Friday, 10 April 2015

आयपीएल येती घरा!

       पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलीयन खेळाडूंचे अभिनंदन ! का कोणास ठाऊक पण कांगारूंचे अभिनंदन कधी मनापासून करताच येत नाही. तसं त्यांच्या सध्याच्या संघात कोणाविषयी राग नाहीये. पण त्यांच्या पूर्वजांनी केलेले कर्म विसरणं या जन्मात तरी शक्य नाही. असो.
           उपांत्य फेरीत त्यांच्याकडून हारण्याच्या दु:खातून सावरतच होतो की परत त्यांच्याच  स्वागताला उभं राहण्याची वेळ आली. अहो कश्यासाठी म्हणून काय विचारताय ..राष्ट्रीय तमाशा सुरु होतोय या आठवड्यात ! इंडिअन प्रिमियर लीग ! पाहुण्या कलाकारांच स्वागत करायला नको का ? नरेंद्र मोदीन्पेक्षाही अधिक व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या श्री श्री ललित मोदी यांनी सुरु केलेल्या तमाश्याच हे आठवं वर्ष ! आता त्यांनी सक्तीचा सन्यास घेतला असला तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने त्यांचे "आशीर्वाद" या उत्सवामागे असतातच. क्रिकेट या खेळाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनवण्याचे श्रेय त्यांनाच जातं. त्यांच्या दूरदृष्टीला तोडच नाहीये. बेटिंग आणि बॅटिंग यांच्यातलं जवळच नातं त्यांनी वेळीच ओळखलं. वर्षभर जगभरात होत असलेले क्रिकेटचे सामने बेटिंग उद्योगाच्या  वाढत्या पसाऱ्याला पूरक नसल्याच हेरून त्यांनी आयपीएलची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेलच. पण म्हणतात ना "पैसा तिथे मार्ग"!
            सगळ्यात मोठी अडचण होती भांडवलाची. त्यासाठी ते मोठमोठ्या उद्योगपती आणि राजकारण्यांना भेटले. 'सबका साथ सबका विकास' हा नारा खरं तर त्यांचाच. फुटबॉलमधल्या इंग्लिश प्रिमियर लीगचे (ईपीएलउदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होते. त्याच्यात थोडेफार बदल करून त्यांनी आयपीएलचा आराखडा तयार केला. तसंही कुठलाही विदेशी खाद्यपदार्थ आपल्याकडे आल्यावर त्यात भारतीय मसाले घातल्याशिवाय आपले लोक ते  चवीने खात नाहीत. त्यासाठीच त्यांनी काही विशेष मसाले तयार केले. आता बघा,ईपीएल मध्ये एखादा खेळाडू करारबद्ध करून घेताना होणार व्यवहार हा खेळाडू आणि क्लब यांच्यापुरताच मर्यादित असतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर त्याचे तपशील बाहेर येतात. ललितजींना एक अभिनव कल्पना सुचली. त्यांनी खेळाडूंचा जाहीर लिलाव करायला सुरवात केली. तसंही एखाद्याची किंमत ठरवायची हौस आपल्याला असतेच,मग ती चारचौघात ठरवली तर काय बिघडलं ? जुन्याकाळातही गुलामांचा (आणि स्त्रियांचा!) लिलाव व्हायचाच ना.   आता द्रविड,गांगुलीसारख्या खेळाडूंची किंमत प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टीनी ठरवली तर त्यात वावगं वाटण्यासारखं काहीच नाहीये. त्यातही गम्मत काय आहे की , एखादा खेळाडू किती किमतीत विकला जाईल किंवा विकला जाईल की नाही जाईल यावरही बेटिंग होऊ शकते ना ! शिवाय या "राष्ट्रीय कार्यक्रमाचे" हक्क विकून मिळणारा पैसा वेगळाच. जिथे पैसा येतो तिथे लोकांचा इण्ट्रेस्टसुद्धा वाढतो. बघा ना, एखाद्या खेळाडूने झेल सोडला तर आपल्या खिशातल्या पैशावर तो खेळतोय या आविर्भावात ," अरे ८ कोटी काय कॅच सोडायला दिले का ***** ?" असा शेरा येतो. 
       ईपीएल मध्ये खेळ चालू असताना मैदानाबाहेर चीयरगर्ल्स नाचत असतात. ललितजींनी त्यांना खऱ्या अर्थाने "मैदानाबाहेर" नाचवायचं ठरवलं. मैदानावर कोणी कोणाला नाचवलं यापेक्षा मैदानाबाहेर कोण कोणासोबत नाचलं याची जास्त चर्चा ललितजींनी होऊ दिली. काही सन्माननीय अपवाद या प्रकारापासून दूर राहिले. काही लोकांनी क्रिकेटच्या संस्कृतीत हे बसत नाही अशी टीकासुद्धा केली. पण कुठल्याही विधायक कार्याला विरोध हा होणारच. या विधायक कार्यामुळे क्रिकेटचा प्रसार होतोय, आंतरराष्ट्रीय सट्टेबाज आकर्षित होतायेत,परकीय चलन देशात येतंय, हे समजण्याएवढी दूरदृष्टी टीकाकारांमध्ये नव्हती. म्हणून ललितजींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सामान्य जनतेला सुद्धा ह्या गोष्टी मान्य होत्या. एकाच रंगमंचावर नाट्य,थरार,रोमान्स,वाद-विवाद असं सगळं अनुभवयाला मिळत असेल तर मिळत असेल तर काय हरकत आहे ? ललितजींनी आणखी एक गोष्ट थोड्याफार प्रमाणात ईपीएल सारखी केली. ईपीएलमध्ये मॅंचेस्टर, लिव्हरपूल सारख्या शहरांच्या नावानी टीम्स आहेत. शहराचं नाव नसलं तरी चेल्सी, आर्सेनाल या क्लब्सच्या नावानी टीम्स आहेत. ललितजींनी भारतीयांचे "प्रांत" प्रेम ओळखून शहरांच्या नावाने टीम्स तयार केल्या. त्यामुळे ज्या टीमचा मालक आणि खेळाडू यापैकी कोणीही त्या शहराचे नाही तरीसुद्धा त्या त्या शहराचे लोकं आपापल्या टीम्स ला पाठींबा देऊ लागले. उदा. धोनीचे पूर्वज सुद्धा कधी चेन्नईला गेले नसतील तरी तो चेन्नई सुपर किंग्स नावाच्या संघात. म्हणजे चेन्नई आणि रांची दोन्हीकडली जनता त्या टीम ला पाठींबा देणार. किंवा  पुण्याच्या टीमचा कप्तान गांगुली असूनही पुणेकर त्याला पहिला बाजीराव समजून पाठींबा देणार. "घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लावणं" ही उक्ती ललितजींनी खरी करून दाखवली.
       एवढा मोठा पसारा मांडून सुद्धा फायदा कितपत होईल याबद्दल थोडी शंका होतीच. शिवाय  ज्या लोकांचा पैसा वापरलाय ते उद्योगपती,राजकारणी, किंवा फिल्मस्टार असे मोठे लोकं होते. म्हणून ललितजींनी प्रत्येकाला १० वर्षांसाठी टीमची मालकी दिली. मार्केटच्या नियमाप्रमाणे कोणत्याही धंद्यात फायदा मिळायला २-३ वर्ष लागतातच. आता रिलायंस किंवा तत्सम मोठ्या कंपनीला १० वर्षात ५००-६०० कोटींची गुतंवणूक करणं फार अवघड नाहीये. आणि मिळणाऱ्या फायद्याचे आकडे डोळे फिरवणारे आहेत. थेट फायदा नाही झाला तरी जाहिरात तर होतेच आहे. किंवा नुकसान दाखवून काळा पैसा सहज खपवता येतोय. स्विस बँकेत कुजवण्यापेक्षा आयपीएल हा कधीही चांगला मार्ग आहे. शिवाय टीमच्या मैदानावरील कामगिरीचा आणि टीम ला होणाऱ्या फायद्याचा काहीही संबंध नाहीये. कारण आयपीएलच्या एका स्पर्धेला झालेला फायदा सर्व संघ मालकांना समसमान वाटण्यात येतो (BCCI चा हिस्सा सोडून). म्हणजे इकडे संघ  वाईट कामगिरी करत असताना, समर्थक ओरडून ओरडून रक्त आटवत असतात आणि संघमालक मनातल्या मनात हसत असतो. अर्थात वाईट कामगिरीचा परिणाम संघ्याच्या पुरस्कर्त्यांवर नक्कीच होत असेल पण आज नाही तर उद्या संघ जिंकतोच त्यामुळे तेवढा फरक पडत नाही.
      असे एक ना अनेक फायदे असणाऱ्या आयपीएलमुळे  भारतीय क्रिकेटचंसुद्धा खूप भलं झालंय.  टी-२० च्या जमान्यात अजूनही शिवकालीन कसोटी क्रिकेट खेळणारे कितीतरी खेळाडू आयपीएलमुळे भानावर आले. सचिन, राहुल संघात असताना कोणताही कप्तान यशस्वी होऊ शकतो पण  सर्कशीचे नेतृत्व करणे किती कठीण आहे गांगुलीला कळले असेलच. शिवाय काही खेळाडूंना "तुम्ही आता जुने झालात " हे वेगळं सांगायची गरज उरली नाही. त्यातूनच रवींद्र जडेजा सारखे नव्या दमाचे खेळाडू भारतीय संघाला मिळाले. जुन्या काळी फक्त बॉल पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रुमालाचे इतरही उपयोग होऊ शकतात हे श्रीसंत सारख्या खेळाडूंनी सगळ्यांना दाखवून दिले.
      कालानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल हे घडतंच असतात. किंवा कधी ललित मोदींसारखे युगपुरुष ते घडवून आणतात. फुटबॉल सारखा खेळ दोनशेहून अधिक देशात खेळला जातो. पण क्रिकेटचा तेवढा प्रसार झाला नव्हता. शेवटी ललितजींनी ते करायचं ठरवलं. त्यांनी क्रिकेटच्या स्वरूपात आमुलाग्र बदल घडवून आणले. बदलांचा आवाका इतका मोठा होता की आता  मूळ क्रिकेट मधल्या बॅट, बॉल, आणि स्टम्प्स या तीन गोष्टी सोडून बाकी सगळं नवीन आहे. अर्थात या तीन गोष्टींमध्ये सुद्धा तांत्रिक बदल झालेतच. पण त्यांचे क्रिकेट्मधले महत्त्व ललितजींनी अजून कायम ठेवले आहे. पण भविष्यात गरज पडलीच तर बॅट-बॉल च्या ऐवजी गिल्ली - दांडू वापरायलासुद्धा ललितजींसारखे युगपुरुष  कचरणार नाहीत!
क्रिकेटच्या मूळ पुरुषाने जर स्वत:चे बदललेले रूप पाहिले तर तो ही म्हणेल,
कोण होतास तू , काय झालास तू ?
अरे वेड्या, कसा विकल्या गेलास तू ??

                                                            -- चिनार

1 comment: