कालपरवा
रिझर्व्ह बँकेचा एक लक्षवेधी अहवाल जाहीर झाला. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. गेले
काही दिवस जरा भविष्याच्या चिंतेतच होतो. या आर्थिक मंदीमध्ये आपली नोकरी टिकेल का?
समजा नोकरी गेली तर दुसरी मिळेल का? पगार वगैरे कसा असेल? असे बरेच प्रश्न पडत होते.
पण त्यादिवशी आरबीआयच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी माझ्यावर उपकारच केले म्हणायचे. आता
मला ओळखणाऱ्या लोकांना वाटेल की, माझ्या टीचभर ज्ञानाचा, चिमूटभर कौशल्याचा, वेळकाढू
नोकरीचा आणि तुटपुंज्या उत्पन्नाचा रिझर्व्ह बँकेच्या अहवालाशी काय संबंध? मी रिझर्व्ह
बँकेच्या गव्हर्नरची शप्पथ घेऊन सांगतो, त्या अहवालाशी माझा काहीही संबंध नाही. मुळात
रिझर्व्ह बँकेशी माझा संबंध नोटेवरच्या त्या "मैं धारक को" वाल्या शपथेपलीकडे
आलेला नाही. आपलं रिझर्व्ह बँकेत अकाउंट का असू नये असले बाळबोध प्रश्न मला आत्ता आत्तापर्यंत पडायचे. आठवड्याचे पाच दिवस
पीएमटीतुन प्रवास करताना,सुट्टे नऊ रुपये जवळ बाळगणं ही माझ्या आर्थिक नियोजनाची परिसीमा
आहे. त्यानंतर दुचाकी विकत घेण्याइतपत पैसे जमवणं ही जवळजवळ एक आर्थिक क्रांतीच होती.
या पातळीचं आर्थिक अज्ञान बाळगणाऱ्या माणसाने रिझर्व्ह बँकेचा अहवाल वाचायचा तरी कश्यासाठी??
पण
हा अहवाल जरा वेगळाच आहे. त्यात म्हटलंय की,
"भारताने
जर आपला विकासदर आठ-नऊ टक्के ठेवला तर २०४७ साली भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
होणार !!"
किती
जबरदस्त आशावाद निर्माण केलाय या एका वाक्याने !! तीस वर्षानंतर आपला देश आर्थिक महासत्ता
होणार! म्हणजे आमचं आयुष्य कडकीत गेलं तरी निवृत्ती सुखाची असणार. त्याचं काय आहे की,
पुढचे तीस-पस्तीस वर्ष बँकेच्या एका कर्मचाऱ्याच्या पगाराची जबाबदारी मी स्वखुशीने
स्वीकारली आहे.आता पुढचे तीस वर्ष बँकेची, बिल्डरची आणि संपूर्ण भांडवलशाहीची देणी
चुकवताना चुकचुकल्यासारखं वाटणार नाही. आणि या अहवालाचं महत्त्व इथंच संपत नाही. या अहवालाने
एक उत्तम, सुलभ आणि कमीत कमी धोका असलेल्या करियरचा पर्याय माझ्यासमोर आलाय. आता आपण
ठरवलंय...जर काहीच जमलं नाही तर कुठलातरी तज्ञ किंवा त्यातल्या त्यात अर्थतज्ज्ञ बनायचं
!!
(बसला
का धक्का वाचताना??? त्येच्यायला हे बरंय...!!
म्हणजे आमच्या अज्ञानाची कवाडे उघडली की लगेच ,"कित्ती छान लिहितोस रे"
अश्या प्रतिक्रिया येतात. पण जरा कुठे तज्ञबिज्ञ बनायचं म्हटलं की धक्का बसतो सगळ्यांना!!)
असो.
पण अर्थतज्ञ होण्याचा निर्णय मी अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे.तसं पाहिलं तर, क्रिकेटतज्ञ
हेही एक चांगलं करियर ऑप्शन आहे. पण तिथं तज्ज्ञांची
संख्या इतकी वाढलीये की आता ऍक्चुअली काही खेळाडूंची गरज आहे!
तर
तज्ञ होण्याची कारणमीमांसा करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेचा तो अहवाल परत एकदा वाचू.
"भारताने
जर आपला विकासदर आठ-नऊ टक्के ठेवला तर २०४७ साली भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
होणार !!"
किती
सोप्पंय हे भविष्य लिहायला!
आता
२०४७ साली ते सगळे अर्थतज्ज्ञ तर सोडूनच द्या तर आम्हीसुद्धा हयात असण्याची शक्यता
नाही. मग आपल्या बापाचं काय जातंय फेकायला! आता जगाच्या इतिहासात सलग तीस वर्षे स्थिर
विकासदर ठेवणे कोणत्या देशाला जमलंय का? आणि
एवढं करूनही तिसरा क्रमांक मिळेल!! मग पहिल्या दोघांनी काय पंधरा-वीस टक्क्यांचा दर
ठेवायचा का? तज्ञ लोकांना हा विचार करण्याची गरज पडत नाही. त्यांनी फक्त अंदाज वर्तवायचे
असतात. मी परत गव्हर्नरची शप्पथ घेऊन सांगतो, की मला देशाचा विकासदर कशाशी खातात हेसुद्धा
कळत नाही. (विकासदर सोडा, विकाससुद्धा फक्त निवडणुकीच्या वेळी तोंडी लावून खायचा असतो
हेच आम्हाला आत्ता कुठे उमगलंय!) पण तज्ञ होण्यातलं गमक हेच आहे. कुठली गोष्ट कशाशी
खातात हे कळत नसतानाही ती गोष्ट तिसऱ्याच एखाद्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीसोबत खाल्ली
की काय होईल हे वर्तवायचं. आता आर्थिक प्रगती जाऊद्या पण नुसत्या तांत्रिक प्रगतीच्या
आधारावर २०४७ पर्यंत कदाचित चंद्रावर मानवी वस्त्या सुरु होतील (-- इति खगोलतज्ञ चिनार!)...मग
चंद्रावर गेलेल्या आमच्या पुढच्या पिढीला भारताच्या आर्थिक विकासदराशी काय देणंघेणं
असेल! त्यामुळे काहीही लिहिलं तरी तज्ञ नेहमीच सेफ झोनमध्ये असतो. आणखी सेफ झोन मध्ये
येण्यासाठी जर-तरची भाषा वापरायची. म्हणजे
जर अमुक अमुक पन्नास गोष्टी घडल्या तर तमुक
तमुक तीन गोष्टी घडतील. उदाहरणादाखल, जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर तुमचा राज्याभिषेक
होणार हे युवराजांना काही राजकीय तज्ञांनी सांगून ठेवलंय. उद्या हे नाही घडलं तरी त्यांच्या तज्ञ असण्याला
धक्का पोहोचत नाही.
पण
वेळ सांगून येत नाही त्यामुळे तज्ञ होण्यातल्या पळवाटासुद्धा मी शोधून ठेवलेल्या आहेत.
देव न करो पण उद्या जर एखाद्याने जाब विचारलाच तर उत्तर तयार हवं. कुठलीही अनपेक्षित
गोष्ट घडली की आंतरराष्ट्रीय बाजार आणि जागतिक अशांतता यांना आपली ढाल बनवायची.(आंतराष्ट्रीय
बाजारात वेगवेगळ्या देशांचे सुटाबुटातले प्रतिनिधी आपापल्या देशाचा माल हातगाडीवर ढकलत
नेतात आणि बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून विकतात असं मानणाऱ्यांची संख्या कमी नाही.
या अज्ञानामुळेच आंतरराष्ट्रीय बाजाराच्या भरवश्यावर कितीतरी अर्थतज्ञांचे संसार सुरु
आहेत.) मला सांगा, इराकने इराणवर हल्ला केला म्हणून आमच्या गल्लीतल्या वाण्याने गोडेतेलाचे
भाव वाढवण्याची काही गरज आहे का? तरी आपण अंदाज वर्तवून मोकळं व्हायचं. समजा भाव नाही
वाढला तर,"आहात कुठं राजे?? अमेरिकेने मध्यस्थी केलीये म्हणून थांबलंय युद्ध!!
आता कसला वाढतोय तेलाचा भाव??" असं निर्लज्जपणे ठोकून द्यायचं. त्याचं कसंय, आंतरराष्ट्रीय
राजकारणात अमेरिका आणि रशिया यांना मध्यस्थ म्हणून नेमण्याआधीच ते तिथं पोहोचले असतात.
दोन्ही पार्ट्यानां युदधासाठी आपणच तलवारी विकायच्या आणि युद्ध सुरु झाल्यावर तिथं
धावत जाऊन ढाली अन पांढरे झेंडे विकायचे ही ह्या दोन्ही राष्ट्रांची युद्ध कम अर्थनीती आहे. एवढी साधी गोष्ट
ज्याला कळली तो यशस्वी व्यावसायिक होतो. उरलेले लोकं अर्थतज्ञ म्हणून नावारूपाला येतात.
आणि ज्यांना काहीच कळत नाही ते आमच्यासारखे वाणी सांगेल त्या भावात आयुष्यभर गोडेतेल
विकत घेतात.
तर
अर्थतज्ञ होण्याची तयारी सुरु
झालेली आहे. त्यात
यशस्वी होणार ह्यात शंका
नाही. कारण विकासदराविषयी
नसला तरी स्वतःच्या वक्तव्यांविषयी
कमालीचा आशावाद बाळगणे ही
तज्ञ होण्याची पहिली
पायरी आहे. अडचण
आहे ती एवढीच
की, ओढूनताणून विनोद
करणाऱ्या माझ्यासारख्याला मुळातच विनोदी असलेल्या
या क्षेत्राशी जुळवून
घेणं थोडं कठीण
जाईल एवढंच...!!
--चिनार
mast.
ReplyDelete