Tuesday, 3 January 2017

चेंडूफळीच्या गोष्टी !

"२००३ वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना. भारत वि ऑस्ट्रेलिया! भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. तेवढ्यात ऑस्ट्रलियन ओपनर्स  ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू  हेडन मैदानात येत आहेत. भारतीय कप्तान सौरव गांगुली संघासोबत चर्चा करतोय. आज एक नवीन बॉलर   भारतातर्फे पदार्पण करतोय. गांगुलीने त्याच्या हातात नवीन चेंडू सोपवला. कोण हा नवीन बॉलर? ह्याचे नावही फारसे ऐकलेले नाही. अजून कॅमेरा त्याच्यावर गेला नाहीये. दुरून तो रन-अप घेताना दिसतोय. हळूहळू कॅमेरा त्याच्या जवळ जातोय. अरे देवा !! भारताचा नवीन बॉलर !!!!................मी !! ?????"

        खडबडून मी झोपेतून जागा होतो. जंजीर मध्ये अमिताभ जागा होतो अगदी तस्सा! "बीस साल से ये जंजीर" च्या चालीवर "बीस साल से ये मॅच" असले काहीतरी विचार माझ्या डोक्यात सुरु होतात. सगळं अगदी जंजीरसारखंच! फरक असेल तर तो एवढाच की जंजीरमध्ये अमिताभ पूर्ण सिनेमाभर अजितच्या मागे खाऊ की गिळू या नजरेने धावत असतो. पण इथं हेडन -गिलख्रिस्ट माझ्यामागे धावतायेत असं वाटते. अरे काय चाललंय काय ??? एकवेळ माझा स्वतःच्या स्वप्नांवर कंट्रोल नाही हे समजू शकतो पण गांगुलीलासुद्धा कळू  नये?? स्वप्नातही मला गिलख्रिस्टसमोर बॉलिंगला उभं करण्याइतपत अक्कल गहाण ठेवलीये का त्यानी? अहो आमच्या आंतर-गल्लीय  मॅचमध्येसुद्धा मला बॉलिंग करू देत नव्हते.म्हणजे बॅटिंग करू देत होते असंही काही नाही! माझी फील्डीन्ग पोझीशनसुद्धा क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही अशीच असायची. वेगवेगळ्या बॅट्समनच्या क्षमतेनुसार जिकडे बॉल मारण्याची शक्यता कमी तिथेच माझी नेमणूक व्हायची. जिथं कमी तिथं आम्ही ! गल्ली क्रिकेटमध्ये एक बरं असतं की प्रत्येकाची खेळातील भूमिका ही आपसूकच ठरते. म्हणजे बघा, जो फास्टर नाही पण प्रसंगी बॉलिंग करतो तो स्पिनर ! मग त्याचे बॉल सुतासारखे सरळ पडलेत तरी हरकत नाही.जो दिसायला तगडा तो बॅट्समन. त्याच्या बॅटींगचं तंत्र एकचं, दिसला की हाण अन नाही दिसला तरी हाण ! जो बॅटींग-बॉलिंग काहीही करू शकत नाही पण आवाज करू शकतो तो ऑलराउंडर! आणि आमच्यासारखा नुसताच उत्साही कोणी असला की तो फील्डर! पण ह्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा असतो तो संघाचा चीफ स्ट्रॅटेजिस्ट. आमच्या टीमचा स्ट्रॅटेजिस्ट गल्लीतल्या दुसऱ्या टीमच्या आधी मैदान कसे बळकावयाचे इथपासून ते त्याच टीमबरोबर असलेली अकरा रुपये पैजेची मॅच कशी जिंकायची ह्या सगळ्या 'स्ट्रॅटेज्या' ठरवायचा . पण असं असतानाही माझं संघातलं महत्व अनन्यसाधारण होतं. त्याचं कारण म्हणजे मैदानाला लागूनच असलेल्या एका बंगल्यात बॉल वारंवार जायचा. तिथल्या चिंचोळ्या गल्लीत जाण्यायोग्य शरीरयष्टी फक्त माझ्याकडे होती! बऱ्याच वेळेला तर त्या बंगल्याची भिंत हीच माझी फिल्डिंग पोझीशन असायची. त्या भिंतीवर बसून मी कितीतरी भावी श्रीनाथ,कुंबळे,अझर अन कांबळी बघितले.("सचिन" हे मानाचं पद मात्र मी कधीही कोणाला दिले नाही आणि देणारही नाही!)  त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, माझं सोडा पण आमच्या गल्लीतले सगळे भावी दिग्गजसुद्धा त्या मैदानाची चौकट कधी ओलांडू शकले नाहीत.असो.

         माझ्यासाठी क्रिकेट हा खेळण्यापेक्षा बोलण्याचा खेळ अधिक होता. मैदानात अंधार असला तरी माझ्यातला क्रिकेटतज्ञ(!)तेंव्हा फुल फॉर्ममध्ये फटकेबाजी करायचा. तिथे क्रिकेटपेक्षा आमचा जाज्वल्य देशाभिमान जास्त डोकावयाचा ही गोष्ट वेगळी! मॅकग्राथपेक्षा श्रीनाथ काकणभर सरस कसा हे पटवण्यासाठी मी तासोनंतास भांडलो आहे. किमान मैदानाबाहेर तरी व्येंकटेश  प्रसादला जयसूर्यापासून वाचवण्यासाठी मी माझ्या परीने किल्ला लढवला आहे. खरं म्हणजे, प्रसाद हा भरतनाट्यम कलाकार होण्याऐवजी चुकून गोलंदाज झाला असं माझं स्पष्ट मत आहे. पण आमिर सोहेल प्रकरणामुळे प्रसादने आमच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवले. आणि जयसूर्यासमोर प्रसाद म्हणजे 'कसायाच्या दावनीले बांधली जशी गाय' इतका केविलवाणा वाटायचा. त्या परिस्थितीत त्याचा बचाव करणे हे आमचे आद्यकर्तव्य होते. ९६ सालच्या एका कसोटीत अॅलन डोनाल्डने सचिनचा उडवलेला त्रिफळा हा सचिनपेक्षा जास्त माझ्या जिव्हारी लागला होता. त्या बॉलवर उपाय शोधण्यासाठी मी स्वतः त्या पद्धतीने बाद होऊन पाहिले आहे (अर्थात माझी नेहमीची बाद होण्याची पद्धत काही वेगळी नव्हती!) नंतर कधीतरी द्रविडने डोनाल्डच्या उडवलेल्या चिंध्या मी "गब्बरसिंग तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे" अश्या ऐटीत साजऱ्या केल्या होत्या. डोनाल्ड, अँब्रोस ह्या लोकांसमोर मला गब्बरसिंग आजही सज्जन वाटतो. कारण गब्बर कमीत कमी सांगून तरी मारायचा. इकडं अँब्रोससमोर सिद्धू,जडेजा आपापला स्टान्स बदलेपर्यंत स्टम्प्स उडालेले असायचे. मुळात सिद्धू,जडेजा ही नवाबी थाट असलेली माणसं. आता सकाळी ९:३० ला नेट प्रॅक्टिस सुरु करायच्या वेळी जर थेट सामनाच सुरु झाला तर त्याला ते तरी काय करणार! (ह्याच सिद्धूनी नंतर वेस्टइंडीजमध्ये जाऊन द्विशतक ठोकल्यावर आंम्ही हातापायाची बोटं तोंडात घातली होती!)

       भारतीय संघाने क्रिकेटच्या सगळ्या पैलूंवर केलेल्या प्रयोगांची संख्या गिनीज बुकात नोंद होण्यासारखीच आहे. सोळा महिन्यात पाच विकेटकीपर बदलण्याचा भारतीय संघाचा विक्रम/प्रयोग अजूनही अबाधित आहे. दीप दासगुप्ताला विकेटकीपर म्हणून उभे करणे ह्याला प्रयोग म्हणावे की सुसाईड अटेम्प्ट ह्यावर तज्ञांमध्ये दुमत आहे. डोळ्याला पट्टी बांधूनसुद्धा धोनीने दासगुप्तापेक्षा चांगली कीपिंग केली असती! इन्जुअर्ड श्रीनाथच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून ऑफ स्पिनर नोएल डेव्हिडला त्रिनिनादला पाठवणे हा तर ड्युएल मीनिंग जोक होता. कारण वेगवान गोलंदाजाला फिरकीने रिप्लेस करणं विनोदी असलं तरी एका फिरकीपटूला पदार्पणासाठी वेस्ट इंडीजला पाठवणं ही त्याहून मोठी थट्टा होती. ज्याला जे जमतं ते सोडून बाकी सगळं करायला लावणं ही भारतीय परंपरा क्रिकेटमध्येही इमानेइतबारे पाळल्या गेली. ऑलराऊंडर शोधण्याच्या नादात इरफान पठाणसारख्या उमद्या गोलंदाजाच्या हाती बॅट देऊन,"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असं सांगणं हा त्यातलाच प्रकार होता.सलामीवीरांची समस्या तर कसोटी क्रिकेटच्या उदयापासूनच आपल्याला भेडसावत आहे. त्यामुळे नयन मोंगियाला एखाद्यावेळी सलामीला पाठवणे समजू शकतो. पण म्हणून काय वनडेत सचिनच्या डेझर्ट स्टॉर्म खेळीच्या वेळी वन डाऊन पोझीशनलासुद्धा मोंगियाला पाठवायचं? तेही संघात अझर,लक्ष्मण,जडेजा,कानिटकर असताना!! सचिनला जनतेने 'देवत्व' का दिले असावे ह्याचा यावरून अंदाज येऊ शकतो. ह्याच कारणाने द्रविडही संतपदापर्यंत पोहोचला. कसोटीत द्रविडची वन डाऊन पोझीशन ही ऍज गुड ऍज सलामीवीराचीच होती. कारण बॉलचा लाल रंग उतरेपर्यंत एखादातरी माई का 'लाल' सलामीवीर परतलेला असायचा. तसं पाहिलं तर द्रविडने मैदानावर अंपायर सोडून इतर सर्व भूमिका निभावल्या असतील !

           भारतीय संघ ते टीम इंडिया हे स्थित्यंतर आम्ही ह्याची देही ह्याची डोळा बघितले आहे. ह्यात कितीतरी जय-पराजय,शह-काटशह अनुभवले. आता क्रिकेटची 'ती' पिढी बदलली. आजही क्रिकेट बघितल्या जाते. पण जुनी पिढी जशी आमच्या तेंडुलकर मध्ये त्यांचा गावस्कर शोधायची, तसेच आम्हीही आजच्या विराटमध्ये कालचा सचिन शोधतो.गावातल्या मैदानाजवळचा तो बंगला आणि ती भिंत आजही तशीच आहे. फक्त त्या चिंचोळ्या गल्लीत बॉल मारायला आणि शोधायला आता कोणीही नाही !

--चिनार

1 comment: