सध्या सीसीडीचं (कॅफे कॉफी डे) प्रकरण जोरात आहे म्हणून नाहीतर हे लिखाण तसं सीसीडी, बरिस्ता आणि तत्सम सगळ्या प्रकारांना उद्देशून आहे. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये असताना शहरात सीसीडीचं पहिलं आउटलेट सुरु झालं. तेंव्हापासून ते नंतर कितीतरी वर्ष "हे आपल्यासाठी नाही" हे डोक्यात पक्कं बसलं होतं. कॉलेजसमोरच्या मामाच्या टपरीवर दोन रुपयात कटिंग चहा अन छोटा पारले जीचा पुडा घेणाऱ्या आमच्यासारख्यांना सीसीडीत जाऊन दीडशे रुपयाची कॉफी पिणे कधीच झेपणारे नव्हते. अगदी कमवायला लागल्यावरसुद्धा सीसीडीत जाऊन उधळावं असं कधीही वाटलं नाही. चहा किंवा कॉफी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण चांगल्या हॉटेलात आजही तीस रुपयात कॉफी अन दीडशे रुपयात भरपेट थाळी मिळत असताना फक्त कॉफीसाठी दोनशे-अडीचशे रुपये लोकं कसे काय देऊ शकतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
पुण्यात नवीन असताना नोकरी लागायच्या आधी एकदा एका मित्राला भेटायला गेलो होतो. त्याच्या कंपनीसमोर बरिस्ता कॉफी शॉप होतं. तो ही तिथे कधीच गेला नव्हता. पण त्यादिवशी त्याला काय वाटले माहिती नाही. फोनवर तो मला बरिस्तात भेटू असं म्हणाला. त्याने बरिस्ताचं नाव काढल्याबरोबर ,"तुया बाप गेला होता का रे बरिस्तात कधी?" ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.
त्यावर तो म्हणाला,
"अबे माझी पण हिंमत नाही झाली अजून. पण आता तू सोबत आहे तर गेलो असतो"
"हे पाय पैशे तुलेच द्यायचे आहे. पण आतमध्ये जाऊन मी इंग्रजी बोलणार नाही भाऊ"
इंग्रजी बोलावे लागेल हे कळल्यावर त्याने लगेच नाद सोडला.
बरं फक्त इंग्रजी बोलून भागणार नव्हते. तिथले वेटर व्हायवा घेतल्यासारखे प्रश्न विचारतात. म्हणजे पंधरा हत्तींची हिंमत एकटवुन दोन कॉफ्यांसाठी पाचशेची नोट खिशातून काढायची. त्यानंतर वन हॉट अँड वन कोल्ड कॉफी प्लीज असं घोकत घोकत काउंटरवरच्या तरुणीजवळ जायचं. अन मी तुझ्यावर लाईन मारतोय असं तिला जाणवू न देता अन एकदाही न अडखळता आपली ऑर्डर द्यायची.मग तिच्या कॅपेचिनो ऑर एस्प्रेसो ह्या प्रश्नावर मुरलीधरनसमोरच्या हेमांग बदानीसारखा केविलवाणा चेहरा करायचा. नंतर कसंबसं स्वत:ला सावरत "नाही नाही..गरम कॉफी आपली साधी" असं बावळटासारखं उत्तर द्यायचं.
एकतर अगदी पहिल्यापासूनच इतक्या चकचकीत वातावरणात मला गुदमरल्यासारखं होते. त्यात ह्यांचे प्रश्न अन शिष्टाचाराचे फवारे उडायला लागले की असह्य होते. कसंय की, नेहमीच्या हॉटेलात, वाजवी दर असल्याने अन्न आणि अपमान दोन्ही मुकाट गिळले जातात. पण इकडं, अवाजवी दरात अत्यंत बेचव कॉफी अन आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन परवडत नाही. म्हणून कित्येक वर्ष ह्या प्रकारापासून मी लांबच होतो. पण नंतर काही अपरिहार्य कारणांमुळे सीसीडीची ब्याद अंगावर घ्यावीच लागली.
ते कारण म्हणजे... लग्नासाठी वधूसंशोधन..
झालं काय की, आमचे पालक गावाकडे अन आम्ही नोकरीसाठी पुण्यात. आणि 'साहेबांच्या शैक्षणिक धोरणामुळे' अनेक समवयस्क सावित्रीच्या लेकीसुद्धा पुण्या-मुंबईतच नोकरीला असायच्या. मग आमचे पालक आपापसात बोलून राजीखुशीने आम्हाला पुण्यातल्या सीसीडीत भेटायला सांगायचे. आता आपला मुलगा कपातून बशीत ओततानासुद्धा चहा सांडवतो हे त्यांना माहिती असूनही मला ह्या अग्निदिव्यात का ढकलायचे ते माहिती नाही. तर एके दिवशी अचानक सीसीडीत भेटायचं फर्मान आलं. ध्यानीमनी नसताना डायरेक्ट वर्ल्डकप खेळायला जायचे फर्मान आल्यावर मयांक अग्रवालला काय वाटले असेल हे मी एगझॅक्ट सांगू शकतो.पण मयांकच्या गाठीशी क्रिकेट खेळण्याचा अनुभव तरी होता. इथं आमच्यासमोर मेनूकार्ड कसं मागायचं इथपासून ते मेनूकार्डातलं काय मागवायचं इथपर्यंत प्रश्न होते. मग लगोलग आम्ही गुगलवरून सीसीडीचं मेनूकार्ड डाऊनलोड केलं. आणि बराच खल केल्यावर स्वतःसाठी कोल्डकॉफी आणि तिच्यासाठी तिला जे हवं ते मागवायचं अशी स्ट्रॅटेजी ठरवली. तिला इंप्रेस करण्यासाठी दोन-तीन कॉफ्यांचे नावसुद्धा पाठ करून ठेवले.
पण.... नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते..
ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आम्ही सीसीडीत भेटलो. तोपर्यंत आमची खूप प्रॅक्टिस झाली होती. त्यामुळे मी आपल्या बापाचे कॉफीचे मळे असल्यागत सराईतपणे वागत होतो. मी माझ्यासाठी कोल्डकॉफी मागितली.
अन तिला विचारले..,
"तू काय घेणार? एक्स्प्रेसो ट्राय करून बघ हवं तर.."
आणि तिने बॉम्ब टाकला..
"ऍक्चुअली..माझी ना आज चतुर्थी आहे. इथं उपासाचं काही मिळते का?"
अगं रताळे आपण काय करमरकर नाश्ता सेंटरमध्ये आलोय का ... ! ही माझी मनातल्या मनात पहिली रिएक्शन होती.
आता हिच्यासाठी सीसीडीत उपासाचे पदार्थ शोधणं हा आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न होता. मी काउंटरवर जाऊन काहीतरी विचारल्यासारखं केलं आणि वापस आलो. आणि तिला घेऊन शेजारच्या गंधर्व हॉटेलात गेलो.
मला दुःख तिच्या चतुर्थीचं किंवा गंधर्वात जाण्याचं नव्हतं. तर दुःख हिच्यासाठी केला का अट्टाहास ह्याचं होतं. बरं एवढं करूनही तिने आधी नकार कळवला राव...!!
त्यानंतर सीसीडीत बऱ्याच वेळा जाणं झालं. (ह्याचं कारण सूज्ञांच्या लक्षात येईलच!) हळूहळू मी उत्तम सीसीडीपटू झालो. "सीसीडीचं स्टॅंडर्ड घसरलंय" किंवा "छया..पूर्वीचं सीसीडी राहिलं नाही" हे बोलण्याइतपत अनुभव आता गाठीशी आहे. पण गंमत म्हणजे जिच्याशी लग्न ठरलं तिच्याशी पहिली भेट सीसीडीत झाली नाही.
बहुतेक माझ्या पत्रिकेत 'सीसीडी लाभी नाही' असं कुठेतरी कोपऱ्यात लिहिलं असावं.
समाप्त
No comments:
Post a Comment