Monday, 7 March 2016

राईट टू (बी) लेफ्ट !

"तू लेफ्टी आहेस?"
मी डाव्या हाताने लिहितोय हे दिसत असूनही त्याने मला विचारलं. पण ह्या प्रश्नाची मला सवय आहे.
" हो", मी उत्तरलो.
"लहानपणापासून ?"
मी दचकलो. आता हे काय नवीन ? एखाद्याला व्यक्तीला ," का हो तुम्ही चालायला लागल्यापासून दोन पायांवरच चालता का ?" असं विचारलं तर कसं वाटेल ? तरीही सयंम राखून मी उत्तर दिलं.
"हो अर्थातच"
"जरा वेगळं नाही वाटत का असं?”
" नाही...  मी जर उजव्या हाताने लिहिलं तर ते जगावेगळं वाटेल !", माझा संयम आता सुटत होता.
मी मुद्दाम 'जगावेगळं' अश्यासाठी म्हटलं, कारण लहानपणी मी डावखुरा आहे हे लक्षात आल्यावर आई जेंव्हा जेंव्हा मला उजव्या हाताने लिहायला सांगायची तेंव्हा मी उर्दू लिहिल्यासारखं उजवीकडून डावीकडे लिहायचो. मायमराठीचे असे धिंडवडे उडताना पाहून ती माऊली वरमली. आणि मी डावखुराच राहिलो!
" त्या मानाने अक्षर खराबचं आहे तुझं ?", तो म्हणाला.
"त्या मानाने म्हणजे?"
"डाव्या हाताने लिहिणाऱ्यांच अक्षर छान असते असं म्हणतात...पण तुझं तर........"

         वरील संभाषण प्रातिनिधिक असलं तरी डावखुऱ्यांना असे अनुभव दैनंदिन जीवनात नेहमीच येतात.चार लोकांपेक्षा काहीतरी वेगळं दिसलं की ते एकतर अद्भुत तरी असते किंवा तुच्छ तरी असते.अरे कोणी सांगीतलय यांना डावखुरे चांगल्या अक्षरात लिहितात म्हणून ? मी मान्य करतो की माझे अक्षर वाचण्याजोगे नाहीत. लोकं आकडेमोड करतात तसं मी अक्षर 'मोड' करतो. पण त्याचा लिहिण्याच्या हाताशी काय संबध? डाव्या हाताला लिहिण्याची सूचना देताना आपला मेंदू काय 'जरा चांगल्या अक्षरात लिही' अशी वेगळी तळटीप देतो का? डावखुरे लोकं चित्र फार छान काढतात हा आणखी एक गैरसमज ! मला वर्तुळाचे दोन टोकसुद्धा नीट जुळवता येत नाहीत. परीक्षेत मी घाईघाईत लिहिलेला शुन्य हा आकडा फुटक्या अंड्यासारखा जास्त दिसत असल्यामुळे आमचे सर वर्तुळाची दोन्ही टोकं व्यवस्थित जुळवून मला शुन्य मार्क द्यायचे. चित्रकलेत पन्नास पैकी अठरा मार्क हा माझा सर्वोत्तम पर्फोर्मंस होताडावखुरे लोकं त्यांच्या क्षेत्रात फार हुशार असतात हा तिसरा गैरसमज. मी म्हणतो, लिहित असेल सचिन तेंडूलकर डाव्या हातानी पण त्याच्या शंभर शतकाएवढ्या अपेक्षा आमच्याकडून कश्यासाठी? शाळेत एकदा आम्ही क्रिकेट खेळत असताना मी बॅटिंगला करायला आलो. सवयीप्रमाणे मी उजव्या हातात बॅट धरली. एका इच्चक मित्राने शंका काढली की हा जोश्या डाव्या हातानं लिहिते तं बॅटिंग उजव्या हातानं काऊन? झालं !! मी डाव्या हातानीच बॅटिंग करायची असा आग्रह सुरु झाला. मुळात मी उजव्या किंवा डाव्या कोणत्याही हातानी बॅटिंग केली तरी फार काही फरक पडणार नव्हता.(अरे वर्गातल्या टीम मध्ये  सातव्या नंबरवर बॅटिंगला येणारा काढून काढून किती रन्स काढणार ! पण हे सत्य जर मी उघड केलं असतं तर मला आयुष्यात बॅटिंग मिळाली नसती !) आईनष्टाइनसुद्धा डावखुरा होता म्हणेमी म्हणतो असेल ना, पण म्हणून मला थेयरी ऑफ रिलेटीव्हीटी समजली पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? फिजिक्स आणि मी एकमेकांशी  रिलेटीव्हली डिसकनेक्टेड आहोत हे पुरेसं नाहीये का ?
       या डावखुऱ्या प्रकारचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, राजकारणातसुद्धा उजवी आणि डावी विचारसरणी ही हातावरूनच ठरवतात असं मला वाटायचं. त्यामुळे मी डाव्या विचारांचा आहे अशी अनेक वर्ष माझी उगाचंच समजूत होती.(आता विचारसरणी हातावरून ठरत नसली तरी हल्लीच्या राजकारणात "हाताच्या" विरोधात असलेले सगळे उजवे अशी सरळसोट व्याख्या आहे हा भाग वेगळा !) आम्हाला दहावीत "लेफ़्ट इज राईट" नावाचा एक धडा होता. त्यातही जगभरातल्या महान डावखुऱ्यांचा उल्लेख केला होता. ते लिहिणारा सुद्धा डावखुराच असला पाहिजे. त्या सगळ्या महान लोकांविषयी पूर्ण आदर राखून मी म्हणेल की, डावखुरे लय भारी असतात असा जर काही नियम असेल तर त्या नियमाला अपवाद  म्हणून माझा उल्लेख करावा. सन्माननीय नव्हे तर लज्जास्पद अपवाद म्हणून करा हवं तर.
       सगळीकडे आश्चर्य किंवा आदर मिळत असला तरी डाव्यांना हमखास  तुच्छतेची वागणूक मिळते ती देवाधर्माच्या ठिकाणी. मंदिरात डाव्या हातानी घंटा वाजवणं किंवा डाव्या हाताने गंध,फुलं वाहणं किंवा प्रसादासाठी डावा हात पुढं करणं हे सगळे अजामीनपात्र गुन्हे आहेत. कारण तिथल्या तिथे ,"अरे काय करतोयेस, देव शिक्षा देईल" अशी शिक्षा ठोठावून लोकं मोकळे होतात. मला नेहमी प्रश्न पडतो, भगवंताच्या दहा अवतारात एकही डावखुरा नव्हता का? रामाने शिवधनुष्य उचलताना तरी डाव्या हाताचा उपयोग केला असेलच ना? की भर सभेत त्याला जनकाने ," तू डावा हात वापरलास म्हणूनच शिवधनुष्य भंगलं, आता वनवास पक्का" असं म्हटलं असेल ? एका भक्ताने  तर मी डावखुरा आहे हे कळल्यावर मला पत्रिका दाखवण्याचा सल्लासुद्धा दिला होता. मी त्या काकांची फार उडवली होती.
सुरवात थोडीबहुत वरच्यासारखीच,
"पत्रिका दाखवून दे एकदा. डाव्यांच्या पत्रिकेत बहुतेकवेळा  काहीतरी दोष असतो म्हणतात."
" कोण म्हणतात?"
" असं ऐकलंय मी. शास्त्रात लिहिलं असेल कदाचित."
"म्हणजे शास्त्र लिहिणाऱ्या लोकांमध्ये एकही डावखुरा नव्हता?"
"फालतू जोक मारू नको. पत्रिका दाखवून घे."
"बरं दाखवतो... पण दाखवू कोणाला ? तो सुद्धा डावखुरा असेल तर ? की आधीच विचारून घेऊ ?"
"तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. तुमची नवीन पिढी म्हणजे................................"
झालं!... काका नवीन पिढीवर घसरले  आणि त्यांचा दिवस सार्थकी लागला !
पंगतीत जेवताना एखादा डावखुरा बाजूला आला की उजव्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते.
"त्या हाताला काही लागलंय का ?"
"नाही"
"मग दोन्ही हाताने जेवायची सवय आहे का ? अरे चार लोकात बरं दिसत नाही असं. उजव्या हाताने जेव."
होतं काय की अश्यावेळी आपण नुकतंच पुरणपोळीचा घास घेतला असतो. त्यामुळे या काकांना उत्तर देण्याऐवजी खाल्लेल्या पुरणाला जागणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच  उत्तरादाखल त्याच डाव्या हाताने काकांच्या मांडीवर मठ्ठा सांडवायची तीव्र इच्छा दाबून ठेवावी लागते !

नाही नाही... डाव्यांच्या हक्कांसाठी वगैरे लढत नाहीये मी इथे. डाव्यांना भगवान का दिया सबकुछ हैं! दौलत हैं..शोहरत हैं..कधी जास्त तर कधी कमी अशी इज्जत सुद्धा हैं! डाव्यांना नेहमीच येणारे गमतीशीर अनुभव मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. खरं तर मला डावखुरा असल्याचा काही अभिमान वगैरे नाहीये. उजवा असतो तरी असाच आणि इथेच असतो. शेवटी कुठला हात आभाळाला टेकला ह्यापेक्षा दोन्ही पाय जमिनीवर असणं जास्त महत्त्वाचं !! नाही का?


                                                                                                                              --चिनार 

Friday, 5 February 2016

खरेदी पाहावी करून !

अमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा जमाना आहे. सगळं काही एका क्लिकवर मिळतं. मोबाइल काय अनं कपडे काय अनं दागिने काय जे म्हणाल ते मिळेल. खिशात पैसे नसतील तर सुलभ हप्त्यांची सोय सुद्धा उपलब्ध आहे. शक्य तेवढं ह्या मोह्मायेपासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. कारण एक तर आपल्याला खरेदीचा कंटाळा! त्यात ,"पैसे काय झाडाला लागतात का रे ?" हे मध्यमवर्गीय संस्कार ! त्यामुळे मी या विषयावर लिहिण्याच तसं काही कारण नाहीये. पण कालपरवा एक घटनाच अशी घडली की मला ह्याचा गांभीर्याने विचार करणे भाग पडले. झालं असं की, आमच्या कंपनीच्या क्लायण्टला प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट करून द्यायचा होता. त्यासाठी अत्यंत लहान क्षमतेच्या एयर ब्लोअरची गरज होती. बरेच प्रयत्न करूनही कुठेच तो ब्लोअर मिळेना. सगळ्या सप्लायर्सकडे चौकशी करून झाली पण परिणाम शुन्य! आता काय करावं या विचारात असताना अचानक प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला.
तो म्हणाला," ब्लोअर मिळाला."
मी विचारलं," कुठं?"
मी स्वप्नातही विचार केला नव्हता असं उत्तर आलं," फ़्लिपर्काट !!!!"

मी हादरलोच. च्यामारी आमच्या अख्ख्या सोर्सिंग टीमला जे जमलं नाही ते फ़्लिपर्काटवर मिळालं ! कंपनीचे कामं जर फ़्लिपर्काटवर व्हायला लागले तर आम्हाला घरीच बसावं लागेल ना. मी विचारात पडलो. खरंच इतकं सोप्पंय आमचं काम? काय करतो आम्ही कंपनीत? तर सोर्सिंग....म्हणजेच खरेदी. नाही नाही...खरेदी करणं हे खायचं काम नव्हे.( आता खरेदी करणं हे "खायचंच" काम आहे हा सर्वमान्य समज असला तरी ते एवढं सोप्पं नाही !)

रम्य अश्या सकाळी आम्ही रमतगमत कंपनीत पोहोचतो( इथे 'रमतगमत' ह्याचा अर्थ अर्धा तास ट्राफिक जाममध्ये अडकून, अख्ख्या गावाची धुळ अंगावर घेऊन असा घ्यावा!) तर प्रोजेक्ट मॅनेजर वासून समोर उभा असतो. त्याच्याकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी तो मला खिंडीत गाठतोच. मग आमचं सुसंवाद सुरु होतो. सुसंवाद म्हणजे तो बोलतो आणि मी ऐकतो !
" अरे राजा..पंपाचं फौंडेशन ड्रॉईंग्स कुठे आहेत ? साईटवर सिव्हीलचं काम थांबलंय त्यामुळे. व्हॉल्व्स का नाही पोहोचलेत अजून ? असेम्बली थांबलीये साईटवर. बंर ते जाऊदे कॉम्प्रेसरचे डीटेल्स कुठे आहेत ? एयर लाइनचं रुटिंग होत नाहीये त्यामुळे. त्या xxx साईटच्या पाईपिंगची ऑर्डरचं नाही निघालीये म्हणे अजून. कधी करणार ? या महिन्यात बिलिंगला घेतलंय आपण ते. त्या yyy व्हेंडरचा आडव्हांस नाही दिलाय अजून. काम थांबवलंय त्यानी"

एव्हढे सगळे तोफगोळे अंगावर झेलून त्यावर ,"सर बघून सांगतो" असं शक्य तितक्या निर्विकार चेहऱ्याने उत्तर देणं  फ़्लिपर्काटला जमेल का? असो. तर खिंडीच्या मागल्या दराने पळ काढून आपल्या जागेवर स्थानापन्न होताच मोबाईलची रिंग ठणाण वाजते. फोन उचलताच तिकडून एखादा सप्लायर पेमेंटचं रडगाणं सुरु करतो. ह्यांना सकाळी सकाळी राजे गडावर पोहोचल्याची वर्दी मिळतेच कशी कोण जाणे? पण या असल्या फोनची एक गम्मत असते. सप्लायरच्या टोनप्रमाणे किंवा भाषेप्रमाणे आमचं उत्तर बदलते. उदा. समोरच्याने फोनवर नुसतंच ,"साहब मेरा पेमेण्ट" असं म्हटल्यास आम्ही लगेच वरच्या आवाजात ,"अरे दे रहे हैं भाई , भाग जायेंगे क्या?" असं म्हणून फोन ठेऊन देतो. पण समजा समोरच्याने फोनवर ," साहब वो जरा पेमेण्ट का देख लेना." अशी विनंती केल्यास आम्ही लगेच ," हा साहब हो रहा हैं...इस वीक में हो जायेगा." असं  ठोकून देतो. आता समोरचा जर इंग्लिशमध्ये विचारत असेल तर आम्ही तितक्याच सफाईने ," येस वुई हॅव टेकन इट इन प्रोसेस. वुई आर जस्ट वेटिंग फोर अवर सीफओजं अप्प्रुव्हल विच कॅन कम एनी मोमेण्ट." असं झाडून मोकळे होतो. वास्तविक बहुतांशवेळा वरच्या तीनही सप्लायर्सच्या पेमेंटचा दूर दूर पर्यन्त पत्ता नसतो. शिवाय काही दिवसांनी जर परत फोन आलाच तर अनुक्रमे उत्तरं तयार असतात....फिलहाल पैसे नही हैं टाइम लगेगा/ चेक सायनिंग में हैं/ सीफओ इज ट्राव्हेलिंग !! ह्या तीनही वाक्यांना वेळेचं बंधन नाही. ह्याउपर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे थोड्या वेळाने ह्यातल्याच एखाद्याला  फोन करून ,"मटेरियल कब भेजोगे?" असं विचारायला आम्हाला काहीही वाटत नाहीअमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा धंदा रोखीत चालतो. त्यांना हे असले उधारीतले बाळंतपण सोसतील का?

ह्यात आणखी एक मजेदार प्रकार असतो. त्याला म्हणतात बदल / चेंज किंवा ह्यापेक्षाही गोंडस नाव म्हणजे रिव्हिजन ! थोडक्यात सांगायचं म्हणजे क्लायंटला जर सोनं हवं असेल तर आमच्याकडून नजरचुकीने किंवा जाणूनबुजून चांदीची ऑर्डर देण्यात येते आणि ती सुद्धा पितळेच्या भावात ! येनकेनप्रकारे क्लायण्टच्या हे लक्षात आल्यावर त्याला सोन्यापेक्षा चांदीच कशी चांगली हे पटवण्याचा असफल प्रयत्न केल्या जातो. शेवटी क्लायंट प्ल्याटीनमची मागणी करतो. मग सुरु होतो तो सप्लायरकडून पितळेच्याच भावात प्ल्याटीनम घेण्याचा एक वेडा अट्टाहास ! बऱ्याच प्रयत्नानंतर सुवर्णमध्य साधला जातो. (आता साईटला गेल्यावर त्या प्ल्याटीनमला गंज का चढतो ते मला विचारू नका!) पण ह्या अश्या परिस्थितीत फ़्लिपर्काटवाले तर चांदी आणि प्ल्याटीनम दोन्ही आमच्या माथ्यावर मारतील. कोणी चांदी घेता का चांदी असं म्हणायची आमच्यावर वेळ येईल.

बरं एकवेळ हे सगळं विसरून जाऊ. पण आमच्या कार्पोरेट विश्वात जबाबदारी हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. आणि जबाबदारी ढकलणे म्हणजेच जबाबदारी निभावणे हा अलिखित नियम आहे. म्हणजे बघा, प्रोजेक्टला उशीर होतोय या सत्यघटनेची जबाबदारी सेल्स डीपार्टमेण्टपासून प्लानिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट, इंजीनीयरिंग असं करता करता शेवटी सोर्सिंगवर ढकलण्यात येते. आम्ही सोर्सिंगवालेसुद्धा निरागसपणे ती सप्लायरकडे ढकलून देतो. काहीही झालं तरी ती आमच्याकडे परत येऊ देणे ह्यातच आमचं कौशल्य असते. अश्यावेळी जर फ़्लिपर्काट आमचा सप्लायर असेल तर ती जबाबदारी त्याच्या फायरवॉलपर्यन्तही पोहोचता आमच्याकडे वापस येईल. मग आम्ही पामरांनी कोणाकडे बघायचं ?

नाही नाही...फ़्लिपर्काट आम्हाला किंवा आमच्या सप्लायरला पर्याय असू शकत नाही.पिझ्झ्यावर भाजी फ्री मिळते म्हणून तो भाकरीला पर्याय ठरत नाही.तुझ्यासोबत जमेना अन तुझ्याशिवाय करमेना असं जरी आमचं नातं असलं तरी हर एक सप्लायर जरुरी होता हैं. सप्लायरला फोन करून झापण्यात जो आनंद आहे तो फ़्लिपर्काटच्या कॉलसेंटरला शिव्या घालण्यात नाही. किंवा एकेक अडथळा पार करून शेवटी साईटवर मटेरियल पोहोचवण्यात जे समाधान आहे ते एका क्लिकनंतर डिलीव्हरी बॉय कडून डिलीव्हरी घेण्यात नाही.  मी पैजेवर सांगू शकतो की आमचे प्रोजेक्ट मॅनेजरसुद्धा फ़्लिपर्काटला लवकरच कंटाळतील. कारण प्रोजेक्ट मॅनेजरच्या ," अरे अर्जेण्ट आहे" या वाक्याला जर प्रत्येकवेळी ,"युअर ऑर्डर इज रेजीस्टर्ड विद अस. इट विल बी डिलॆवर्ड इन टु वीक्स" असं छापील आणी नीरस उत्तर येणार असेल तर काय फायदा? क्लायण्टला सांगायला काहीतरी ष्टोरी हवी ना! फ़्लिपर्काट २ आठवडे घेणार असेल तर आम्ही १० घेऊ पण त्यासाठी आमच्याकडे काहीतरी ष्टोरी असेल. शेवटी अनुभव नावाची काही गोष्ट असते का नाही!  
म्हणूनच म्हणतो ,
येथे पाहिजे जातीचे, फ़्लिपर्काटचे हे काम नव्हे !!

                                                                  -- चिनार 

Tuesday, 24 November 2015

आमिर आणि शाहरुख

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर  मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय  तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..

नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!