Friday 5 February 2016

खरेदी पाहावी करून !

अमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा जमाना आहे. सगळं काही एका क्लिकवर मिळतं. मोबाइल काय अनं कपडे काय अनं दागिने काय जे म्हणाल ते मिळेल. खिशात पैसे नसतील तर सुलभ हप्त्यांची सोय सुद्धा उपलब्ध आहे. शक्य तेवढं ह्या मोह्मायेपासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. कारण एक तर आपल्याला खरेदीचा कंटाळा! त्यात ,"पैसे काय झाडाला लागतात का रे ?" हे मध्यमवर्गीय संस्कार ! त्यामुळे मी या विषयावर लिहिण्याच तसं काही कारण नाहीये. पण कालपरवा एक घटनाच अशी घडली की मला ह्याचा गांभीर्याने विचार करणे भाग पडले. झालं असं की, आमच्या कंपनीच्या क्लायण्टला प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट करून द्यायचा होता. त्यासाठी अत्यंत लहान क्षमतेच्या एयर ब्लोअरची गरज होती. बरेच प्रयत्न करूनही कुठेच तो ब्लोअर मिळेना. सगळ्या सप्लायर्सकडे चौकशी करून झाली पण परिणाम शुन्य! आता काय करावं या विचारात असताना अचानक प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला.
तो म्हणाला," ब्लोअर मिळाला."
मी विचारलं," कुठं?"
मी स्वप्नातही विचार केला नव्हता असं उत्तर आलं," फ़्लिपर्काट !!!!"

मी हादरलोच. च्यामारी आमच्या अख्ख्या सोर्सिंग टीमला जे जमलं नाही ते फ़्लिपर्काटवर मिळालं ! कंपनीचे कामं जर फ़्लिपर्काटवर व्हायला लागले तर आम्हाला घरीच बसावं लागेल ना. मी विचारात पडलो. खरंच इतकं सोप्पंय आमचं काम? काय करतो आम्ही कंपनीत? तर सोर्सिंग....म्हणजेच खरेदी. नाही नाही...खरेदी करणं हे खायचं काम नव्हे.( आता खरेदी करणं हे "खायचंच" काम आहे हा सर्वमान्य समज असला तरी ते एवढं सोप्पं नाही !)

रम्य अश्या सकाळी आम्ही रमतगमत कंपनीत पोहोचतो( इथे 'रमतगमत' ह्याचा अर्थ अर्धा तास ट्राफिक जाममध्ये अडकून, अख्ख्या गावाची धुळ अंगावर घेऊन असा घ्यावा!) तर प्रोजेक्ट मॅनेजर वासून समोर उभा असतो. त्याच्याकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी तो मला खिंडीत गाठतोच. मग आमचं सुसंवाद सुरु होतो. सुसंवाद म्हणजे तो बोलतो आणि मी ऐकतो !
" अरे राजा..पंपाचं फौंडेशन ड्रॉईंग्स कुठे आहेत ? साईटवर सिव्हीलचं काम थांबलंय त्यामुळे. व्हॉल्व्स का नाही पोहोचलेत अजून ? असेम्बली थांबलीये साईटवर. बंर ते जाऊदे कॉम्प्रेसरचे डीटेल्स कुठे आहेत ? एयर लाइनचं रुटिंग होत नाहीये त्यामुळे. त्या xxx साईटच्या पाईपिंगची ऑर्डरचं नाही निघालीये म्हणे अजून. कधी करणार ? या महिन्यात बिलिंगला घेतलंय आपण ते. त्या yyy व्हेंडरचा आडव्हांस नाही दिलाय अजून. काम थांबवलंय त्यानी"

एव्हढे सगळे तोफगोळे अंगावर झेलून त्यावर ,"सर बघून सांगतो" असं शक्य तितक्या निर्विकार चेहऱ्याने उत्तर देणं  फ़्लिपर्काटला जमेल का? असो. तर खिंडीच्या मागल्या दराने पळ काढून आपल्या जागेवर स्थानापन्न होताच मोबाईलची रिंग ठणाण वाजते. फोन उचलताच तिकडून एखादा सप्लायर पेमेंटचं रडगाणं सुरु करतो. ह्यांना सकाळी सकाळी राजे गडावर पोहोचल्याची वर्दी मिळतेच कशी कोण जाणे? पण या असल्या फोनची एक गम्मत असते. सप्लायरच्या टोनप्रमाणे किंवा भाषेप्रमाणे आमचं उत्तर बदलते. उदा. समोरच्याने फोनवर नुसतंच ,"साहब मेरा पेमेण्ट" असं म्हटल्यास आम्ही लगेच वरच्या आवाजात ,"अरे दे रहे हैं भाई , भाग जायेंगे क्या?" असं म्हणून फोन ठेऊन देतो. पण समजा समोरच्याने फोनवर ," साहब वो जरा पेमेण्ट का देख लेना." अशी विनंती केल्यास आम्ही लगेच ," हा साहब हो रहा हैं...इस वीक में हो जायेगा." असं  ठोकून देतो. आता समोरचा जर इंग्लिशमध्ये विचारत असेल तर आम्ही तितक्याच सफाईने ," येस वुई हॅव टेकन इट इन प्रोसेस. वुई आर जस्ट वेटिंग फोर अवर सीफओजं अप्प्रुव्हल विच कॅन कम एनी मोमेण्ट." असं झाडून मोकळे होतो. वास्तविक बहुतांशवेळा वरच्या तीनही सप्लायर्सच्या पेमेंटचा दूर दूर पर्यन्त पत्ता नसतो. शिवाय काही दिवसांनी जर परत फोन आलाच तर अनुक्रमे उत्तरं तयार असतात....फिलहाल पैसे नही हैं टाइम लगेगा/ चेक सायनिंग में हैं/ सीफओ इज ट्राव्हेलिंग !! ह्या तीनही वाक्यांना वेळेचं बंधन नाही. ह्याउपर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे थोड्या वेळाने ह्यातल्याच एखाद्याला  फोन करून ,"मटेरियल कब भेजोगे?" असं विचारायला आम्हाला काहीही वाटत नाहीअमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा धंदा रोखीत चालतो. त्यांना हे असले उधारीतले बाळंतपण सोसतील का?

ह्यात आणखी एक मजेदार प्रकार असतो. त्याला म्हणतात बदल / चेंज किंवा ह्यापेक्षाही गोंडस नाव म्हणजे रिव्हिजन ! थोडक्यात सांगायचं म्हणजे क्लायंटला जर सोनं हवं असेल तर आमच्याकडून नजरचुकीने किंवा जाणूनबुजून चांदीची ऑर्डर देण्यात येते आणि ती सुद्धा पितळेच्या भावात ! येनकेनप्रकारे क्लायण्टच्या हे लक्षात आल्यावर त्याला सोन्यापेक्षा चांदीच कशी चांगली हे पटवण्याचा असफल प्रयत्न केल्या जातो. शेवटी क्लायंट प्ल्याटीनमची मागणी करतो. मग सुरु होतो तो सप्लायरकडून पितळेच्याच भावात प्ल्याटीनम घेण्याचा एक वेडा अट्टाहास ! बऱ्याच प्रयत्नानंतर सुवर्णमध्य साधला जातो. (आता साईटला गेल्यावर त्या प्ल्याटीनमला गंज का चढतो ते मला विचारू नका!) पण ह्या अश्या परिस्थितीत फ़्लिपर्काटवाले तर चांदी आणि प्ल्याटीनम दोन्ही आमच्या माथ्यावर मारतील. कोणी चांदी घेता का चांदी असं म्हणायची आमच्यावर वेळ येईल.

बरं एकवेळ हे सगळं विसरून जाऊ. पण आमच्या कार्पोरेट विश्वात जबाबदारी हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. आणि जबाबदारी ढकलणे म्हणजेच जबाबदारी निभावणे हा अलिखित नियम आहे. म्हणजे बघा, प्रोजेक्टला उशीर होतोय या सत्यघटनेची जबाबदारी सेल्स डीपार्टमेण्टपासून प्लानिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट, इंजीनीयरिंग असं करता करता शेवटी सोर्सिंगवर ढकलण्यात येते. आम्ही सोर्सिंगवालेसुद्धा निरागसपणे ती सप्लायरकडे ढकलून देतो. काहीही झालं तरी ती आमच्याकडे परत येऊ देणे ह्यातच आमचं कौशल्य असते. अश्यावेळी जर फ़्लिपर्काट आमचा सप्लायर असेल तर ती जबाबदारी त्याच्या फायरवॉलपर्यन्तही पोहोचता आमच्याकडे वापस येईल. मग आम्ही पामरांनी कोणाकडे बघायचं ?

नाही नाही...फ़्लिपर्काट आम्हाला किंवा आमच्या सप्लायरला पर्याय असू शकत नाही.पिझ्झ्यावर भाजी फ्री मिळते म्हणून तो भाकरीला पर्याय ठरत नाही.तुझ्यासोबत जमेना अन तुझ्याशिवाय करमेना असं जरी आमचं नातं असलं तरी हर एक सप्लायर जरुरी होता हैं. सप्लायरला फोन करून झापण्यात जो आनंद आहे तो फ़्लिपर्काटच्या कॉलसेंटरला शिव्या घालण्यात नाही. किंवा एकेक अडथळा पार करून शेवटी साईटवर मटेरियल पोहोचवण्यात जे समाधान आहे ते एका क्लिकनंतर डिलीव्हरी बॉय कडून डिलीव्हरी घेण्यात नाही.  मी पैजेवर सांगू शकतो की आमचे प्रोजेक्ट मॅनेजरसुद्धा फ़्लिपर्काटला लवकरच कंटाळतील. कारण प्रोजेक्ट मॅनेजरच्या ," अरे अर्जेण्ट आहे" या वाक्याला जर प्रत्येकवेळी ,"युअर ऑर्डर इज रेजीस्टर्ड विद अस. इट विल बी डिलॆवर्ड इन टु वीक्स" असं छापील आणी नीरस उत्तर येणार असेल तर काय फायदा? क्लायण्टला सांगायला काहीतरी ष्टोरी हवी ना! फ़्लिपर्काट २ आठवडे घेणार असेल तर आम्ही १० घेऊ पण त्यासाठी आमच्याकडे काहीतरी ष्टोरी असेल. शेवटी अनुभव नावाची काही गोष्ट असते का नाही!  
म्हणूनच म्हणतो ,
येथे पाहिजे जातीचे, फ़्लिपर्काटचे हे काम नव्हे !!

                                                                  -- चिनार