Saturday 17 December 2016

मन्याची नोटबंदी !

नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणं सुरु झालं.काळ्या पैशेवाल्यांचे चेहरे पांढरे पडले अन प्रामाणिक लोकांचे चेहरे खुलले. पण काळे नं पांढरे ह्यातल्या कश्याशीही संबंध नसलेला आमचा मन्या मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर परेशान झाला होता. आता अर्थातच हे आमच्या ध्यानात आलं नव्हतं. साहजिकच आहे म्हणा, नोटबंदी नंतरच्या गदारोळात मन्याची आठवण येणे शक्यंच नव्हते. पण त्यादिवशी बँकेच्या लायनीत उभा असताना, दूर झाडाखाली मन्या दिसला. मी त्याच्याजवळ गेलो.
"काय मन्या? इकडे कोणीकडे?"
"काही नाही रे", मन्या हताशपणे म्हणाला.
"काय झालंय तुला? काही टेन्शन आहे का?"
"काय सांगू रे, ह्या नोटबंदीने परेशान केलंय. काय करावं कळत नाही"
आता नोटबंदीने, पैश्याची चणचण सगळ्यांनाच आहे हे खरं असलं तरी मन्याची अडचण काहीतरी वेगळी आहे असं जाणवत होतं. कारण पैसे काढण्यासाठी तो लायनीत उभा नव्हता तर तो बॅंकेजवळ उभा होता. मन्याला मी खूप वर्षांपासून ओळखतो. अतिसामान्य परिस्थितीत वाढलेला मन्या आत्ता आत्ता कुठे सामान्य परिस्थितीपर्यंत पोहोचला होता.मुलखाचा इमानदार असल्यामुळे काळा पैसे वगैरे भानगड नव्हतीच. मन्या वीजमंडळात कारकून होता. वरकरणी ही नोकरी 'वरच्या कमाईवाली' वाटत असली तरी मन्या असलं काही करत नव्हता. मुळात त्याच्याकडे बघून, तो कधी लाच मागेल आणि मागितलीच तर त्याला कोणी देईल असंही वाटणार नाही. याउलट कामाला उशीर झाला तर ग्राहकाच्या संतापाला घाबरून मन्याचं नुकसान भरपाई देण्याची शक्यता जास्त आहे. कधीकाळी एक तारखेला मिळणारे पगाराचे पैसे ही मन्याने हाताळलेली सगळ्यात मोठी रोख असायची. ते ही पगार घरी आणून बायकोच्या हातात देईपर्यंतच. आताशा पगार बँकेत जमा होत असल्यामुळे मन्याला ते ही टेन्शन नव्हतं. बाकी ATM वगैरे भानगड मन्याची बायकोच सांभाळायची. म्हणजे महिन्यातल्या कुठल्याही दिवशी आणि दिवसाच्या कुठल्याही वेळी मन्याच्या खिश्यात शंभरपेक्षा जास्त रुपये मिळाले तर शप्पथ! हे असं असताना, नोटबंदीच्या निर्णयाचा मन्याशी काय संबंध हे कळत नव्हतं.
"नेमकं झालंय काय मन्या ?"
"अरे काय सांगू? खूप अडचणी आहेत माझ्यासमोर."
"कसल्या अडचणी?"
"अरे मोदींनी सांगितलंय, घरातल्या जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा बँकेत जमा करा किंवा बदलून घ्या”
"मग कर ना जमा. त्यात काय एवढं?"
"असतील तर करणार ना ?? घरातली कॅश मोजली मी आठ तारखेलाच रात्री. सातशे त्रेपन्न रुपये होते. त्यात एकही पाचशेची नोट नव्हती. काय भरू आता बँकेत?"
"मग चांगलंय ना. काहीच अडचण नाही आता"
"तुला काय होतंय बोलायला? बँकेत पैसे जमा करणाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड मागतायेत बँकवाले."
"मग?"
"आता माझं आधार कार्ड नाही मिळणार ना त्यांना."
"त्याने तुला काय फरक पडतो?"
"अरे, कसं कळत नाही तुला? मी मनोहर भास्कर तळपदे बँकेत पैशे जमा करायला आलोच नाही हे कळल्यावर डाऊट येणार ना त्यांना. माझ्या घरी धाड पडणार आता."
अरे रे रे रे रे रे रे...कोणाचं काय तं कोणाचं काय रे देवा !!
मी मन्याला भेटायला सोडून आलेली लाईन आता मारुतीच्या शेपटासारखी लांब पसरली होती. आणि इथे मन्याची ही अडचण ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं.
"मन्या मी निघतो. आपण नंतर भेटू."
"कुठे निघालास? माझी मदत कोण करणार आता? घरात धाड पडल्यावर येणार का तू?"
माझ्या डोळ्यासमोर मन्याचं छोटेखानी घर आलं. दरवाजातल्या पायपुसण्यापासून परसातल्या कुंडीपर्यन्त सगळ्या गोष्टी हिशोबात धरल्या तरी त्याचं व्हॅल्युएशन दोन लाखाच्यावर जाणार नाही. मन्या आणि कुटुंब एकंदरीतच काटकसरी पण नीटनेटके होते. आता ह्याच्या घरी धाड घातल्यावर एखादा आयकर अधिकारी पश्चातापाने राजीनामा देईल.
"बरं मग तू आत्ता बँकेत का आला आहेस ? तुझ्याकडे तर पाचशे-हजाराची एकही नोट नाही."
"मी विचार केला, बँकेतच जाऊन चौकशी करावी काय करता येईल म्हणून."
एवढ्या गर्दीने आधीच वैतागलेला बँकेचा कर्मचारी मन्याच्या प्रश्नाला कसा रियाक्ट होईल ह्याचा मी विचार करू लागलो. तसे बँकेत येणाऱ्या लोकांचे प्रश्नही विनोदी असतातच. एकाने माझ्यासमोर विचारलं होतं,"ह्या दोन हजाराच्या नोटेचा रंग गेला तर बदलून मिळेल का?"!!
शेवटी मी मन्याला म्हटलं," असं करू, माझ्याजवळ पाचशेच्या नोटा आहेत. त्यातली एक तू घे आणि बँकेत जमा करून टाक. तुझ्याजवळची चिल्लर मला देऊन टाक हवंतर."
हे ऐकून मन्याचा चेहरा एकदमच उजळला. मन्याच्या आयुष्यातला मोठा प्रश्न मी सोडवला होता.मुळात मन्याला प्रश्न फार कमी पडायचे. आहे ते स्वीकारायची मानसिकता असल्यामुळे  कुठल्याही अडचणीला तो सामोरा जायचा. ह्यापूर्वी सद्दाम हुसेनला फाशी झाली त्यादिवशी मन्या चिंताग्रस्त झाला होता. पण त्याच्या चिंतेचं कारण वैश्विक अशांतता हे नव्हतं. आता इराकने चिडून जगाचा तेलपुरवठाच बंद केला तर आपल्या स्कुटरमध्ये पेट्रोल कुठून भरायचं हे त्याला काळात नव्हतं. असो.
"तू पाच मिनिट थांब, मी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन येतो.", मन्या आंनदाने म्हणाला.
"अरे आधार कार्ड नाही लागत पाचशे रुपयांसाठी. तुझ्या नावाने पैसे जमा झाल्याची नोंद होणं आवश्यक आहे फक्त."
मी आणि मन्या लायनीत लागलो. दोन तासानंतर आमचा नंबर आला.

पाचशे रुपये बँकेत जमा करून मन्या समाधानी मनाने घरी गेला !!


Wednesday 14 December 2016

वाट पाहावी बघून !

वाट पाहणे हा योग माझ्या कुंडलीतच असावा बहुधा. मी कुठेही, कधीही, काहीही करायला गेलो की सर्वात आधी माझ्या वाटेवर येते ते म्हणजे वाट पाहणं. बऱ्याच ठिकाणी वाट पाहणं अपरिहार्य असते आणि ते सगळ्यांच्याच "वाट्याला" येते. उदा.बाहेर जाताना बायकोची तयारी होईपर्यंत वाट पाहणं या वैश्विक समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. पण माझ्या वाट्याला वाट पाहण्याचे आणखी कितीतरी योग येत असतात. इतके की आताशा वाट पाहणं मी एन्जॉय करायला लागलो आहे. अतार्किक ,स्वैर,रँडम विचार करायचे असतील तर त्यासाठी मी वाट पाहण्याचा वेळ उपयोगात आणतो. (आता अतार्किक विचार करण्यासाठी मला वेगळं काही करण्याची गरज नाहीये हा भाग वेगळा!) अश्या वेळी जे समोर दिसेल त्यावर मी विचार करायला सुरु करतो. 

        आता हेच बघा, मुंबई-पुणे हायवेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर मी गेले दीड तास माझ्या एका मित्राची वाट बघत उभा होतो. मुळात त्याच्या कामासाठी त्याने मला बोलावलं असताना मी त्याची वाट का पाहत होतो हे मलाही उलगडत नव्हतं."तू साडेचारला पोच तिथं, मी येतोच तोपर्यंत",असं फोनवर ठणकावून सांगणाऱ्या मित्राचा सहा वाजून गेले तरी पत्ता नव्हता. पाच-सहा वेळा त्याला फोन केल्यावर प्रत्येकवेळी,"बस्स आलोच" एवढं बोलून तो फोन ठेवत होता. मी उभा होतो त्यामागे एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. टाईमपास म्हणून त्याच्या जाहिरातीचा बोर्ड मी जवळजवळ शंभर वेळा वाचून काढला. बोर्डावरच्या बाईचं सौंदर्य सगळ्या प्रकारे निरखून झालं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मी बांधकामावरचा मुकादम वाटत असावो बहुधा. कारण जाताजाता एकाने मला ,"काय रेट चाल्लायं इथे सध्या?" असंही विचारून घेतलं. बांधकाम क्षेत्रात सध्या मंदी आहे असं ऐकून होतो. पण म्हणून कोणी सेल्समनला दारावर उभं करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना," ओ भाऊ..घ्या ना एखादा वन बीएचके" असं म्हणायला भाग पाडेल का ? पण आता त्याने रेट विचारलाच आहे म्हटल्यावर मी सुद्धा ठोकून दिला एक रेट !

       समोर एक चहाची टपरी होती. त्याच्या टेपरेकॉर्डरवर आशिकीच्या गाण्याची कॅसेट दोन वेळा संपून आता तिसऱ्यांदा सुरु झाली होती. (चहाच्या किंवा पानाच्या टपरीवर भीमण्णांचे ,'कानडा वो विठ्ठलु" कानावर पडावे अशी अपेक्षा करणंच चूक आहे. पण झाडून सगळ्या टपऱ्यांवर आशिकी आणि तत्सम किंवा 'गुलशन कुमार पेश करते है, टी सीरिज की पेशकश' हे सोडून दुसरं काहीच कसं वाजत नाही? अरे गेला बाजार, बप्पी लहरीची तरी गाणी वाजवा ना !)  टपरीवाला कंटाळला असावा म्हणून त्याने कॅसेट बदलली.( कॅसेटचं! आशिकीच्या गाण्यांची सीडी किंवा एमपी ३ असं म्हणवत नाही हो !) आता गाणं सुरु झालं,' धीरे धीरे प्यार को बढाना है..हद से गुजर जाना है (सिनेमा : फूल और काटे).  मी विचार करू लागलो, म्हणजे नेमकं काय करायचंय ह्याला ? प्रेमात ही गोलसेटींगची पद्धत कधीपासून आली? आणि हद से गुजर जाना है म्हणजे काय रे भाऊ ? साधारणपणे ज्या काळात हे गाणं आलं होतं, त्यावेळी कॉलेजमधल्या प्रेमाचा परिपाक एकतर लग्नात व्हायचा किंवा दारूच्या बाटलीत व्हायचा. (ह्यातला दूसरा पर्याय निवडला तर डायरेक्ट मोक्षप्राप्ती व्हायची!) लग्न झालंच तर पुढे संसार, मुलंबाळं वगैरे सर्वसामान्य गोल असायचेत. पण या हिरोला हद्द म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे ? शिवाय त्या काळातला अजय देवगण म्हणजे दोरीवरच्या चार उड्या मारल्यावर धापा टाकेल असा वाटायचा. तो काय हद्द पार करणार ? असो. तर हे असे  गाणे लिहिण्यामागे काय प्रेरणा असेल ह्याचा मी विचार करू लागलो. एक असंच गाणं होतं,'थोडासा प्यार हुआ है..थोडा है बाकी'. म्हणजे प्रेमाचा ईएमआय भरत भरत ते पूर्ण करायचं ! ही एक अत्यंत सोयीची पद्धत म्हणावी लागेल. कारण झेपलं नाही की लगेच करायला डीफॉल्ट करायला मोकळे ! लवकरच क्रेडीट कार्ड फॅसिलिटी असलेलं ,'थोडासा प्यार उधार दे दे'  गाणं आलं तर मुळीच आश्चर्य वाटू देऊ नका. कसं आहे की, गाणे लिहिणे म्हणजे प्यार,दिल,दिवाना,मस्ताना,दर्द इ. शब्दांचे परम्युटेशन्स -कॉम्बिनेशन्स करण्याहून वेगळं काहीही नसतं. असं मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. मग त्याला थोडी  दैनंदिन व्यवहाराच्या वास्तविकतेची जोड दिली तर काय बिघडलं?

        असो. तर एकीकडे आमच्या डोक्यात  काव्याची चिरफाड सुरु असताना, त्याचवेळी व्हाटस ऍपवर दोन-चार मॅसेज आले. व्हाटस ऍप हे टाईमपासचं उत्तम साधन म्हणून लौकिकास येत असताना, ती किती मोठी डोकेदुखी आहे ह्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. कोंबड्याने बांग नाही दिली म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसंच आता गुड मॉर्निंग मेसेज आला नाही म्हणून दिवस सुरु व्हायचा थांबत नाही हे सांगायची वेळ आलीये. पूर्वी लोकं सरकारी नोकरीला चिकटायचे तसे आता व्हाटस ऍपला चिकटतात. आणि मेसेजेसचे प्रकार तर काय वर्णावे महाराजा !! लोकांच्या किडन्या नि डायबेटीस बरे करायला उपायांचा पूर येतोय. लवंगेपासून डांबराच्या गोळीपर्यंत पदार्थांचे एवढे औषधी गुण साक्षात धन्वन्तरीलासुद्धा माहिती नसतील. उपाय कमी पडल्यास, उर्वरित आयुष्य समाधानाने जगण्यासाठी आयुष्यावरचे मेसेज येतात. Life is like ..............अशी सुरवात असलेले हे मेसेज आयुष्याला पार कागदापासून ते कडबोळ्यापर्यंत नेऊन ठेवतात.  ह्यांचं लाईफ कधी नदीसारखं,कधी मुंगीसारखं,कधी फुलासारखं तर कधी कॉफीच्या कपासारखं  असतं .तसं ते आमचंही असतं.  फक्त आमची नदी आटलेली तरी असते किंवा कप फुटलेला असतो! मुंग्या या पायाला तरी येतात किंवा डोक्याला तरी ! फुलांसोबत काटे आणि भुंगे फ्री मिळतात! पण ह्यामुळे व्हाटस ऍप निराश होत नाही. तुमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून आध्यात्मिक ज्ञानाचा डोज पाजला जातो. आपण फक्त ते ज्ञान पाच-सात ग्रुपवर पाठवून स्वर्गाची एक एक पायरी चढायची असते! मी म्हणतो, हेही एकवेळ चालेल पण व्हाटस ऍपने एक मोठी गोची करून ठेवलीये. म्हणजे बघा,मी बिझी आहे,कामात आहे हे एखाद्याला  सांगण्याची सोयच राहिली नाहीये आता. निरर्थक मेसेजेस वाचून,फॉरवर्ड करून, स्मायल्या टाकून आपण रिकामटेकडे आहो हे आपणच जगाला बोंबलून सांगतो आहोत. अरे कुठे नेऊन ठेवलंय स्वातंत्र्य माझं !!

ह्या वैचारिक गोंधळात काही वेळापूर्वी व्हाटस ऍपवर आलेला एक मेसेज मी वाचलाच नव्हता. तो माझ्या मित्राचा होता," कान्ट मेक इट टुडे, स्टक अप विद सम अर्जंट वर्क ! सॉरी !" सोबतीला माझा टाईमपास व्हावा म्हणून त्याने ८-१० स्मायल्या टाकल्या होत्या. वाट पाहण्याची आमची ही यात्रा या वळणावरती संपणार होती तर! समोरच्या टपरीवाल्याचा टेपरेकॉर्डर अजूनही आशिकीच्या नावाने गळा फडात होता. मी गाडी सुरु करून निघणार तेव्हढ्यात मित्राचा फोन आला...,

"अबे निघाला का तू ? पाच मिनिट थांब येतोच मी!"

--चिनार


Friday 19 August 2016

ऑलिम्पिक !

92 सालचे  बार्सीलोना ऑलिम्पिक सुरु असतानाची गोष्ट. त्यावेळी बार्सीलोना आणि ऑलिम्पिक ह्या दोन्ही शब्दांचे  अर्थ कळत नव्हते. कोणीतरी,कुठेतरी,काहीतरी खेळतायेत एव्हढंच कळायचं. दूरदर्शनवर रात्री दिवसभरातल्या सामन्यांचे हायलाइट्स दाखवायचे. त्यात बरोब्बर साडेदहा वाजता संसद अधिवेशनाचे वृत्तांकन करणाऱ्या दहा मिनिटाच्या 'पार्लियामेंट न्युज ' सुरु व्हायच्या. 'आज मी पार्लमेंट नंतर सुद्धा ऑलिम्पिक बघणार' असं म्हणणारा मी बातम्या संपेपर्यंत झोपलेला असायचो.असो. तर त्या ऑलिम्पिकमध्ये मला आवडलेला खेळ म्हणजे उड्या मारण्याचा ! एक माणूस दुरून तिरप्या दिशेने धावत यायचा,आणि तिथे लावलेला आडव्या बारवरून उडी घेऊन पलीकडल्या गादीवर पडायचा!! मी हाच खेळ खेळायचे ठरवले. फक्त मी बार लावता डायरेक्ट  पलंगावर उडी मारायचो. पुढे पलंगाला बाक येणं सुरु झाल्यावर माझं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न पाठीत धपाटा खाऊन भंगलं. दुसरा खेळ म्हणजे, धावत येऊन मातीत उडी मारायची. त्यावेळी घरी बांधकाम सुरु होतं. भिंतीला लागून असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर उड्या मारून ती पूर्ण रस्त्यावर पसरावायचं काम मी इमाने इतबारे केलं. यावेळी त्यातल्या त्यात प्रगती म्हणजे वडिलांनी भर रस्त्यात मला फटक्यांचं पदक बहाल केलंमधल्या काळात 1996 आणि 2000 साली भारताने अनुक्रमे टेनिस आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवलं. घरात टेनिस रॅकेट असण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग जुन्या बॅडमिंटन रॅकेटने रबरी बॉल वापरून मी मोठ्या भावासोबत टेनिस खेळायचो. नेट म्हणून वापरायला आमच्या सायकली होत्याच. पण आमच्या खेळण्यात रॅली हा प्रकार कधी घडतच नव्हता. कारण सर्विस केल्यावर बॉल सायकलवर आदळून कुठेतरी भरकटायचा किंवा भावाच्या जोरदार फटक्याने तो आंगणाबाहेर तरी जायचा. वेटलिफ्टिंगचा सराव करण्यासाठी घरात एवढी वजनदार वस्तू नव्हती. पाण्याने भरलेली बादली डोक्यापर्यंत उचलायचा प्रयत्न करताना मी स्वतःला अभिषेक करून घ्यायचो. आता हे असं सगळं असताना आम्ही ऑलिम्पिकमध्ये जाण्याचा प्रयत्न कसा करावा ?

तरीसुद्धा  मी बरेच खेळ खेळलो पण त्यातले बरेच ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जात नव्हते. म्हणजे बघा, चौथीत असताना आंतरशालेय लंगडी स्पर्धेत मी राखीव खेळाडू होतो. (शाळेच्या संघात खेळणारे चार-पाच जण सोडले तर उरलेली पूर्ण शाळाच राखीव असायची हा भाग वेगळा!) ह्याच स्पर्धेत खो-खो च्या  एका सामन्यात मी पूर्ण दोन मिनिटे मैदानावर होतो. पण त्याच झालं असं की, प्रतिस्पर्धी खेळाडू धावत असताना तो ज्या बाजूला जायचा तिकडे मी वळून बसायचो. दोन मिनिटानंतर आमचा पूर्ण संघच बाद ठरवण्यात आला ! त्यावेळीतर अख्ख्या शाळेसमोर माझा जाहीर सत्कार झाला होता. धावण्याच्या स्पर्धेत मी वर्गातून एकोणतिसावा आलो असलो तरी माझ्या बेंचवरील  तीन मुलांमध्ये मी पहिला होतो! त्यानंतर आणखी एका खेळात मी प्राविण्य मिळवलं.   फूटबॉल ! पण माझं मैदान घरातल्या आंगणापर्यंत मर्यादित होतं. शाळेतल्या मोठया मैदानावर खेळण्याची इच्छा होती. पण पाचवी ते दहावी या सहा वर्षात पंक्चर नसलेला, पूर्ण हवा भरलेला फुटबॉल शाळेच्या साहित्यात मला एकदाही दिसला नाही. (शाळेची फुटबॉल टीमसुध्दा होती म्हणे. एक-दोन वेळा मैदानात छोटा रबरी बॉल घेऊन खेळताना मी काही पोरांना पाहिलं होतं, तीच असावी बहुतेक ! पण ते फुटबॉल कमी आणि रग्बी जास्त खेळतायेत असं वाटायचं!) आमच्या शाळेच्या क्रीडासाहित्यात कुठल्याही एका खेळाचे साहित्य पूर्ण सापडेल तर शप्पथ! बॅडमिंटनच्या रॅकेट्स असल्या तर शटलची कोंबडीच्या पिसासारखी पूर्ण पिसे निघालेली तरी असतील किंवा शटल चांगले असले तर रॅकेटच्या जाळीने आ वासलेला असेल ! टेबल टेनिसचा टेबल तर शाळेच्या सगळ्या कार्यक्रमात टेबलक्लॉथ आणि फुलदाणी अंगावर घेऊन मिरवायचा.  क्रिकेटच्या सामानात स्टंप,बॅट,ग्लोव्हस,पॅड वगैरे असलं तरी बॉल आम्ही वर्गणी गोळा करून आणावा अशी शाळेची इच्छा असायची. हॉकी वगैरे श्रीमंत खेळ तर शाळेच्या आवाक्याबाहेरचे होते. पण आवाक्यातले असते तरी सुस्थितीतल्या अकरा हॉकी स्टिक्स शोधण्यापेक्षा मंगळावर पाणी शोधणे सोपे ठरले असते. (अहो त्यादिवशी रियो ऑलिम्पिकमधला एक टेनिस सामना बघत होतो. मैदानाच्या बाजूला दोन बास्केट भरून टेनिस बॉल ठेवले होते! काय हा माजुरडेपणा!! एवढ्या सामानात तर आमच्या शाळेच्या तीन पिढ्या खेळल्या असत्या!!). तसं या सगळ्यासाठी फक्त शाळाच जबाबदार होती असं नाही. आमचे शाळेतले पोट्टेसुद्धा खूप इच्चक होते. बॉल हा फक्त फटकावणे किंवा लाथाडणे यासाठीच असतो अशी आमची ठाम समजूत होती. व्हॉलीबॉलचा उपयोग जास्त करून फुटबॉल म्हणून व्हायचा किंवा स्टंप्सचा सवाधिक वापर शाळेतल्या गॅंगवॉरमध्ये व्हायचा.आमचे स्पोर्ट्सचे सर सुद्धा एक वेगळीच असामी होती. (म्हणजे  पीटीचे सर तेच स्पोर्ट्सचे सर आणि स्पोर्ट्सचे सर तेच पीटीचे सर असं सरळ साधा हिशोब होता!) त्यांनी आम्हाला शिकवलेला एकमेव मैदानी खेळ म्हणजे रस्सीखेच ! तेसुद्धा योग्यवेळी दोरी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही हाताने खेळायचो.  वर्गातल्या मुलींना तर त्या सरांनी 'कानगोष्टी' हा मैदानी खेळ म्हणून शिकवला होता! हेच सर आंतरशालेय स्पर्धांसाठी मुलांना निवडायचे. खेळ कुठलाही असो, त्यांचे क्रायटेरिया ठरलेले होते. मैदानी खेळ असेल तर शाळेतले उंच मुलं निवडायचे. आणि बुद्धीबळ वगैरे बैठ्या खेळांसाठी हुशार मुलं निवडायचे. ह्यातल्या एकाही क्रायटेरियात मी बसत नव्हतोच. मला नेहमी प्रश्न पडायचा, व्हॉलीबॉल वगैरे ठीक आहे पण  कुस्तीसाठी उंच काडी पहलवान मुलाचा काय उपयोग ?? आणि 'घोकणे' हा बुद्धीचा एकमेव उपयोग माहिती असलेल्या मुलाला बुद्धीबळ कसा खेळता येईल ?          
   
अखेरीस माझ्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या प्रयत्नांचा शेवटचा पर्याय म्हणून मी एक धाडसी निर्णय घेतला. आमच्या गावात एक क्रीडा विद्यापीठ आहे. देशातल्या कानाकोपरयातून खेळाडू तिथं प्रशिक्षणासाठी येतात. मी तिथं स्विमिंग शिकण्यासाठी प्रवेश केला. तीन-चार दिवस पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर आमच्या ट्रेनरने साधारण पंधरा फूट उंचीवरून पाण्यात उडी मारायला सांगितली. त्या उंचीवरून थोड्यावेळ पाण्याकडे बघितल्यावर मला घेरी यायचीच बाकी होती. मनाशी काहीतरी ठरवून मी थेट घरी आलो.
"बस्स झालं आता खेळणं ! काही अभ्यास वगैरे आहे की नाही ! "

आणि अश्या तर्हेने भारत काही ऑलिम्पिक पदकांना मुकला !!
                                       -- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/