Wednesday, 27 May 2015

शेतातला एक दिवस...

'संसदेतला एक दिवस ' ह्या माझ्या आधीच्या लिखाणाचा दुसरा भाग म्हणून हा कल्पनाविस्तार प्रकाशित करत आहे.

युवराजांनी आता मनाशी पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी जनतेतली आपली प्रतिमा सुधारायची. जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा.ते प्रश्न सोडवून जनतेचा हिरो बनायचं. पण त्यांना नक्की सुरवात कोठून करावी हे कळत नव्हतं. या विचारात असतानाच कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं की , भारत हा कृषीप्रधान देश आहे. पंतप्रधान आणि कृषीप्रधान ह्या दोन शब्दात त्यांना काहीतरी साम्य जाणवल्यामुळे त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. ते शेवटी मातोश्रींकडे गेले.
युवराज : आई आपला देश कृषीप्रधान आहे ना?
मातोश्री : हो रे बाळा..काय झालं?
युवराज : कृषीप्रधान म्हणजे काय ?
मातोश्री : अरे देशातली जनता प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हणजेच कृषी. आपल्याही परिवारात जुन्या काळी कोणी ना कोणी शेती केली असेलच.
युवराज: हो हो...आत्ता आठवलं..आजोबा-पणजोबा नेहमी म्हणायचे..भारत देश म्हणजे आपल्यासाठी शेतजमीनच आहे..जनतेने पेरायचं अन आपण खायचं..
मातोश्री : अरे परमेश्वरा..!!

शेवटी युवराजांनी कृषी म्हणजेच शेती या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं. लगेच त्यांनी जवळपासच्या एक दोन गावात कृषी दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले. ठरल्याप्रमाणे युवराज एका  गावात पोहोचले. तिथे दोन -चार शेतकरी त्यांना दिसले.
युवराज : आपला देश हा कृषीप्रधान देश आहे ! जय जवान जय किसान !
शेतकरी : काय झालं मालक ?
युवराज : आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अवकाळी पावसाने झालेले नुकसान सरकारला भरून द्यावेच लागेल. आम्ही त्यासाठी आंदोलन करू.
शेतकरी : मालक..गेल्या २ वर्षापासून इथे पाऊसच पडला नाही.
युवराज : तरीपण दुबार पेरणीचे पैसे सरकारला द्यावेच लागतील.
शेतकरी : मालक..यावर्षी अजून एकदाही पेरणी झालेली नाही.
युवराज : काय म्हणता ?...काळजी करू नका ,आम्ही शेतमालाला योग्य भाव मिळवून देऊ ?
शेतकरी : मालक अजून गेल्या २ वर्षांचे पैसे मिळाले नाही.
युवराज: तुमच्या अजून काही समस्या असतील तर मला सांगा. मी त्या सोडवेन. गेल्या ६० वर्षांपासून शेतकऱ्यांचा मित्र अशीच ओळख आहे आमची. ह्या नवीन सरकारने वाटोळे केले आहे तुमचे. भारत हा कृषीप्रधान देश आहे...
शेतकरी : बरं बरं मालक...कळलं आम्हाला..तेवढं पेमेण्टचं बघा..
युवराज: हो..मी लगेच कृषीमंत्र्यांना सांगतो. बाय द वे..कश्याची शेती करता तुम्ही ?
शेतकरी : सोयाबीन लावतो मालक..आणि कपास पन..
युवराज:  अरे वा..म्हणजे बागायती शेती..चांगलंय..
शेतकरी : नाही हो मालक..कोरडवाहू..ऊस ,गहू  म्हणजे बागायती..
युवराज:  गहू का नाही लावत तुम्ही?
शेतकरी: दुष्काळी भागात गहू कसा लावणार मालक..पाणी लागते भरपूर
युवराज:  अहो..दुष्काळ दरवर्षी एकदाच पडतो ना..दुष्काळ पडायच्या आधीच लावायचा ना !!!
शेतकरी : धन्य आहात मालक तुम्ही !
युवराज:  आणि तुम्ही धनधान्य आहात ..कारण भारत हा कृषी......!
शेतकरी : अरे कोणी आवरा रे ह्याला...

नंतर युवराजांनी शेतीची पाहणी करायचे ठरवले. जवळच्याच एका शेतजमिनीवर ते गेले. चपलेतून सुद्धा त्यांना काटे - खडे टोचत होते. तरीपण युवराज चालत राहिले. त्यांच्या सोबत पाच-पन्नास कार्यकर्ते, शेतकरी वैगेरे होतेच. एका ठिकाणी थांबून त्यांनी थोडी माती उचलली.
शेतकरी: काय झालं मालक ?
युवराज: हा पहा सविनय कायदेभंग!
शेतकरी: म्हणजे काय ?
युवराज:भूसंपादन कायदा आम्ही होऊ देणार नाही.
शेतकरी: ठीक आहे..नका होऊ देऊ..पण माती का उचललीत मालक?
युवराज: हीच माती नेउन मी सत्ताधाऱ्यांना दाखवणार..त्यांना विरोध करणार..
शेतकरी (मनात) : आणि माती खाणार...!
शेतकरी: मालक काही वर्षांपूर्वी तुमच्या सरकारने हाच कायदा आणायची तयारी केली होती. तुमचं सरकार गेलं आता ह्याचं आलं..आम्हाला काय फरक पडला..शेतकऱ्याला काय फरक पडतो शेवटी ?
युवराज: काय सांगता ?...मी कुठे होतो त्यावेळी ?
शेतकरी (चिडून) : मालक..तुम्ही तेंव्हाही माती खात होतात..आताही माती खात आहात!

हे ऐकून युवराज स्तब्ध झाले. वापस आल्यावर ते तडक पंतप्रधानांना भेटायला गेले.
युवराज: परत एकदा..परत एकदा सूडाच राजकारण खेळताय तुम्ही.
पंतप्रधान: काय झालं युवराज ?
युवराज:आमचाच कायदा परत आणताय..शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव  आहे तुमचा !
पंतप्रधान: त्यावेळी तुमचा काय डाव होता युवराज ?
युवराज: जमिनी हडपण्यासाठी आम्हाला कायद्याची गरज कधीच नव्हती..प्रत्येक कार्यकर्त्याला एकरानी जमिनी वाटल्यात आम्ही..
पंतप्रधान: त्याच जमिनी परत मिळवण्यासाठी हा कायदा आहे युवराज..
युवराज: पण मोबदल्याच काय ?..भारत हा कृषीप्रधान ......
पंतप्रधान: अरे कोणी आवरा रे ह्याला...!!

-- चिनार 

5 comments: