Monday, 7 January 2019

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited)


दिलो में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...
जावेद अख्तर लिखित वरील सुंदर ओळीवर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा संपतो...
ह्यानंतर कबीर (अभय देओल),इम्रान (फरहान अख्तर)  आणि अर्जुन (ह्रितिक रोशन) आपापली जिंदगी जियायला निघून जातात. साधारण पाच वर्षांनी तिघेही मुंबईच्या एका बारमध्ये भेटायचं ठरवतात. कबीर आणि अर्जुन बारमध्ये आधीच पोहोचतात. इम्रान सवयीप्रमाणे अजून पोहोचला नाहीये.
कबीर: इम्रान आला नाही यार अजून?

अर्जुन: त्याचं नेहमीचंच आहे रे. चल आपण सुरु करू. काय घेणार तू?

कबीर: टकीला शॉट्स..

अर्जुन: बावळटासारखं बोलू नकोस. आपण कुठे बसलोय बघ. इथं टकीला फकीला मिळत नाही.

कबीर: अरे हो..जुनी सवय यार... पण इथं का बसलोय आपण?

अर्जुन: इथंच परवडेल मला.पेग सिस्टीम नाहीये इथं ...दोन-तीन क्वार्टर मारू पटापट.

अर्जुन ऑर्डर देतो. वेटर ऑर्डर घेऊन येतो. कबीर आणि अर्जुन पेग बनवून प्यायला सुरु करतात.
तेव्हढ्यात इम्रान येतो.

इम्रान: काय म्हंता बे पोट्टेहो?

कबीर: अरे ये इम्रान. साल्या किती उशीर केला यार. कुठे होता?

अर्जुन: कशाला विचारतो त्याला? काहीतरी फालतू कारण सांगणार नेहमीप्रमाणे.

इम्रान: चिडू नका बे. घरून वेळेवर निघालो होतो. पण एक काम मिळालं निघताना. मग ते पूर्ण करून निघालो.

अर्जुन: एवढ्या रात्री कोणतं काम केलं तू?

इम्रान: अरे त्या साठे काकू राहतात ना शेजारी. त्या उद्या रिटायर होतायेत पोस्टातून.

अर्जुन: बरं मग?

इम्रान: अरे त्यांचा उद्या सत्कार होणार ना. मग त्यांना दोन मिनिटांचं भाषण द्यावं लागणार. ते लिहून हवं होतं त्यांना. मी लिहून दिलं लगेच.
कबीर आणि इम्रान स्तब्ध होऊन एकमेकांकडे बघतात. आणि खो खो हसायला लागतात.

इम्रान: हसायला काय झालं बे?

कबीर: साल्या तू शायरी लिहायचास ना? आता भाषणं लिहितोस?

इम्रान: मग काय झालं? कला आहे आपल्यात. सगळं लिहून देतो. आणि फुकट नाही लिहीत भाऊ. पर वर्ड चार्जेस ठरले आहेत आपले. आज सकाळी टिळकांवर भाषण लिहून दिलं खेरकरांच्या नातवाला. शेंगा आणि टरफलं ह्यांचा उल्लेख करता भाषण पाहिजे होतं त्याला टिळकांवर. आपण दिलं लिहून.

कबीर आणि अर्जुन हे ऐकून अजून हसायला लागतात. एव्हाना दोघानांही चढायला लागली असते.

इम्रान: हसा लेकं हो.

इम्रान त्याचा पेग बनवून प्यायला सुरु करतो.
इम्रान: बाकी काय म्हणतो कबीर? कुठलं हॉटेल बांधतो आहेस सध्या?

कबीर: कुठलं हॉटेल बे? बंद झालं ते काम कधीचंच.

इम्रान: बंद? कधी? कसं काय?

कबीर: तुझ्यामुळे साल्या. तूच घेऊन गेला होता ना आम्हाला ते बैलं अंगावर घ्यायला. त्या बैलांना एकदा काय चकवलं आपण. आपल्याला वाटलं आता दुनिया अंगावर घेऊ आपण. पण बैल आणि दुनियेतली माणसं ह्यांच्यात लय फरक असतो मित्रा.

इम्रान: चढली का बे तुले? काही बोलून राहिला का?

कबीर : अबे साल्या, त्या बैलांच्या शर्यतीनंतर जोशमध्ये येऊन त्या नताशासोबत ठरलेलं लग्न मोडलं मी. तिने ऐकून घेतलं रे पण तिचा बाप लय चिडला आमच्यावर. हॉटेल बांधायचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकला त्याने लगेच. अन जेवढं बांधून झालं होतं ना त्याच्यावर उशीर केला म्हणून पेनल्टी लावली. केलेल्या कामाचे पैसे पण नाही मिळाले रे आम्हाला. माझा बाप अजून चकरा मारतोय त्याच्या ऑफिसमध्ये.

इम्रान: काय सांगतो कबीर? मला नव्हतं माहिती हे. मला वाटलं मजेत चाललंय तुझं. मग कोर्टात का नाही गेला तू तिच्या बापाविरोधात?

कबीर: अबे एवढं नुकसान झाल्यावर वकिलाची फी कोण भरणार? कॉन्ट्रॅक्टमधले कोणते कोणते कलमं शोधून पेनल्टी ठोकली त्याने. अन त्याची हॉटेल इंडस्ट्रीत खूप ओळख आहे रे. त्याने दुसऱ्या कुठलेही काम मिळू दिले नाही आम्हाला.

इम्रान: मग रस्ते वगैरे बांधायला घ्यायचे ना लेका?

कबीर: हे तू शिकवतो का मला? घेतलेलं काम अर्धवट सोडलं म्हणून मार्केटमध्ये खूप बदनामी झाली आमची. कन्स्ट्रक्शन लाईनचं कोणतंच टेंडर भरायला  एलिजिबल नाही राहिलो आम्ही आता.

इम्रान: मग करतो काय तू आता?

कबीर: हार नाही मानली भाऊ आपण! बीएमसीचा कॉन्ट्रॅक्टर बनलो. गटारं बांधायचे कामं घेतले. तुझ्या घरासमोरच ते गटार आपणच बांधलय. काम भरपूर आहे. आता पाइपलाइनचं टेंडर भरणार आहे. बीएमसीत सेटिंग करून ठेवलंय.

इम्रान: अरे वा..चांगलंय की मग.

कबीर: तसं बरं चाललंय रे. पण सहा-सहा महिने पैसे मिळत नाही कामाचे. खूप टेन्शन आहे राजा आयुष्यात.

इम्रान: अरे पण त्या नताशाच्या तावडीतून सुटलास ना कायमचा.

कबीर: तसं नाही रे. पण कधी कधी वाटतं सुधारली असती पोरगी लग्नानंतर. तिच्यासोबत लग्न ठरवणं ही जरी चूक होती तरी लग्न मोडणं ही त्याहून मोठी चूक ठरली यार. जिंदगी ना मिलेगी दोबारा हे खरंय रे पण म्हणून एकाच आयुष्याचे एवढे वांदे होतील असं नव्हतं वाटलं यार.

हे ऐकून एवढ्या वेळ शांत असलेला अर्जुन अचानक ओरडायला लागतो.

अर्जुन: चूप बसा बे. तुम्हा दोघांनाही काही कळत नाही साल्यांनो. तुमच्यापेक्षा जास्त वांदे तं माझे झाले साल्यांनो. लंडनमध्ये शेयर ट्रेडर होतो मी अन आता इथे मुंबईत एलआयसीच्या पॉलिस्या विकून राहिलो आता.ह्यापेक्षा वाईट काय होणार बे?

कबीर: एलआयसी?? काय सांगतो? शेयर ट्रेडिंग बंद केलं का? कधीपासून?

अर्जुन: अबे तुम्हाले आठवते का मी स्पेनवरून सरळ मोरोक्कोले गेलो होतो लैलासोबत?

कबीर: हो. माहितीये ना. मीच सोडलं होतं तुले एअरपोर्टवर.

अर्जुन: मोरोक्कोला राहिलो बे काही दिवस. अन हिकडं एकादिवसात लंडनचं शेयरमार्केट जे बदाबदा कोसळलं लेका काय सांगू. मला पोजिशन बदलायला पण वेळ नाही मिळाला रे तिकडे. एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. माझे क्लायंट्सचं पण जबरदस्त नुकसान झालं. मार्केटमध्ये खूप अलर्ट असावं लागतं रे. अन सुट्टीत दुर्लक्ष झालं माझं.

कबीर: मग काय केलं तू?

अर्जुन: काय करणार? लंडनला परत आलो. म्हटलं हळूहळू सगळं परत मिळवू आपण. मार्केट काय आज नाही तर उद्या सावरेलचं. लैलासोबत लग्न केलं. ट्रेडिंग परत सुरु केलं.

कबीर: मग झालं की सगळं नीट?

अर्जुन: काय नीट होतंय? त्या लैलाला दर पंधरा दिवसांनी समुद्रात उडी मारायला जायचं असतं रे. उठसूट चाललो आपले एकदा ह्या बीचवर एकदा त्या बीचवर. मग परत मार्केट पडलं बदाबदा. परत कंगाल. लंडनचं घर पण विकावं लागलं मला. शेवटी आलो मुंबईत.

कबीर: अन ते एलआयसीचं काय?

अर्जुन: अरे मग सुरुवात कुठून करणार साल्या? एलआयसी एजेंट बनलो. मग हळहळू म्युच्युअल फंड विकायला लागलो. थोडं थोडं ट्रेडिंगपण सुरु केलंय. आता जरा बरं चाललंय.

कबीर: बरं चाललंय ना..झालं की मग..

अर्जुन: हो रे..नशीब सगळं दुसरं काय.

कबीर: चालायचंचं रे..

अर्जुन: अबे तुम्हाला ती माझी गर्लफ्रेंड आठवते का लंडनवाली. मी त्या क्लायंट मीटिंगसाठी तिच्यासोबत ट्रिप कॅन्सल केली होती एकदा.

कबीर: हो हो..काय झालं तिचं..

अर्जुन: काही नाही रे..तिनी असेच एकदोन बॉयफ्रेंड फिरवले माझ्यासारखे. मग माझ्याचं क्लायंटसोबत लग्न केलं.

कबीर: काय सांगतो...

अर्जुन: हो ना..झिपरी लेकाची..अन जिथं आम्ही ट्रीपला जाणार होतो ना तिथंच नवऱ्यासोबत गेली ती. अन  फोटो काढून फेसबुकवर मला टॅग केलं तिनी.

कबीर: काय ???

कबीर आणि इम्रान खोखो हसायला लागतात.

अर्जुन: हसा साल्यांनो हसा. ह्या इम्रानला तर पहिलेपासूनच माझ्यावर हसायला लय आवडते. तुझं बरंय लेका इम्रान. क्रिएटिव्ह फिल्डमध्ये आहेस तू. मरण नाही तुम्हाला. ते जिंदगी ना मिलेगी दोबारा नाव तूच दिलं होतंस ना साल्या.  

इम्रान: हो...

अर्जुन: कसलं बकवास लिहायचास रे तू! अजूनही असंच लिहून पैसे कमावतोस ना साल्या?

इम्रान: कसले पैसे बे? सालेहो तुम्ही दोघांनीतरी विकत घेतलं का माझं पुस्तक कधी?  शायरीने काय  पोट भरते बे ? त्यात मी तर आधीपासूनच कफल्लक होतो. तुम्हाला काय जात क्रिएटिव्ह म्हणायला? मरणाची कॉम्पिटिशन आहे तिथे.  दर सेकंदाचे दर शब्दाचे रेट ठरले आहेत. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त इम्पॅक्ट पाहिजे म्हणतात. मी नाही लिहू शकलो तर दुसरा कोणीतरी तयार आहेच वहीपेन घेऊन. तुला काय वाटतं मी उगाच लोकांचे भाषणं लिहून देतो? 

अर्जुन: हायला म्हणजे तू पण आमच्यासारखाच का ?

ईम्रान: मग नाहीतर काय? हा कबीर म्हणतोय ते बरोबर आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्यापेक्षा जिंदगी पाहिजेच कोणाला आहे दोबारा? असं लिहायला हवं.

तिघेही हसायला लागतात
.
वेटर बिल आणून देतो. तिघेही आपापल्या खिशातून पैसे काढून आपापल्या हिश्श्याचं बिल भरतात.आणि बार मधून बाहेर पडतात.
बारमध्ये टेपरेकॉर्डरवर सुरु असलेलं जिंदगी ना मिलेगी दोबारा हे  गाणं संपून दुसरं गाणं सुरु होते....

जिंदगी हर कदम एक नयी जंग है..जीत जायेंगे हम..जीत जायेंगे हम..तू अगर संग है...

समाप्त   
चिनार

No comments:

Post a Comment