Friday, 3 February 2017

राख !

स्मशानातील गर्दी आता सरली होती.पण आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या जनाबाईचा आत्मासुद्धा दोन क्षण का होईना पण सुखावला असेल..............
*************************************************************************************
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या त्या आश्रमात पहाटे चार वाजता हलकल्लोळ माजला होता. त्याला कारणही तसंच होतं. आश्रमात एका साध्वीचा अचानक मृत्यू झाला होता. काही वेळापूर्वी साध्वीच्या खोलीत आगेच्या ज्वाळा दिसल्याने आश्रमातले सगळे तिकडे धावले. पण आग लागल्याचे उशीरा लक्षात आल्याने आता काहीही उपयोग नव्हता. पाण्याने आग विझवण्यात आली पण आता खोलीत केवळ साध्वीच्या शरीराची हाडं आणि राख उरली होती. आता पोलिसांना बोलावणाशिवाय पर्याय नव्हता. थोड्याश्या नाखुशीनेच पण नाईलाज म्हणून आश्रमप्रमुखांनी पोलिसांना पाचारण केले. प्राथमिक तपासावरून साध्वीने आत्महत्या केली असे दिसत होते. कारण आग लागण्यासाठी कुठलाही ज्वलनशील पदार्थ खोलीत नव्हता. शॉर्ट सर्कीट वगैरे भानगडसुद्धा वाटत नव्हती. पण पोलिसांसमोर दोन प्रश्न होते. एक म्हणजे, फक्त हाडं आणि राख यावरून मृत्यू झालाय हे कसं ठरवायचं ? आणि एकवेळ ते जरी मान्य केलं तरी आगपेटी,रॉकेल असं काहीही जवळपास नसताना आग लागली किंवा लावली तरी कशी ?
"साध्वीने आत्मदाह तर केलं नसेल ?", कोणीतरी कुजबजलं.

झालं ! साध्वीच्या आत्मदाहाची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. आश्रमासमोर एकचं गर्दी लोटली. आत्मदाह म्हणजे काय असं प्रश्न लोकं दबक्या आवाजात विचारू लागले. काही धर्मगुरूंनी आत्मदाह विषयावर लगेच वक्तव्य द्यायला सुरु केलं. एका योगगुरूने तर," योगशक्तीने आत्मदाह संभव!" हे बोलून खळबळ माजविली. दुपारी बारा वाजेपर्यंत देशभरात बातमी पोहोचली होती. साध्वीला संतपद देण्याची चर्चा सुरु झाली. तिच्या देहाचे अवशेष अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करण्यासाठी पोलिसांवर दबाव आला. नाईलाजाने पोलिसांनी ते सुपूर्द केले पण तपास चालूच ठेवला.
संध्याकाळी सहा वाजता, स्मशानात हजारोंच्या उपस्थितीत समाजातील मोठ्या व्यक्तींच्या हातून साध्वीचे अंत्यसंस्कार पार पडले.
*******************************************************************************
त्या शहरापासून अंदाजे तीनशे किमी दूर असलेल्या गावातल्या एका लॉज मध्ये तो तिला घेऊन पोहोचला. ती जरा घाबरली होती.
"सुटलो एकदाचे", तो म्हणाला.
"पकडल्या गेलो तर", ती म्हणाली.
"काहीही होणार नाही. आपण निसटलोय ! आता फक्त तू आणि मी !," असे म्हणत त्याने तिला जवळ घेतले.
******************************************************************************
तीन-चार दिवसांपूर्वी मरणासन्न अवस्थेत असताना जनाबाई आपल्या नशिबाला दोष देत होती. आयुष्यभर लोकांची घरातील धुणी-भांडी करता करता जनाबाई चार पैसे तर जोडू शकली नाहीच पण म्हातारपणी आधार देतील अशी चार माणसंसुद्धा जमवता आली नाहीत ह्याची तिला खंत होती. आता मेल्यावर 'चार खांदे' तरी गोळा होतील का ह्याविषयी ती साशंक होती. शेवटी व्हायचे तेच झाले. झोपडीत मृतावस्थेत सापडलेल्या जनाबाईच्या देहाला म्युनीसीपाल्टीच्या गाडीने स्मशानात पोहोचवले. तिसऱ्या दिवशीसुद्धा जनाबाईचं 'तिसरं' करायला कोणीही आलं नाही. अर्थात मेल्यानंतर जनाबाईला ह्या गोष्टीने काहीही फरक पडत नव्हता.
रात्र झाल्यावर स्मशानाचा रखवालदार झोपायला गेला. मध्यरात्री खुडबुडीने त्याला जाग आली. पण मढ्यावर नेहमीप्रमाणे कुत्रं  चढलं असेल ह्या विचाराने तो परत झोपी गेला. त्याचा अंदाज काही फार चुकला  नाही. कुत्रंच होतं पण पिसाळलेलं आणि मानवी रुपातलं ! वीस-बावीस वर्षाचं एक पोरगं धडपडत मढ्याच्या ओट्यापाशी आलं. चिता शांत झाली असली तरी धग अजूनही कायम होती. तो दुसऱ्या ओट्यापाशी आला. जनाबाईच्या देहाची हाडं आणि थोडी राख त्याने जवळच्या पोत्यात भरली. आणि तिथून पसार झाला. आजच्या रात्रीत अजून त्याला बरीच कामं पार पाडायची होती!
********************************************************************************
बऱ्याच वेळ त्याच्या कुशीत झोपल्यावर तिला जाग आली. डोके जड झाले असले तरी आपण स्वतंत्र झालोय ह्या भावनेमुळे  तिला मोकळे वाटत होते. एव्हाना त्यालाही जाग आली होती.
तेव्हढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. दरवाज्यावर पोलिसांना बघून दोघेही घाबरले !
********************************************************************************
पण  आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या जनाबाईच्या देहाची राखसुद्धा मनात सुखावली होती........कारण 'चार खांद्यांची' तिची अंतिम इच्छा चार हजार खांद्यांनी पूर्ण केली होती !!
****************************************************************************
समाप्त

(सत्यघटनेवर आधारित)

No comments:

Post a Comment