Monday 7 March 2016

राईट टू (बी) लेफ्ट !

"तू लेफ्टी आहेस?"
मी डाव्या हाताने लिहितोय हे दिसत असूनही त्याने मला विचारलं. पण ह्या प्रश्नाची मला सवय आहे.
" हो", मी उत्तरलो.
"लहानपणापासून ?"
मी दचकलो. आता हे काय नवीन ? एखाद्याला व्यक्तीला ," का हो तुम्ही चालायला लागल्यापासून दोन पायांवरच चालता का ?" असं विचारलं तर कसं वाटेल ? तरीही सयंम राखून मी उत्तर दिलं.
"हो अर्थातच"
"जरा वेगळं नाही वाटत का असं?”
" नाही...  मी जर उजव्या हाताने लिहिलं तर ते जगावेगळं वाटेल !", माझा संयम आता सुटत होता.
मी मुद्दाम 'जगावेगळं' अश्यासाठी म्हटलं, कारण लहानपणी मी डावखुरा आहे हे लक्षात आल्यावर आई जेंव्हा जेंव्हा मला उजव्या हाताने लिहायला सांगायची तेंव्हा मी उर्दू लिहिल्यासारखं उजवीकडून डावीकडे लिहायचो. मायमराठीचे असे धिंडवडे उडताना पाहून ती माऊली वरमली. आणि मी डावखुराच राहिलो!
" त्या मानाने अक्षर खराबचं आहे तुझं ?", तो म्हणाला.
"त्या मानाने म्हणजे?"
"डाव्या हाताने लिहिणाऱ्यांच अक्षर छान असते असं म्हणतात...पण तुझं तर........"

         वरील संभाषण प्रातिनिधिक असलं तरी डावखुऱ्यांना असे अनुभव दैनंदिन जीवनात नेहमीच येतात.चार लोकांपेक्षा काहीतरी वेगळं दिसलं की ते एकतर अद्भुत तरी असते किंवा तुच्छ तरी असते.अरे कोणी सांगीतलय यांना डावखुरे चांगल्या अक्षरात लिहितात म्हणून ? मी मान्य करतो की माझे अक्षर वाचण्याजोगे नाहीत. लोकं आकडेमोड करतात तसं मी अक्षर 'मोड' करतो. पण त्याचा लिहिण्याच्या हाताशी काय संबध? डाव्या हाताला लिहिण्याची सूचना देताना आपला मेंदू काय 'जरा चांगल्या अक्षरात लिही' अशी वेगळी तळटीप देतो का? डावखुरे लोकं चित्र फार छान काढतात हा आणखी एक गैरसमज ! मला वर्तुळाचे दोन टोकसुद्धा नीट जुळवता येत नाहीत. परीक्षेत मी घाईघाईत लिहिलेला शुन्य हा आकडा फुटक्या अंड्यासारखा जास्त दिसत असल्यामुळे आमचे सर वर्तुळाची दोन्ही टोकं व्यवस्थित जुळवून मला शुन्य मार्क द्यायचे. चित्रकलेत पन्नास पैकी अठरा मार्क हा माझा सर्वोत्तम पर्फोर्मंस होताडावखुरे लोकं त्यांच्या क्षेत्रात फार हुशार असतात हा तिसरा गैरसमज. मी म्हणतो, लिहित असेल सचिन तेंडूलकर डाव्या हातानी पण त्याच्या शंभर शतकाएवढ्या अपेक्षा आमच्याकडून कश्यासाठी? शाळेत एकदा आम्ही क्रिकेट खेळत असताना मी बॅटिंगला करायला आलो. सवयीप्रमाणे मी उजव्या हातात बॅट धरली. एका इच्चक मित्राने शंका काढली की हा जोश्या डाव्या हातानं लिहिते तं बॅटिंग उजव्या हातानं काऊन? झालं !! मी डाव्या हातानीच बॅटिंग करायची असा आग्रह सुरु झाला. मुळात मी उजव्या किंवा डाव्या कोणत्याही हातानी बॅटिंग केली तरी फार काही फरक पडणार नव्हता.(अरे वर्गातल्या टीम मध्ये  सातव्या नंबरवर बॅटिंगला येणारा काढून काढून किती रन्स काढणार ! पण हे सत्य जर मी उघड केलं असतं तर मला आयुष्यात बॅटिंग मिळाली नसती !) आईनष्टाइनसुद्धा डावखुरा होता म्हणेमी म्हणतो असेल ना, पण म्हणून मला थेयरी ऑफ रिलेटीव्हीटी समजली पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? फिजिक्स आणि मी एकमेकांशी  रिलेटीव्हली डिसकनेक्टेड आहोत हे पुरेसं नाहीये का ?
       या डावखुऱ्या प्रकारचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, राजकारणातसुद्धा उजवी आणि डावी विचारसरणी ही हातावरूनच ठरवतात असं मला वाटायचं. त्यामुळे मी डाव्या विचारांचा आहे अशी अनेक वर्ष माझी उगाचंच समजूत होती.(आता विचारसरणी हातावरून ठरत नसली तरी हल्लीच्या राजकारणात "हाताच्या" विरोधात असलेले सगळे उजवे अशी सरळसोट व्याख्या आहे हा भाग वेगळा !) आम्हाला दहावीत "लेफ़्ट इज राईट" नावाचा एक धडा होता. त्यातही जगभरातल्या महान डावखुऱ्यांचा उल्लेख केला होता. ते लिहिणारा सुद्धा डावखुराच असला पाहिजे. त्या सगळ्या महान लोकांविषयी पूर्ण आदर राखून मी म्हणेल की, डावखुरे लय भारी असतात असा जर काही नियम असेल तर त्या नियमाला अपवाद  म्हणून माझा उल्लेख करावा. सन्माननीय नव्हे तर लज्जास्पद अपवाद म्हणून करा हवं तर.
       सगळीकडे आश्चर्य किंवा आदर मिळत असला तरी डाव्यांना हमखास  तुच्छतेची वागणूक मिळते ती देवाधर्माच्या ठिकाणी. मंदिरात डाव्या हातानी घंटा वाजवणं किंवा डाव्या हाताने गंध,फुलं वाहणं किंवा प्रसादासाठी डावा हात पुढं करणं हे सगळे अजामीनपात्र गुन्हे आहेत. कारण तिथल्या तिथे ,"अरे काय करतोयेस, देव शिक्षा देईल" अशी शिक्षा ठोठावून लोकं मोकळे होतात. मला नेहमी प्रश्न पडतो, भगवंताच्या दहा अवतारात एकही डावखुरा नव्हता का? रामाने शिवधनुष्य उचलताना तरी डाव्या हाताचा उपयोग केला असेलच ना? की भर सभेत त्याला जनकाने ," तू डावा हात वापरलास म्हणूनच शिवधनुष्य भंगलं, आता वनवास पक्का" असं म्हटलं असेल ? एका भक्ताने  तर मी डावखुरा आहे हे कळल्यावर मला पत्रिका दाखवण्याचा सल्लासुद्धा दिला होता. मी त्या काकांची फार उडवली होती.
सुरवात थोडीबहुत वरच्यासारखीच,
"पत्रिका दाखवून दे एकदा. डाव्यांच्या पत्रिकेत बहुतेकवेळा  काहीतरी दोष असतो म्हणतात."
" कोण म्हणतात?"
" असं ऐकलंय मी. शास्त्रात लिहिलं असेल कदाचित."
"म्हणजे शास्त्र लिहिणाऱ्या लोकांमध्ये एकही डावखुरा नव्हता?"
"फालतू जोक मारू नको. पत्रिका दाखवून घे."
"बरं दाखवतो... पण दाखवू कोणाला ? तो सुद्धा डावखुरा असेल तर ? की आधीच विचारून घेऊ ?"
"तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. तुमची नवीन पिढी म्हणजे................................"
झालं!... काका नवीन पिढीवर घसरले  आणि त्यांचा दिवस सार्थकी लागला !
पंगतीत जेवताना एखादा डावखुरा बाजूला आला की उजव्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते.
"त्या हाताला काही लागलंय का ?"
"नाही"
"मग दोन्ही हाताने जेवायची सवय आहे का ? अरे चार लोकात बरं दिसत नाही असं. उजव्या हाताने जेव."
होतं काय की अश्यावेळी आपण नुकतंच पुरणपोळीचा घास घेतला असतो. त्यामुळे या काकांना उत्तर देण्याऐवजी खाल्लेल्या पुरणाला जागणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच  उत्तरादाखल त्याच डाव्या हाताने काकांच्या मांडीवर मठ्ठा सांडवायची तीव्र इच्छा दाबून ठेवावी लागते !

नाही नाही... डाव्यांच्या हक्कांसाठी वगैरे लढत नाहीये मी इथे. डाव्यांना भगवान का दिया सबकुछ हैं! दौलत हैं..शोहरत हैं..कधी जास्त तर कधी कमी अशी इज्जत सुद्धा हैं! डाव्यांना नेहमीच येणारे गमतीशीर अनुभव मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. खरं तर मला डावखुरा असल्याचा काही अभिमान वगैरे नाहीये. उजवा असतो तरी असाच आणि इथेच असतो. शेवटी कुठला हात आभाळाला टेकला ह्यापेक्षा दोन्ही पाय जमिनीवर असणं जास्त महत्त्वाचं !! नाही का?


                                                                                                                              --चिनार