Thursday 11 July 2019

रुखरुख


आयुष्यात कितीही मिळवलं तरी काहीतरी मिळाल्याची किंवा एखाद्या अपयशाची रुखरुख असतेच असं म्हणतात. आणि तशी ती असावीच असंही म्हणतात.

कारकिर्दीच्या अखेरीस वर्ल्डकप जिंकला असला तरी सचिनच्या आयुष्यात रुखरुखीचे प्रसंग कमी नाहीत. २००३ च्या फायनलमधले अपयश त्याला आजही सलत असेल. आणि त्यानंतर २००७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध सचिन तिसऱ्याच बॉलवर क्लीन बोल्ड झाला होता. तेही त्याला आठवत असेलच

कालही असेच काहीतरी घडले,
वर्ल्डकपमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा आणि आपल्या संघाचा आधारस्तंभ विराट कोहली हे दोघेही संघाला गरज असताना काल अपयशी ठरले. दोघांचे वय आणि कॅलिबर बघता पुढे ते भारताला वर्ल्डकप जिंकून देतीलही ह्यात शंका नाही. पण हे एक अपयश त्यांना सतत टोचणी देत राहील. ह्यांचंच  काय, भारताला दोन वर्ल्डकप मिळवून देणारा धोनीसुद्धा काल मोक्याच्या क्षणी आउट झाला. योगायोग बघा, ज्या धोनीने अगणित वेळा अश्या महत्त्वाच्या प्रसंगी सफाईने स्टंपिंग किंवा रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला आहे किंवा जो धोनी अश्या चोरट्या धावा घेण्यात मास्टर आहे, तोच काल रन आऊट झाला. कारकिर्दीत इतकी धावाधाव केल्यावर शेवटी एक इंच कमी पडलाच.

आणखी एक गोष्ट,
"मौका सभी को मिलता है"
आमच्या रामूच्या सत्या सिनेमातला हा डायलॉग.
सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा भरवशाचा बॅट्समन मार्टिन गुप्तिल एक रन काढून आउट झाला. काल न्यूझीलंड हरली असती तर हीच रुखरुख त्याला वाटली असती. पण मॅचच्या शेवटी त्याला एक संधी मिळाली. आणि त्याने भूतो भविष्यती असं डायरेक्ट हिट करून धोनीला आऊट केले. खरंच आहे, मौका सभी को मिलता है..!

हारलो असलो तरी निराश व्हायचं कारण नाही. ८३ च्या विजयापासून प्रेरणा घेऊन सचिन जन्माला आला. तसंच २०११ पासून कोणीतरी प्रेरणा घेतली असेलच. तसंही आपली मनोवृत्ती ही 'अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आयी' अशी आहेच. आणि त्यात काही चुकीचं नाही

तूर्तास जावेद अख्तर साहेबांच्या या ओळी आठवू,
ये जो गेहरे सन्नाटे है,
वक्त ने सब ही को बाटे है..
थोडा गम है सबका किस्सा..
थोडी धूप है सबका हिस्सा...

समाप्त