Sunday, 26 February 2017

फोनाफानी...

"हालो ...बापूसायब बोलून ऱ्हायले का जी ?
"हा मंग...कोन बोलून ऱ्हायलं? "
"आहो मी....मी पद्मा बोलून ऱ्हायली"
"पद्मा?" बापुसायबाले कायबी टोटल लागेना.
"वळखलं नाय का?"
"आवाज वळखीचा हाय पन आठवू नाय ऱ्हायला."
"अवं मी भौसायबाची सून..तुमी नाय का त्यादिवशी घरी आल्ते?"
"हा हा ...बोला सुनबाई ..आत्ता आलं ध्यानात."
आता भौसायबाची सून आपल्याला कायले फोन करू ऱ्हायली ते बापुसायबाले  कळेना..
"बापूसाहेब येक अडचण व्हती. मदत करसान का?"
"सांगा की सुनबाई. अवं हक्क हायं तुमचा.भौसायबाची सून म्हंजे आमचीबी सून."
"आता काय सांगावं ..मामंजी अन हे गेले गावाले हप्ताभरासाठी. अन हिकडं आम्ही अडचणींत पडलो."
"कायची अडचण. सांगा तं येक डाव."
"आवं म्या घरी येकलीच हायं. अन हे सारे वावरातले मजूर आले हिथं पैसे मागाले."  
"काह्यचे पैसे?"
 "आवं ते कायतरी नोटबंदी केली म्हन्ते ना सरकारनी. या मजुराईले त्याईचे पैसे पायजे म्हन्ते सारे. आता मी कुटून देनार. पन्नास हजार हायेत साऱ्यायचे मिळून."
"बरं मंग आता?"
 "मले तं कैच समजू नाही ऱ्हायलं? ह्यांले फोन केल्ता तं म्हने तुमाले फोन करून मागून घे सद्याचे. ते वापस आले की बातचं देतील म्हने तुमचे पैसे. येवढी मदत करान का बापूसायब? लागनं तं हे फोन करतीनं तुमाले."

बापुसायब विचार करू लागले. अन येकदमच त्येच्या चेहऱ्यावर खुशी झळकू लागली. दोन दिवसापासून बापुसायब चिंतेत व्हते. नोटबंदीच्यान त्यायच्या बी खुट्या लटकेल व्हत्या. वाड्यातले धा लाख कुठं ठेवावं त्यांले समजत नव्हतं. त्यातल्या पन्नास हजाराची सोय झाली व्हती.

"आवं काय सुनबाई..हे काय विचारनं झालं? आपलंच घर हायं हे. पैसे घ्यायले येता की मानुस पाठवू तेव्हढं सांगा फकस्त."
"लय उपकार झाले बापूसायब. म्या पाठवते मानसाले."
"काह्यचे उपकार सुनबाई..भौसायब आमचे दोस्त !! त्याईले नाहीतं कोनाले मदत करनार. पाठवा मानसाले.अन ते पैसे परत द्यायचं का न्हाय ते मी अन भौसायब पाहू. तुमी नका टेन्शन घेऊ."

बापुसायबानी फोन ठेवला. त्यांले जरा बरं वाटू लागलं. आता अशेच दोन-तीन बकरे सापडले का त्यांचं काम व्हनार व्हतं. दोन मिनिटात फोन परत वाजू लागला. मगाचाच नंबर व्हता.

"हालो"
"हालो बापुसायब..मी पद्मा बोलू ऱ्हायली"
"हा बोला सुनबाई..काय झालं?"
"ह्यांले फोन केल्ता बापूसायब..त्यायनं लयडाव आभार मानले तुमचे."
"आवं काय सुनबाई."
"बापुसायब..त्याईनं तुम्चावाला तो बॅंकेतला नंबर असते का न्हाई, तो मागायले सांगतला. आल्यावर चेक फाडून देतो म्हने लगेच."
"आवं राहूद्या सुनबाई. मी बोलन नंतर भौसायबाशी."
"आवं बापूसायब..मी बायमानूस काय बोलनार त्येंच्यासमोर. तुमी देऊन टाका जी मले नंबर.नायतर चिल्लावंतीन मायावर."
"बरं. मी देतो तुमाले. मॅसेज पाठवू काय तुमच्या फोनवर."
"ते मले नाय ना समजत..तुमी पाठवा, म्या देईल त्यांले आल्यावर."
"बरं..पन मले सांगतल्याशिवाय चेक फाडू नका म्हना त्याले."
"हांव"

बापुसायबानी फोन ठिवला. अन मॅसेज पाठवून देल्ला अकाऊंट नंबरचा.

सातेक मिनिटं झाले असतीनं तं फोन परत वाजला.
बापुसायबानी फोन हातात घेतला तं बँकेचा मॅसेज आल्ता.
"प्रिया ग्राहक, तुमच्या xxxxxxxxxxxxxxxxx या खात्यामध्ये रु.५००००० नगद जमा झाली आहे."

बापुसायबाले काहीच समजेना. थोडं शुद्धीत आल्यावर त्याईनं भौसायबले फोन लावला.
"हे काय केलं भौसायब तुमीनं?"
"काय झालं बापूसायब?"
"आवं तुमच्या सुनबाईचा फोन आल्ता मले आत्ता पैसे मागायला. अन आता...."
"आमच्या सुनबाईचा??...कायतरी गलती होत आसन बापुसायब. आमच्या सुनबाई माहेरी हायेत बाळंतपणासाठी. त्या कायले तुमाले फोन करतीनं ??"


बापूसायब गपकनं जमिनीवर बसले.

No comments:

Post a Comment