Monday, 29 April 2019

लग्नाचा मुहूर्त


आज लग्नाचा मुहूर्त आहे बहुतेक..
रस्त्यात एक वरात पाहिली. जादूगारासारखा जाडाभरडा वेष घातलेला आणि घामाने लथपथलेला नवरा मुलगा..

वरती सूर्य आज फिफ्टी मारण्याच्या तयारीत आहेच..

बकरा हलाल करण्याआधी भाजून काढण्याची ही कुठली अमानुष पद्धत..!!

तिकडे नवरीची परिस्थिती फार काही वेगळी नसते..
चेहऱ्यावर अर्ध्या इंचीचा मेकअप अन चमकी थापलेली..स्वत:च्या वजनाच्या दुप्पट असलेला पेहराव..
तो पायात येऊन पडू नये म्हणून आसपास सतत दोन-चार बहिणींचा जागता पहारा..

आता लोकं ह्यांच्या डोक्यावर अक्षता फेकून मारणार. मग हे दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालणार. 
नंतर सुलग्न लावण्याच्या नावाखाली लोकं ह्यांची डोकी एकमेकांवर आपटवणार..फेट्यातूनही कवटीला मार बसेल असा इंपॅक्ट असतो त्याचा..अश्या पाहुण्यांसाठी लग्नात बाउंसर्स का ठेवत नाही कोण जाणे?

त्यात तो फोटोग्राफर नावाचा शनी ह्यांची प्रत्येक हालचाल वक्रदृष्टीने टिपत असतो. त्यामुळे चेहरा हसरा ठेवायचा. आजकाल तर कॅन्डीड फोटोसाठी प्रत्येक हालचाल तीन-तीनवेळा करायला लावतात म्हणे!
दोन-चार महत्त्वाचे फोटो काढल्यावर ह्याच्या मुसक्या बांधून खोलीत बंद का करत नाहीत कोण जाणे?

वरती सूर्याची फिफ्टी झालेली आहे. सेटिंग स्टॅन्डबाय मोडवर ठेऊन तो लंचला गेलाय... आता ही दोघं बसणार होम-हवनासाठी...अगागागा..

सकाळपासुन पोटात पाण्याशिवाय काहीच नाही, असह्य गरमी आणि  समोर बफेत लोकं आईस्क्रीमचे गोळे भातात कालवून खातायेत.

अश्या परिस्थितीत गुरुजी ह्या दोघांना साताजन्माचे वचनं घ्यायला सांगतात. कंटाळून "नाही" किंवा चिडून "हो" म्हणण्याशिवाय कोणताच पर्याय समोर नसतो. म्हणजे मी तर गुरुजींना सुटकेच्या बदल्यात इस्टेट लिहून दिली असती.

मग मंगळसूत्र वगैरे घालून झाल्यावर सप्तपदी सुरु होते. परत त्या फोटोग्राफरला चेव येतो. सप्तपदीच्या प्रत्येक पावलाचे तीन आवर्तनं होऊन त्याची एकवीसपदी होते.

एव्हाना पाहुणेमंडळी बफेतलं जेवण पचवून एक झोपसुद्धा झालेली असते. आता विहिणीच्या पंगतीची वाट बघत बसतात बिचारे. कार्यालयात एकंदरीतच मरगळ आलेली बघून "अरे काही घाईच नाही या लोकांना..चाललंय सगळं आरामात" अशी एखादी टिपणी येते.

शेवटी विहिणीची पंगत सुरु होते. दोघं बिचारे पहिला घास घेणार तेवढ्यात उखाणा घेण्याची मागणी येते. शहाण्या माणसाने इथं थोडं सांभाळून वागावं. कारण एकतर उखाण्याइतका पांचट साहित्यप्रकार दुसरा कुठलाच नाहीये. त्यामुळे त्यासाठी आग्रह करणं म्हणजे शास्त्रीय संगीताची सुंदर मैफील ऐकून तृप्त झाल्यावर झिंगाटची फर्माईश करण्यासारखं आहे. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नवदाम्पत्याला घास घेताना अडवल्यावर अख्ख्या लग्नाचं फ्रष्ट्रेशन तुमच्यावर निघू शकते. त्यामुळे ह्या भानगडीत पडूच नये.

पण आपलं कोणी ऐकते का?? चालू द्या...

शेवटी लग्न म्हणजे तरी काय असतं...?

हौस असते एकेकाची... !!








Monday, 8 April 2019

विराट, आयपीएल आणि वर्ल्डकप


क्रिकेट वर्ल्डकप तोंडावर आले असताना आयपीएलला प्राधान्य देऊन ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल बीसीसीआयचे हार्दिक अभिनंदन ! अर्थात कितीतरी धनाढ्यांचे हितसंबंध आयपीएलमध्ये गुंतले असताना वर्ल्डकपसारख्या टुकार स्पर्धेचे शुल्लक कारण देता येत नसते ह्याची मला कल्पना आहे.
तर आयपीएल आता रंगात आलेली आहे. आता आमच्यासारखे पूर्वग्रहदूषित आणि प्रतिगामी लोकं आयपीएल बघत नाहीत त्याचा आयपीएलच्या लोकप्रियतेवर घंटा फरक पडत नाही. (हो हो आम्हीच ते आयपीएल सामना सुरु असताना 'तूला पाहते रे' किंवा 'तारक मेहता का उलट चष्मा' बघणारे.)
तर आयपीएलमध्ये कोण खेळतंय, कसं खेळतंय आणि का खेळतंय ह्याने आम्हालाही घंटा फरक पडत नाही.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हारू दे किंवा बार्शीटाकळी इलेव्हन जिंकू दे, आम्हाला त्याचे सोयरसुतक नाही.  ह्यातल्या कोणत्याही बातमीवर आम्ही 'हा तो उसका क्या?' अशीच रिएक्शन देणार.
पण पण पण...
आज सकाळी पेपर वाचताना आमच्या विराट कोहलीचा रागीट चेहऱ्याचा एक फोटो नजरेत आला. आता ह्यात फारसं नवल ते काहीच नाही. विराटचा शेवटचा हसताना दिसला होता तो  म्हणजे आईच्या पोटात असताना विसाव्या आठवड्यातील सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये! विराट अगदी तान्हा असताना झोपेतसुद्धा हासायाचा नाही. तान्ह्या बाळांना झोपेत सटवाई हसवते असं म्हणतात. पण विराट म्हणे त्या सटवाईलाच घाबरावयाचा.
असो.
 तर विराटचा पेपरमधील रागीट चेहरा यावेळी जरा वेगळा वाटला म्हणून ती बातमी वाचायला घेतली. तर विराट नेतृत्व करत असलेली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम ह्यावेळी ओळीने सहा सामने हारली म्हणे. त्यामुळे विराट चिडला आणि त्याने स्वतःच्याच बॉलर्सवर तोंडसुख घेतलं. आणि ह्या बातमीच्या शेजारीच 'विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह!' अशी बातमी छापलेली होती.
(बाकी आयपीएलमधल्या सिमेंटने प्लास्टरिंग केलेल्या पिचेस, त्यावर कुठेतरी वळतील या आशेने बॉल आपटू आपटू हतबल झालेले बॉलर्स आणि एकंदरीत बॉलिंगचा दर्जा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी नंतर कधीतरी) 
मी काय म्हणतो विराट, ती आयपीएल जाऊदे गाढवाच्या गावाला !
ह्यावर विराट म्हणेल, जी स्पर्धा मुळातच गाढवाच्या गावात भरवल्या जाते तिला तिथंच कसं पाठवणार?
अरे राजा मग तू तिथून वापस ये ना.. हे बघ मोदींविषयी विचारू शकत नसलो तरी तुझ्याविषयी आम्ही विचारू शकतोच !!

इफ नॉट विराट, देन हू ????

तूच आहेस रे बाबा..तुमरे बिन हमरा कौनो नहीं..
अरे आठव आठव, आपण कर्णधारपदाची धुरा कोणाकडून स्वतःच्या खांद्यावर घेतली? त्या माणसाचे कर्तृत्व काय अफाट  होते ! असल्या फालतू आयपीएल ट्रॉफ्या दोन-चार वेळा जिंकून फेकून दिल्या त्याने पण तब्बल दोन वेळा वर्ल्डकप सन्मानाने खांद्यांवर मिरवला. तुलाही तसाच मिरवताना आम्हाला बघायचे आहे रे..
अरे सोन्या, २००३ च्या वर्ल्डकप फायनलचा पराभव ह्या फुटकळ सहा पराभवांपेक्षा कितीतरी जास्त वेदनादायी होता रे.
अरे दे सोडून ते आयपीएल...आणि लाग वर्ल्डकपच्या तयारीला...सगळे आयपीएलच्या मैदानावर तूला शोधत बसतील..अन तू वर्ल्डकपच्या मैदानातून दिवारमधल्या बच्चनस्टाईलने उत्तर दे..

"तुम लोग मुझे वहा धुंड रहे हो और मैं तुम्हारा यहा इंतजार कर रहा हू !!!"

अब आयेगा मजा खेल का !!

-- चिनार







Friday, 5 April 2019

मी-माझी पिढी, लग्न आणि क्रिकेट -स्टँडअप कॉमेडी

विद्यमान कंपनीत होळीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात स्टॅन्ड अप कॉमेडीचा एक छोटा कार्यक्रम केला.
कार्यक्रमाच्या व्हिडियोची लिंक खाली देत आहे.

https://youtu.be/-gBDGoEE3Cg