Saturday 17 August 2019

लोकमान्य - एक युगपुरुष !


लोकमान्य टिळक  हे एक हिमालयाएवढं विशाल व्यक्तीमत्व होतं याविषयी दुमत  नाही. त्यामुळे या महापुरुषाचे चरित्र कुठल्याही स्वरूपात रसिकांसमोर आणणे हे तेवढंच विशाल आव्हान आहे. दिग्दर्शक ओम राऊत, सहलेखक कौस्तुभ सावरकर आणि साक्षात टिळकांची भूमिका साकारणारा सुबोध भावे या सगळ्यांनी हे आव्हान पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अर्थात कुठलीही कलाकृती सर्वसमावेशक असू शकत नाही. कारण रसिकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. पण कलाकृती साकारणाऱ्या सर्व कलाकारांचा दृष्टीकोन आणि ध्येय एकच असेल तर ती कलाकृती बहुतांश रसिकांना भावतेच ! यासाठी 'लोकमान्य' च्या टीमचे अभिनंदन करायलाच हवे.

चित्रपटाची सुरवात होते ती नाना पाटेकर यांच्या टिपीकल शैलीतल्या निवेदनाने. हे निवेदन पडद्यावर कलाकारांची नाव दाखवत असताना प्लेबॅक पद्धतीने आपल्याला ऐकू येतं. यासाठी पडद्यावर वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेतलेला आहे. ते संपूर्ण निवेदन केवळ लाजवाब आहे. सद्य परिस्थितीवर केलेले मार्मिक भाष्य आणि योग्य ठिकाणी काढलेले चिमटे अंतर्मुख करणारे आहेत. विशेषत: निवेदनातले अखेरचे  वाक्य  काळजाचा ठाव घेते --- " टिळक , तुमचं पुण्यस्मरण करणारी आमची ही  शेवटचीच पिढी असेल... असेल नाही, आहेच !!"

टिळकांवर झालेल्या न्यायलयीन खटल्याच्या प्रसंगापासून चित्रपटाची खरी सुरवात होते. सुबोध भावेनी साकारलेले टिळक या क्षणापासून आपल्या मनावर  आरूढ होतात ते अखेरपर्यन्त ! हळूहळू टिळकांचा जीवनपट उलगडत जातो. टिळक- आगरकरांची मैत्री, त्यांच्यातले वैचारिक मतभेद, त्यातूनच उफाळून आलेले जहाल आणि मवाळ असे दोन गट हे सगळे प्रसंग प्रभावी आहेत. महापुरुषांचे विचार कोणाला पटो अथवा ना पटो, त्यातली स्पष्टता ही नेहमीच वाखाणण्याजोगी असते. चरित्रपट साकारताना तीन तासात चरित्राची उकल करणं जमलं नाही तरी व्यक्तिमत्व आणि विचारांची स्पष्टता व्यवस्थित मांडली गेलीच पाहिजे. त्याबाबतीत लोकमान्य हा सिनेमा यशस्वी होतो. तत्कालीन समाज व्यवस्थेत असलेले दोष टिळकांना मान्य होते. पण त्यात इंग्रजांची मध्यस्थी त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच तत्कालीन काही सुधारणवाद्यांच्या इंग्रजधार्जिण्या भूमिकेला त्यांचा विरोध होता. ही बाब सिनेमात ठळकपणे समोर येते. 
    
टिळकांचा इंग्रज सत्ताधाऱ्यांविषयी असलेला आत्यंतिक राग संपूर्ण सिनेमातून अधोरेखित झालेला आहे. टिळकांनी गणेशोत्सव आणि इतर सामाजिक उपक्रमातून केलेली जनजागृती दाखवण्यात सुद्धा चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी होतो. चाफेकर बंधूंनी केलेला रँड या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या वधाचा प्रसंग उत्तम जमलेला आहे. सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. सुबोध भावेने टिळकांचे करारी व्यक्तीमत्व अगदी जसेच्या तसे सादर केले आहे. आगरकरांच्या भूमिकेत समीर विद्वांस सुद्धा शोभून दिसतो. टिळकांचे कथानक सांगताना एका उपकथानकाचा आधार घेतला आहे. आजच्या काळातला मकरंद (चिन्मय मांडलेकर) नावाचा एक युवा पत्रकार सद्य सामाजिक आणि राजकीय परिस्थिमुळे निराश झालेला आहे. अशातच तो टिळकांच्या विचारांकडे खेचला जातो. त्यातून त्याच्या मनातले द्वन्द्व आणखीनच वाढत जाते. चिन्मय मांडलेकरनी ही भूमिका उत्तम वठवली असली तरी हे उपकथानक नंतर नंतर कंटाळवाणे वाटत जाते. कारण यामुळे मुख्य कथानकाची लिंक तुटते.

 चरित्रपट साकारताना इतिहासाची योग्य प्रकारे उकल करणे आवश्यक असते. तिथे हा चित्रपट थोडा कमी पडतो. टिळक हे राष्ट्रीय नेते होते. ब्रिटीश त्यांना घाबरत होते. पण या चित्रपटात त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे कार्य दिसून येत नाही. इतर समकालीन नेत्यांशी त्यांचे असलेले राजकीय संबंध सुद्धा पूर्णत: उलगडून येत नाहीत. यासंदर्भातले काही प्रसंग घाईघाईत गुंडाळल्यासारखे वाटतात. उदा. टिळक आणि स्वामी विवेकानंदाची भेट किंवा वंगभंग आंदोलनाआधी बिपीन पाल यांच्याशी झालेली महत्वपूर्ण भेट. उपकथानकातल्या काही प्रसंगाची लांबी कमी करून इतर महत्वाचे प्रसंग तपशीलवार दाखवता आले असते. अर्थात ज्यांना टिळकांविषयी काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणीच म्हणवी लागेल. थोडक्यात सांगायचे तर दिग्दर्शक ओम राऊत आणि टीमने हिमालयावरील चढाई यशस्वी केली असली तरी एव्हरेस्ट गाठण्यात ते कमी पडले असं म्हणावं लागेल.

समाप्त

(तळटीप: शेंगा आणि टरफलं हा प्रसंग दाखवण्याचा मोह आवरल्यावाबद्दल ओम राऊत आणि टीमचे वैयक्तिक  पातळीवर अभिनंदन!)


No comments:

Post a Comment