Wednesday, 25 January 2017

मी सध्या काय करतो ?

      नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या  अब्जावधी लोकांपैकी मी एक !

      एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय  अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलोच तर 'देवा,हा अजून आहेच का ?'असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण,'मी तेंव्हातरी काय करायचो?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!

      तसं आमच्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक वगैरे व्हायचा असल्यामुळे एका वर्गात 'साठ-सत्तरचं'(!) मुलं असायची. अश्यावेळी उजवीकडल्या दुसऱ्या लाईनीतील पाचव्या बाकड्यावर बसलेल्या माझ्याकडे बाईंचं लक्ष जाण्याची शक्यता कमीच होती. त्यासाठी वर्गात असलेली अप्रतिम प्रकाशयोजना आणि आमचा एकंदरीतच शैक्षणिक अंधार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. तरीसुद्धा कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर केला तरी तो त्यांना दिसत नसे. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं. त्याचा प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष फायदे असतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात नव्हते. मग आम्ही वर्गात फेमस कसे होणार? मग एखादी मुलगी आमच्याकडे कशी बघणार? आणि “मी सध्या काय करतो” हा प्रश्न तिला कसा पडणार? तसं शाळेतल्या एका पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे  बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर चाळीस-बेचाळीस आणि मार्कही साधारण तेव्हढेच !! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घेऊन येण्याची परिक्रमा मी ०.००३ सेकंदात पूर्ण करायचो. मग तीसुद्धा संधी गेली (त्या शिक्षकांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल कारण्याएवढं कायद्याचं ज्ञान त्यावेळी नव्हतं ह्याची खंत वाटते.) तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकलो नाही. आणि मी स्वतः लावलेल्या जोडीची व्हॅलिडिटी अट्ठेचाळीस तासाच्या वर टिकत नव्हती. शाळेच्या वार्षिक उत्सवात हिंदी-मराठी  गाण्यांवर मुलामुलींचे नाच बसवण्यात यायचे. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फारच फार 'शूर आम्ही सरदार' या गाण्यासाठी कोरस मध्ये मला उभं करायचे. बरं शाळेत जाऊद्या, पण रिक्षातून येताजाता एखाद्या मुलीशी ओळखबिळख व्हावी म्हणावं तर बोंबलायला आमचं घर शाळेच्या बोडख्याशी! प्रार्थनेचा 'पssssssssssहिsssssssला नमस्कार' सुरु झाल्यावर घरून निघालं तरी पाचव्या नमस्कारापर्यंत मी शाळेत पोहोचायचो. अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'ती'च्याविनाच गेलं.

       'कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतेच ना बे' या एकमेव आशेवर आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे आमच्या ध्यानातच आलं नाही. शाळेतल्या "चल हो बाजूला" म्हणणाऱ्या साळकाया- माळकाया आता "ओह एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत होत्या. अन आम्ही अजूनही "आय माय कमीन सर?" च्या पलिकड़े गेलो नव्हतो. त्यांच्या नवीन कोऱ्या स्कुटया आमच्या हर्क्युलस बाबाच्या शेजारी ऐटीत उभ्या राहायच्या. आता ब्राउनी पॉईंट्स मिळवायची पद्धतही बदलली होती. त्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून नोट्स वगैरे काढाव्या लागायच्या. चला एकवेळ ते ही केलं असतं, पण नोट्स काढायला समोरचा कुठल्या विषयावर बोलतोय हे तरी कळायला हवं ना? आमच्यातले काही उत्साही कार्यकर्ते प्रॅक्टिकलच्या वेळी मुलींना मदत करायला जायचे. जणू इंजिनाचा शोध यांच्या परसातचं लागला होता या थाटात बोलायचे. मला तर व्हर्नीयर (का कॅलिपर काय म्हणतात ते?) वापरून रीडिंगही घेता येत नव्हतं. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे माझे कॉलेजमधले  मित्र 'जोड्या लावणे' खेळत नव्हते. 'अबे कोणाशीही लाव पण लाव' अशी भूमिका असायची. कारण त्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. शेवटी काही सीनियर्सनी,'नजरेत येण्यासाठी' आम्ही गँदरिंगमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये सामील व्हावं असं सुचवलं.पण आमची 'नसलेली ख्याती आणि असलेले गुण' बघता आम्हाला दरवेळी एकच कमिटी मिळायची. डिसिप्लिन कमिटी !! केंद्रीय मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्र्याचं जे स्थान असतं तेच कॉलेज गॅदरिंगमध्ये  डिसिप्लिन कमिटीचं असतं. त्यांना कोणीही विचारत नाही! उलट नुसतेच उभे असतात म्हणून एखादयाची बॅग पकडायची जबाबदारी त्यांच्यावर येते. गॅदरिंगच्या त्या दोन दिवसात एखाद्या मुलीने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त 'ह्या नाटकाची प्रॅक्टिस कुठे सुरु आहे रे?' एवढं विचारण्यापुरती असते! शेवटी आमचं कॉलेजही तिच्याविनाच गेलं.

      अर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक वेंधळेपणा, अफाट न्यूनगंड आणि तरीसुद्धा असलेली बेफिकीर वृत्ती(किंवा निर्लज्जपणा म्हणा हवं तर) परमेश्वराने आमच्यांतच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलींनी इंप्रेस व्हावे ही मनीषा तरी बाळगू नये, पण नाही ना ! येताजाता एखाद्या मुलीने चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर स्वप्नांचे इमले डायरेक्ट वरातीपर्यंत पोहोचायचे! नंतर ह्याच मुलींच्या लग्नाच्या वराती आमच्या डोळ्यासमोरून गेल्या.

या परिस्थितीत ती सध्या काय करते हा प्रश्न मला शंभर मुलींच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करतो असं प्रश्न एक शंभरांश मुलींनाही पडणार नाही.आणि पडलाच तर त्याचे तिच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !

"तो सध्या काय करतो?....कॉलेजमधून बाहेर पडला असेल ना एव्हाना?

--चिनार

Tuesday, 17 January 2017

बोहनी...

       नंद्या सकाळपासून खुशीत होता. आजपासून त्याला नवीन काम मिळालं होतं. राजाभाऊंकडून एक रिक्षा त्याने भाड्याने चालवायला घेतली होती. नंद्या तसा मेहनती,अंगापिंडाने मजबूत गडी. आजवर कधी हमाल,कधी बांधकामावरचा मजूर, कधी रंगरंगोटी कामगार असे बरेच कामं त्याने केले होते. पण महिन्याभरापासून नंद्या घरीच होता. बांधकामावर मिस्त्रीशी झालेल्या मारामारीनंतर नंद्या दहा-बारा दिवस जेलमध्ये होता. तिथून सुटल्यावर त्याला काहीच कामं मिळालं नाही. बायको चार घरी धुणीभांडी करायची म्हणून जेमतेम निभत होतं. नंद्या खिन्न मनाने घरात स्वतःला दोष देत बसायचा. त्या मारामारीमध्ये नंद्याचा दोष नसला तरी चिडून पहिल्यांदा हात त्यानेच उगारला होता. ह्या सगळ्यात त्याचा एक-दिड महिना वाया गेला. शेवटी मेव्हण्याच्या ओळखीने त्याने रिक्षा मिळवली. राजाभाऊ तसा बिलंदर माणूस. नंद्याची अडचण ओळखून त्याने रिक्षाचं  भाडं जास्त सांगितलं. शेवटी सात रुपये रोज अश्या भाडयावर त्याने नंद्याला रिक्षा दिली.राजाभाऊंच्या इतर रिक्षा पाच रुपये भाड्यावर चालायच्या. भाडंसुद्धा रोज जमा करायचं ठरलं होतं. नाहीतर राजाभाऊ व्याज लावेल अशी नंद्याला तंबी दिली होती. ह्यासाठी नंद्याला दिवसाची किमान चाळीस रुपये कमाई आवश्यक होती. दिवसभर सायकलरिक्षा दामटवुन फक्त चाळीस रुपये कमाई हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हेच ह्या धंद्याचं सत्य होतं. बांधकामावर असताना नंद्याला साधारण साठ रुपये रोज मिळायचे. पण नंद्याजवळ सध्यातरी दुसरा कुठलाच उपाय नव्हता.त्यामुळे मेहनत करून जे मिळेल त्यात भागवायचं असं नंद्याने ठरवलं.

नंद्या सकाळीच रिक्षा घेऊन घराबाहेर पडला. अनेक दिवसांनी सायकलरिक्षा चालवत असल्यामुळे नाक्यापर्यंतचं नंद्याची दमछाक झाली होती.पाय लटपटत होते. पण नंद्या धीराने नाक्यावर उभा राहिला. तिथे आधीच चार-पाच रिक्षा येऊन उभ्या होत्या. त्या रिक्षावाल्यांनी नंद्याला हटकले.
"हिकडं कुठं उभं रायलास रे?"
"हिकडं म्हंजे?"
"हा आमचा एरिया हाय.हिथून सवाऱ्या घ्यायच्या न्हाय. पुढं जाऊन उभं ऱ्हाय."
"मी हिथंच उभं रायनार. जागा कोणाच्या मालकीची न्हाय."

चार-पाच रिक्षावाल्यांनी मिळून नंद्याला हाकलून लावले. परत भांडण नको म्हणून नंद्या मुकाट्याने निघाला.पलीकडले दोन-तीन नाके सोडून नंद्या पुढे जात राहिला. शेवटी एका फाट्यावर येऊन त्याने रिक्षा थांबवली. इकडंतिकडं नजर फिरवल्यावर तिथे विरळ वस्ती असल्याच्या त्याच्या लक्षात आलं. पण त्याचा नाईलाज होता. बऱ्याच वेळ थांबल्यावर एक जोडपं तिथे आलं.
"खाली आहे का?"
"हो..कुठं जायचं?"
"येष्टी स्टॅन्ड...किती घेणार?"
"दहा रुपये"
"सात देईन"
"नाही परवडत दादा..बराच लांब हाय स्टॅन्ड"
"राहू दे मग"
ते जोडपं निघालं. नंद्या परत आवाज देईलच ह्याची त्यांना खात्री असावी.
"बसा दादा..आठ देजा."
"सातचं देईन"
"काय येक रुपयासाठी..बरं बसा"

जोडपं बसलं. नंद्या वेगाने निघाला. रिक्षाच भाडं तरी निघालं होतं. येष्टी स्टँडावर एखादी तरी सवारी मिळेलच असं त्याला वाटलं. बोहनी मिळाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण स्टॅण्डवर पोहोचेपर्यंत तो पुरता थकून गेला. पैसे घेतल्यावर इतर रिक्षावाल्यांच्या नजरेपासून दूर जाऊन तो उभा राहिला. लागलीच त्याला दहा रुपयाची एक सवारी मिळाली. लटपटणाऱ्या पायांकडे दुर्लक्ष करून नंद्या रिक्षा दामटवू लागला. मुक्कामावर सोडल्यावर नंद्याने जरा श्वास घेण्यासाठी रिक्षा थांबवली. सकाळचे सात आणि आत्ताचे दहा त्याने वेगवेगळ्या खिशात ठेवले. आणि तो पुढच्या सवारीची वाट पाहू लागला. तासभर थांबूनही त्याला सवारी मिळाली नाही. एखादी सवारी मिळाल्यास नंतर घरी जेवायला जावे असं त्याने विचार केला होता. एक स्त्री तिच्या लहान मुलासोबत त्याला दुरून येताना दिसली. तिने जवळ आल्यावर विचारलं.
"अंबापेठेत सोडाल का ?"
"हो..सहा रुपये."
“ठीक आहे"
मुलाला बसवून ती स्त्री रिक्षात बसणार तेवढ्यात पाऊस सुरु झाला. नंद्याने कापडी पडदा बांधायला घेतला तशी ती स्त्री म्हणाली,
"राहू द्या. मी जाते घरी. पावसात नको जायला"

त्यानंतर अडीच-तीन तास पाऊस सुरु होता. नंद्या उपाशीपोटी पाऊस थांबण्याची वाट बघत बसला. पाऊस थांबल्यावर नंद्या निघणार तेवढ्यात मोटारीवरून लाकडी फलटया घेऊन दोन माणसं आली.
"या फलटया पोचवान का या पत्त्यावर?"
"आता नाही जमणार"
"पोचवा की भाऊ. पावसात भिजतीन म्हणून म्हंतो. न्हायतर गाडीवरच नेणार होतो."
फलटया तश्या वजनदार दिसत होत्या. होय नाही करता करता नंद्या तयार झाला. एका माणसाने पत्ता लिहिलेला कागद नंद्याच्या हातात दिला.
"हिथं पोहोचा. आम्ही येतो मागंमागं."
"हे नाही वाचता येत मला. तुमच्या मांग येतो मी."
"ठीक आहे"

नंद्या निघाला. रस्त्यात राजाभाऊंच्या घरी थांबून त्याने भाडं देऊन टाकलं. या सवारीचे २० रुपये त्याला मिळणार होते. गाडीच्या मागे जाता जाता नंद्या दमला होता. पंधरा वीस मिनिटे रिक्षा चालवल्यावर नंद्या मुक्कामावर पोहोचला. ती जागा बघून तो थक्क झाला. आता त्याला करावे समजेना. कारण एक महिन्यापूर्वी जिथे त्याचे भांडण झाले होते ही तीच बांधकामाची जागा होती! आणि त्याच बांधकामात लागणाऱ्या लाकडी फलटया त्याने आणल्या होत्या!

रिक्षा बघून तिथला मिस्त्री बाहेर आला. त्या दोन माणसांनी मिस्त्रीला फलटया उतरावयाला  सांगितल्या. मिस्त्रीने रिक्षाकडे बघताच त्याला नंद्या दिसला. नंद्या नजर टाळू लागला.
"तू कायला आला रे भडव्या इथं?"
नंद्या काहीच बोलला नाही.
 "त्याला काय म्हणताय मिस्त्री तुम्हीतो रिक्षावाला आहे"
"हरामखोर चोर आहे हा"
नंद्या शक्य तितका शांत राहत होता. पण मिस्त्री काही थांबायला तयार नव्हता.
"अहो इथंच चोरी केली या सायाच्याने. वरतून मलेच मारत होता त्यादिवशी.पोलिसमध्ये देल्ला याले. तिथूनही पळाला असेल साला. थांब परत पोलिसात देतो तुले."
"म्या नाही केली चोरी. पोलिसाने सोडलं मले. रिक्षाची सवारी घेऊन आलो हिथं. उतरावा फलटया अन जाऊद्या मले."
"आता नाही सोडत तुले"

थोड्यावेळाने नंद्या पोलिस स्टेशनमध्ये होता. साहेब यायचे होते म्हणून हवालदाराने त्याला बसवून ठेवले.
"साहेब जाऊद्या मले. म्या काहीच केलं नाही."
"थे सगळं सायबाले सांग."
"काय सांगू त्यांला.तो मिस्त्री उगाच मागं लागलाय माझ्या.एक महिना झाला मला जेलमधून सुटून साहेब."
"असं हाय का..सोडतो मी तुले..पण....."
"पण काय सायब?"
"तोडपाणी?"
"सायब रिक्षेवाला हाओ मी..काय देणार तुमाले?"
"मंग बस असाच..सायेब आले की पायतीन."
"सायब काहीच पैशे न्हाय खिशात..दहा रुपये हयात फक्त."
"आन हिकडं..अन जाय हितून..."

आणखी टाइम खोटी करण्यापेक्षा पैशे दिलेले बरे असं विचार करून नंद्या पैशे देऊन तिथून निघाला. नंद्या रिक्षा घेऊन रस्त्यावर आला त्यावेळी दहा वाजले होते. तो भुकेने कासावीस झाला होता. पण घरी कुठल्या तोंडाने जाणार?


शेवटी थकलेला,भुकेला नंद्या रात्री दहा वाजता निर्जन रस्त्यावर बोहनीच्या शोधात निघाला!!

Wednesday, 11 January 2017

तो राजहंस एक !

२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच! ह्या संस्थानिकांच्या हाती एकदा जरी बॅट दिली की संस्थाने खालसा व्हायची. आता हे धोनी नामक संस्थानिक कधी खालसा होतात एवढंच बघायचं होतं! पण हळूहळू हे संस्थान भारतात नुसतं रुजलंच नाही तर पाळेमुळे घट्ट करून त्याने पूर्ण भारतावर वर्चस्व मिळवलं. मान्य करा अथवा करू नका,२००८ ते २०१५ ह्या कालखंडात महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटचा अभिषिक्त सम्राट होता !

मान्य करणाऱ्यांमध्ये काही काळ माझाही समावेश होता. कारण धोनी हे रसायन वेगळंच होतं. आदर्श खेळाडूच्या आमच्या व्याख्येत धोनी कुठेही बसत नव्हता. हा कसला कॅप्टन? कपिल देव,गावस्कर,सचिन,गांगुली,द्रविड ह्या माझी कप्तानांच्या चेहऱ्यावर खेळाप्रती,संघाप्रती जी निष्ठा दिसायची ती धोनीच्या चेहऱ्यावर कुठेही नसायची. पण निष्ठा दाखवावीच लागते हा आमचा गैरसमज धोनीने अलगद दूर केला. तो त्याच्या पद्धतीने खेळायचा. आणि  बहुतांश वेळा आपण जिंकायचो. अँड इट्स ऑल दॅट मॅटर्स!

काही लोकांचा जन्मचं जिंकण्यासाठी होतो. धोनीसुद्धा त्यातलाच एक असं मला वाटायचं. पण असं काही नसतं. धोनी किती जिंकला, किती हरला ते महत्वाचं नाही. धोनीच्या आधीचे कर्णधार हे त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावान होते हे तोसुद्धा मान्य करेल.पण ते सगळे आणि धोनी ह्यांच्यात मला जाणवलेला एक मूलभूत फरक सांगतो. ते सगळे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या भावनेने खेळायचे. धोनी, आपण जिकंलेलो  आहो,फक्त अजून जाहीर व्हायचंय ह्या विचाराने खेळायचा. धोनी विजयश्री खेचून आणत नव्हता तर ती त्याच्याच घरी राहते अश्या आविर्भावात खेळायचा. माझ्या अगाध क्रिकेटज्ञानामुळे धोनी कुठे कुठे चुकला ह्याच तांत्रिक विश्लेषण मी करू शकणार नाही. त्यामुळे  कोण बरोबर, कोण चूक हे ज्याचे त्याने ठरवावे. पण एक सामान्य क्रिकेटप्रेमी म्हणून बघताना मी असं म्हणेन की धोनी मैदानात असताना जिंकणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट वाटायची.

सचिन,लक्ष्मण,गांगुली,द्रविड आणि अश्याच कितीतरी आंतराष्ट्रीय फलंदाजांची तंत्रशुद्ध फलंदाजी बघण्याची सवय असल्यामुळे धोनी हा आमच्यासाठी एक धक्का होता. पण मुळात शुद्धता वगैरे सगळ्या कविकल्पना असतात. कुठलाही एक चेंडू  तुम्ही पायचीत होता,जायबंदी होता,जास्त श्रम घेता आणि इतर  कुठल्याही प्रकारे बाद होता,जर त्याच्या मुक्कामी पोहोचवू शकत असाल तर तुम्ही तंत्रशुद्ध फलंदाज आहात! धोनी नेमकं हेच करायचा. जगातल्या कोणत्याही गोलंदाजाने त्याला फार काळ सतावलेले  मी तरी बघितलेले नाही. उलट त्याला आऊट कसे करावे ह्यावर खलबतं व्हायची. फार कमी फलंदाजांच्या नशिबात अशी खलबतं असतात.

'गुरु' सिनेमातल्या शेवटच्या प्रसंगात गुरुभाई कोर्टाला ठणकावून सांगतात,"यहातक पोहोचने  के लिये बहोत कुछ खोया है मैने. और ये केस खतम होने तक शायद मेरी आवाज,मेरा दिमाग और मेरा सबकुछ खो दूंगा.पर एक चीज आप मुझसे नही छिन पायेंगे..और वो है मेरी हिम्मत !!"

वर्ल्डकप क्रिकेटच्या फायनलमध्ये सचिन,सेहवाग,कोहली परतल्यावर, फॉर्मात असलेल्या युवराजला थांबवून स्वतः मैदानात येण्यासाठी अपार हिम्मत असावी लागते. ही सामान्य बाब नव्हे. क्रिकेटविषयी,संघाविषयी आणि स्वतः विषयी अतुलनीय निष्ठा असणारा व्यक्तीच हे करू शकतो.ती हिम्मत दाखवून धोनीने तो सामना तिथंच जिंकला होता. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं त्यानं जिंकला होतं ते करोडो भारतीयांचं मन !
धोनी, तुझ्या असण्याला,घडण्याला,कर्तुत्वाला आणि सयंमाला मनापासून सलाम !!

-- चिनार

Monday, 9 January 2017

व्यथा- त्यांच्या आणि आमच्या !

 साधं सरळ आयुष्य असतं आमचं. दहावी-बारावीच्या मार्कांवर आमची लायकी ठरते अन कॉलेज सुरु होतं. ते आटपून कुठेतरी नोकरीला लागायचं. मग लग्न, पोरंबाळं,संसार वगैरे वगैरे. आमच्यासारख्या शंभरातल्या ऐंशीजणांची हीच कथा. उरलेले काहीजण कॉलेजमध्ये प्रेम वगैरे करतात, परदेशात वगैरे शिकायला जातात.शेवटी  एका पातळीनंतर सगळ्यांची कथा आणि व्यथा सारखीच ! कोणी पुण्यात रडतो तर कोणी क्यालिफोर्नीयात एवढाच काय तो फरक!

           पण "त्यांचं" तसं नसतं. त्यांचं म्हंजे आमच्या हिंदी सिनेमावाल्यांचं! त्यांना दर्द दिल असतो (आम्हाला कोलेस्ट्रॉल असतो!).त्यांना दुनिया जीतने  की तमन्ना असते (आम्हाला मंथली टार्गेट असतात!). त्यांना ख्वाब असतात (आम्हाला इएमआय असतो!). त्यांना नयी राहे धुंडायची असतात (आम्हाला ट्रॅफिक जॅम असतो!).त्यांचा जालीम जमाना असतो(आम्हाला देशाचं सरकार असतं!). त्यांना बदले की आग असते (आमच्या बॉसच्या हातातच इन्क्रिमेंट असतं!).  त्यांचे शंभर-दोनशे-तीनशे कोटींचे क्लब असतात (आम्हाला आर्थीक मंदी असते किंवा नोटबंदी असते!)

        मध्यंतरी दिल धडकने दो नामक सिनेमा बघण्यात आला.श्रीमंत पण विविध व्यथा असलेले काही लोकं एका बोटीवर जमतात अशी काहीशी कथा आहे. व्यथांची पातळी काय असावी हे लक्षात यावे म्हणून त्यातील काही पुढे मांडतो. बिझिनेसमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वडील आता मुलासाठी घेतलेले विमान (खेळण्यातले नव्हे! खरेखुरे) विकणार असतात. आता आपल्याला कधी 'विमान चालवायला' मिळणार नाही ह्यामुळे मुलगा व्यथित असतो! दुसरीकडे एका गर्भश्रीमंत मुलाच्या प्रेमात पडले असताना आपले वडील दुसऱ्याच गर्भश्रीमंत मुलाशी लग्न करण्याचा आग्रह (जबरदस्ती नव्हे, हा सैराट नाही!) करतायेत म्हणून एक मुलगी व्यथित असते. आपल्या जाड दिसण्यामुळे नवरा आपल्यावर प्रेम करत नाही आहे असं वाटून एक पत्नी जास्तीत जास्त अन्नग्रहण करत असते. बरं ह्या व्यथांवर सिनेमात दाखवलेले इलाज तर अचाट होते. खरं म्हणजे सगळे बोटीवर जमलेच आहेत तर बोटीला खालून एक भगदाड पाडून कितीतरी समस्या मिटवता आल्या असत्या पण असो...! म्हणजे ह्यांच्या व्यथांची समृद्धी बघूनच आपण थक्क होतो. अश्याच कुठल्याश्या सिनेमात, आयुष्याचा  अर्थ समजावून घेण्यासाठी समुद्रात डुबकी मारणे, विमानातून खाली उडी मारणे किंवा माजलेले बैल अंगावर घेणे वगैरे इलाज सांगितले होते. खोल समुद्रात उडी मारण्यासाठी आधी समुद्राच्या मधोमध जाण्याचे सामर्थ्य अंगी बाळगावे लागते ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं होतं. किंवा बैलाच्या पुढे पळण्यापेक्षा, बैलांमागे नांगरावर उभे राहिल्यास आयुष्याचा अर्थ जास्त चांगल्या पद्धतीने कळतो हे बहुधा दिग्दर्शक विसरला असावा.   

           एवढं असूनही ह्यांच्या जिंदगीत म्हणे खूप प्रॉब्लेम असतात. दिल चाहता है नामक सिनेमात बापानं सेट केलेला धंदा सांभाळायला पोरगा ऑस्ट्रेलियात जातो. तिथं एक लग्न ठरलेली मुलगी योगायोगाने त्याला भेटते. ती ह्याच्यासोबत गावभर भटकते. मग तीच ह्याच्या प्रेमात पडते. आणि आता तिचं लग्न दुसऱ्याशी होणार हे कळल्यावर पोरगं सैरभैर होते. बाप लगेच पोराला बिझिनेस क्लासने भारतात बोलावून घेतो. साधारणपणे आपल्यापैकी कोणी जेंव्हा प्रेमात पडतं तेंव्हा गुप्तता पाळण्यात येते. ह्यांचं तसं नसतं. मुळात आपण हिच्या प्रेमात पडलोय ही गोष्ट त्यांना तिच्या लग्नाच्या दिवशीच कळते. मग तिचा होऊ घातलेला नवरा सोडून अख्खी वरात ह्या दोघांचं लग्न लावायच्या मागे लागते. शेवटी आटपाट नगरात पोरीच्या 'होऊ घातलेल्या सासऱ्याच्या' समंतीने त्या दोघांचा विवाह संपन्न होतो! बरं एवढं झाल्यावरही त्या ऑस्ट्रेलियाच्या धंद्याचं काय झालं असा प्रश्न कोणालाच पडत नाही! आणि योगायोग तरी किती घडावे ह्यांच्यासोबत ?? साध्या पीएमटी बसमध्ये बाजूला एखादी मुलगी बसावी एवढाही योगायोग कधी घडत नाही आमच्यासोबत ! ह्यांना पावसात लिफ्ट मागणारी ललना भेटते, आम्हाला पावसात गाडीचं पंक्चर दुरुस्त करायलासुद्धा कोणी सापडत नाही! अनोळखी तर सोडूनच द्या,पण ओळखीतल्या मुलीसुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत फेसबुकावर! ह्याच सिनेमात आणखी एक योगायोग आहे. सिनेमातला दुसरा एक पोरगा डझनभर प्रेमप्रकरणं केल्यावर शिस्तीत अरेंज मॅरेज करतो. त्यातही त्याला सांगून आलेली पहिलीच मुलगी आवडते. कालांतराने मुलीलाही तो आवडतो. ह्यांच्यात एकदा लग्न करायचं ठरलं ना की जुन्या सगळ्या प्रकरणातून आपसूक क्लिनचीट मिळते. इथं आमचं लग्न ठरवताना, एक-दोन मुलींना नाकारलं तर लगेच,"तुला काय ऐश्वर्या पाहिजे का रे?" असे प्रश्न चालू होतात.(नंतर किती ऐश्वर्या आम्हाला नाकारतात हा स्वतंत्र विषय आहे!). योगायोग घडण्याची परिसीमा बघायची असेल तर हम तुम सिनेमा बघावा. नायक-नायिका दर दोन-तीन वर्षांनी जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे भेटतात. तसे ते कुठेही भेटले तरी नवल वाटू नये  कारण हिंदी सिनेमात  दक्षिण आणि उत्तर ध्रुव सोडून पृथ्वीच्या प्रत्येक कोनाड्यात आता प्रेमकथा फुलवून झालेली आहे! पण प्रश्न योगायोगाचा आहे. भारतात ताटातूट झाल्यावर फ्रान्समधल्या कुठल्यातरी ट्रेनमध्ये ते भेटतात. इथं आपल्याला लोकलमध्ये चढायला मिळेल का ह्याची शाश्वती नसते. लोकल सोडा, तीन तीन महिन्याआधी रिझर्वेशन करून ते कन्फर्म होत नाही तर आपल्या बाजूच्या बर्थवर जुनी मैत्रीण भेटेल अशी अपेक्षा तरी कशी करायची?       

     रिझर्वेशन वरून आठवलं, ह्यांच्यात ते मैं दुनिया का कोना कोना देखना चाहता हू टाईप नग असतात बघा. ह्यांचे तिकीटं कोण काढत असेल हा बाळबोध वाटत असला तरी अत्यंत महत्वाचा प्रश्न मला नेहमी पडतो. ह्यांना आयआरसीटीसी, वेटींग लिस्ट, तात्काळ तिकीट,सर्व्हर डाऊन वगैरे प्रकार आड येत नाहीत का? विमानाचे दर पाहून ह्यांचे डोळे फिरत नाहीत का ? जिंदगी का मतलब शोधण्यासाठी वर्षातून दोन-तीन युरोप टूर करणं ह्या चाकरमानी हिरोंना कसं काय परवडतं? बरं जिंदगी का मतलब युरोपमध्येच का सापडतो? गेलाबाजार माथेरान नाहीतर अजिंठ्यात का सापडत नाही? बरं एकवेळ सगळ्या गोष्टी नजरेआड केल्या तरी वर्षातून दोन वेळा पंधरा दिवसांची सुट्टी मंजूर करणारे मॅनेजर ह्या सृष्टीत कोणत्या ग्रहावर आढळतात?  
  
      जाऊद्या! आमच्या आणि त्यांच्या व्यथांची तुलना होऊच शकत नाही. भाऊसाहेब पाटणकरांनी माणसाची व्याख्या, 'आपल्या व्यथांच्या सौंदर्यावर मुग्ध होतो तो माणूस!' अशी केली आहे. आम्ही मुक्त होऊ शकत नसलो तरी मुग्ध नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास आम्ही बरे अन आमच्या व्यथा बऱ्या !  

--चिनार