Tuesday, 17 January 2017

बोहनी...

       नंद्या सकाळपासून खुशीत होता. आजपासून त्याला नवीन काम मिळालं होतं. राजाभाऊंकडून एक रिक्षा त्याने भाड्याने चालवायला घेतली होती. नंद्या तसा मेहनती,अंगापिंडाने मजबूत गडी. आजवर कधी हमाल,कधी बांधकामावरचा मजूर, कधी रंगरंगोटी कामगार असे बरेच कामं त्याने केले होते. पण महिन्याभरापासून नंद्या घरीच होता. बांधकामावर मिस्त्रीशी झालेल्या मारामारीनंतर नंद्या दहा-बारा दिवस जेलमध्ये होता. तिथून सुटल्यावर त्याला काहीच कामं मिळालं नाही. बायको चार घरी धुणीभांडी करायची म्हणून जेमतेम निभत होतं. नंद्या खिन्न मनाने घरात स्वतःला दोष देत बसायचा. त्या मारामारीमध्ये नंद्याचा दोष नसला तरी चिडून पहिल्यांदा हात त्यानेच उगारला होता. ह्या सगळ्यात त्याचा एक-दिड महिना वाया गेला. शेवटी मेव्हण्याच्या ओळखीने त्याने रिक्षा मिळवली. राजाभाऊ तसा बिलंदर माणूस. नंद्याची अडचण ओळखून त्याने रिक्षाचं  भाडं जास्त सांगितलं. शेवटी सात रुपये रोज अश्या भाडयावर त्याने नंद्याला रिक्षा दिली.राजाभाऊंच्या इतर रिक्षा पाच रुपये भाड्यावर चालायच्या. भाडंसुद्धा रोज जमा करायचं ठरलं होतं. नाहीतर राजाभाऊ व्याज लावेल अशी नंद्याला तंबी दिली होती. ह्यासाठी नंद्याला दिवसाची किमान चाळीस रुपये कमाई आवश्यक होती. दिवसभर सायकलरिक्षा दामटवुन फक्त चाळीस रुपये कमाई हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हेच ह्या धंद्याचं सत्य होतं. बांधकामावर असताना नंद्याला साधारण साठ रुपये रोज मिळायचे. पण नंद्याजवळ सध्यातरी दुसरा कुठलाच उपाय नव्हता.त्यामुळे मेहनत करून जे मिळेल त्यात भागवायचं असं नंद्याने ठरवलं.

नंद्या सकाळीच रिक्षा घेऊन घराबाहेर पडला. अनेक दिवसांनी सायकलरिक्षा चालवत असल्यामुळे नाक्यापर्यंतचं नंद्याची दमछाक झाली होती.पाय लटपटत होते. पण नंद्या धीराने नाक्यावर उभा राहिला. तिथे आधीच चार-पाच रिक्षा येऊन उभ्या होत्या. त्या रिक्षावाल्यांनी नंद्याला हटकले.
"हिकडं कुठं उभं रायलास रे?"
"हिकडं म्हंजे?"
"हा आमचा एरिया हाय.हिथून सवाऱ्या घ्यायच्या न्हाय. पुढं जाऊन उभं ऱ्हाय."
"मी हिथंच उभं रायनार. जागा कोणाच्या मालकीची न्हाय."

चार-पाच रिक्षावाल्यांनी मिळून नंद्याला हाकलून लावले. परत भांडण नको म्हणून नंद्या मुकाट्याने निघाला.पलीकडले दोन-तीन नाके सोडून नंद्या पुढे जात राहिला. शेवटी एका फाट्यावर येऊन त्याने रिक्षा थांबवली. इकडंतिकडं नजर फिरवल्यावर तिथे विरळ वस्ती असल्याच्या त्याच्या लक्षात आलं. पण त्याचा नाईलाज होता. बऱ्याच वेळ थांबल्यावर एक जोडपं तिथे आलं.
"खाली आहे का?"
"हो..कुठं जायचं?"
"येष्टी स्टॅन्ड...किती घेणार?"
"दहा रुपये"
"सात देईन"
"नाही परवडत दादा..बराच लांब हाय स्टॅन्ड"
"राहू दे मग"
ते जोडपं निघालं. नंद्या परत आवाज देईलच ह्याची त्यांना खात्री असावी.
"बसा दादा..आठ देजा."
"सातचं देईन"
"काय येक रुपयासाठी..बरं बसा"

जोडपं बसलं. नंद्या वेगाने निघाला. रिक्षाच भाडं तरी निघालं होतं. येष्टी स्टँडावर एखादी तरी सवारी मिळेलच असं त्याला वाटलं. बोहनी मिळाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण स्टॅण्डवर पोहोचेपर्यंत तो पुरता थकून गेला. पैसे घेतल्यावर इतर रिक्षावाल्यांच्या नजरेपासून दूर जाऊन तो उभा राहिला. लागलीच त्याला दहा रुपयाची एक सवारी मिळाली. लटपटणाऱ्या पायांकडे दुर्लक्ष करून नंद्या रिक्षा दामटवू लागला. मुक्कामावर सोडल्यावर नंद्याने जरा श्वास घेण्यासाठी रिक्षा थांबवली. सकाळचे सात आणि आत्ताचे दहा त्याने वेगवेगळ्या खिशात ठेवले. आणि तो पुढच्या सवारीची वाट पाहू लागला. तासभर थांबूनही त्याला सवारी मिळाली नाही. एखादी सवारी मिळाल्यास नंतर घरी जेवायला जावे असं त्याने विचार केला होता. एक स्त्री तिच्या लहान मुलासोबत त्याला दुरून येताना दिसली. तिने जवळ आल्यावर विचारलं.
"अंबापेठेत सोडाल का ?"
"हो..सहा रुपये."
“ठीक आहे"
मुलाला बसवून ती स्त्री रिक्षात बसणार तेवढ्यात पाऊस सुरु झाला. नंद्याने कापडी पडदा बांधायला घेतला तशी ती स्त्री म्हणाली,
"राहू द्या. मी जाते घरी. पावसात नको जायला"

त्यानंतर अडीच-तीन तास पाऊस सुरु होता. नंद्या उपाशीपोटी पाऊस थांबण्याची वाट बघत बसला. पाऊस थांबल्यावर नंद्या निघणार तेवढ्यात मोटारीवरून लाकडी फलटया घेऊन दोन माणसं आली.
"या फलटया पोचवान का या पत्त्यावर?"
"आता नाही जमणार"
"पोचवा की भाऊ. पावसात भिजतीन म्हणून म्हंतो. न्हायतर गाडीवरच नेणार होतो."
फलटया तश्या वजनदार दिसत होत्या. होय नाही करता करता नंद्या तयार झाला. एका माणसाने पत्ता लिहिलेला कागद नंद्याच्या हातात दिला.
"हिथं पोहोचा. आम्ही येतो मागंमागं."
"हे नाही वाचता येत मला. तुमच्या मांग येतो मी."
"ठीक आहे"

नंद्या निघाला. रस्त्यात राजाभाऊंच्या घरी थांबून त्याने भाडं देऊन टाकलं. या सवारीचे २० रुपये त्याला मिळणार होते. गाडीच्या मागे जाता जाता नंद्या दमला होता. पंधरा वीस मिनिटे रिक्षा चालवल्यावर नंद्या मुक्कामावर पोहोचला. ती जागा बघून तो थक्क झाला. आता त्याला करावे समजेना. कारण एक महिन्यापूर्वी जिथे त्याचे भांडण झाले होते ही तीच बांधकामाची जागा होती! आणि त्याच बांधकामात लागणाऱ्या लाकडी फलटया त्याने आणल्या होत्या!

रिक्षा बघून तिथला मिस्त्री बाहेर आला. त्या दोन माणसांनी मिस्त्रीला फलटया उतरावयाला  सांगितल्या. मिस्त्रीने रिक्षाकडे बघताच त्याला नंद्या दिसला. नंद्या नजर टाळू लागला.
"तू कायला आला रे भडव्या इथं?"
नंद्या काहीच बोलला नाही.
 "त्याला काय म्हणताय मिस्त्री तुम्हीतो रिक्षावाला आहे"
"हरामखोर चोर आहे हा"
नंद्या शक्य तितका शांत राहत होता. पण मिस्त्री काही थांबायला तयार नव्हता.
"अहो इथंच चोरी केली या सायाच्याने. वरतून मलेच मारत होता त्यादिवशी.पोलिसमध्ये देल्ला याले. तिथूनही पळाला असेल साला. थांब परत पोलिसात देतो तुले."
"म्या नाही केली चोरी. पोलिसाने सोडलं मले. रिक्षाची सवारी घेऊन आलो हिथं. उतरावा फलटया अन जाऊद्या मले."
"आता नाही सोडत तुले"

थोड्यावेळाने नंद्या पोलिस स्टेशनमध्ये होता. साहेब यायचे होते म्हणून हवालदाराने त्याला बसवून ठेवले.
"साहेब जाऊद्या मले. म्या काहीच केलं नाही."
"थे सगळं सायबाले सांग."
"काय सांगू त्यांला.तो मिस्त्री उगाच मागं लागलाय माझ्या.एक महिना झाला मला जेलमधून सुटून साहेब."
"असं हाय का..सोडतो मी तुले..पण....."
"पण काय सायब?"
"तोडपाणी?"
"सायब रिक्षेवाला हाओ मी..काय देणार तुमाले?"
"मंग बस असाच..सायेब आले की पायतीन."
"सायब काहीच पैशे न्हाय खिशात..दहा रुपये हयात फक्त."
"आन हिकडं..अन जाय हितून..."

आणखी टाइम खोटी करण्यापेक्षा पैशे दिलेले बरे असं विचार करून नंद्या पैशे देऊन तिथून निघाला. नंद्या रिक्षा घेऊन रस्त्यावर आला त्यावेळी दहा वाजले होते. तो भुकेने कासावीस झाला होता. पण घरी कुठल्या तोंडाने जाणार?


शेवटी थकलेला,भुकेला नंद्या रात्री दहा वाजता निर्जन रस्त्यावर बोहनीच्या शोधात निघाला!!

No comments:

Post a Comment