Wednesday, 19 July 2017

प्रेषीडेन्ट...

"बबन्या.....",
"काय बे गब्ब्या?"
"हा प्रेषीडेन्ट कोन असते?"
"कोन?"
"प्रेषीडेन्ट बे...पेपर नाय वाचत का तू? इलेक्शन हाय म्हन्ते ना प्रेषीडेन्टचं.", गब्ब्या म्हणाला.
"हा वाचलं ना..प्रेषीडेन्ट म्हंजे राष्ट्रपती. हे बी माहित नाही का तुले ?"
"नाही बा..कोन असते थो?"
"थोचं तं सगळ्यात मेन राह्यते..बाकी सारे त्याच्या हाताखाली राह्यते.."
"सारे म्हंजे?"
"म्हणजे संसद-गिन्सद वाले, पंतप्रधान..सारे वचकून ऱ्हायतेत त्याले.", बबन्यानं माहिती पुरवली.
"बाप्पा बाप्पा..पंतप्रधानपन त्येच्या हाताखाली म्हंजे लयचं झालं."
"मंग! तुले काय वाटलं?"
"अन करते काय पन थो?",गब्ब्याचे प्रश्न आता सुरु झाले.
"तो साऱ्यावर लक्ष ठेवते..कोणतंच बिल त्याच्या सहीशिवाय पास होत नाही म्हन्ते."
"येवढा मोठा मानुस काय बिलं चेक करत बसते नुस्ता?"
"अबे तुये किरान्याचे बिल नाय ना बे..ते मोठंमोठे कायद्याचे बिल बनवते ना संसदवाले..ते"
"अस्सं काय!! अन असते कुठं मंग थो? "
"दिल्लीला असते थो..राष्ट्रपती भवनात."
"राष्ट्रपती भवन?"
"हो मंग..त्याले शेप्रेट घर असते..अन त्यातच ऑफिस असते मागच्या बाजूले."
"तुले कसं माहिती बे?", गब्ब्यानं विचारलं.
"अबे मी टीव्हीवर पाह्यलं ना..लय मोठं हाय राष्ट्रपती भवन दिल्लीले..चार-पाचशे खोल्या हायेत म्हन्ते."
"चार-पाचशे खोल्या!!! एका माणसाले?? आतमध्ये घुमता घुमताचं दिवस जात अशीनं त्याचा.", गब्ब्यानं आपलं लॉजिक लावलं
"तो एकटाच नाही राह्यतं ना बे..त्याची बायको-पोरं असते,नोकरचाकर,पाव्हणेराव्हने असते तिथं. पोलीस राह्यते गस्तीवरचे."
"फक्त एवढ्यासाठी चार-पाचशे खोल्या?? एवढ्या जागेत तं सारं गाव झोपीन आपलं. अन एवढे कोणचे पाव्हणे असते? खोल्या भाड्यावर चढवून पैसे कमवत असंन थो."
"हे पाय गब्ब्या..ज्यातलं माहित नाही त्यात कायले बोलतं तू ? फॉरेनगिरेनचे पाव्हणे आल्यावर त्याईले काय लॉजमध्ये उतरवतीन का? अन तुले काय त्रास हाय? ते भाड्यावर चढावतीन न्हायतर म्हशी बांधायले वापरतींन खोल्या!!"
"तसं नाही ना बे..म्या आपलं असंच म्हणलं. पन बाकी मजा राह्यतं असंन लेका प्रेषीडेन्टची."
"कायची मजा? बम्म काम असते त्येच्या मागं 
"कायचे कामं बे? बिलावर सह्या करायला किती वेळ लागते सांग बरं. बाकी चहापानी,जेवणगिवन फुकटच राह्यतं आसन त्याले. अन बोअर झाला का चालला बाहेर फिरायले."
"तसं नसते ना बे..जबाबदारी हाय ना डोक्यावर. हे संसदवाले लोकं काय सरके राह्यते का? त्यातील सांभाळावं लागते. अन किती लोकं येत असतींन रोजचे भेटायले. व्यवस्थित राहा लागते. तुयसारखा गबाळ राहून चालते का?", बबन्या ओरडला.
"हाव ते बी हाय म्हणा..बबन्या आपन एक कामं करायचं का?," गब्ब्याले नवीन आयडीया सुचली.
"काय?"
"आपन जाऊन भेटायचं का त्याले?"
"हाव जाऊं ना..आपल्या फाट्यावरून येष्टी डायरेक जाते राष्ट्रपती भवनात. म्याट झाला का बे तू ? दिल्लीले हाय ना तो."
"मंग काय झालं..जाऊ आपन.."
"अन आपल्याला कायले भेटेन तो?"
"काऊन नाही भेटणार..सरपंचाची चिट्ठी घेऊन जाऊ लागन तं."
"बाप्पा बाप्पा..सरपंच जसा जिगरी हाय त्याचा..दोघं सोबतच शाळेत जायचे."
"जिगरी कायले पाहिजे बे? ओळखत तं असंन त्याले."
"अबे दोन-तीन लाख सरपंच हाय देशात. थो काय सरायले ओळखते का? अन आपल्या सरपंचानं कोणते तीर मारले अशे? तालुक्याचा तहसीलदार ओळखत नाही त्याले."
"मंग काय करायचं आता? आपनचं एखांदी चिट्ठी लिहू त्याले की बा आमाले तुमाले भेटायचं आहे!."
"अबे गब्ब्या..तो लय बिझी माणूस असते बे. अन समाज भेटला आपल्याले तं काय बोलायचं त्याच्याशी?'
"काय म्हंजे? त्याले सांगू की बा आम्ही या गावचे आहो अन तुमाले पाहाले आलो."
"अन पुढं काय? जन गनं मन म्हणून वापस यायचं?"
"हाव...", गब्ब्या म्हणाला
"दोन लाता घालतीन आपल्या कंबरड्यात तिथले पोलीस!!"
"काऊन बे?"
"काऊन म्हंजे..चूप ऱ्हाय तू..फालतू गोष्टी करतं नुसत्या."
"चिडू नको ना बे..बरं ते जाऊ दे..मले एक सांग...", गब्ब्याले आणखीन काहीतरी सुचलं.
"आता काय?"
"तू म्हणाला की प्रेषीडेन्ट सगळ्यात मेन माणूस ऱ्हायते....."
"हो मंग..."
"पन थो जर मेन ऱ्हायते तं त्याले निवडते कोन?",गब्ब्याले प्रश्न पडला.
"कोन म्हन्जे? हेच संसदवाले निवडते."
"संसदवाले?"..
"मंग थो का गावचा सरपंच हाय का तुले इचारून निवडायले?"
"तसं न्हाय ना बे..संसदवाले त्येच्या हाताखाली असते. त मंग संसदवालेचं त्याले कसं काय निवडतीन?"
"तुले काय त्रास हाय पन?"
"अबे मंग ते तं त्याईचाच सोयरा निवडतीन..काय अर्थ ऱ्हायला मंग त्याले?", गब्ब्या ओरडला.
"तसं नसते ना बे गब्ब्या."
"मंग कसं असते?"
"हे पाय आता..तू अन मी दोघंही आपापल्या बायकोले घाबरतो ना?", बबन्यानं ट्रॅक बदलला.
"त्येचा काय संबंध इथं?"
"तू घाबरतं का नाही ते सांग?", बबन्याने विचारलं.
"हाव घाबरतो ना."
"हा आत्ता कसं बोलला..पन तिले निवडलं पन तूच ना??"
"हाव लेका..हे खरंय...",गब्ब्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
"मंग तसंच ऱ्हायते ते...!!"

बायकोच्या आठवणीने गब्ब्या गार पडला. अन बबन्यानं प्रेषीडेन्ट विषय संपवला.

समाप्त..

Saturday, 17 June 2017

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!
      तसे मला बरेच प्रश्न नेहमीच पडतात. त्यातले काही विचारण्यासारखे असतात तर काही नसतात. काहींची उत्तरे असतात पण ती देण्यासारखी नसतात. आणि ज्यांची उत्तरे देण्यासारखी असतात ती मला समजण्यासारखी नसतात. म्हणूनच शेवटी मी आणि माझे प्रश्न आहेत तिथेच राहतात. मनाच्या समजुतीसाठी  मी आपला "तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे" आणि "ठेविले अनंते तैसेची राहावे" या ओव्या गुणगुणत असतो. (आता तैसेची राहावे म्हणजे कैसेची राहावे हासुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो हा भाग वेगळा!)

पण सध्या एक अजब प्रकार सुरु आहे. प्रश्नांचेसुद्धा सिक्वेल येत आहेत. त्याच प्रश्नांच्या मालिकेचा उहापोह करण्याचा हा एक प्रयत्न.

       कसंय की विजेचं भारनियमन आणि आमचा शैक्षणिक अंधार यांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये हे मान्य! कारण अद्वितीय आकलनशक्तीमुळे आमच्या ज्ञानाची कवाडे सतत दिव्याखाली अंधार या परिस्थितीत असायची.त्यामुळेच भारनियमन असून नसून काही विशेष फरक पडणार नव्हता. पण प्रश्न असा आहे की, जिथे काहीही केल्या आमची मजल साठ-सत्तर मार्कांच्या पलीकडे जात नव्हती तिथे आज १४३ मुलांना १०० टक्के मार्क पडतात तरी कसे? म्हणजे अशी काय अमूलाग्र सुधारणा आपल्या शिक्षणपद्धतीत झाली आहे? थोडी चौकशी केल्यावर कळलं की,एक सुधारणा म्हणून आजकालच्या परीक्षा या जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेतल्या जातात. म्हणजे एका प्रश्नाला उत्तर म्हणून चार पर्याय, त्यातला एक बरोबर निवडायचा वगैरे वगैरे. शिक्षकांच्या शपथेवर सांगतो आम्ही या पद्धतीनेसुद्धा दिवेच लावले असते. कारण ही पद्धत म्हणजे 'चुकीला माफी नाही' या प्रकारातली आहे. आणि आम्हाला चुकण्याशिवाय पर्यायच नाही!! त्यामुळेच सर्व उपलब्ध पर्यायांची चाचपणी करता करता परीक्षेची वेळ संपली असती.

यावरून आम्ही किमान पास तरी व्हावे यासाठी आमच्या शिक्षकांनी केलेले प्रयत्न आणि सांघिक कामगिरीने आम्ही त्याचा उडवलेला फज्जा या सगळ्या गोष्टी मला आठवल्या.

     आमच्यावेळी वर्गातल्या पोरांचं लक्ष जरातरी अभ्यासाकडे वळावं म्हणून मुलींची शाळा सकाळी आणि मुलांची दुपारी असे छोटेमोठे बदल केल्या जायचे.तरीसुद्धा आमच्या वर्गातली पोरं कार्यानुभव,एनसीसी वगैरे फालतू विषयांसाठी सकाळपासून शाळेत जाऊन बसायची. एवढंच काय तर पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जातो असं सांगून, शाळेत आपापले 'पक्षी' टिपत बसायचे. त्यामुळे या छोट्यामोठ्या सुधारणा आमच्या आधीच सुधरलेल्या पोरांसाठी काहीही उपयोगात आल्या नाहीत. आणि आजकाल तर मुलं मुली एकाच बाकावर बसतात म्हणे. तरीसुद्धा शंभर टक्के?? आमच्या शिक्षकांचं नशीब थोर म्हणून ही असली थेरं आमच्यावेळी केली नाहीत. पोरांनी 'कोणत्या' विषयात शंभर टक्के 'कामगिरी' केली असती काही नेम नाही! आमच्यापेक्षा एक वर्ष सीनीअर असलेल्या पोरांसाठी  केलेली आणखी एक सुधारणा म्हणजे वर्गातल्या काही गुणवत्तावान विद्यार्थाना निवडून, शिक्षक त्यांच्यावर जास्ती मेहेनत घ्यायचे. आता एखाद दुसरा अपवाद वगळता हा खरं म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार होता. कारण आम्ही सगळी गुरंढोरं एकाच शेतात राबवायच्या लायकीचे होतो.आमच्यावेळी हा प्रकार बंद झाला कारण गुणवत्तावान विद्यार्थी शोधण्यातच शिक्षकांना जास्त मेहनत करावी लागणार होती. ट्रायल अँड एरर करता करता परीक्षा तोंडावर आली असती. शेवटी शिक्षकांनी एक अभिनव मार्ग शोधला. हुशार मुलं निवडण्यापेक्षा 'ढ' मुलं निवडली. आता या गटासाठी उमेदवारांची कमी नव्हतीच. इथे माझी इतक्या वर्षांची अविश्रांत मेहनत फळाला आली. आणि मोठ्या दिमाखात मी त्या गटात प्रवेश केला. अक्षरश: हाऊसफुल होऊन सुरु झाले हे वर्ग!  मग पालक-शिक्षक मिटींग्स वगैरे होऊ लागल्या.  प्रत्येक मीटिंगमध्ये 'हुशार खूप आहे हो तो,पण अभ्यासाचं करत नाही' ह्यावर दोन्ही पक्षांचं एकमत व्हायचं.( त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर ह्याच  वाक्याचं स्वरूप 'भारताने ठरवल्यास, २०२० मध्ये भारत ही एक महासत्ता असेल' असं असायचं!) शेवटी शिक्षकांच्या अथक प्रयत्नांना यश आले. आणि २०२० च्या होऊ घातलेल्या भारतीय महासत्तेत आणखी एका सुशिक्षित अज्ञानवीराची भर पडली.

इथून प्रश्नाचा दुसरा भाग सुरु होतो. आमच्या अज्ञानाच्या अमर्यादित कक्षेचं अस्तित्व आम्ही मान्य केलं आहे. असं असताना,

ज्यांनी कधीकाळी आम्हाला फाटकातून आतमध्येही घेतलं नसतं त्या बिट्स पिलान्या अन  कोपऱ्याकोपऱ्यातल्या मॅनेजमेंट इंस्टीटयूटा आजकाल मेल पाठवू पाठवू ऍडमिशन घ्या म्हन्तेत बा!!

      ह्यांचं स्टॅंडर्ड घसरलं का आमचं वाढलं तेच कळत नाहीये. ती दिल्लीतली एक नॅशनल इन्स्टिट्यूट तर माझ्या हयातीत किंवा मरणोत्तर मला डॉक्टरेट दिल्याशिवाय राहणार नाही असं दिसतंय.दोन-चार वेळा फोन टाळल्यावर एकदा त्या बाईशी मी डिट्टेलमध्ये बोललो. तिच्या मते, डिग्री मिळवायला कॉलेज,लेक्चर,प्रोजेक्ट,अभ्यास यागोष्टींचे बागुलबुवे उगाचच उभे केले आहेत. आता यापैकी डिग्री मिळवायला फारसा अभ्यास करावा लागत नाही ह्या वाक्याशी मी आणि माझे कुटुंबीय बिनशर्त सहमत होतील. पण लोकलज्जेखातीर इतर अनेक गोष्टी कराव्याच लागतात हा स्वानुभव आहे. तर ती बया म्हणे, एकदा पैसे भरले की सहा-सात महिन्यात डिग्री घरी येईल. याउपरही जर मला लेक्चर वगैरे हवेच असतील तर डिस्टन्स लर्निंगची व्यवस्था आहे म्हणे. पण तिच्या मते, व्हाय टू वेस्ट टाइम? आम्ही एका डिग्रीसाठी आयुष्यातले वीस-बावीस वर्ष कशाला वाया घालवले तेच कळत नाही. कारण ज्ञानाचा अंधार तर दोन्हीकडे आहेच. कसं होतंय की, शिक्षणपद्धतीवर टीका करणे हा आमचा आवडता टाईमपास आहे. पण इथे नेमकी टीका कोणावर करावी हेच कळत नाहीये. शिक्षणाचा बाजार झालाय वगैरे गोष्टी तर लहानपणापासून ऐकत आलोय. पण हे म्हणजे पार डी-मार्ट,वॉलमार्टच्या पातळीचं होलसेल मार्केट झालं की हो! अरे एखाद्या डॉक्टरला डिस्टन्स लर्निंगने सर्जरी शिकवायलासुद्धा हे लोक मागेपुढे पाहणार नाही उद्या. एकेकाळी बिट्स पिलानी वगैरे आमच्यासाठी तीर्थक्षेत्रे होती. आता हळूहळू ते पिकनिक स्पॉट होतील का काय अशी शंका वाटते.

आता कल्पना करा,बिट्स पिलानीमध्ये त्या शंभर टक्केवाल्या मुलांच्या शेजारी जर आमच्यासारखे सेल्फ्या घेत उभे राहिले तर काय होईल?? त्या बिचाऱ्यांना 'याचसाठी केला का अट्टाहास' असा प्रश्न पडेल. खरं सांगू का, ह्या एकशे त्रेचाळीस मुलांच्या मार्कांची बेरीज केल्यास, तेव्हढ्या मार्कात आमची अख्खी पिढी पास झाली हे लक्षात येईल. आणि जर चुकून, त्यांच्या आणि आमच्या मार्कांची वजाबाकी केली तर लांबलचक जनरेशन गॅप दिसेल. म्हणून मी तर आजकाल देवाकडे एकचं गोष्ट मागतो.

"परमेश्वरा,माझ्या प्रश्नांचं तू लोड घेऊ नको. त्यांची उत्तरं नाही मिळालीत तरी चालतील.पण ही जनरेशन गॅप वाढत चाललीये. पुढेमागे आम्हाला तोंड लपवण्यापुरती तरी गॅप मिळू दे रे बाबा!!"


-- चिनार

Tuesday, 30 May 2017

टार्गेट्स आणि स्ट्रेस!

"आजचा सेशन ऐकून एक गोष्ट तर नक्कीच कळली यार.", सतीश हातातल्या कॉफीचा घोट पीत म्हणाला
"कोणती गोष्ट रे? “, अमितने विचारलं.

"माणसाचं पोट भरलेलं असलं ना की या गोष्टी बोलायला सुचतात यांना."

"कोणत्या गोष्टी? आता तू नको पकवू यार."

"ह्याच रे...बी पॉझिटीव्ह, डोन्ट वरी बी हॅपी वगैरे वगैरे.", सतीशचा आवाज थोडा वाढला.

"नेमकं काय म्हणायचंय तुला? थोडा थोडा अंदाज येतोय मला."

"अरे हे बघ..हे स्ट्रेस रीलिव्हिंग सेशन कोणी अरेंज केलं? आपल्या एचआरवाल्यांनी...बरोबर?. आणला कोणीतरी पकडून भाषण ठोकायला. ह्यांच्या बापाचं काय जातं रे टेन्शन घेऊ नका वगैरे म्हणायला.एक दिवस आमच्या  सेल्स किंवा एक्झेक्युशन टीममध्ये काम करून बघा आणि बिना स्ट्रेस राहून दाखवा म्हणावं."

"बरोबर आहे तुझं. पण ते भरल्यापोटी वगैरे काय म्हणत होता तू?"

"अरे आता बघ, तो ट्रेनर आला आपल्याला शिकवायला. पैसे तर घेतले असतीलच त्याने. आज आपल्याकडून उद्या दुसऱ्याकडून. आपल्याच मजल्यावर सहा-सात कंपन्या आहेत. आपल्यासारखे स्ट्रेसवाले बकरे भरपूर सापडतात यांना. ह्यांचं दुकान जोरात चालतंय. मग भरल्यापोटी स्ट्रेस रीलिव्हिंगचे सल्ले द्यायला लागताच काय?"

"हो..हे बघ मला तर फार बोअर झालं ते सेशन. पण एक सांगू का? तो काही चुकीचं सांगत नव्हता रे. आपण उगाच जास्त टेन्शन घेतो असं मलाही वाटतं. त्याने ते उदाहरण नाही का दिलं चहा-साखरेचं काहीतरी. ते पटलं मला.", कॉफीत थोडी अजून साखर टाकताना अमित म्हणाला.

"बस बस..हीच उदाहरणं सुचतात यांना. त्याच काय म्हणणं आहे, की चहा करताना जर घरातली साखर संपलीये असं दिसलं तर कितीही चिड्चीड केली तरी काय उपयोग? शेवटी साखर आणावीच लागणार ना. मग साखर कधीतरी संपणारच असा विचार करावा आणि सरळ दुकानात जावे. वा!! क्या बात हैं!!."

"मग बरोबरच आहे ना?"

"घंटा बरोबर आहे!!! इतकं साधंसरळ नसतं रे. घरातली साखर संपल्यावर आधी बायको चिडणार की चार दिवस सांगते आहे साखर आणा म्हणून, लक्ष कुठं असतं तुमचं?? मग साखर आणल्यावर आधीच झालेल्या भांडणामुळे चहा गोड नाही लागणार!! आणि मुळात हे चहा-साखर काय घेऊन बसलात रे तुम्ही? दोन दिवस चहा नाही पिला तर काय फरक पडतो?? नोकरीत तसं नसतं रे. आता मी सेल्समध्ये आहे. एक महिना मी ऑर्डर नाही आणल्या तर बॉस म्हणेल का डोन्ट वरी बी हॅपी!!!", सतीश आता चिडला होता.

"हे बघ तू एकदम टोकाचं बोलतोय. टेन्शन घेऊ नका म्हणजे काय रिकामे बसून राहा असा अर्थ होत नाही मित्रा. एक महिना तू ऑर्डर आणणार नाही असे कसे चालेल? त्याच म्हणणं असंय की, आपण जे टार्गेट्सचं टेन्शन घेतो ना ते घेऊ नये. टार्गेट्स कधी पूर्ण होतात कधी नाही हे मान्य करावं."

"फक्त मी मान्य करून चालतं का? मी तुला एक सिनॅरिओ सांगतो. अगदी आपला नेहमीचाच. त्यात हे डोन्ट वरी बी हॅपी कसं बसवायचं ते सांग बरं का!!"

"कोणता सिनॅरिओ?", अमितने विचारलं.

"महिन्याच्या एक तारखेला मी सेल्स मीटिंगमध्ये छाती ठोकून सांगतोय की मी यंदा चार कोटींचा धंदा आणणार. आपल्या बॉसने तोंड वाकडं करून त्याचं सहा कोटी केलं. वीस-बावीस तारखेपर्यंत मी तीन कोटींच्या ऑर्डर बुक केल्या. शेवटच्या आठवड्यात चार कोटींची मोठी ऑर्डर मिळणार हे मला माहिती आहे. अगदी क्लायंटच्या एमडीने मला तसं कन्फर्म केलंय. मग मी आपला टेन्शन घेता काही छोट्या-मोठ्या ऑर्डरींच्या मागे लागलोय. एकोणतीस तारखेला ती ऑर्डर दुसऱ्याला गेल्याचं कळते. आता काय करायचं?? डोन्ट वरी बी हॅपी!!"

"अरे मग तुझं टार्गेटच चुकलं होतं ना."

"माझं नाही मॅनेजमेंटचं!! आणि त्यांचंही काय चुकलं सांग? त्यांच्यावरती कंपनीचे मालक आहेत..प्रमोटर्स आहेत. आणि या सगळ्यांचे आपापले टार्गेट्स आहेत. मी म्हणतो, या सगळ्यांना बसावा ना त्या स्ट्रेस रीलिव्हिंग सेशनमध्ये. तुला कळतंय का, स्ट्रेस निर्माण करणारे हे लोकं आहेत आणि स्ट्रेस रिलीव्ह करणारा तो ट्रेनर आहे. आणि दोघेही सुखात आहेत. पण स्ट्रेस भोगतोय कोण?? तू आणि मी"

"अरे पण कंपनी काहीतरी करते आहे ना आपल्यासाठी.", इति अमित

"काय करते आहे? हे म्हणजे दुष्काळात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवण्यासारखं आहे!!"

"मग तुझ्या मते काय करायला हवं?"

"आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवा रे. चांगलंच आहे ते. पण आधी लिव्हेबल वातावरण तरी तयार करा."

"चल केलं तू म्हणतोस तसं वातावरण तयार. पुढे काय?"

"मग हळूहळू परिस्थिती बदलेल. स्ट्रेस कमी होईल आपल्यावरचा.", सतीश ठामपणे म्हणाला.

"पण पुढे काय?"

"पुढे हेच आपलं..."

"हेच म्हणजे?"

"हेच रे..स्ट्रेस कमी होईल. शांतता मिळेल. समाधान मिळेल वगैरे वगैरे."

"पण तुझ्या वैयक्तिक टार्गेट्सचं काय?"

"कोणते टार्गेट्स आता?"

"तुला प्रमोशन हवंय..तुला पगारवाढ हवीये..परदेशात जायचंय ...त्याचं काय?", अमितने विचारलं.

"मग तो माझा प्रॉब्लेम असेल ना..मी करेल जास्त काम..मी वाढवेल  माझे टार्गेट्स."

"म्हणजे परत तेच."

"तेच कसं? हे माझ्यापुरतं ना!"

"का? मलाही हवंय प्रमोशन..मी सुद्धा वाढवेल माझे टार्गेट्स. मग सुरु आपल्यात स्पर्धा."

"म्हणजे परत स्ट्रेस?"

"हो अर्थातच."

"मग ह्यावर इलाज काय?"

"इलाज त्या ट्रेनरने सांगितलाय. तो तुला मान्य नाही."

"कोणता इलाज?"

"थोडक्यात सांगायचं तर...ट्रेनर म्हणतोय स्वतःला बदला. आणि तू म्हणतोय की जगाला बदला. जास्त सोपं काय आहे?", अमित हसून म्हणाला.

"............................................................." सतीश बोलता बोलता थांबला.

"हे बघ तू विषय काढला म्हणून सांगतो. आपल्याला हवंय म्हणून आकाश खाली येणार नाही. आता त्यासाठी किती उंच उडी मारायची हे ज्याचे त्याने ठरवावे. आपण दुसऱ्यांच्या उड्या मोजत बसतो हा खरा प्रॉब्लेम आहे.
आपल्या भाषेत सांगायचं तर, नोकरी किंवा काम करण्याला पर्याय नाही. पण कश्यासाठी आणि कोणासाठी हे पक्कं असायला हवं."

"हे बघ ही सगळी फिलॉसॉफी झाली. नोकरी करण्याला पर्याय नाही म्हणतोस ना. तो माझा मगाचा सिनारियो घे. आणि सांग काय करायचं."

"'नाही' म्हणायला शिक!!"

"म्हणजे?"

"चार कोटींचं सहा कोटी केलं ना त्याने. त्याला सांग चार कोटी नक्की करणार. उरलेले दोन कोटींची जबाबदारी आपल्या दोघांची."

"त्याने ऐकले नाही तर?"

"किती वेळा ऐकणार नाही?"

"तो भाषण देतो रे..यू कॅन डू इट वगैरे."

"तो बोलणारच ना...तू बळी पडू नको."

"म्हणजे माझ्यात हिंमत नाही हे सिद्ध होणार."

"चार कोटींच्या ऑर्डर आणायला हिंमत लागत नाही का? हिंमत आणि महत्त्वाकांक्षा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इथे चार कोटी ही हिंमत आहे आणि सहा कोटी ही महत्त्वाकांक्षा!"

"मग नसावी का माणसाला महत्त्वाकांक्षा?"

"असावी ना...पण ती स्वतःची!! दुसऱ्याने सांगितलेली नव्हे."

"थोडक्यात दबावापुढे झुकायचं नाही."

"हो..त्यालाच खरी हिंमत म्हणतात."

 "पण अश्याने टीमवर्क होणारच नाही ना."

"एकोणतीस तारखेला जेंव्हा ऑर्डर मिळाल्यामुळे तू एकटा शिव्या खातोस तेंव्हा टीमवर्क कुठे जातं? फार गोंडस शब्द आहे हा टीमवर्क!!", अमित हसून म्हणाला.

"गोंडस म्हणजे?"

"म्हणजे सोयीनुसार येतं हे टीमवर्क! सहा कोटी झाले की टीमवर्क... आणि नाही झाले की तू एकटा."

"मग हेच तर होते ना सगळ्या बाबतीत."

"तेच सांगतोय मी मगापासून तुला...कंपनी,टार्गेट्स हे सगळं असणारच आहे. ह्या सगळ्यात तू कुठे राहणार हे महत्वाचं. हे असले गोंडस शब्द, भाषणं,स्पर्धा ह्याला बळी पडू नये असं मला वाटते. बाकी स्वतःच्या मेहनतीने जेवढं शक्य असेल तेव्हढं करावं."

"पण एक गोष्ट विसरतो आहेस तू? माझी क्षमता,स्किल ह्याविषयी काय?"

"काय त्याविषयी?", अमितने विचारलं.

"हे बघ मार्केटिंग,सेल्स हे माझं स्किल आहे. ते जर मी थोडं स्ट्रेच करून पूर्ण वापरणार नाही तर काय उपयोग त्याचा?"

"आता मला परत थोडी फिलॉसॉफी सांगावी लागेल."

"सांग..काही प्रॉब्लेम नाही"

"गोड असणं हा उसाचा गुणधर्म आहे बरोबर?"

"हो"

"मग त्याला मशीनमध्ये जास्त वेळ पिळून त्याचा रस काढला तर तो जास्त गोड लागतो का?"

"असं काही नाही."

"मगच तेच तुझ्या-माझ्या स्किल बद्दल सुद्धा लागू नाही होत का? म्हणजे बघ सहा कोटी केलं तरच तुझं स्किल आणि चार कोटी केलं तर तो योगायोग?"

"नाही..ते सुद्धा स्किल आहेच!!"

"मग झालं तर."

"यार तू तर त्या ट्रेनरपेक्षाही चांगलं बोलतोस. तू पण ट्रेनिंग देणं सुरु कर.",सतीशने अमितला टाळी दिली.

"नको..तुझ्यासारखे दोन-चार भेटले तरी खूप झालं...चला काम करू आता!"


-- समाप्त