रात्रभर
पावसाची रिपरिप चाललेली..टिनपत्र्याच्या खोलीच्या छतावर होणार टनटन आवाज..खोली कसली? झोपडीच ती..आसपास पडलेले भंगारातले टिनपत्रे उचलून कापडी भिंतीना आधार दिलेला, म्हणून तिला खोली म्हणायचं..टनटन आवाजामुळे लक्ष्मीचा रात्रभर डोळा लागला नव्हता..सकाळी कसल्याश्या आवाजाने तिला जाग आली..त्यातला एक आवाज तिच्या
ओळखीचा होता..दुसराही ओळखीचा असला तरी अनपेक्षित होता.आसपासच्या उकीरड्यात फिरणाऱ्या डुकरांचे आवाज तिच्यासाठी नेहमीचे होते..आज त्यातलंच एक
डुक्कर खोलीच्या बाहेरील माती खणून कापडातून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतं..लक्ष्मी एका दमातच उठली..कापडातूनच एक लाथ घालून
डुकराला पळवून लावलं तिने..तसा तर तिला आता
त्या डुकरांचाही लळा लागला होता..कधीमधी शिळी भाकर घालायची ती डुकरांना..कालची
अर्धी भाकर खोलीच्या कोपऱ्यात एका
कागदावर तिने ठेवली होती..पावसाने जमीन ओली झालेली..ते डुक्कर बहुतेक
त्या भाकरीसाठीच धडपड करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असावं..सगळं आवरल्यावर लक्ष्मीने तोंडावर पाणी मारलं.. ती ओलसर शिळी
भाकर खाऊन लगेच तिला कामावर निघायचं होतं..
निघताना
लक्ष्मीने तिची नेहमीची वेताची टोपली घेतली..टोपलीच्या अर्ध्या भागातील कालचे उरलेले शेण फेकून दिले..मधात एक कापड टाकून
तिने टोपलीच्या दोन भाग केले होते..दुसऱ्या भागातला कागद थोडा झटकून परत तिथेच ठेवला..खोलीत एक नजर फिरवून
कामावर निघाली..काम कसलं? भाकरी मिळवण्याची धडपड नुसती ! गावाच्या दुसरया टोकाला म्हशीचे दोन तीन गोठे होते. संध्याकाळी गोठ्यात परतताना म्हशी रस्त्यावर शेण टाकत... लक्ष्मी सकाळी जाऊन ते शेण टोपलीत
गोळा करायची..गावातल्या तीन-चार घरात जाऊन शिळ्या पोळी-भाकरीच्या बदल्यात आंगण सारवण्यासाठी शेण टाकायची..जगाच्या भाषेत ह्याला खरेदी-विक्रीचा व्यवहार म्हणतात..पण लक्ष्मीचा व्यवहार
वेगळा होता..कारण एवढ्या शेणाच्या बदल्यात एवढ्या भाकऱ्या असा काही नियम नव्हता..हातभर शेणाच्या बदल्यात, घरात जे आणि जेवढं
उरलेलं असेल तेवढंच तिला मिळायचं..कधीकधी शेणाच्या
क्वालिटीविषयी टोमणेसुद्धा मिळायचे..पण लक्ष्मी या
सगळ्याला सरावली होती..शेणही रोज गोळा व्हायचंच असं काही नाही..कारण म्हशी कधी रस्त्यात शेण टाकायच्या तर कधी गोठ्यात
गेल्यावर..! असं जेंव्हा जेंव्हा घडायचं त्यापुढचा दिवस लक्ष्मीसाठी "एकादशीचा" असायचा...एके दिवशी शेण नाही मिळालं म्हणून लक्ष्मी गोठ्यात मागायला
गेली होती…नंतर तसा प्रयत्न तिने कधीच केला नाही !!
आज
चार घरी पुरेल एवढं शेण मिळालं म्हणून लक्ष्मी खुशीत होती. पहिल्याघरी आज तिला बाजरीच्या
भाकरीला लोण्याचं बोट लावून मिळालं होतं..दुसऱ्याघरीसुद्धा बऱ्यापैकी अन्न मिळालं.
वेताच्या टोपलीत शेणाच्या बाजूला कापड टाकून केलेल्या जागेत तिने सगळे अन्न ठेवले आणि
ती तिसऱ्या घराकडे निघाली...आता थोडंफार जरी मिळालं तरी तिचे दोन दिवस पोटभरल्या सुखात
जाणार होते..
"भाकर
दे वो माय...शेण टाकतीया", लक्ष्मीने आरोळी ठोकली..
त्या
घरातली लक्ष्मी बाहेर येऊन म्हणाली," थोडं जास्त शेण दे गं लक्ष्मी.आज परसाकडचं सारवायचंय..एक पोळी
जास्त देते तुला."
"नाही
वं माय..थोडंच उरलंय आता..अजून पाटलाच्या घरी टाकायचंय..पोळी दे जास्तीची..उद्या टाकते
जास्त शेण"
"मग
जास्तीची पोळी उद्याच घेऊन जा", फणकाऱ्यात उत्तर आलं.
लक्ष्मी
माघारी फिरली आणि पाटलाच्या वाड्याकडे निघाली..
परत
तीच आरोळी...
"उक्षुम्बाई
आली....उक्षुम्बाई आली", पाटलाचा नातू धावत बाहेर आला. दोन वर्षाच्या त्या चिमुरड्याला
तिचं नावही घेता येत नव्हतं...लक्ष्मीला त्याने फरक पडत नव्हता..तिला त्या चिमुरड्याचा
लळा लागला होता. रोज त्याला कडेवर घेऊन मुका घ्यावा असं तिला वाटायचं...पण शेणाच्या
हाताने !!!!
लक्ष्मीने
नेहमीच्या ठिकाणी शेण टाकलं तेव्हढ्यात पाटलीणबाई बाहेर आल्या.
"लक्ष्मी
काल रात्रीच काहीच उरलेलं नाही आता..शेण टाकून जा..उद्या देईल."
लक्ष्मी
शून्यात बघत उभी राहिली...
"थोडं
काय असेल तर बघ माय."
"सांगितलं
ना काही नाहीये ते..उद्या देईल..जा आता"
चिमुरड्याकडे
बघत बघत लक्ष्मी वाड्याबाहेर आली. शेवटी तिने विचार केला, जाऊदे आजच्यापुरतं तर मिळालंय
ना..
खोलीवर
पोहोचेपर्यंत अंधार होत आला होता. आतमध्ये आल्यावर तिने टोपली नेहमीच्या जागेवर ठेवली.
आणि अंधारात दिवा लावण्यासाठी तेल हुडकू लागली..काही वेळात दिवा लागला आणि मिनिटभरात
वाऱ्यामुळे विझून गेला..पण तेवढ्या वेळात लक्ष्मीला सगळं काही दिसलं ..
कापडी
भिंतीच्या खालची माती उकरल्या गेली होती. आणि एक डुक्कर आतमध्ये येऊन लक्ष्मीने ठेवलेल्या
टोपलीत तोंड घालून बसलं होतं.....!!!
बाहेर
पावसाची रिपरिप परत चालू झाली ...यावेळी पाऊस मात्र लक्ष्मीच्या डोळ्यातूनही बरसत होता....!!
--चिनार
No comments:
Post a Comment