Sunday 15 February 2015

एक परंपरा

शनीवार  आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनीवार  होता. शाळेची वेळ ११.३०-२.३०. पण त्या दिवशी शाळा दहा मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण .३० वाजता एक क्रिकेट सामना सुरु होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं हि काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला. कारण .३० वाजता सुरु होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६ चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!!
       आम्ही धावत घरी आलो. आपली पहिली ब्याटिंग होती. सचिन आणि सिद्धुनी सावध सुरुवात केली. त्यांचा जम बसला असा वाटताक्क्षणिच सचिन आउट झाला. छातीतली धडधड वाढली. मधल्या फळीने डाव सावरला, पण आपली धावगती कमीच होती. ४१ व्या षटकाच्या तिसर्या चेंडूवर अझरूद्दीन आउट झाला. रशीद लतीफने घेतलेला तो झेल अप्रतिम होता. आपली धावसंख्या होती २००. अजय जडेजा क्रिझवर होता. जास्तीत जास्त २५० पर्यंत जाऊ असा वाटायला लागलं. पण जडेजा पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटुन पडला. विशेषतः वकार युनुसवर. श्रीनाथ कुंबळेच्या साथीने जडेजाने शेवटच्या षटकात ५० धावा कुटल्या. त्यात जडेजाचा योगदान होतं २५ चेंडूत ४५ धावा. या एका इनिंगमध्ये अजय जडेजा त्याची अक्खी कारकीर्द खेळून गेला. आपण पाकिस्तानसमोर २८७ धावांचा लक्ष्य ठेवलं. त्या काळात हि मोठी धावसंख्या मानली जायची. विजय दृष्टीपथात दिसू लागला. पण पाकिस्तानची फलंदाजी सुरु झाल्यावर चित्र पालटलं. आमिर सोहेल आणि सईद अन्वर आपल्या गोलंदाजांचा समाचार घेऊ लागले. त्यांच्या धडाक्या समोर २८७ धावा कमी वाटत होत्या. एका चेंडूवर आमिर सोहेल ने वेंकटेश प्रसाद ला चौकार मारला. आणी प्रसाद कडे बघू ," हीच तुझी लायकी " अशा आशयाचं काहीतरी बोलला. मैदानावरच वातावरण एकदम बदललं. तिथला तणाव घरबसल्या टीव्ही वर बघताना सुद्धा जाणवत होतं. प्रसादने डोक शांत ठेवून पुढचा चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली. आमिर सोहेल ने रागाच्या भारत वेडीवाकडी ब्याट फिरवली. आणि चेंडू त्याची उजवी यष्टी उडवून पुढे गेला. अख्खं स्टेडिअम आनंदाने बेभान झालं. प्रसादने क्रिकेटच्या भाषेत आमिर सोहेल ला प्रत्युत्तर दिलं होतं. सणसणीत चपराकच होती ती. क्रिकेटच्या मैदानावर मी अनुभवलेली ही सगळ्यात नाट्यमय घटना आहे. जडेजा सारखंच त्या एका क्षणात प्रसाद त्याचं अख्खं आयुष्य जगला. सामना पुढे सुरु झाला. सलीम मलिक, ईजाझ अहमद भारतीय माऱ्याला समर्थपणे खेळू लागले. पण अनिल कुंबळेने सलीम मलिकचा काटा काढला. वेंकटपती राजू ने ईजाझ अहमद ला दूर केले. नंतर रशीद लतीफ ने हाणामारी सुरु केली. एकवेळ सामना हातचा जातो की काय असं वाटू लागलं. यथाअवकाश तो सुद्धा बाद झाला. श्रीनाथ- कुम्बलेनॆ शेपुट फारसं वळवळू देत भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. आणि आम्ही सगळे आनंदाने उड्या मारू लागलो.
साधारण वर्षांनी आणखी असाच एक दिवस उजाडला. सच्चा क्रिकेटप्रेमी हा दिवस कधीही विसरणार नाही. बारावीची बोर्डाची परीक्षा सुरु होती. पण आम्हाला टेन्शन वेगळ्याच गोष्टीच होतं. त्यादिवशी २००३ विश्वकप ची भारत - पाकिस्तान सामना होता. आधीचे चार सामने जिंकून आपण आधीच पुढच्या फेरीत पोहोचलो होतो. त्यामुळे सामना हरलो तरी आव्हान शाबूत राहणार होतं. पण पाकिस्तान कडून हार ! शक्यच नाही. सामना जिंकण्याविषयी आम्ही निर्धास्त होतो. आम्हाला वाट होती ती सचिन- शोएब च्या युद्धाची! काही जुने हिशोब चुकते करायचे होते. सामना सुरु झाला. पाकिस्तानाची पहिली ब्याटिंग घेऊन २७२ धावांचे आव्हान ठेवले. आपली ब्याटिंग सुरु झाली. वसीम अक्रमचा मान राखून पहिला ओव्हर सचिन- सेहवागने शांततेत खेळून काढला.शोएब अख्तर गोलंदाजीला आला. सगळी ताकद वापरून त्याने सचिन वर हल्ला केला. पण अगदी खरं सांगायचं तर सचिन ने अंगावरचं झुरळ झटकाव तसं त्याच्या ऑफसाईड च्या चेंडू ला मैदानाबाहेर भिरकावलं. नंतर त्याचं ओव्हर मध्ये तीन सणसणीत फटके मारले. सचिन ठरवून मारतोय असं वाटत होतं. सचिनचं हे रूप वेगळंच होतं. हेन्री ओलांगानी एकदा सचिनचं हे रूप अनुभवलं होतं. आता शोएब ची पाळी होती. एका ओव्हरमध्येच शोएब उध्वस्त झाला. नंतर सचिन ने कोणालाच सोडलं नाही. अक्रम- वकार सारखे दिग्गज हतबल झाले होते.९८ धावा काढून सचिन बाद झाला. पण तो पर्यन्त त्याने पाकिस्तानचा कोथळा बाहेर काढला होता. शतक झाल्याची हुरहूर वाटत नव्हती. कारण सचिन त्याची सर्वोत्कृष्ट खेळी खेळून गेला होता. युवराज- द्रविडने उरलेल्या धावा लीलया काढल्या. आणी परत एकदा आपण विश्वकप मध्ये पाकिस्तान ला हरवले.
      कालच विश्वकप २०१५ मधला भारत - पाकिस्तान सामना झाला. यावेळी सचिन, राहुल, सौरव, अनिल नव्हते. त्यांची जागा आता नव्या शिलेदारांनी घेतली आहे. पण ते सुद्धा आपल्याच मातीतले आहेतअपेक्षेप्रमाणेच आपण तो सामना जिंकला. कारण पाकिस्तान विरुद्ध जिंकणे ही आपली परंपरा आहे. निश्चिंत राहा!! शिरीष कणेकरांच्या भाषेत सांगायचं तर ,
जोवर क्रिकेट आहे आणि त्यावर मनापासून प्रेम करणारी तुमच्या आमच्या सारखी माणसं आहेत तोवर ही परंपरा कायम राहणार !!
                                                                                                                    -- चिनार


No comments:

Post a Comment