Wednesday, 7 January 2015

"घर- घर "

गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय  आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो. जवळपास   20 वर्षांच्या कालावधीनंतर भेटलेल्या एका नातेवाईकाने मला वरील प्रश्न विचारला, त्यावर 'नाही' असे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले , "अरे काय अजून किती दिवस भाड्याच्या घरात रहाणार? करा काहीतरी ! " त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलेला सगळ्यात पहिला विचार म्हणजे," मी म्हशीच्या गोठ्यात जरी राहीलो तरी ह्याच्या बापाचं काय जाते? "  ते गृहस्थ अजूनही गावात वडिलोपार्जित वाड्यात रहात असल्याचं मला नंतर कळलं !

असो. तर लोकाग्रहास्तव म्हणा किंवा स्वत: ची गरज म्हणा पण आम्ही Flat शोधण्याची मोहीम सुरु केली. थोडीबहुत चौकशी केल्यावर कळलं की साधारण चार माणसांचा महिन्याचा किराणा आणि पेट्रोल च्या खर्चात एक स्क़्वेअर फूट जागा मिळते . ती सुद्धा किराणा, पेट्रोल ज्या ठिकाणी मिळते तिथून -१० किलोमीटर दूर !! जसं जसं जवळ येऊ तशी तशी किंमत वाढेल. मग हळुहळु आम्ही बिल्डर्सच्या ऑफिसेस मध्ये जाऊ लागलो. सुरुवातीला काही मोठ्या बिल्डर्स चे ऑफिस बाहेरूनच बघून आत जावं की नाही अशी भीती वाटायची. पण नंतर आम्ही सरावलो. आत गेल्यावर एखादी आकर्षक रिसेप्शनिस्ट मुलगी आपलं स्वागत करते. थोडसं 'हाय - हेलो' करून हळुच आपलं बजेट किती वगैरे ही माहिती काढून घेते. आपल्या बजेट चा आकडा जर कमी असेल (बहुधा असतोच!) तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात (मग आपल्याला बसायला सांगून ती निघून जाते. आणि नेमके त्याच दिवशी तिचे सर इतके बिझी असतात की आपल्याला भेटू शकत नाही. मग ती आपल्याला 'प्रोजेक्ट प्लान ' आणि  'कोस्टिंग शीट' देऊन आपली बोळवण करते.). पण चुकून जर आपल्या बजेटचा आकडा तिच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लगेच ती सरांना भेटायला आतल्या केबिन मध्ये घेऊन जाते. मग सर बोलायला सुरु करतात
" सर आमचा हा प्रोजेक्ट इतक्या इतक्या एकरांवर पसरलेला आहे. आसपास असं असं निसर्गसौंदर्य आहे. आम्ही  अमुक अमुक फेजेस बांधतो आहे .....वगैरे वगैरे
खरं म्हणजे आपल्याला दोनचं गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. घराचा एरिया किती ? भाव किती? पण या गोष्टी सर आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतात. आणि दोघांचा गुणाकार ऐकू आपण तिथुन निघून जातो

पण काहीही असो , यांच्या सोसायट्यांचे नाव मात्र ऐकण्यासारखे असतात. 'नेस्टोरीया', ,ओनेलीया', 'ग्रेसिया', 'रोझ व्हिला', 'प्रिस्टिन गार्डन' !! नाव ऐकल्यावरच आपण साहेबाच्या देशात आल्यासारखे वाटते. पण मला सांगा नेस्टोरीया धनकवडी ,ओनेलीया हांडेवाडी , ग्रेसिया तळेगाव ढमढेरे , रोझ व्हिला कोंढवा बुद्रुक  असे पत्ते साहेबाच्या देशात असतील का हो ? असो. दुसरी ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे साइट लोकेशन . ते लोकेशन शहरापासून कितीही लांब असो तरीसुद्धा ते एकतर 'मोस्ट डेव्ह्लप्ड' तरी असतं किंवा 'नेक्स्ट डेस्टीनेशन' तरी असतं. आसपास सगळीकडे जंगल जरी असलं तरी तिथे लवकरच ‘Shopping Mall” किंवा ‘IT Park’ होणार असतो. शिवाय समोर ओसाड पडलेल्या जागेवर एक साठ मीटर रुंद रस्ता मंजूर झालेला असतो. जो एकीकडे विमानतळ आणि दुसरीकडे डायरेक्ट हिंजेवाडीला जाऊन मिळणार असतो. तो रस्ता कोणी मंजूर केला ? कोण बांधणार आहे? कधी बांधणार आहे ? असले मुर्खासारखे प्रश्न विचारायचे नसतात

एक साइट लोकेशन बघायला गेलो असताना मी तिथल्या माणसाला जास्त किमतीचे कारण विचारले. तो म्हणाला ," साहेब इथून हायवे एकदम जवळ आहे ". आता हायवे आणि ते लोकेशन याच्या मधात साधारण तीन डोंगर होते. आणि कच्च्या रस्त्याने हायवे पर्यन्त जायला वीस मिनिटे लागत होती !! बरं समजा लोकेशन हायवे टच जरी असलं तरी त्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग असतो ? आपल्या मुलांना जर क्रिकेट खेळायचं असेल तर ते हायवेवर जातील का ? हायवेवरच्या वाहनांचा आवाज आणि उडणारी धूळ यांचा काय उपयोग ? जास्त पैशे नक्के मोजायचे कशासाठी

सोसायट्यान्मध्ये मिळणाऱ्या  ‘Ammenities’ ही आणखी एक मजेदार बाब आहे. प्रत्येकी बारा मजल्यांच्या बावीस इमारती असलेल्या एका लोकेशनवर मी गेलो होतो. तिथे स्विमिंग पूल, जौग्गिंग रुट, गार्डन, जीम . सगळ्या ammenities होत्या. मी नं राहवून एक प्रश्न विचारला ," बावीस इमारती बांधल्यावर सुर्य दिसेल का हो ? की त्यासाठी वेगळा ammenity charge द्यावा लागेल ?

याशिवाय आपल्या लोकेशन पासून सगळ्याच गोष्टी किती जवळ आहे याचा हिशोब अंतरात नाही तर मिनिटात दिला जातो. दिलेला वेळ हा बहुतेक विमानप्रवासाचा असावा असं माझा अंदाज आहे. उदा. खराडी बायपास ते पुणे स्टेशन हे साधारण १० किमी अंतर १७ मिनिटे असं दाखवलं असते. दिवसातल्या कोणत्याही वेळी हे अंतर १७ मिनिटात पार करता येत नाही. विमानाने बहुधा शक्य असावं

जागेचे दर वाढवण्याचे कारणं तर अनाकलनीय असतात. अक्षरश: "खूप दिवसात भाव वाढवलाच नव्हता म्हणून वाढवला" अशी कारणं सुद्धा सांगण्यात येतात. प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, आयटी पार्क ह्याच्या नावाखाली भाव वाढवले जातात. आपल्या नातवाच्या लग्नापर्यन्त ते विमानतळ बांधून होत नाही. आणि बांधून झालंच तर नातू विमानात बसून परदेशात स्थायिक व्हायला जातो. मग आयुष्यभर आपण उडणारी विमानं बघायची !

असो. तर घर शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सगळी गणितं जमून आली तर घर नक्के होईल. मग उरलेलं आयुष्य ईएमआयरुपी  गणितं  सोडवायची आहेतच !!!


No comments:

Post a Comment