Tuesday, 26 May 2015

संसदेतला एक दिवस !

सदर लिखाण काल्पनिक नसून त्याचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्ती किंवा घटनेशीसंबंध आढळल्यास तो अजिबात योगायोग समजू नये !
स्थळ : संसद भवन
युवराजांची आलिशान गाडी संसद भवनाच्या मुख्य दरवाजातून आत आली. आज युवराज ड्रायव्हरला बाजूला बसवून स्वत: गाडी चालवत होते. सवयीप्रमाणे त्यांनी गाडी त्यांच्या नेहेमीच्या जागी पार्क करायला नेली. पण काय आश्चर्य ! त्या जागी दुसऱ्याच कोणीतरी गाडी पार्क केली होती.
युवराज : माझ्या जागेवर गाडी कोणी लावली आहे ?
ड्रायव्हर : साहेब..ती पंतप्रधानांची गाडी आहे. ही जागा पंतप्रधानांच्या गाडीसाठीच आरक्षित आहे.
युवराज : असेल..त्याने काय फरक पडतो. वर्षानुवर्षे आमची गाडी याच जागेवर पार्क केली जाते. आजही मी इथेच  पार्क करणार.
ड्रायव्हर: हो साहेब, कारण वर्षानुवर्षे आपल्या घराण्यातले लोकच पंतप्रधान होत होते. आता  पंतप्रधान बदलले आहेत. आता ही जागा त्यांची आहे.
युवराज: मुर्खासारखं बोलू नको..मागील दहा वर्ष आमच्या घरातला माणूस पंतप्रधान नव्हता. तरीसुद्धा आमची गाडी इथेच लागायची.
ड्रायव्हर: हो साहेब..कारण या आधीचे पंतप्रधान , आपण पंतप्रधान आहोत हेच विसरले होते...तुमच्या गाडीच्या मागे मागे त्यांची गाडी यायची. जागा मिळेल तिथे लावायचे ते !
युवराज: फार बोलतोयेस तू ....आता जे कोणी पंतप्रधान असतील त्यांना जाऊन सांग ही गाडी हटवायला.
ड्रायव्हर: साहेब ..श्री XXX सध्या पंतप्रधान आहेत. मी गरीब माणूस त्यांच्यासमोर काय बोलणार ?
युवराज : तो मौत का सौदागर !!
ड्रायव्हर: साहेब हळू बोला. निवडणुका संपल्या आहेत. आणि आपण संसदभवनात आहोत.
युवराज: अरे कोणाला सांगतोयेस तू हे..संसद भवन म्हणजे आमच्या घरातलं आंगण आहे. लहानपणी इथल्या गवतावर खेळायला यायचो मी.
ड्रायव्हर: साहेब तुम्ही आजही इथे खेळायलाचं येता हो !
युवराज: चूप बस!!! जा ..जाऊन सांग त्या पंतप्रधानाला ..म्हणावं..संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याने संसद तुमच्या मालकीची होत नाही.
ड्रायव्हर: साहेब तुमच्या पाया पडतो. तुम्ही आत चला. मी बघतो गाडी कुठे पार्क करायची ते.
युवराज: बर बर ...माझा मोबाईल दे गाडीतला. कॅंडी क्रशची सातशेवी लेव्हल पार करायचीये आज आत बसून.

युवराज आत गेलेत. लोकसभेच्या सभागृहात प्रवेश करताच त्यांची पावले सवयीप्रमाणे सत्ताधारी बाकांकडे चालू लागली. त्यांनी आपली नेहमीची जागा पकडली. एका खासदाराच्या ते लक्षात येताच तो लगबगीने त्यांच्याकडे गेला.
खासदार : साहेब..आपली जागा तिकडे आहे. इकडे सत्ताधारी खासदार बसतात.
युवराज: अरे काय चाललंय हे..बाहेर आमच्या जागेवर पार्किंग करू देत नाही. इथे नेहमीच्या ठिकाणी बसू देत नाही. ही लोकशाही आहे की हुकुमशाही ?
खासदार : साहेब..हवं तर माझ्या जागेवर बसा पण इथे बसू नका..अध्यक्ष यायची वेळ झाली.
युवराज: येऊ दे अध्यक्षांना..मला बोलायचं आहे त्यांच्याशी. पिढ्यानीपिढ्या आमची असलेली खुर्ची आम्ही सोडली..आता काय बाक पण सोडायचा का ? अन्याय आहे हा !
खासदार: साहेब तुम्ही खूप दिवसांनी इथे आला आहात. आजकाल आपण इथे बसत नाही. तुम्ही माझ्या जागेवर चला.
युवराज : ठीके येतो मी..पण तुमच्या जागेवर नेट ची रेंज येते का ? मला थायलंडच्या ट्रिपचे फोटो फेसबुकवर टाकायचे आहेत.
खासदार (हादरून): रेंज येते साहेब..पण कृपा करून तिथले फोटो शेयर करू नका हो !!
युवराज : का ? तुमचे ते पंतप्रधान सेल्फी शेयर करतात तेंव्हा ? मी पण काढले आहेत सेल्फी विपश्यना करताना ?
खासदार: साहेब तुम्ही विपश्यनेला गेले होते यावर कोणाचा विश्वासचं नाहीये हो ? थायलंडला जाऊन विपश्यना करणं म्हणजे सनी लियोनच्या घरी जाऊन तिची फक्त ओटी भरल्यासारखं होतं हो. कोण विश्वास ठेवेल ?
युवराज : मी केली ती विपश्यनाच होती !!
खासदार : साहेब तुम्हाला काय करायचं ते करा ..कृपा करून आम्हाला त्या फोटोंमध्ये टॅग करू नका.

शेवटी युवराज त्या खासदाराच्या जागेवर जाऊन बसले. इकडे अर्थमंत्र्यांनी काळ्या पैशावरचे विधेयक सादर केले. त्यांचे भाषण झाल्यावर युवराज तावातावाने उठले.
युवराज: हे विधेयक अत्यंत फालतू आहे.
अर्थमंत्री: काय झालं?
अध्यक्ष : कृपया असंसदीय भाषा वापरू नका !
युवराज: वा !! आता आमच्या भाषेवर पण आक्षेप. इतके वर्ष आमचीच भाषा चालायची इथे.
अध्यक्ष : तुम्हाला जे बोलायचं आहे ते संसदीय भाषेत बोला.
युवराज: बर बर..हे विधेयक सदोष आहे. काळा पैसा कमावणाऱ्या नवीन लोकांच ठीक आहे पण वर्षानुवर्षे ज्यांनी काळा पैसा कमावलाय त्यांचं काय ? त्यांचं विचारच केला नाहीये या विधेयकात.
अर्थमंत्री:नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला ? काळा पैसा वापस आणण्यासाठी विधेयक आहे हे.
युवराज: असेल ना..पण ज्यांना आपला काळा पैसा पांढरा करून घ्यायचा असेल त्यांना एक संधी द्यायला हवी ना. त्या काळ्या पैशावर जेवढा प्राप्तीकर भरावा लागत असेल तेवढा भरायला जर कोणी तयार असेल तर !
अर्थमंत्री: कोणाला करायचं आहे असं?
युवराज: कोणाला म्हणजे...माझ्या आईला करायचा आहे !
युवराजांची आई जागेवरून कोसळण्याच्या बेतात होती. काही खासदार तिकडे धावले. काही खासदार युवराजांकडे धावले.
खासदार: साहेब..काय बोलताय तुम्ही ?
युवराज:काय चुकीचं बोललो मी ?
खासदार: अहो तुमच्या मातोश्रीने काळ्या पैशावर प्राप्तीकर द्यायचा ठरवला तर पुढचे किमान पाच वर्ष देशात कोणालाही प्राप्तीकर भरावा लागणार नाही.
युवराज: मग काय झालं? आमचे पैशे तर पांढरे होतील ना !
खासदाराचे डोळे पांढरे झाले.
खासदार :अरे याला कोणीतरी आवरा रे !

नंतर युवराजांना कोणीतरी संसदेच्या कॅण्टीन मध्ये घेऊन गेले. पोटात थोडं अन्न गेल्यावर युवराज शांत झाले.थोड्यावेळाने पंतप्रधान स्वत: तिथे आले. त्यांना बघून युवराज पुन्हा चवताळले.
युवराज: आले ..आले आमचं रक्त प्यायला. मौत के सौदागर. कशाला आलात इथे ? त्या परदेशात कोणी जेवू  नाही घातलं वाटते.
पंतप्रधान: युवराज..तुमचा नक्की प्रोब्लेम काय आहे ?
युवराज: तुम्ही..तुम्हीच माझा प्रोब्लेम आहात.
पंतप्रधान:काय केलंय मी ? तुमच्यावर तर आजकाल टीका पण करावी वाटत नाही मला.
युवराज: तुम्ही आल्यापासून वाट लागलीये देशाची..देशात भूकंप होतायेत..शेतकरी आत्महत्या करतायेत..स्त्रिया सुरक्षित नाहीयेत..सीमेवर हल्ले होतायेत..पार्किंगला जागा नाहीये..मोबाईलला रेंज नाहीये ..फ़ोटो शेयर करता येत नाही..अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीये..
पंतप्रधान: अहो युवराज थांबा थांबा..तुमचा प्रोब्लेम कळलाय मला.
युवराज: नुसतं कळून काय उपयोग? काय केलं गेल्या वर्षभरात तुम्ही?
पंतप्रधान: तुमचं खरय युवराज ! पण तुमच्या पार्किंगचा आणि रेंजचा प्रोब्लेम मी आजच्या आज सोडवतो बघा. बाकी गेल्या वर्षभरात आम्ही काय काय केलंय ते तुमच्या मातोश्रींना मी समजावून सांगतो. तुम्ही त्यात पडू नका.
युवराज: मातोश्रींवरून आठवलं..ते काळ्या पैशाच विधेयक ! सूडाच राजकारण खेळता आहात तुम्ही. पंधरा लाख रुपये देणार होतात तुम्ही. माझे आणि आईचे पैसे कुठे आहेत ?
पंतप्रधान: आधार कार्ड नाहीये तुमचं युवराज. नाहीतर लगेच पैसे मिळाले असते तुम्हाला तुमच्या बँक खात्यात.
युवराज: मूर्ख समजलात होय मला...स्विस बँकेतून स्विस बँकेच्याच खात्यात पैसे टाकायला आधार कार्ड कशाला लागतंय तुम्हाला ?
पंतप्रधान: अरे ..ह्याला कोणीतरी आवरा रे !!

-- चिनार 

1 comment:

  1. चिंतामणीजी, खूप छान लिहिलंत. अप्रतिम.

    ReplyDelete