Wednesday, 5 November 2014

माझा पहिला स्मार्टफोन्

माझा पहिला स्मार्टफोन्

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत". नाही म्हणायला माझ्या मित्रांचे स्मार्टफोन्स  मी एक दोन वेळा वापरायचा प्रयत्न केला आहे. पण त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. स्मार्टफोन्सविषयी माझा मुलभूत प्रश्न असा आहे कि स्मार्टफोन् वापरायला जर माझा स्मार्टनेस वापरावा लागत असेल तर त्या फोन ला स्मार्ट का म्हणायचं ??
त्यादिवशी माझ्या भावांसोबत गप्पा मारत असताना मी सहज म्हणालो , " मला नवीन फोन घ्यायचा आहे. स्मार्टफोन् घ्यायचा विचार आहे. "
 ते ऐकून त्या दोघांचा चेहरा इतका गंभीर झाला कि जणू काही मी त्यांना ," माझी भारतरत्न साठी शिफारस करा" असं म्हणालोय !!!!
पण ते दोघही मला चांगलाच ओळखत असल्यामुळे त्यांच्या गांभीर्याच कारण मला कळत होतं. जगातल्या कोणत्याही विषयावर माझं नसलेलं ज्ञान मी पाजाळू शकतो पण मोबाईल  चा विषय निघाला कि  मी गप्प बसतो. पण आता स्मार्टफोन् घ्यायचाच असं मी ठरवलं. माझ्या दोन्ही भावांनी मला मदत करायचा मान्य केलं. मग त्या दोघांची अगम्य भाषेत चर्चा सुरु झाली. माझं बजेट त्यांनी परस्पर ठरवलं. अधूनमधून 'नोकिया', 'साम्संग,'सोनीअशी नावं मला ऐकू येत होती.
नंतर श्रीकांत म्हणाला ,"  अरे नोकिया चांगला आहे पण त्याच्यात विंडोज ओएस   आहे." 
 व्वा !! नोकियाविंडोज आणि ओएस हे तीनही शब्द माझ्या ओळखीचे होते. मी खुश झालो.
 पण दादा लगेच म्हणाला, " हो !! आणि विंडोज ह्याला वापरता येणार नाही." दोघेही हसले.
शेवटी मी राहवून म्हणालो, "अरे, विंडोज  ही मला माहिती असलेली एकमेव ओएस आहे. थोडीफार जमेल ना मला."
"तू शांत बस. माझ्या laptop मध्ये विंडोज आहे" ,  दादा म्हणाला.  

 आणि मी खरचं शांत बसलो. दोन दिवसांपूर्वी दादाचा laptop वापरत असताना तो बंद कसा करायचा हे मी अर्धा तास शोधत होतो. (म्हणजे अर्ध्या तासांनी मला यश मिळालं असं नाही. नन्तर मी प्रयत्न करणं सोडून दिलं ). नवीन ओएस तयार करताना सगळं काही बदललं तर चालेल पण कॉम्पुटर सुरु आणि बंद करण्याची पद्धत का बदलावी लागते हे माझ्या आकलनशक्ती  पलीकडलं आहे. असो.

तर अश्या रीतींनी माझं मोबाईलपुराण  सुरु झालं. त्यानंतर रोज ते दोघही मला नवीन नवीन मोबाईल चे नाव सांगत होते. आणि रोज वेगवेगळ्या वेबसाईट चे नाव सांगून , "इथे जाउन हे चेक कर ,तिथे जाउन ते चेक कर " असं सुरु होतं. त्या वेबसाईट वर गेल्यावर मोबाईल चे वेगवेगळ्या कोनातून काढलेले फोटो दिसायचे. आणि त्याखाली अगम्य भाषेत काहीतरी लिहिलेलं असायचं. पण मी आधी कुठेतरी कोपऱ्यात लिहिलेली किंमत वाचायचो. १६८०० ओन्ली !! १८३०० ओन्ली !!! २०५०० ओन्ली !!!. ओन्ली लिहून या लोकांना काय सांगायचं असतं देव जाणे. मला मिळालेला पहिला पगार याच आकड्यांच्या जवळपास होता .आता थोडा जास्त मिळत असला तरी तिथे पोहोचायला - वर्ष लागली. आणि ह्यातला कोणताही फोन घेतला तरी तो आउटडेटेड व्हायला - महिने पण लागणार नाही . पण माझे हे विचार कोण ऐकणार.
दादा म्हणाला," अरे आजकाल कॉलेज च्या मुलांकडे चांगले फोन असतात तर तू कशाला इतका विचार करतो ?"

 
कॉलेज चे मुलं एवढ्या महागाचा फोन का वापरतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. म्हणजे कॉलेज मध्ये जाउन अभ्यास करा किंवा लेक्चर करा असे सल्ले मी देणार नाही पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे  बघण्यात काय सुख असतं ?? मी पुण्यातल्या एका  नातेवाईकांकडे गेलो होतो . त्यांच्याकडे त्यांच्या नात्यातला एक मुलगा राहत होतातो इथेच शिकतो अशी त्यांनी ओळख करून दिली. पण  त्याने  माझ्याकडे बघितला सुद्धा नाही. देवाशप्पथ सांगतो त्या नंतर चे दोन तास  मी  त्याचा चेहरा बघायला   धडपडत होतो. पण तो सतत त्याच्या मोबाईल कडेच  बघत होता .आणि नंतर त्याच मोबाईल वर कोणाचा तरी फोन आला म्हणून तो निघून गेला.

असो. तर आपल्या पहिल्या पगाराएव्हढे पैसे खर्च करून  मोबाईल घ्यावा का या विचारात मी पडलो. पण माझ्या दोन्ही भावांनी माझा मन वळवलं. आणि शेवटी मी स्मार्टफोन् घेतलाच. नंतर चे काही दिवस तो शिकण्यात गेले. आता मी पण स्मार्ट झालो आहे. समोर कोणीतरी  माझ्याशी बोलत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून हातातल्या फोन कडे बघणं आता मला जमायला लागला आहे. " आज संध्याकाळी आपण भेटू " असा मेसेज whats app  वर मित्रांना पाठवून , संध्याकाळी ते भेटल्यावर whats app  वर तिसऱ्याच मित्राशी बोलणं सुद्धा मी सुरु केलं आहे. थोडक्यात आईनस्टाईननी  म्हटलेलं वाक्य मी आता खर करून दाखवतोय.

" A day will come when technology will surpass humanity. And we will have generation of idiots!! “---- Albert Einstein


----- चिनार

2 comments:

  1. hi chinar..

    very nice posts.... mast... khamang and khuskhushit...

    i am also trying to write, may not be as good as you but i am trying...


    ReplyDelete
  2. last paragraph is so nice

    ReplyDelete