Tuesday, 28 February 2017

#हॅशटॅग#

"भाऊ..तुले एक विचारू का?"

"विचार ना बे."

"तू फेसबुक वर हायस नं?"

"हो मंग..माया पोस्टा नं फोटो दिसत नाय का तुले?"

"अन टिवटर वर?"

"टिवटर नाय बे ट्विटर."

"हा तेच ते"

"बरं मंग?"

"ते फेसबुक नं टिवटरवर, दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काय असतेत?"

"काय?"

"अरं ते असते ना..दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काढून त्याच्यासमोर लिहितेत सारे?"

"काय बोलून ऱ्हायला बे?"

हातावर आकृती काढून…..#
"हे पाय असं असते ते?"

"हा...ह्याला हॅशटॅग म्हन्तेत?"

"काय म्हन्तेत?"

"हॅशटॅग..हॅशटॅग."

"म्हंजे काय पन?"
"मले काय मालूम बे?"

"अबे मंग त्वां कायले लिहितं? #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी?"

"ते तसंच लिहा लागते ना बे ट्विटरवर."

"पन काऊन? दादाच्या लग्नात पंगतीत संन्न जिलब्या हानल्या असं काऊन लिहत नाही."

"अबे पद्धत ऱ्हायते ना लिहिण्याची एकेका ठिकाणची."

"मले नाही समजू ऱ्हायलं बा?"

"हे पाय..आपल्याले एखांदी गोष्ट ठासून सांगायची असंन तं हॅशटॅग द्या लागते ट्विटरवर."

"म्हंजे मास्तरनं शाळेत ते उद्गारवाचक चिन्न शिकवलं होतं तसं?"

"हा तस्संच!"

"पन समोरच्याले कसं कळनं?"

"काऊन नाय कळणार?"

"म्हंजे पाय त्वां लिहिलं #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी...बराबर?

"हा मंग?"

"ह्याचा काय अर्थ होते?"

"दादाच्या लग्नात बम्म जिलब्या सुतल्या..अन बुंदी पन!"

"नाही ना?"

"काऊन..दुसरा काय अर्थ होते?"

"दादाच्या लग्नात, पंगतीत बम्म जिलब्या वाढल्या असा पन अर्थ निंगते ना?"

"तू जाय बे...मजाक उडवतं का मायी?"

"तसं नाय भाऊ..उदाहरण देल्लं फक्त."

"लय शायना हायस तू?"

"नाय भाऊ..हे तर मराठी झालं..इंग्लिशमदे बी कायच्या काय लिहितेत ना सारे."

"काय लिहितेत?"

"आता हे पाय...#dayoff #leginjury #sitting@home #relaxed"

"मंग बराबर तं हाय. तेच्यात काय चुकलं आता? पाय मोडला म्हणून घरी बशेल हाय तो."

"अबे त्याचं तंगडं मोडलं म्हणून काय इंग्लिशचं बी मोडायचं का? पार आय माय करून टाकतेत इंग्लिशची!!"

"तू काऊन चीडतं पन?"

"तसं नाय भाऊ..पन आपले खेड्यापाड्यातले पोट्टे पुन्यामुमैले जाते तवा त्यायच्या इंग्लिशची कशी मजा उडवतेत तिथले पोट्टे!! अन आता हे कसं चालते?"

"ते वेगळी गोष्ट हाय ना बे."

"वेगळी कस्काय? आपले पोट्टे तरी चारचौघात चुकीचं बोलतेत बिचारे..हे तर साऱ्या दुनियेले बोंबलून सांगू ऱ्हायले."

"बराबर हाय तुय..पन ते कसंय..बा एखांदी महत्त्वाची घटनागिटना एखाद्याले सांगायची असंनं तं हॅशटॅग लावला की साऱ्याइचं लक्ष जाते."

"अबे तं ह्याच तंगडं कोणतं युद्धात जाऊन मोडलं होतं बे?मोरीत पाय घसरून पडला असंनं थो. कायले हॅशटॅग लावा लागते?"

"पन तुयी काऊन जळू राहिली येवढी? त्यांले काय लिहाच ते लिहीतीन."

"अजून एक विचारू का तुले?"

"हा विचार"

"ते LOL अन ROFL म्हंजे काय?"

"ते हासायाचं असलं की LOL किंवा ROFL लिहा लागते."

"ते मले बी माहिती हाय."

"मंग कायले विचारतं?"

"त्यादिवशी एका पोट्टीनं लिहिलं #feelingsleepy. मले ते वाचून हसू आलं. मंग म्या बी लिहिलं lol..तं ते पोट्टी मायावरचं डाफरली."

" काऊन?"

"म्या मराठीत लिहिलं ना बे... लोळ !!!!"
"मंग डाफरणारच ते..तिले झोप आली तं तू लोळ म्हणतं!!"

"माय चुकलं ना भाऊ मराठीत लिहिलं ते...मानतो ना मी..पन  झोप आली तं लोळ नाही तं काय पळ म्हनाचं का?"

"अबे पन तुले लिहाची गरजच काय होती?"

"मंग तिले तरी लिहाची काय गरज होती बे? झोप आली तं ओरडून कायले सांगा लागते?"

"हे पाय तू फालतू होबासक्या करू नको फेसबुकवर. आनशीन घरावर गोटे."

"मायबीन लोकं होबासक्या करतेत एवढ्या ते चालते. अजून एक विचारायचं होतं मले."

"आता काय ऱ्हायलं अजून?"

"आता समजा मले एखांदी फ्रेंड रिक्वेष्ट आली. तं तिले इग्नोर मारताना समोरच्याले दोन-चार शिव्या पाठवायची व्यवस्था हाय का? किंवा मायी फ्रेंड रिक्वेष्ट एखाद्यानं इग्नोर मारली तं त्याले तरी शिव्या द्यायची व्यवस्था पाह्यजे की नाही?"

"शिव्या काऊन द्यायच्या हायेत पन तुले?"

"अबे काही लोकांचे फोटो पाहूनच थोबाडीत द्यावीशी वाटते ना बे...वरतून ते फेसबुक दहावेळा विचारते..व्हॉट' ऑन युअर माईंड?"

"मंग त्याच्यासाठी हॅशटॅग वापर ना बे?"

"त्यानं काय होईन?"

"शिवी देल्ली हे बाकी कोणाला कळणारच नाय ना."

"म्हंजे?"

"हे पाय #tuyananachitang #bhaitadbongya #chalningithun !!!"

"हे जमलं ना भाऊ...बरं येतो मंग मी"

"कुठं चालला आता?"


"#मीकुठंबीजाईन #तुलेकायकरायच !!!"

No comments:

Post a Comment