Wednesday, 19 June 2019

ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा'

ट्वेन्टी इयर्स ऑफ सरफरोश....फिफ्टीन इयर्स ऑफ लक्ष्य वगैरे ट्रेंड सुरु आहेत.
पण ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा' विषयी कोणी काहीच कसं बोलत नाहीये !
९९ साली आलेल्या ह्या सिनेमाची जाहिरात 'टायटॅनिकला मराठी उत्तर' अशी करण्यात आली होती.
टायटॅनिकमध्ये शेवटी लाकडी फलटीवर पुरेशी जागा असतानाही जॅकने मरण का स्वीकारले ह्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळते.
धांगडधिंगा सिनेमाची कथा कोर्टाच्या पार्श्वभूमीवर घडते. टायटॅनिक जहाजातून वाचलेल्या सातशे प्रवाश्यांनी धांगडधिंगा बघितल्यावर, आम्हाला का वाचवले म्हणून जहाजाच्या कॅप्टनवर त्याच कोर्टात केस केली होती म्हणे. एवढंच नाही, टायटॅनिक सिनेमात ती म्हातारी शेवटी गळ्यातला हिऱ्याचा हार समुद्रात फेकते ते आठवतंय का? तर धांगडधिंगा या 'सिनेमॅटिक जेम' समोर गळ्यातल्या हिऱ्याचे काहीच मोल नाही ह्याची पुरती जाणीव तिला झाली होती. म्हणूनच तिने हे पाऊल उचलले.
केट विन्स्लेटने तर किशोरीताई आंबीयेंचा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरवात केली होती. जेम्स कॅमेरूनच्या केबिनमध्ये 'आमचे श्रद्धास्थान' म्हणून आजही महेश कोठारेंचा फोटो आहे. धांगडधिंगाची पटकथा जेम्सने देवघरात ठेवलीये. अवतार सिनेमा करण्याआधी धांगडधिंगाचाच हॉलीवूडी रिमेक करण्याचा प्रस्ताव घेऊन एक निर्माता जेम्सकडे गेला होता. पण 'क्लासिकस् अँड कल्ट्स कॅन नॉट बी रीमेड. अँड धांगडधिंगा इज अ जेम विच शुड ओन्ली बी व्ह्यूड अँड शुड नॉट बी इव्हन टच्ड' असे म्हणून जेम्सने तो प्रस्ताव धुडकावून लावला.धांगडधिंगा हा माझ्या लायर लायर ह्या सिनेमावरून प्रेरित आहे असा आरोप खुद्द जिम कॅरीने केला होता. जेम्सने त्याचा विरोध करत "जिम कॅरीचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला. अवतारच्या पटकथेत जेम्सने महेश कोठारेंची मदत मागितली होती. पण कोठारे त्यावेळी 'जबरदस्त' या सायन्स फिक्शनच्या कामात बिझी असल्याने ते होऊ शकले नाही.
तरी नशीब धांगडधिंगा सिनेमात महागुरू नव्हते. नाहीतर लियोनार्डो डिकार्पियोने त्यांची दीक्षा घेण्यासाठी भारतात स्थलांतर केले असते. धांगडधिंगात महागुरुंचे नसणे आणि म्हणूनच लियोनार्डोने त्यांना फॉलो न करणे हेच त्याला ऑस्कर मिळण्यासाठी इतकी वर्ष थांबावे लागण्याचे कारण आहे.
इतके अनन्यसाधारण महत्त्व असलेला धांगडधिंगा !
ह्या सिनेमाला अनुल्लेखाने मारल्याबद्दल तमाम सिनेरसिक,विश्लेषक, समीक्षक आणि लेखक ह्यांचा जाहीर निषेध !
चिनार

No comments:

Post a Comment