Thursday, 9 May 2019

व्हिडीयो कोच..

९३-९४ साली प्रायव्हेट बस ही संस्था अगदी नवीन होती. शिवा ट्रॅव्हल्स, सदानी ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्या नुकत्याच उदयाला आल्या होत्या. अमरावती-अकोला, अमरावती-यवतमाळ वगैरे गाड्या राजापेठ चौकातून निघायच्या. नोकरीसाठी अप-डाऊन करण्याऱ्या लोकांसाठी ह्या गाड्या सोयीच्या होत्या. दिवसभर ऑफिसमधून थकूनभागून घराकडे निघाल्यावर एसटीतुन उभं राहून प्रवास करण्यापेक्षा हे बरं होतं. किंवा दिवसभर खरेदीसाठी वगैरे अमरावतीत आलेल्या कुटुंबांना रात्री गावाकडे परतण्यासाठी सुध्दा ह्या बसेसचा पर्याय उपलब्ध झाला. पण खाजगी क्षेत्र म्हटलं की स्पर्धा आली. स्पर्धा म्हटलं की नवनवीन डावपेच आले. आलेला प्रवासी जागा नसल्याकारणाने निसटून जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या सीट्सच्या मध्ये जी जागा असते त्यात स्टूल ठेवण्यात यायचे. त्या स्टूलवर लहान मुलांना बसवले की आईबाप मांडीवर घेण्याच्या त्रासातून मोकळे. पण ब्रेक लागला की सगळे स्टूल लायनीत एकमेकांवर आदळायचे. त्यामुळे काही दिवसांनी स्टूलवर बसायला कोणी तयार होईना. आणि दुसरीकडे स्पर्धा वाढतच होती.

मग प्रवासांना आकर्षित करण्यासाठी एक शक्कल लढवण्यात आलीव्हिडीयो कोच !!

x आरामदायी बस (व्हिडीयो कोच उपलब्ध) अश्या जाहिराती बसवर लिहिल्या जाऊ लागल्या. बसच्या समोरच्या भागात आणि ड्रायवर केबिनच्या मागे टीव्ही लावलेला असे. आणि व्हीसीआरवर कॅसेट लावून सिनेमे दाखवायचे. तेवढाच तास-दोन तास प्रवाश्यांचा वेळ चांगला जायचा. मलाही सुरवातीला ह्या व्हिडीयो कोचवाल्या बसेस फार आवडायच्या. इतरवेळी बघायला मिळणारे बरेच सिनेमे तिथे बघायला मिळायचे. मिथुन, अजय देवगण, सुनील शेट्टी, अक्षय कुमारच्या  त्याकाळातील सिनेमांचे थेयटरपेक्षाही जास्त शोज ह्या व्हिडीयो कोच बसमध्ये जास्त झाले असतील. त्यावेळी खान त्रिकुट आणि गोविंदा हे चलनी नाणे होते. त्यामुळे त्यांचे सिनेमे बसमध्ये लावणे म्हणजे प्रीमियम कॅटेगरी होती. अगदीच एखाद्यावेळेला त्यांचे सिनेमे लावायचे. पुढे जाऊन गोविंदाचे चलनीमूल्य कमी झाले. आणि त्याच्या सिनेमाची रवानगी जनरल कॅटेगिरीत झाली. आणि गोविंदाचे चाललेले जुने सिनेमे ही व्हिडीयो कोचची ओळख बनली. इंगजी सिनेमेवगैरे बसमध्ये कधीच लावत नव्हते. कारण समोर फॅमिली ऑडियन्स असायचा. आणि भारतीय फॅमेल्या हिंदी सिनेमातले बलात्काराचे प्रसंग आणि सीरियलमधले कौटुंबिक कटकारस्थानं चालतील पण इंग्रजी सिनेमे नको ह्यावर अजूनही ठाम आहेत.

असो. पण कुठलाही सिनेमा लावला तरी एक समस्या कायमच असायची. अमरावती -अकोला किंवा यवतमाळ हे अंतर दोन तासांचं. आणि त्याकाळात कोणताच हिंदी सिनेमा दोन तासात संपत नसे. त्यामुळे शेवटी  हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या दुष्ट आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात 'चलो अकोला बसस्ट्यांड' अशी आरोळी ऐकू यायची. की उतरा बसमधून. माझ्या व्हिडीयोकोच बस प्रवासाच्या कारकिर्दीत टायटल्सपासून क्रेडिट्सपर्यंत पाहिलेला एकही सिनेमा मला आठवत नाही. तश्या आणखीही बऱ्याच समस्या होत्या. बसमधल्या मागच्या सीटवर टीव्हीचा आवाज पोहोचत नसे. मग काही दिवसांनी तिथे स्पीकर लावण्यात आले. आधीच लाऊड सिनेमे आणि त्यात फाटलेल्या आवाजाचे स्पीकर्स म्हणजे कानावर अत्याचार व्हायचा. आणि एखाद्यावेळी चांगला सिनेमा, चांगली जागा आणि व्यवस्थित आवाज हे सगळं जुळून आलं की टीव्हीवरचं चित्र खराब असायचं. ह्या असल्या कारणांनी व्हिडीयो कोचचं आकर्षण कमी झालं.

पुढे अमरावती-पुणे, सुरत वगैरे लांब पल्ल्याच्या x सीटर बसेस सुरु झाल्या. ह्यात व्हिडीयो कोच ही सुविधा नसून गरज होती. कारण एवढे मोठाले कंटाळवाणे प्रवास  मनोरंजनाशिवाय करणं अशक्य होतं.ह्यात साधारण दोन सिनेमे तरी बघून व्हायचे. नंतर व्हीसीआर जाऊन सीडी प्लेयर आले. सीटर बसेसला स्लीपर कोचचा पर्याय आला. मग एसी स्लीपर कोच आलेत. पण स्लीपर कोचमध्ये एकाबाजूला झोपून समोरच्या टीव्हीकडे बघणं त्रासदायक होतं. ह्यावर उपाय म्हणून स्लीपर कोचच्या प्रत्येक कम्पार्टमेन्टला स्वतंत्र स्क्रीन देण्यात आली. मग शेजारी बसलेल्या अनोळखी सहप्रवाश्याला सिनेमा बघायचा नसेल तर काय हा प्रश्न उपस्थित झाला. त्यासाठी एकाच कंपार्टमेंटमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या. आणि आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक प्रवाश्याला एकेक हेडफोन! आताशा उपलब्ध असलेल्या सिनेमातून आपल्या आवडीचा सिनेमा निवडण्याचीही सुविधा आहे. एवढं असताना आजकाल आलिशान एसी बसमधून प्रवास करताना इयर फोन लावून स्वत:च्याच लॅपटॉपवर वेब सिरीज बघण्याची पद्धत आहे.

डिजिटल क्रांती का काय म्हणतात ते हेच असावं...

असो. आणि आम्ही काय करतो? तर त्या लॅपटॉपवल्याच्या आजूबाजूच्या कंपार्टमेंटमध्ये आमच्या लेकीला झोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
"अगं तो टीव्ही खराब झालाय. तो नाही लागणार. झोप तू."

आणि ह्यावर सुपर मिलेनियल जनरेशनची आमची लेक आम्हाला ऐकवते,

"मग मला यु त्यूबवल व्हीदियो लाऊन द्या..आनि तुमी झोपा"


समाप्त

No comments:

Post a Comment