Saturday 29 April 2017

दि अदर साईड….

तो म्हणे डिप्रेशनमध्ये होता. कधीपासून,कश्यामुळे ते काही माहिती नाही. आता बघणाऱयाला वाटतं, श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा..लाडात वाढलेला..मस्तीत जगलेला..कसलं आलंय डोंबलाचं डिप्रेशन? श्रीमंती एवढी की तो जन्मभर बसून खाऊ शकेल. पण ती काय एका दिवसात नव्हती आलेली. त्याच्या आज्यानं अन मायबापानं भरपूर खस्ता खाल्ल्या..पण त्याला एवढंच माहिती की ग्रँडपाचा कसलातरी बिझनेस होता तो मॉम-डॅडनी एक्सपांड केला. त्याच्यासाठी ही गोष्ट इतर अनेक गोष्टींसारखी "व्हॉटएव्हर!" कॅटेगिरीत यायची. आपण त्या बिझनेसचं  अजून एक्स्पान्शन करू असं त्याला कधी वाटलं नाही.त्याच्यावर तसं काही बंधनही नव्हतं. त्याच्या मॉम-डॅडनी त्याला मुक्त विचारसरणी भेट म्हणून दिली होती. त्यातली मुक्तता त्याने आनंदाने घेतली. विचारसरणी वगैरे त्याने तूर्तास बाजूला ठेवली. तसा तर तो अभ्यासात हुशारही होता.

"मम्मा मी ना आता पायलट व्हायचं ठरवलंय!!"
"बरं..एकदा काय ते नक्की ठरव. काही दिवसांपूर्वी तुला मॉडेल व्हायचं होतं."
"ते असंच गं..फॅशन शो बघून आलो होतो ना..म्हणून एकसाईटमेन्ट वाढली होती."
"असंच ?? त्यासाठी फोटोशूटही करून घेतला तू? आठवतं का?"
"हो..पण आता रियलाईझ झालंय की माय बॉडी इज नॉट अ शोपीस यू नो!! काय घाण लाईफ असतं त्या मॉडेल्सचं...सतत चेहऱ्याला चोपडत बसायचं मिररसमोर..अन लोकांसमोर वेडंवाकडं चालत राहायचं..यक्स!!!"
"अरे ते त्यांचं काम असतं."
"मला नाही जमणार..मी तर आता पायलट बनणार."
"हे बघ आमची काही हरकत नाहीये. पण जसं आता तुला मॉडेलिंगमधल्या इतर गोष्टी कळल्या तश्या पायलट बाबतीतही असतीलंच. त्या आधी बघून घे. मग ठरव."
"तसं काही नसतं. मी चौकशी केली आहे. हो..आता खूप फिरावं लागतं. बट दॅट्स ओके फॉर मी!! तसंही कोणाला राहायचं आहे या देशात?"
"बरं..पण त्यातही खूप कॉम्पिटिशन आहे. त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल."
"मग घेईल ना..त्यात काय एवढं?"
"पण समजा..मेहनत घेऊनही तुला ऍडमिशन नाही मिळाली तर?"
"इंजिनियरिंग एंट्रन्स देतो आहेच ना..बट माय फर्स्ट प्रेफेरन्स इज टू फ्लाय!!!!"
"ठीक आहे."

त्याने वडिलांनासुद्धा त्याची कल्पना दिली. त्यांची तशी हरकत नव्हती पण पायलट होण्यातले खाचखळगे त्यांना चांगलेच माहिती होते. पायलटची मेडिकल अन फिजिकल टेस्ट फार अवघड असते. त्यात भले भले पास होत नाहीत. त्यांनी त्याला याविषयी सांगितलं.
"आय नो दॅट पप्पा..मी त्यासाठीच जिम जॉईन केलीये ना आता."
"इट्स नॉट ओनली अबाउट जिमिंग यंग मॅन!! हा खूप चॅलेंजिंग जॉब आहे.शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असावं लागतं त्यासाठी."
"सो यू फील आय एम नॉट फिट मेंटली अँड सायकॉलॉजिकली?? इज इट?"
"तसं नाही रे"
"लेट मी टेल यू ..आय एम टफ... ओके?"
"हे बघ..माझी काही हरकत नाहीये. पण तू अतिशय सुरक्षित वातावरणात वाढला आहेस. यू ह्यॅव नॉट सीन दी अदर साईड ऑफ लाईफ!!"
"डोन्ट वरी पप्पा..आय डोन्ट नीड टू सी इट."
"ठीक आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत."

ठरल्याप्रमाणे तो पायलट होण्यासाठी प्रयत्न करू लागला.एंट्रन्सचा अभ्यास त्याने जोरात सुरु केला. एका बाजूला इंजिनियरिंग एंट्रन्सचा अभ्यासही सुरूच होता. अर्थात ही गोष्ट त्याच्या वडिलांना खटकली होती. त्याने एकावेळी एका गोष्टींचाच पाठपुरावा करावा असं त्यांना वाटायचं. ह्या सगळ्यात एखादं वर्ष थांबण्याचीही त्यांची तयारी होती. पण त्याही नव्हती. सेफ असावं म्हणून त्याने दोन्ही पर्याय समोर ठेवले. पण खरंच तो मनातून सेफ होता का?? ह्याच उत्तर कोणाजवळच नव्हतं..

शेवटी घडायचं ते घडलंच!! दोन्ही लेखी परीक्षा त्याने आरामात पास केल्या.पण फ्लायिंग क्लबची फिजिकल टेस्ट तो पास करू शकला नाही. तो निराश झाला. वडिलांनी त्याला समजावलं.
"हे बघ..तुझी पायलट होण्याची इच्छा आहे तर तू पुढल्या वर्षी परत प्रयत्न कर. यश-अपयश येतच असतं आयुष्यात. इतक्या लवकर हार मानू नकोस."
"नाही..मी आता पायलट बनणार नाही. मी फेल झालोय अँड आय ह्यॅव एक्सेप्टेड इट!!. मला पुन्हा प्रयत्न करायचा नाही. मी इंजिनीयरींगला ऍडमिशन घेणार."
"अरे पण...."
"पप्पा प्लीज."
"ठीक आहे."

त्याने एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतली. हळूहळू तो तिथंही रुळत गेला. पण पायलटची परीक्षा पास न करू शकल्याचं शल्य त्याला कुठेतरी टोचत होतं. आपण फेल झालोच कसे हे त्याला कळत नव्हतं. आता त्याला नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या होत्या. मित्रांसोबत हळूहळू दारूचं व्यसन ही लागलं. ही गोष्ट त्याच्या वडीलांना कळली होती. पण सोशल ड्रिंकिंगच्या गोंडस नावाखाली त्यांनी ते मान्य केलं. दिवसामागून दिवस जात होते. तो आता तिसऱ्या वर्षाला पोहोचला होता. सहाव्या सेमिस्टर नंतर बऱ्याच कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी यायच्या. त्याने त्यातलीच एक टॉप कंपनी टार्गेट केली. पण पाचव्या सेमिस्टरचा निकाल लागला आणि त्याला धक्का बसला. तो एका विषयात नापास झाला होता. त्याला काहीच कळेनासं झालं. नापास झाल्यामुळे आता तो कॅम्पस प्लेसमेंटसाठी एलिजिबल नव्हता. तो सैरभैर झाला.वडिंलानी परत त्याला समजावलं. त्याने इंजिनियरिंग पूर्ण करून परदेशात उच्च शिक्षण घ्यावं असं त्यांनी सांगितलं. दोन-तीन वर्षांनी त्याचाही तोच विचार होता. पण परत तेच.... आपण नापास झालोय हे त्याला पचतंच नव्हतं.

तो खचला होता. त्यातूनच दारूचं प्रमाण वाढलं. हळूहळू ते व्यसन ड्रग्सपर्यंत पोहोचलं. आणि त्यातच...त्याने तो निर्णय घेतला....या अपयशी आयुष्याचा काही उपयोग नाही...आता स्वत:ला संपवायचं!! आणि तेही सगळ्या जगासमोर...!!

त्याने शहरातल्या मोट्ठ्या हॉटेलमध्ये सगळ्यात वरच्या मजल्यावर एक रूम बुक केली. तिथे गेल्यावर त्याने उंची मद्य आणि जेवण मागवले. सोबतीला ड्रग्स होतेच. हे करताना त्याने फेसबुकवर लाईव्ह व्हिडीयो सुरु केला. त्याने बडबड सुरु केली. आणि हळूहळू तो खिडकीजवळ आला...

"आय वॉन्टेड टू फ्लाय..बट यू डींट अलाउ मी..बट टुडे आय एम गोइंग टू फ्लाय...यू कान्ट स्टॉप मी नाऊ!!! हे डॅड..यू हियर मी??? यू वॉन्टेड मी टू सी दि अदर साईड ऑफ लाईफ राईट?? आय ह्यॅव सीन इनफ ऑफ धिस साईड.... नाऊ सी यू एट दि अदर साईड.....!!!

एवढं बोलून त्याने खिडकीतून उडी मारली. खाली पडताच काही क्षणातच तो गतप्राण झाला.

तिथे समोरच एका बाजूला एक लहान मुलगा बूट पोलिश करत बसला होता. त्या आवाजाने तो खडबडून उठला. आणि धावतच तिथे गेला. ते दृश्य त्याला बघवलं नाही. तो तसाच परत आला.तो थरथर कापत होता. हळूहळू गर्दी जमली. पोलीस आले ...पंचनामा झाला...पोलीस बॉडी घेऊन निघून गेले.
पण इतक्या उंचावरून पडल्यामुळे त्याच्या दोन्ही पायातले बूट दूर फेकल्या गेले होते. त्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. या बुटपॉलीशवाल्या पोराने ते उचलले. त्या महागड्या बुटांकडे तो पाहतच राहिला. कदाचित आता ते त्याच्या मालकीचे झाले होते...ते बूट घेऊन तो एका बाजूला आला....

हीच ती बाजू होती जी उभ्या आयुष्यातचं काय पण मरतानासुद्धा "त्याला" दिसली नव्हती....

दि अदर साईड ऑफ लाईफ!!!!


समाप्त

-- चिनार