....(इथपर्यंत ऐकून आम्ही गपगार झालो होतो). 

सांगा बरं एकेका मावळ्याने किती पाचुंड्या खाल्ल्या असतील ?? (आम्हाला विचारलं)

"सहा...."

"आठ"

"अकरा", (काही बोलतं का बे वगैरे उद्गार ऐकू येत होते..)

कोणत्याच पोराची कल्पनाशक्ती ह्या पलीकडे जात नव्हती...

"अबे पोट्टेहो...काय कामाचे तुम्ही? आकडा पण बरोबर सांगू शकत नाही ! खाणार काय तुम्ही?"

"ऐका...एकेका मावळ्याने वीस वीस पाचुंड्या खाल्ल्या लेकं हो !"

काय ??? 

वीस पाचुंड्या? सगळ्यांनी आश्चर्याने आ वासला होता...

वीस गुणिले पाच म्हणजे शंभर...गुणिले ऐंशी हजार ... म्हणजे आठ लाख...नाही नाही सोळा लाख...नाही ऐंशी लाख बहुतेक...मी तिथल्या तिथे तीन वेळा हिशोब चुकवला..

कीर्तन संपलं..तरी हिशोब जुळत नव्हता...

आणि येणार प्रत्येक आकडा हा नवे नवे उच्चांक गाठत होता..

दोन-तीन दिवसांनी ऐंशी लाख हा आकडा फायनल झाला..

पण ऐंशी लाख पुराणपोळ्यांना लागणारं पुरण (ते सुद्धा आठवतंय ना, परातीएवढी एक पोळी, त्यावर अर्धा किलो गावरान तूप वगैरे वगैरे !) करायला किती हरभऱ्याची डाळ भिजवली असेल? कधी भिजवली असेल? साखर किती वापरली असेल? एका पाचूंडीला अडीच किलो ह्या हिशोबाने चाळीस लाख किलो गावरान तूप कढवायला किती गावरान गाई म्हशी कुतुबशाहाकडे असतील? एका मावळ्याने पाच तांबे ताक जरी प्यायलं असेल तरी चार लाख तांबे ताक बनवायला किती मोठं भांड वापरलं असेल? 
ह्याचा मी अजूनही हिशोब करतोय..

ह्यात कीर्तनकाराने त्याच्या पदरचा मसाला, तुपाची धार वगैरे सोडली असेलच ह्यात शंका नाही. पण एका मावळ्याने तीन-चार पाचुंड्या जरी खाल्ल्या असतील तरी पंधरा-वीस पुरणपोळ्या होतात हो !

दरवेळी पुरणपोळी खाताना ही पाचूंडीची गोष्ट मला आठवते. आणि निग्रहाने खाऊन सुद्धा तीन पुरणाच्या पोळी पलीकडे मजल जात नाही.

आयुष्यात एकदा तरी, दोन दिवस पुरवून पुरवून का होईना पण एक तरी पाचूंडी खायची इच्छा आहे !

अंगठ्यासारखी जाडजूड अन परातीएवढी मोठी एक पुरणपोळी ! त्यावर अर्धा किलो गावरान तूप, मग त्यावर आणखी एक तशीच्च पुरणपोळी, त्यावर परत अर्धा किलो गावरान तूप....अश्या एकावर-एक पाच पोळ्या ! 

पाच पुरणपोळ्यांची एक पाचूंडी !

समाप्त 

चिनार 

(तळटीप: ही कथा कीर्तनकाराने सांगितलेली आहे. ह्या मागील ऐतिहासिक सत्य मी तपासलेलं नाही. कथेला कथा म्हणूनच घ्यावे ही विनंती!)

Thursday, 13 August 2020

नारायण...लॉकडाऊन इफेक्ट्

 दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली.

त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन,


"काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली!  सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला.


"बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?"    


"नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले 


आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही. त्याने सॅनिटायझरची बाटली दिली गण्याच्या हातात अन गण्याला बजावून सांगितलं


"हे बघ गण्या, दोन थेंबाच्यावर कोणाच्याच हातावर टाकू नको सांगून ठेवतो! संध्याकाळपर्यंत हीच बाटली पुरवायची आहे लक्षात ठेव"


"अहो पण चार बाटल्या आणल्यात ना नारायणभाऊ?


"म्हणून काय लगेच संपवायच्या का? किती महाग झालंय सॅनिटायझर माहितीये का? जेवढं उरेल तेवढं संध्याकाळी वापस करायला येईल असं बजावून आलोय त्या मेडिकलवाल्याला मी! तो मला सांगत होता वापस नाही घेता येत म्हणून. मी म्हटलं, त्याला काय एक्स्पायरी असते होय रे? की सोडा असतो त्याच्यात झाकण उघडलं की उडून जायला. मला सांगतोय! तू जपून वापर"


"बरं"


"आणि हे बघ, शिंच्या अत्तर समजून लोकांच्या अंगावर सॅनिटायझर शिंपडू नको लक्षात ठेव."


गण्याला उगाचच दम देऊन नारायण पुढे निघाला. 


पुढे दोन बायका एकमेकांना चिपकून सेल्फी घेत होत्या. दोघीही 'अफाट' असल्याकारणाने एका फ्रेममध्ये बसणं शक्य नव्हतं. 


नारायण लगेच खेकसला,

"ए ए शकुताई! काय चाललंय? काय सोशल डिस्टंसिंग वगैरे काही आहे की नाही? जवळ उभं राहून काय सेल्फी काढताय. तू या कोपऱ्यात जा अन तू त्या कोपऱ्यात जा! अन लागेल तेवढे फोटो काढा जा"


"ए असं काय रे नारायण? दूर उभा राहून कसं काय सेल्फी काढणार रे?"


"हे बघ..लग्नात सोशल डिस्टंसिंग पाळणार अशी हमी तुझ्याच नवऱ्यानं दिलीये पोलीस स्टेशनमध्ये. त्याचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावायचा नसेल तर सांगतो ते ऐक. नाहीतर तुझं तू बघ"


नारायण पुढे निघाला,

"नारबा, चहा-नाश्ता नाही आला अजून? व्याही पेटलाय तिकडं!"


"सकाळपासून तीन वेळा मी चहा पाजलाय त्यांना! कप सॅनिटाइझ्ड आहेत का असं विचारात होते मला.  मी म्हटलं कप,बशी, साखर,चहा पावडर इतकंच काय तर गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. आता बोला !!


तेव्हढ्यात नारायणाला मुलीच्या आईने आवाज दिला..तिच्यासोबत सात-आठ बायका होत्या.

"नारायणा, अरे मुलाकडल्या बायकांना हळदी-कुंकू द्यायचंय. वाण म्हणून प्रत्येकीला एकेक मास्क देऊ म्हटलं. तर हे कसले सुती कापडाचे मास्क आणलेस रे. मुलाच्या आईला तरी किमान गर्भरेशमी मास्क आणायचास ना!"


"काय करायचंय थेरडीला गर्भरेशमी? सुती कापड बरं पडतं त्यापेक्षा"


सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर मनसोक्त हसल्या.


"नारबा...मुलाचे मित्र परगावावरून आलेत. आता क्वारंटाईन केल्याशिवाय कसं काय सामील करून घेणार त्यांना?"


"काका, काही काळजी करू नका. त्यांची 'सोय' मी वरच्या खोलीत केली आहे. संध्याकाळपर्यंत उठणार नाहीत"


"अरे म्हणजे, दारू बिरू आणलीस की काय?"


"कसली दारू? सॅनिटायझरमध्ये ८२ टक्के अल्कोहोल असते म्हणतात. तेच ठेवलंय ग्लासात भरून!!"


असे एकानंतर एक हल्ले परतवत नारायण आपला डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा कार्यालयात थैमान घालत असतो.


नवरा-नवरी बोहोल्यावर उभे राहतात. मंगलाष्टक म्हणण्याची वेळ येते. आणि नेमका आंतरपाट सापडत नाही. 


"हे काय, साध्या आंतरपाटाची व्यवस्था करता येत नाही ह्यांना?", कोणतरी कुजबुजतं..


तेवढ्यात नारायण उत्तरतो,

"कश्याला पाहिजे आंतरपाट गुरुजी? लग्न लागण्याआधी एकमेकांचे चेहरे पाहायचे नाही हाच उद्देश असतो ना आंतरपाटाचा? हो ना!! मग हे काय मास्क लावलेत त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? चला सुरु करा मंगलाष्टक...म्हणा रे सगळ्यांनी..तदैव लग्न सुदिनं...."


आणि एकदाच लग्न लागतं..


नारायण डोक्यावर कफन बांधल्यासारखं चेहऱ्यावर मास्क बांधून पुढचा हल्ला परतवायला निघतो...


समाप्त...


चिनार

Monday, 10 August 2020

अंबापेठेतले सिनेमे...

 आज सकाळी अक्षय अन सैफचं मैं खिलाडी तू अनारी गाणं सुरु होतं. काही आवाज, काही ओळखीचे वास डायरेक्ट भूतकाळात घेऊन जातात. तसं हे गाणं मला अंबापेठेत घेऊन गेलं.

अंबापेठ ! म्हणजे माझं आजोळ. अमरावतीच्या मध्यवर्ती भागात असलेली सगळ्यात जुनी वस्ती ! अंबापेठेचं आयुष्यातलं स्थान लिहिण्याजोगती प्रतिभा माझ्यात कधी येईल का ते माहिती नाही, पण आज त्यातल्या एका भागावर लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

अंबापेठेत पाहिलेल्या किंबहुना पाहायला मिळालेल्या सिनेमांची मोठी यादी तयार करता येईल. त्याकाळात आमिर, सलमान, शाहरुख ह्यांची चलती होती. तिघांचीही सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरु होती. अनिल कपूर, ऋषी कपूर ह्यांचा थोडाबहुत पडता काळ सुरु झाला होता तरीपण १९४२ ए लव्ह स्टोरी, बोल राधा बोल वगैरे सिनेमातून त्यांचं नाणं खणखणीत वाजत होतंच. आणि हे पाच-सहा लोकं सोडले तर इंडस्ट्रीत आदित्य पांचोली, राहुल रॉयपासून ते अक्षय कुमार, अजय देवगणपर्यंत असे बरेच लोकं होते ज्यांचे सिनेमे चालायचे किंवा पडायचे. पण ह्यांचा अमुक एक सिनेमा बघितला आणि आवडला असं चार चौघात सांगता येत नसे. ह्यांचे सिनेमे थेयटरमध्ये जाऊन बघण्याची आमच्यात पद्धतच नव्हती. थिएटरमध्ये हम है राही प्यार के, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे वगैरे बघायचे असतात. मोहरा, खिलाडी, दिलवाले कभी ना हारे हे सिनेमे बघायचेच नसतात अशी माझी एक समजूत होती. आता ह्याच्यामागे एक अर्थकारण सुद्धा होतं. आलेला प्रत्येक सिनेमा पोरांना दाखवणं हे कोणत्याच मध्यमवर्गीय पालकांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे सिनेमे दाखवायचे ते एकदम सो कॉल्ड प्रीमियम कॅटेगिरीतलेच असा विचार असायचा. मग बलवान, वक्त हमारा है, मैं खिलाडी तू अनाडी हे सिनेमे थोडे कनिष्ठ मध्यमवर्गीय प्रीमियम कॅटेगिरीत यायचे.

मग हे सिनेमे बघायला मिळाले कुठे? तर अंबापेठेत !!

आजोबांचा दिवस सकाळी रेडियोवर भीमण्णांच्या भूपाळीपासून सुरु व्हायचा. अन आम्ही चिल्लेपिल्ले त्यांचं पाणी वगैरे भरून झालं की उठायचो. मग नुसता गोंगाट ! दुपारी शांत झोपणं वगैरे प्रकार माहितीच नव्हते. मग आजोबा केबल टीव्हीवर आम्हाला एखादा सिनेमा लावून देऊन स्वतः वामकुक्षी करायचे.

तिथं बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे राहुल रॉयचा जुनून ! (कदाचित दुसरा असू शकेल पण आत्ता हाच आठवतोय)
तो राहुल रॉय पौर्णिमेच्या रात्री वाघ वगैरे बनतो अशी काहीतरी स्टोरी होती. आता एखाद्याला वाघ बनवायचं आहे तर राहुल रॉय ही काय चॉईस म्हणायची का? राष्ट्रीय प्राण्याला ट्रीट करण्याची ही काय पद्धत झाली ! पण ते वाघ वगैरे होण्याचं चित्रण जबरदस्त होतं बरं का. भीती वाटायची त्यावेळेला. पण मी एकटाच का घाबरू? म्हणून गणिताचा मास्तर पौर्णिमेला कोल्हा बनतो अशी एक अफवा मी शाळेत उठवली होती. (अफवांच्या विश्वात ही आजही अनबिटेबल आहे !)

मग सैफचा पहिला सिनेमा 'आशिक आवारा' बघितल्याचं आठवतंय. शर्मिला टागोर अन नवाब पतौडींचा हा मुलगा. रूप तेरा मस्ताना-प्यार मेरा दिवाना हे शर्मिलाजींचं गाजलेलं गाणं ! आणि नवाब पतौडींचा एक डोळा कृत्रिम होता असं म्हणतात. त्यावरून सैफचा एक डोळा बकरीचा आहे अशी एक अफवा उठली होती.(आईशप्पथ ! ही अफवा माझी नाही.) आणि यावरूनच सैफला हिणवायला, रूप तुला नसताना-बकरीचा डोळा असताना-शान कशाला मारतो रे गाढवा! असं एक गाणं म्हटल्या जायचं. (ही रचनासुद्धा माझी नाही). पण काही असो, सैफ मला तेंव्हापासूनच आवडायचा. आशिक आवरा, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी, तू चोर मैं सिपाही असे त्याचे बरेच सिनेमे मी अंबापेठेत बघितले.

अक्षयने अंडरटेकरला उचललेलं याची देही याची डोळा त्या छोट्या पडद्यावरच बघितलं. जादूगर, इन्सानियत हे शूटिंग झाल्यावर परत अमिताभनेही कधी बघितले नसतील असे सिनेमे अंबापेठेत बघताना खूप मजा यायची.

गोविंदाचा आँखे सुद्धा तिथंच बघितलाय. संजय दत्तचे इनाम दस हजार, सडक, गुमराह,साजन, सुनील शेट्टीचे बलवान, गोपी किशन, टक्कर, अक्षयचे सपूत, खिलाडी सिरीजचे जवळपास सगळेच सिनेमे जर अंबापेठ नसतं तर कदाचित कधीच बघितले नसते. तिथं सिनेमे बघण्याचा एक तोटासुद्धा होता. आजोबांना मारधाड फारशी आवडत नव्हती. त्यामुळे आजोबा जागे व्हायच्या आधी सिनेमा संपलेला बरा असायचा. नाहीतर शेवटची फायटिंग सुरु झाली की आजोबा टीव्ही बंद करायचे. बऱ्याच सिनेमांचा शेवट बघायचा राहिला तो राहिलाच. सिनेमात थोडे इंटेन्स प्रसंग सुरु झाले की बरोब्बर तेंव्हाच आजोबांना कशीकाय जाग यायची हे एक कोडंच आहे. उठल्या उठल्या पहिले टीव्ही बंद !

अंबापेठेचा फायदा आमच्या आई बाबांनाही भरपूर झालाय.अंबापेठेच्या घराजवळच एक थिएटर होतं. त्यामुळे हक्काची पार्किंगची जागा उपलब्ध होती. पण आई बाबा तिथं स्कुटरसोबतच लेकरांनाही पार्क करून जायचे. माझ्यासाठी सिनेमा की आज्जी ह्यातली नैसर्गिक चॉईस आज्जीच असायची. आणि 'एका तिकिटाचे पैसे' हे अर्थकारणसुद्धा होतंच. आणि त्याहीपेक्षा सिनेमा बघताना एका लेकराची कटकट नसणं हे जास्त सुखावह होतं.

अंबापेठेत एका खोलीत लहान मामा राहायचा.तिथल्या लाकडी खिडकीत काचेच्या फ्रेम बसवल्या होत्या. त्यातील एका खिडकीमध्ये शशी कपूरच्या "सवाल" सिनेमाचं पोस्टर चिपकवलं होतं. तासोनतास आम्ही त्या पोस्टरकडे बघत राहायचो. उगाचच! तिथं त्या पोस्टरचं काय प्रयोजन होतं हा एक सवालच आहे.

असो.
अंबापेठ अजूनही आहे. पण ते घर पाडून आता नवीन घर उभारलंय. मोठा टीव्हीसुद्धा आहे.

आता आजोबा नाहीत...आजी खूप थकलीये..

पूर्वीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा मोठे होऊन उगाचच फार शहाणे झाल्यागत वागतोय..

चालायचंच... सिनेमातरी कुठं पहिलेसारखा राहिलाय !!

-- समाप्त

-चिनार

Tuesday, 4 August 2020

राखी स्पेशल

शाळेत वर्गातल्या मुलींनी मुलांना राखी बांधण्याचा एक भिषण प्रकार होता. कोणत्यातरी शिक्षिकेच्या डोक्यात राखीनंतरच्या काही दिवसात हा उपक्रम यायचाच. त्यामुळे ऋषीपंचमीची फार आतुरतेने वाट पाहिली जायची.आता त्याचं कसं असतंय, क्रश वगैरे शब्द तेंव्हा माहिती नव्हते, पण असायचा एखादा गोजिरवाणा चेहरा वर्गात! जिच्याबद्दल भविष्य माहिती नसलं तरी वर्तमानातच राखी बांधून घेण्याचा अजिबात विचार नसायचा.

मग एके दिवशी वर्गात "ती" घोषणा व्हायची. काही पोरं गोंधळाचा फायदा घेऊन वर्गातून निसटायचा प्रयत्न करायची. आम्हाला ते पण जमत नव्हतं. कारण कोणीतरी फितुरी केली तर उद्या वर्गात सगळ्यांसमोर (आणि तिच्यासमोरसुद्धा) आपला उद्धार होण्याची शक्यता जास्त!! आणि का कोण जाणे माझ्या पत्रिकेत असे उद्धाराचे प्रसंग फार ठासून भरले आहेत! (पता नही ऐसी सिच्युएशनमे मैं आटोमॅटिक आगे कैसे आ जाता हू टाईप!) 

मग सगळे बकरे कुर्बानी द्यायला लायनीत उभे राहायचे.आणि समोर बकऱ्या! 

पहिली  मुलगी पहिल्या मुलाच्या हाताला राखी बांधेल, दुसरी मुलगी दुसऱ्या मुलाच्या हाताला असा क्रम असायचा. मला ह्याच्यात मेजर ऑब्जेक्शन होतं. अरे कमीत कमी ह्याच्यात तरी चॉईस द्या ना! ही काय जबरदस्ती? लोकशाही आहे ना देशात? ती काय फक्त नागरिकशास्त्रात शिकवण्यासाठीच का? आपापसात ठरवून घ्या बा बांधून तुम्ही असं म्हणायला काय जातं?

पण नाही.. तिथपण शिस्त त्येजायला..

मग ती कोणत्या नंबरवर उभी आहे त्यावरून आपला नंबर ठरवायची एक कसरत सुरू व्हायची. पण तिचे दिवाने दोन-चार तरी असायचेच ना. सगळ्यांच आपापले नंबर बदलले की परत गोंधळ. आणि वर सांगितल्याप्रमाणे, "पता नही ऐसी सिच्युएशनमें मैं आटोमॅटिक आगे कैसें आ जाता हू!"

शेवटी जे घडू नये तेच घडायचं!

हिंदू संस्कृती,सणवार,रितीरिवाज ह्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे.

पण जर हिंदूंची संख्या वाढवायची असेल तर शाळेत ह्या असल्या धंद्यांना चालना देऊन ती कशी वाढेल??

--एक संतप्त सवाल

--चिनार